तोंडाचा पट्टा चालवत लष्कराच्या भाकरी भाजणे हे मावशींचे नेहमीचे काम. कुठल्या तरी गार्डची नोकरी सुटली तर त्याला दुसरी नोकरी शोधून दे. बायकांना कामवाल्या बायका मिळवून दे. काम सुटलेल्या बायकांना कुठेतरी काम मिळवून दे. अशी कित्येक कामे चंद्रा मावशी एकट्याच करत असत.
– – –
पुण्यातील आमच्या या शांतिप्रसाद गृहनिर्माण सोसायटीमध्ये राहायला येऊन आम्हाला पुष्कळ वर्षं झाली. सुरुवातीची काही वर्षे आमच्याकडे एक तरुण मुलगी कामाला होती. लग्न झाल्यावर ती काम सोडून गेली. ऑफिसच्या धकाधकीत मावशी शोधणे अवघड झाले होते. पण सोसायटीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर काहीही लगेच प्रसारित होते. त्यामुळे आम्हाला घरकामाला मावशी हव्या आहेत ही बातमी वार्यासारखी सगळीकडे पसरली. कित्येक ‘स्थळं’ येऊन गेली. स्थळं म्हणण्यासारखीच परिस्थिती झाली होती. कारण घरकाम करता येणे एवढीच आमची अट असली तरी कामाला येणार्या बायकांच्या कित्येक अटी होत्या. घरात माणसे किती, पाळीव प्राणी आहेत का, किती स्क्वेअर फुटांचे घर आहे, लहान मुले आहेत का, सगळी माणसे घरात किती वेळ असतात, किती लोकांचे घरून काम असते असे सगळे प्रश्न विचारणार्या शिस्तशीर मुलाखती त्या बायकांनी घेतल्या. कित्येकजणींनी कित्येक निकषांवर आम्हाला निकृष्ट दर्जाचे ठरवले. काहीजणींनी कसेबसे कामाला येण्याची तयारी दाखवली, पण आमची वेळ जमू शकली नाही.
एके दिवशी चारजणींना दिवसभरात भेटायला बोलावले होते. खास या कामासाठी मी सहा दिवसांची रजा घेतली होती. सकाळी दहा वाजता घराची बेल वाजली. मी घर अगदी नीट आवरून ठेवलेले होते; नाही तर ते अस्ताव्यस्त आहे म्हणून मावशी आम्हाला नाकारायच्या. दरवाजा उघडला. माझ्या आशेची पालवी असलेल्या एक मावशी दारात उभ्या होत्या. जेमतेम पाच फूट उंची. गोरापान रंग. कपाळावर मोठी टिकली. केसाचा अंबाडा बांधलेला. दोन्ही हात भरून बांगड्या. खांद्याला पर्स. सगळं एकदम टापटीप.
‘येऊ का म्याडम आत?’ असे त्या बाईंनी विचारले. जवळपास पंधरा वीस बायकांनी आम्हाला वेगवेगळ्या कारणांनी नाकारलेले असताना आता त्या दिवशी येणार्या तीन चार जणींवरच माझी भिस्त होती. मराठी माणसाला जमेल तितक्या आदराने मी त्यांना घरात बोलावले. बसायला सांगितले.
‘मी चंद्रा. तुम्हाला कामाला बाई पायजे कळलं,’ बाई बोलल्या.
‘हो, शोधतोय खरे,’ मी उत्तर दिले.
‘आधीची बाई का सोडून गेली?’ चौकशी चालू झालेली होती.
‘मुलगी होती. लग्न झाले तर सोडून गेली.’
‘असं का? तेवढी एकच बाई का तुमच्याकडे कामाला? म्हणजे बाकी स्वयंपाकाला वगैरे कोणी हाये का?’
‘हो, बर्याच वर्षांपासून त्या मावशी आहेत आमच्याकडे. पण आता तरी घरकामाला हव्या आहेत मावशी.’
‘ते कळलं.’
त्यानंतर अजून बरेच प्रश्न विचारून झाले. एकंदर या मावशी आम्हाला आणि मावशींना आम्ही पटण्यासारखे आहोत असे वाटले. पैशांची बोलणी झाली. आणि चंद्रा मावशी म्हणाल्या, ‘कामाला कधीपासून येणार ते मी तुम्हाला फोन करून कळवते. ते काये, त्या पाच नंबरवाल्या म्याडम इथून दुसरीकडे राहायला जाणारे. त्यांचं काम सुटल्याशिवाय तुमचं धरता येणार नाही.’
नाराजीने मी म्हटले, ‘अहो पण मावशी, त्या गेल्याच नाहीत तर?’
‘जाणारे हो. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. हे भाड्याचं घरे. सोताच्या घरी चालल्या त्या. फक्त या का पुढच्या आठवड्यात तेवढं ठरायचं आहे.’
‘पण फोन नक्की करा मावशी. म्हणजे मला कळेल तरी.’
‘त्याची काळजीच सोडा म्याडम. चंद्रानी शब्द दिला म्हणजे दिला. तो आकाशातला चंद्र वरून खाली आला तरी माझा शब्द बदलू शकणार नाही.’
आता यांचा शब्द बदलण्यासाठी तो आकाशातला चंद्र खाली का येईल असा प्रश्न मला पडला होता. पण त्यावेळी तो विचारणे म्हणजे कशाबशा मिळालेल्या मावशी घालवून बसणे होते. मावशी निघाल्या आणि मागे येऊन पुन्हा बोलू लागल्या, ‘मी गौरी गणपतीला पंधरा दिवस सुट्टी करणार. आधीच सांगून ठेवते. आधीच का सांगितले नाही वगैरे तेव्हा ऐकून घेणार नाही.’ त्यांच्या त्या पंधरा दिवसांच्या सुट्टीला माझा होकार गृहीत धरून मावशी निघूनदेखील गेल्या.
नंतरच्या तीन चार दिवसांत चंद्रा मावशींचा फोन आलाच नाही. चंद्राला देखील यांचा शब्द बदलता येणार नाही या भरवशावर मी बाकीच्या मुलाखती थांबवल्या होत्या. आता काय करावे! त्यांचा नंबर होता, पण आपल्या बाजूने कामासाठी अधीरपणा दाखवणे मला पचनी पडत नव्हते.
अखेरीस शुक्रवारी पहाटे सहा वाजताच मावशींचा फोन आला, ‘म्याडम, मी आजपासून कामाला येते. ती पाच नंबरवाली गेली.’
एकतर तो फोन कोणाचा आहे याची मेंदूने नोंद घेण्यात काही पळ खर्ची पडले, त्यात झोपेतून उठल्या उठल्या कोणीतरी गेले हे ऐकून वाईट वाटले.
‘कोण गेले मावशी?’
‘आओ नाही का, ती पाच नंबरवाली जाणार होती?’
‘आजारी होती का?’
‘नाही हो चांगलीच होती की.’
‘मग कशाने गेली? लेकरं वगैरे घरी कोण कोण होतं?’
मावशींच्या घोळ लक्षात आलेला होता. ‘आओ काय म्याडम, ती नाही का घर सोडून जाणार होती. तुमी तर एकदम तिला दुनियेतूनच घालवायला बसल्या.’ आता मी टक्क जागी झाले होते आणि काय घोळ घातला ते लक्षात आले होते.
‘हो की. तुम्ही सांगितले होते म्ाावशी. बरं बरं. तुम्ही या आज ठरलेल्या वेळी.’
मावशी आल्या. त्यांचे काम स्वच्छ होते. फक्त तोंडाचा पट्टा मात्र गिरणीच्या पट्ट्यापेक्षा जोरात चालणारा होता. थांब म्हटले तरी थांबणार नाही. पहिला दिवस म्हणून मी सगळे ऐकून प्रतिक्रिया देत होते. पण त्या बोलण्यात हे लक्षात आले की बाई हिकमती आहे. आमच्या संपूर्ण सोसायटीची बित्तम बातमी त्यांना होती. सगळ्या इमारतींचे सिक्युरिटी गार्ड त्यांना ठाऊक होते. कोणत्या सिक्युरिटी गार्डची नजर कशी आहे, कोण नशा करतं इथपासून ते कोणत्या बिल्डिंगमध्ये पाण्याची अडचण आहे, त्या सोसायटीच्या मीटिंगमध्ये कशी भांडणं झाली, इथवर त्यांना सगळे ठाऊक होते.
पहिला दिवस तरी समाधानकारक गेला होता. दुसर्या दिवशी पहाटे पुन्हा मावशींचा फोन आला, ‘म्याडम, मी येते बरं कामाला?’
मला काही समजेना. या काल येऊन गेल्या तरीही पुन्हा का सांगत आहेत? रविवारी पुन्हा फोन आला. मग त्या कामाला आल्यावर मी विचारलेच, ‘अहो चंद्रा मावशी, रोज पहाटे काय फोन करता? शनिवार रविवार तरी झोपू द्या की.’
‘तुम्हीच तर सांगितले ना म्याडम, फोन करून सांगा म्हणून. काय म्याडम? सांगून सोताच विचारतात, का फोन करता म्हणून!’
‘अहो ते पहिल्या दिवशीसाठी होते. तुम्ही काय रोजच फोन करणार होतात की काय?’
‘अरे देवा, हो का? रोज नाही करायचा का फोन? मी तर पोराकडून सहाचा आलाराम ठेवून घेतला होता. वाजला की तुमाला फोन करायचा.’
मी कपाळावर हात मारून घेतला. आणि तो का मारून घेतला हे चंद्रा मावशींना न समजल्याने त्या गोंधळलेल्या चेहर्याने तिथेच उभ्या होत्या.
चंद्रा मावशी नावाचा एक वेगळा नमुना आपल्या पदरात पडला आहे हे एव्हाना माझ्या चांगलेच लक्षात आले होते. कोणाशीही भरपूर बोलत बसणे हा मावशींचा छंद होता. विरुद्ध दिशेने जाणार्या मुंग्यांच्या रांगेत जशी एक मुंगी दुसर्या मुंगीला भेटल्याशिवाय पुढे जात नाही तसे रस्त्यात भेटणार्या प्रत्येक माणसाशी बोलल्याशिवाय चंद्रा मावशी पुढे जात नाहीत. रस्त्यात भेटणारी प्रत्येक व्यक्ती त्यांच्या ओळखीची असो वा नसो. या उगीचच काहीतरी बोलतील किंवा अगदीच ओळख नसेल तर ‘बरं आहे का?’ असे विचारतील. शिवाय, चंद्रा मावशी हे एक विक्षिप्त प्रकरण आहे. कधी काय विचारतील याचा नेम नाही. ते विचारताना समोरच्याला त्याचे काय वाटेल वगैरे विचार त्यांच्या मनाला शिवतही नाही.
आमच्याकडे कामाला लागून दीड दोन वर्षे झाली होती. एके दिवशी आम्ही दोघेही आपापल्या कामात असताना मावशी समोर आल्या आणि कुलकर्णींना म्हणाल्या, ‘सायेब, तुमी जास्ती शिकलेले आहे की म्याडम?’
आम्ही दोघांनीही एकमेकांकडे बघितले. अहोंनी मावशींना विचारले, ‘मावशी, तुम्हाला काय वाटते की कोण जास्त शिकलेले असेल?’
मावशींनी आमच्या दोघांकडे बघितले आणि म्हणाल्या, ‘म्याडमच ज्यादा शिकल्या असतील.’
हसून अहोंनी पुन्हा विचारले, ‘का असे वाटले तुम्हाला?’
मावशींनी एका क्षणाचाही विचार न करता उत्तर दिले, ‘तुमी तरी नुसते फोनवरच इंग्लिश बोलता, म्याडम खाली स्टेजवर भाषण देतात. म्हणजे त्याच शिकलेल्या असतील की नाही. मी त्यांना सोसायटीच्या पूजेच्या कार्यक्रमात स्टेजवर बोलताना बघितलं आहे.’
कशावरून मावशी काय निष्कर्ष सांगतील हे काही सांगता यायचे नाही. पण एक गोष्ट आहे. त्यांना शिक्षणाबद्दल खूप अप्रूप आहे. त्यांना मुलांना शिकवायची इच्छा होती. पण मुलं शिकली नाहीत. मुलगी तेवढी हुशार आहे. पण बारावी झाली की तिचेही लग्न लावून द्यावे म्हणून मावशींचा नवरा मागे लागत असे. कदाचित जे आपल्या घरातील लोकांनी करावे असे वाटते ते दुसरे कोणीतरी करताना बघून त्यांना शिक्षणाबद्दल आदर आणि उत्सुकता वाटत असावी. कुलकर्णी फोनवर कोणाशी इंग्लिशमध्ये बोलू लागले की मावशींचा चेहरा आनंदाने फुलत असे.
एके दिवशी मावशी मला म्हणाल्या, ‘म्याडम, सायेब किती यत्ता शिकले हो? बाहेरच्या देशात शिकले का?’
मला आता एक लक्षात आलेले होते की अशावेळी मावशींना तयार उत्तर देण्यापेक्षा त्यांच्या डोक्यात काय आहे हे विचारावे. मी विचारले, ‘का हो मावशी, तुमच्या ओळखीत कोणी आहे का बाहेरच्या देशात? का विचारलेत?’
‘आओ म्याडम, सायेब कसले फाडफाड इंग्लिश बोलतात. काल तर कोणाला तरी इंग्लिशमधे रागवत होते. आपल्या देशात शिकून थोडीच असं इंग्लिशमधे रागावता येणारे?’
मावशींचा विचित्र तर्क बघून मी थक्कच झाले होते. एखादी गोष्ट पटली नाही तर त्याबद्दल एखाद्याला स्पष्ट सांगणे यामुळे मावशींची कित्येक कामे सुटली होती. पण त्या काही कुणाचे ऐकत नसत. त्यांच्या बोलण्याच्या मार्यातून घरातील कोणीही व्यक्ती सुटत नाही. आमची छकुली आणि त्यांची चकमक तर नेहमीचीच होती.
एकदा मावशी मला म्हणाल्या, ‘म्याडम काहीही म्हणा. तुमी छकुलीला नीट वळणच लावलं नाही.’
चेहर्यानेच मी काय झाले असे मावशींना विचारले. तर म्हणाल्या, ‘आओ म्याडम, कशी ठेवते ती तिची खोली. सगळीकडं पुस्तकं, कपडे, पसारा. अशाने सासरी तुमचा उद्धार होईल ना. चांगलं झालं तर बापाचं आणि वाईट झालं तर आईचंच नाव घेतेत लोक.’
‘अहो चंद्रा मावशी, तिला ज्या दिवशी वेळ मिळतो त्या दिवशी आवरते की ती खोली. एकटी राहायला लागेल शिकण्यासाठी तेव्हा एकदम काम पडलं की श्िाकेल जेव्हाचे तेव्हा करायला. शिवाय बाकीच्या मुलांसारखी हट्टी नाही छकुली. समजूतदार आहे, आपण चांगलं ते बघावं.’
‘हे खरंय बरं म्याडम. बाकीच्या घरात पोरांचं काय काय बघते मी. तुमची छकुली मात्र तशी नाही बरं. चहा करताना मला विचारती, मावशी चहा घ्यायचा का?’
क्षणार्धात मावशीचे मत बदलले होते. त्यांच्या अति बोलण्यावर मात्र कितीही सांगून इलाज होऊ शकला नाही. कोणाशीही कुठेही त्या बोलत उभ्या राहत. हातात झाडू तसाच आणि या मात्र मला कोणाचे तरी गार्हाणे सांगत उभ्या राहणार. छकुली स्नानाला गेली तर दरवाज्याबाहेर उभ्या राहून तिच्याशी बोलत उभ्या राहत. ‘अगं छकुले आवर बरं लवकर. तुम्ही आजकालच्या पोरी किती वेळ लावता गं. ती जाधवबाईची श्रुती असंच करती. तास तासभर अंगोळ करती. आणि अंग धून झालं की ते शॉवर बंद कर बाई. तुझ्यामागून बाथरूममध्ये जायचं म्हणजे एक कठीण असतं. कितीदा भिजते मी. शॉवर चालूच ठेवता तुम्ही लोक.’
पोरगीसुद्धा आतून उत्तर देत असे, ‘हो मावशी. अहो पण अंघोळ म्हणा, स्नान म्हणा. आंग धून झालं की काय म्हणता?’
मग दोघींची गप्पांची मैफल अशाच स्थितीत चालू होत असे. जे काही मनात येईल ते बोलून मावशी मोकळ्या होत. निर्मळ आहेत.
त्यांची स्वत:ची कामाची एक शिस्त आहे. त्या शिस्तीतच त्या कामे करतात. कोणी जर त्या शिस्तीच्या मध्ये येण्याचा प्रयत्न केला तर काही खैर नाही. खूप दमल्या असाल तर एखादे काम करू नका म्हणून त्यांना सुचवले तर अजिबात ऐकणार नाहीत. ‘मी नाही केलं तर तुमी करणारे का? उद्या मलाच करावं लागतं किनई. करू द्या माझं मला.’ असे म्हणल्यावर पुढे काय बोलणार!
आमच्या घरचा चहा त्यांना फार आवडत असे. काहीतरी बहाणा करून कुठल्याही वेळी चहा मागत. आज झोप झाली नाही त्यामुळे आळस आल्यासारखं वाटतंय, कधी उपास आहे तर चहा द्या, कधी कोणाकडे तरी पाण्यातच भिजले तर त्यामुळे चहा द्या, असे काहीही सांगत. कित्येकदा माझ्याकडून चहा उतू जातो. मावशी आल्या की गॅसची शेगडी पुसून घेत. एके दिवशी चहा होईपर्यंत मी समोरच उभी राहिले आणि चहा उतू जाऊच दिला नाही तर मावशी म्हणाल्या, ‘आज चहा सायेबांनी केला की काय, शेगडीवर चहाच सांडला नाही. अन सायेबांनी केलेला असला तर मला नको. मला म्याडमच्याच हातचा आवडतोय.’
बोलण्याआधी आपण विचार करायचा असतो हे चंद्रा मावशींना कधी कळणार कुणास ठाऊक? पण ज्या घरी त्या काम करत त्या घरच्या माणसांचा मात्र खूप विचारही करत आणि काळजीदेखील घेत. शेजारच्या मिश्रा आजी भयंकर चिकित्सक आहेत. सुनेला फार त्रास देत. मावशी त्यांच्याही घरी कामाला होत्या. मावशीचे काम होईपर्यंत मिश्रा आजी त्यांच्या मागेमागे करत. आजींना मावशी त्यांच्या पद्धतीने भरपूर बोलत. दोघींची कायम हमरातुमरी होत असे. ‘तुमच्याकडचे काम सोडून जाईन’ अशी धमकी मावशींनी त्यांना कित्येकदा दिलेली होती. पण काम काही सोडले नाही. त्यांना एकदा मी विचारलेच, ‘इतक्या वेळा त्या आजींशी भांडता. काम सोडून जाईन म्हणून नुसतेच म्हणता चंद्रा मावशी. सोडून का देत नाही काम?’
‘सोडायला काय हो, एका मिनटात सोडून जाईन मी. काम करणार्याला कुठं बी काम भेटल. पण त्यांची सून बिचारी गरीब हाय, म्हातारी छळती तिला. मी तिची कामं वाटून घेते. तिचे कष्ट जरा कमी होतात. तिच्या मनात काय चाललं ते तर आपण वाटून घेऊ शकत नाही बघा म्याडम, पण कष्ट तर थोडे वाटून घेऊ शकतो.’
वाट्टेल तसे तोंड सोडणार्या मावशी आतून असा विचार करत असतील याचा थोडासाही अंदाज मला नव्हता.
याच मिश्रांच्या घरचे आजोबा वारले तर बातमी मला चंद्रा मावशींनीच दिली. कुठली काही खबर द्यायची असली की चंद्रा मावशींची भावमुद्रा बदलते. जे काही मनात आहे ते कधी एकदा सांगते असे त्यांना होते. तसेच त्या दिवशी झाले. त्या आल्या तेव्हा त्यांच्याकडे बघून माझ्या लक्षात आले की मावशींना काहीतरी सांगायचे आहे.
‘मावशी मला घाई आहे. आता काहीही सांगू नका.’ मी जरा जोरातच म्हणाले.
‘आओ, म्हातारं खपलं ना शेजारचं?’ माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत त्या म्हणाल्या. पण बातमीच अशी होती की मी काळजीत पडले. ‘कोण गेलं मावशी?’
‘आओ म्हातारं, मिसरा मिसरा.’
‘काय बोलता मावशी? अहो काल तर लेकीकडे गेले होते ते.’
‘तिकडंच खपले. जिंदगी इकडं काढली पोराकडे आणि मरायला तिकडं पोरीकडे गेले.’
‘आता ते काय कोणाच्या हातात आहे का मावशी.’
‘खरं तर सांगू का म्याडम, ती म्हातारीच खपायला पायजेल होती. म्हातारं चांगलं होतं. म्हातारी गेली असती तर सून सुटली असती. आता म्हातार्याच्या मागं अजून बगावं लागंल म्हातारीकडे.’
‘मावशी माझ्याकडे बोललात, अजून कुठे असलं काही बोलू नका.’
मलाच त्यांची काळजी वाटली. कितीही खरं असलं तरी काही खर्या गोष्टी बोलून दाखवू नयेत हे मावशींना कधी कळणार होतं काय माहिती?
तोंडाचा पट्टा चालवत लष्कराच्या भाकरी भाजणे हे मावशींचे नेहमीचे काम. कुठल्या तरी गार्डची नोकरी सुटली तर त्याला दुसरी नोकरी शोधून दे. बायकांना कामवाल्या बायका मिळवून दे. काम सुटलेल्या बायकांना कुठेतरी काम मिळवून दे. कुठल्या तरी भंडार्यात भाकरी करून दे, पतपेढीकडून कोणाला तरी व्याजाने पैसे मिळवून दे, अशी कित्येवâ कामे मावशी एकट्या करत असत. सकाळी नऊ वाजता कामाला येणार्या मावशी संध्याकाळपर्यंत सोसायटीतच दिसत. त्यावरून टोकलं की म्हणायच्या, ‘पोरगी शाळेत जाती. नवरा कामाला जाईल याचा काई भरवसा नाही. पोरं नुसती बैलासारखी घरी बसून असत्यात. एवढी तरणीताठी दोन पोरं, पण काय सांगू म्याडम, सगळ्या दुनियेला नोकर्या लावून देते मी. माझ्या पोरांना लावणार नाही का, किती ठिकाणी लावून दिलत्या. पण शाळा शिकलेली हायती. मग त्यांना दुकानात काम करायचं नाही, वॉचमन म्हणून जायला नको वाटतंय. आठ-आठ दिवसात नोकर्या सोडून येतात. घरी बसून नुसते खातात. मी कुठवर पुरी पडू? मी घरी थांबले की सारखे खायला करून मागतात. उगा नकोच त्यापेक्षा.’
गोर्यापान चंद्रा मावशींचा चेहरा यावेळी मात्र खेदाने काळवंडला होता.
मावशींचे वेळेचे गणित भन्नाट होते. मावशींना कामाला यायला उशीर झाला म्हणून आपण फोन करावा तर फोनवर सांगत, ‘हे बघा, या इंदुताईकडचे काम चालू आहे.’
आता इंदुताईंकडे काम चालू आहे त्याचे मला काय? पण नाही, त्या मावशी आहेत. आपण त्यांना मध्येच उडवून लावूच शकत नाही. आपण पुन्हा त्यांना विचारावे, ‘अहो चंद्रा मावशी, किती वेळ लागेल ते सांगा. बाकीचे सांगत बसू नका.’
‘हे बघा, आता तर आलेय. भांडी करतेय, अजून झाडू पोछा राहिलाय.’
तुम्ही कितीही वेळा किती वेळ लागेल असे विचारा. मावशी काही नेमके उत्तर देणार नाहीत. आयुष्यापासून कामाच्या वेळेपर्यंत सगळी गणिते हुकलेलीच आहेत. त्या तरी काय करणार!
कामात चालढकल चालणार नाही हे मावशीचे तत्वज्ञान त्या जिवापाड जपत. एसी सर्व्हिसिंगला आलेल्या माणसाला त्यांनी फरशी पुसायची म्हणून अर्धा तास घराबाहेर उभे केलेले आहे. तो कितीदा सांगत होता की फरशी पुसू नका, सर्व्हिसिंग करताना पाणी सांडणार आहे. पण नाही. मावशींनी फरशी पुसून त्याला घरात घेतले आणि म्हणाल्या, ‘सांड आता तुला काय पाणी सांडायचे ते.’ भर पावसात झाडांना पाणी घालणार्या एका बाईवर नेहमी विनोद होत असतो. त्या आमच्या चंद्रा मावशीच असाव्यात असे मला नेहमी वाटते.
चंद्रा मावशींना झुरळांची भीती वाटते, हे देखील मला फार चमत्कारिकरित्या समजले. एके दिवशी बाथरूममधून जोरजोरात किंचाळत त्या बाहेर आल्या आणि ओरडल्या, ‘बाथरूममध्ये काकूच आहे.’ जाऊन बघितले तर मेलेले झुरळ होते. त्यांना कितीदा सांगितले की ते मेलेले झुरळ आहे तर कचर्याच्या डब्यात नेऊन टाका. पण झुरळ उचलून नेईपर्यंत मावशी पुतळा होऊन उभ्या होत्या. पापण्यासुद्धा लवल्या नाहीत. कदाचित हलल्या असत्या तर झुरळ पुन्हा जिवंत होईल अशी भीती त्यांना वाटली असावी.
आपले खरे वय काय आहे हेसुद्धा सांगण्याची मावशींची तयारी नसे. सोसायटीत प्रवेशासाठी कार्ड तयार करायचे होते. त्यात जन्मतारीख टाकायची होती. मावशींना जन्मतारीख विचारल्यावर म्हणाल्या, ‘टाका तुम्हाला सुचंल ती.’
‘अहो असे कसे चालेल मावशी? तुम्हाला माहिती नाही का?’
‘नाही ना. पण माझा जन्म झाला तेव्हा बाप पोस्टात लागला होता. म्हणजे बघा.’ आता यावरून मावशीचे वय शोधावे असे त्यांचे म्हणणे होते.
खूप विचारल्यावर म्हणाल्या, ‘टाका तीस.’
‘मावशी, तुमची मुलं तेवीस आणि एकवीस वर्षांची आहेत. त्यांच्या आणि तुमच्या वयाचा काही हिशेब?’
‘बरं मग पस्तीस करा.’
‘तरीही तुम्हाला बाराव्या वर्षीच मुले झाली असा अर्थ होतो मावशी. पंचेचाळीस टाकते.’
‘बाई बाई, मी नाही एवढी मोठी.’
‘मग चाळीस?’
‘टाका, पण तेवढं पण नाहीच माझं वय. आधारवर पण असंच टाकलंय.’ चाळीस वय टाकलं म्हणून नंतर महिनाभर मावशी कुरकुर करत होत्या. नशीब वय वाढवले म्हणून सोसायटीतून काम सोडून गेल्या नाहीत.
एका खेडेगावातून लग्न करून मावशी पुण्यात आलेल्या होत्या. दोन मुलं, एक अत्यंत देखणी मुलगी, नवरा असा संसार होता. खरे तर त्याच हा संसार ओढत होत्या. नवरा फारसा काम करत नसे. मुले यथातथा शिकली. सतत बापाशी भांडण करत. मावशी वैयक्तिक आयुष्यात कंटाळलेल्या होत्या. पण तरीही त्याचा त्यांनी कामावर यत्किंचितही परिणाम होऊ दिला नाही. त्यांच्यातील उत्साह, लहान मुलासारखी कुठल्याही गोष्टीची उत्सुकता, लोकसंपर्क ठेवण्याची ओढ असे सगळे जिवंत ठेवले. चंद्रा मावशी म्हणजे डाग नसलेला चंद्र आहेत.
त्यांची मुलगी बारावी झाली आणि मावशींच्या नवर्याने कुठल्यातरी विधुर माणसाशी तिचे लग्न ठरवले. मावशींना स्थळ अजिबातच पसंत नव्हते. त्यामुळे एका रात्रीत मुलीला घेऊन मावशी भावाकडे निघून गेल्या. आम्ही खूप थांबवण्याचा प्रयत्न केला, पण म्हणाल्या, ‘म्याडम, भाऊ मला यातून वाचवतील. त्यांचाच आधार आहे. पोरं आणि नवर्याला मरू देत इथेच. माझ्या लेकीला वाचवायला हवं म्याडम. नाहीतर पुढं जाऊन माझ्यासारखी हालत नको.’
मुलगेच आपले भविष्य आहेत असे वाटण्याच्या परिस्थितीत असतानाही आपल्या मुलीला वाचवायला हवे असे, तिचे भविष्य सुरक्षित करायला हवे असे वाटणार्या मावशी मला आम्हा सगळ्या तथाकथित संस्कृतीरक्षक आणि शिकलेल्या लोकांपेक्षा जास्त समंजस वाटतात.
त्यांचं सगळं चांगलं चाललं आहे. मावशींच्या मुलीचे नुकतेच लग्न झाले आहे. चांगला जावई मिळाला आहे. मावशी पुण्यातच जावयाच्या घराजवळ खोली भाड्याने घेऊन एकट्या राहतात. जवळपास घरकाम करतात. तिथेही त्यांनी चांगलाच जम बसवला आहे. तिथेही त्या सगळ्या सिक्युरिटी गार्ड्सच्या ओळखीच्या झाल्या आहेत. कित्येक बायकांना स्वयंपाकाची कामे लावून दिली आहेत. कुठल्या तरी फ्लॅटमध्ये राहणार्या साहेबांच्या मदतीने लेकीला एके ठिकाणी नोकरी मिळवून दिली आहे. आमची सोसायटी त्यांना फार लांब पडते. पण अधून मधून भेटायला येतात. पैसे देऊ केले तर घेत नाहीत. मानी स्वभावाच्या आहेत.
मी काय म्हणते, तुम्ही पुण्यात कुठे फिरत असताना जर गोर्यापान, नीटनेटक्या, मोठे कुंकू लावलेल्या बाई दिसल्या- ज्या एकतर फोनवर तरी बोलत असतील किंवा प्रत्यक्ष एकसारखी बडबड करत असतील- तर त्या आमच्या चंद्रा मावशी आहेत की नाही हे ओळखण्यासाठी एक खूण आहे. त्यांच्यासमोर फक्त अस्खलित इंग्लिश भाषेत बोला. त्या जर हरखून जाऊन तुमचे बोलणे ऐकत उभ्या राहिल्या तर त्या शंभर टक्के आमच्या चंद्रा मावशीच बरं का!