रामजन्मभूमी झटपट जमीन खरेदीत दोन कोटींची जमीन १८ कोटींना खरेदी करण्याचा ‘व्यवहार’ काही मिनिटांत झाला!
– सब का साथ, सब का विकास म्हणतात तो हाच!
ड्रायव्हरची डुलकी घालवणारं सॉफ्टवेअर लवकरच बाजारात येणार…
– मागच्या सीटवर बसलेली बायको, तोंडावर पाण्याचा हबका आणि एक कप कडक चहा या ‘हार्डवेअर’च्या बरोबरीचं आहे का ते?
‘आप’ची घोषणा- मिशन गुजरात- विधानसभेच्या सर्व जागा लढवणार…
– काही म्हणा, केजरीवाल डेअरिंगबाज, वाराणसीतही भिडलेच होते की! आता घरात घुसतायत थेट.
कोरोना रूग्ण आजूबाजूला असल्यास अलार्म वाजणार, १५ मिनिटांत अॅलर्ट मिळणार, ब्रिटिश वैज्ञानिकाचं संशोधन
– आपल्याला काय उपयोग त्याचा- आपल्या बस आणि लोकलमध्ये त्यांच्या आवाजापेक्षा अलार्मचा आवाज मोठा वाजत राहील प्रवासभर!
ठाण्यात गुप्तीने वाढदिवसाचा केक कापणार्या बर्थडे बॉयला अटक
– असं काय ते वागणं पोलिसांचं… हवं तर तुम्हाला खाऊ घालण्यासाठी दुसरा केक कापायला लावायचा ना त्याला!
चिनी शिक्षकाने बहुपत्नीत्वाचं समर्थन केलं, नोकरी गमावली
– जास्त मुलं जन्माला घालायची तर कामाची विभागणी करायला नको का! एकाच बायकोवर किती भार टाकायचा?
३९ बायका, ९४ मुलं आणि ३३ नातवडं असलेल्या जगातल्या सगळ्यात मोठ्या कुटुंबाच्या प्रमुखाचं निधन
– ‘त्यांच्या निधनाने सगळ्या गावावर शोककळा पसरली’ हे वाक्य या माणसाच्या बाबतीत खरं ठरतं… सगळं कुटुंब मिळूनच एक गाव झालं असेल…
केंद्राची जिओ पारसी योजना फलदायी- कोरोनाकाळात ६१ बालकांचा जन्म
– कोरोना पावलाच म्हणायचा बावालोकांना!
घरोघरी जाऊन कोरोना लसीकरण करण्यास केंद्राचा विरोध कायम
– इथून पुढे पोलिओची लसही अॅपवर नोंदणी करून पैसे देऊन खासगी हॉस्पिटलात घ्यायला लावली नाही म्हणजे मिळवली!
देशद्रोहाच्या आरोपामुळे कंगनाचं पासपोर्ट नूतनीकरणाचं काम रखडलं…
– नशीब हा विभाग केंद्राच्या अखत्यारीत आहे आणि बाईंना ट्विटरने हाकललंय!
महाराष्ट्राने कोरोनास्थिती उत्तम प्रकारे हाताळली; नोबेल पुरस्कारविजेते अर्थशास्त्रज्ञ अभिजीत बॅनर्जी यांच्याकडून कौतुक
– अरे देवा, आता काही दिवस बॅनर्जींना भू भू भुंकणं ऐकावं लागणार पगारी फौजेचं.
२०२४मध्येही मोदीच पंतप्रधान होतील- देवेंद्र फडणवीस
– हल्ली पहाटे झोपू लागलेत की काय? स्वप्नं छान पडतायत.
फेसबुकवर फसव्या जाहिरातींचा फास; सायबर भामट्यांचा धुमाकूळ
– वाचण्याचा उपाय सोपा आहे- फेसबुक असो की कोणतंही इतर समाजमाध्यम- विक्रेता अनोळखी असेल तर सीओडी म्हणजे कॅश ऑन डिलिव्हरीचाच पर्याय निवडायचा… तो ज्यांच्याकडे नाही, ते भामटे आहेत हे निश्चित.
टाळेबंदीच्या काळात पत्नींनी नवर्यांचा छळ केल्याच्या १३० तक्रारी दाखल
– त्यात तक्रार काय करायची? स्त्री-पुरुष ‘समानता’ प्रस्थापित होत असल्याचं लक्षण आहे हे.
जी-७ राष्ट्रांचा चीनवर दबाव- कोरोना कुठून आला ते खरं सांगावं…
– या दबावाला भीक घालेल तो चीन कसला!
कुंभमेळ्यातल्या लाखापेक्षा अधिक कोरोना चाचण्या बोगस; उत्तराखंड सरकारची चालबाजी
– राम तेरी गंगा मैली हो गयी, इन पापीयों के पाप ‘ढोते ढोते’…
लोकप्रतिनिधींना फ्रेंच-रशियन भाषा शिकवली जाणार, देशीविदेशी भाषांचं शिक्षण दिलं जाणार…
– ते कोणत्याही भाषेतले असोत, त्यांना एक प्राचीन भारतीय भाषा अवगत असतेच म्हणे- ‘पैशाची’ भाषा!
पश्चिम बंगालमध्ये भाजप फुटीच्या उंबरठ्यावर
– मुळात इकडे तिकडे हात मारून भोजनभाऊ गोळा केले की पक्ष बनतो का?
पाकिस्तानात गाढवे वाढली, गाढवांच्या संख्येत जगात तिसर्या क्रमांकावर
– दोन पायांची पण मोजली की काय चुकून?
४३ टक्के भारतीयांची चिनी वस्तूंकडे पाठ
– मोबाइल वापरतात ना अजून? ते देशी बनावटीचे आहेत की काय संपूर्ण? खरोखरच बहिष्कार घालायचा तर मोबाइलसह अनेक वस्तूंचा वापर पूर्ण बंद करायला लागेल. तोवर दिल को खुश रखने को ये खयाल अच्छा है…
कोरोनामुळे घरोघरी स्वयंपाकघरात शिजू लागले सकस, पौष्टिक पदार्थ
– टाळेबंदी उठू द्या, आम्ही पुरेपूर बॅकलॉग भरून काढू कदान्नाचा.
मिरवणूक काढायला तुम्ही सेलिब्रिटी आहात का; न्यायालयाचा गजा मारणेला सवाल
– गर्दी करणार्यांसाठी तो सेलिब्रिटीच आहे हे कटु वाटलं तरी वास्तव आहे.