नसतेस घरी तू जेव्हा, झोमॅटो कामी येतो, असे म्हणतात. पण काही वेळा ती घरी नसते आणि काही जगावेगळे करून खायचा मूड येतो. सच्च्या प्रेमाच्या तरल भावना धंदेवाईक कवीच्या किंवा राजकारणातल्या चारोळीकाराच्या ऊटपटांग-फडतूस कवितेत व्यक्त होऊ शकत नाहीत. त्याप्रमाणेच मनात रेसिपी उगवलेला खास पदार्थ ऑनलाइनवर अस्तित्वात असू शकत नाही.
तर ती घरी नव्हती. घरात मी एकटाच होतो. रात्रीची वेळ होती. एक्झिट पोल मनासारखे झालेले असावेत आणि खर्या निकालाची प्रतीक्षा असावी– त्याप्रमाणे भोजनपूर्व मद्यपान झाले होते आणि जेवणाचा इंतजार होता. पण अशा मोक्याच्या वेळी गंमत झाली. फार पूर्वी कुठल्यातरी खेडेगावातल्या लग्नात खाल्लेल्या मसाले भाताची चव अचानक आठवली होती आणि तसाच मसाले भात करायला मी सज्ज झालो होतो.
त्या भातासाठी लागणारे सगळे घटक पदार्थ काढून टेबलवर मांडले. आता फक्त काजू हवे होते. पण ते मघाशीच आणि मीच संपवले होते. आता पर्याय म्हणून निदान शेंगदाणे तरी हवेत. मी कपाट उघडले. एकेक डबा उघडून पाहिला. पण व्यर्थ. सगळ्या डब्यांवर अर्धांगीने स्टिकर्स लावून त्यावर डब्यातल्या पदार्थांची नावे लिहिली होती. पण त्याचा काय उपयोग? पूर्वी कॅसेटच्या कव्हरवर एक नाव आणि आत भलतीच कॅसेट असा प्रकार असे. किंवा हल्ली राजकीय नेत्यांच्या तोंडात एक भाषा आणि त्यांच्या ट्रोलर्सच्या तोंडात वेगळी भाषा असते. एखाद्या पक्षाचा मुख्य नेता देशभर-जगभर गांधींबद्दल आदराने बोलणार आणि त्याच्या पक्षातले ट्रोलर्स गांधींचा एकेरी उल्लेख करून त्यांना शिव्या घालणार, तशातला प्रकार.
म्हणून मग मी काय केलं? ‘शेंगदाणे’ हा शब्द स्टिकरवर न लिहिलेले सर्व डबे उघडून पाहिले. पण कुठल्याच डब्यात ते मिळाले नाहीत. सगळे डबे एकसारखे दिसत होते. लग्नात किंवा इतर पार्ट्यांमध्ये मेकअप, हेअरस्टाईल आणि पैठणी वगैरे नेसलेल्या सर्व स्त्रिया पाठीमागून एकसारख्या दिसतात. त्यातून आपली बायको नेमकी शोधणे मुश्कील नव्हे, तर नामुमकीन असते, याचा प्रत्यय आला.
एरव्ही सगळे पक्ष ध्येयवादावर बोलतात. पण निवडणुकीसाठी मोठा खर्च करावा लागतो. नाहीतर पराभव अटळ असतो. अशा वेळी सत्ताधारी पक्ष एक खास आयडिया करतात. विरोधी पक्षातल्या मालदार नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करतात. त्याच्याविरुद्ध चौकशी लावण्याची धमकी देतात. मग तो नेता घाबरून सत्ताधारी पक्षात प्रवेश करतो. मग त्याच्याविरुद्धचे सगळे आरोप विस्मरणात जातात.
मी देखील तीच आयडिया केली. थोड्या वेळापूर्वी घरातले काजू संपले होते. पण चिवड्याचे एक पाकीट पडून होते. ते पाकीट म्हणजे विरोधी पक्ष होता. मी त्यातल्या शेंगदाण्यांवर आरोप केला. या शेंगदाण्यांमुळे पित्त वाढते. मग पाकीट फोडून त्यातले शेंगदाणे काढून घेतले.
यानंतर मी माझा मसाले भात सज्ज केला. खाल्ला आणि निजलो. त्याची इथे रेसिपी सांगणार नाही.
पण लवकरच त्यावर ‘शेंगदाणे फाइल्स’ नावाचा लघुपट बनवून यू ट्यूबवर टाकणार आहे. माझ्या लघुपटामुळे तुम्हाला शेंगदाण्यांचे महत्त्व समजेल अशी मला आशा वाटते.