टॉवेल ठेवला का?
एका मित्राने दुसर्या मित्राला विचारले-
`टॉवेल ठेवला का?’
म्हणजे?…
अरे टॉवेल, कळत नाही का?
अरे कळतं की…
पण टॉवेल म्हणजे काय?
ठेवला म्हणजे काय?
अरे टॉवेल ठेवला का?
अरे नीट बोल ना…
तू मराठी माणूस आहेस ना…
हो..
मग मी तुला तेच विचारतो… की `टॉवेल ठेवला का?’
`….?’
`…..?’
अरे बाबा, जोपर्यंत बायको बाथरुमध्ये टॉवेल ठेवत नाही…
तोपर्यंत मराठी माणूस जागचा हालत नाही…
वर्तमानपत्र वाचत बसतो…
तर तुझी आंघोळ झाली का? हे विचारायचं होतं मला…
अरे हो…
बघतो टॉवेल ठेवला का ते…
आणि हे बघ, आता इथून पुढे तू सगळ्या मित्रांना विचारत जा…
काय…?
हेच विचार `टॉवेल ठेवला का?’
अरे पण रोज रोज कशाला विचारू…
अरे लॉकडाऊन आहे ना…
वेळेचा सदुपयोग कर…
आळस सोडून दे…
विचार मित्रांना…
काय…?
`टॉवेल ठेवला का?’
—
जीभ
ना ना तर्हा
ना ना घोटाळे
जीभ सैल
ना ना वाटोळे
जीभ तारी
जीभ मारी
जीभ
पक्षाचीच वैरी
—
सूत्राच्या शोधात
तो टीव्ही चॅनेलवरील प्रसिद्ध अँकर अनेक दिवस दिल्लीत राहिल्यानंतर पुन्हा मुंबईत आला आणि मुंबईत येताच त्याने ‘सूत्राच्या आधारे’ असं म्हणत म्हणत एक कपोलकल्पित बातमी सोडली. संध्याकाळी चॅनेलवर त्या बातमीसंदर्भात चर्चा ठेवली. कपोलकल्पित बातमीवर सर्व पक्षांचे प्रवक्ते एकमेकांशी झुंजत होते आणि चॅनेलचा टीआरपी वाढत होता.
अँकर खूष झाला. खुशीतच ऑफिसमधून तो घरी आला, बेल वाजवताच त्याच्या पत्नीने दार उघडले. आत जाताच त्याचा पहिला प्रश्न, चर्चा कशी वाटली?
पत्नी म्हणाली, सुंदर.
तो म्हणाला, अगं, कसली सूत्रं आणि कसलं काय, कपोलकल्पित बातमीवरच सगळे बोलत होते, भडाभडा ओकत होते.
इतक्यात त्याच्या बायकोला ओकारी आल्यामुळे ती बाथरूममध्ये गेली.
अँकरला वाटले की बहुतेक तिची तब्येत बिघडली असावी. म्हणून त्याने तिला विचारलं, तुझी तब्येत ठीक नाही का? डॉक्टरकडे जायचंय का?
ती म्हणाली, तुम्हाला सूत्रांनी नाही सांगितले?
तो म्हणाला, काय?
अहो, सूत्र तुमच्याशी काही बोललं नाही?
कशासाठी?
मग ती लाजत म्हणाली, तुम्ही बाप होणार आहात.
आणि अँकर सूत्राच्या शोधात निघाला.