तसा मी प्रत्येक पावसाळ्यात मनाने कुठंतरी अडकतोच, पण तसा शरीराने पण अनेकदा अडकलो आहे. आणि ते अडकणं एन्जॉय पण केलंय लय.
खुप्पूप वर्षांपूर्वी जेव्हा एखादी आरजे मुंबईतल्या पावसावर फालतू गाणी करत नसे, तेव्हा मी माझ्या एका मैत्रिणीला (?) माहीम स्थानकात भेटायचं ठरवलं. माहीमच का? तर मी राहात होतो गोरेगावला आणि ती किंग्ज सर्कलला. म्हणजे ती हार्बर लाईनवर आणि मी ‘पाश्चिमात्य’ (म्हणजे पश्चिम रेल्वेवरचा- हा खुलासा मुंबईकरेतरांसाठी). तर तिला भेटायला मी नेहमीप्रमाणे वेळेत पोहोचलो आणि वाट बघत उभा राहिलो. माहीमला हार्बरच्या लोकल्स तेव्हा पण हवामान खात्याचा अंदाज अचूक यावा तशा येत. एक ट्रेन आली.. गेली.. दुसरी आली.. गेली.. पण ती काही आली नाही. तिचं असंच असायचं. पण आज मात्र ती यायच्या आधी तुफान पाऊस मात्र आला. म्हणजे सेनाभवनासमोर आंदोलन करायला आलेल्यांसारखा पचपचीत नाही, सेनेच्या दसरा मेळाव्यासारखा दणक्यात. तेव्हा भ्रमणध्वनी नव्हते आणि तिच्या घरी दूरध्वनी पण नव्हता. मला काळजी वाटू लागली. तिच्या घरी जाऊन चौकशी करण्याशिवाय तरणोपाय नव्हता. आणि तोवर माहीम स्थानक पण तरण तलाव होऊ लागलं होतं. लोकल पण बंद झाल्या होत्या. मग मी माहीम ते किंग्ज सर्कल हे अंतर रूळावरून सरकत सरकत चालत निघालो. कधी कुठला होल मला आपलासा करेल आणि मी वरळीला बाहेर पडेन याची पोटात भीती. पण म्हणतात ना ‘प्रेमातुराणां न भयं न लज्जा’. मला कोकणातल्या ओढ्यात मासे पकडायला चालायची सवय असल्यामुळे मी स्वत:ला ओढत ओढत तिच्या घरापर्यंत पोहोचलो.
बघतो तर काय? तिच्या घराला कुलूप.
शेजारी विचारलं तर त्यांनाही ते कुठं गेलेयत ते माहित नाही. म्हणजे ती बाहेर कुठतरी अडकली की काय? आणि तिला शोधायला तिच्या घरचे बाहेर पडून ते पण कुठेतरी अडकले की काय? आता माझ्या घरचे मला शोधायला बाहेर पडून ही अडकाअडकी वाढवण्यापेक्षा मी चालत चालत किंग्ज सर्कलवरून गोरेगावला पोहोचलो तेव्हा रात्रीचे आठ वाजले होते आणि माझ्या नाकी नऊ आले होते. माझ्या पायांचा लगदा झाला होता. पण कागदावर एक कविता मात्र उमटली.
ती अशी.
‘भर पावसात तिजसंगे चिंब भिजण्याची आस तीव्र होती,
पण हाय… प्रियेची माझ्या लाईन हार्बर होती!’
– राजेश देशपांडे
लेखक, दिग्दर्शक