माझा मानलेला परममित्र पोक्या परदेशी गेल्यापासून इडीतील माझा मित्र कावळे याची मला चांगली सोबत झाली आहे. मला त्याची कंपनीही मिळते आणि तो शाळासोबती असल्यामुळे उभ्या, आडव्या, तिडव्या कशाही आणि कोणत्याही विषयावर गप्पा मारता येतात. शाळेतसुद्धा राडेबाजी आणि पॉलिटिक्स याच्याबरोबर शिक्षक-शिक्षिकांच्या नकला करण्यात त्यांच्यातील काही जणांच्या चिठ्ठ्या-चपाट्या पोचवण्यात आणि शाळेला दांड्या मारून चौपाटीवर भटकण्यात आमचा वेळ चांगला जात असे. कावळ्या तर बोलण्यात इतका बिनधास्त होता की समोर शिक्षक असो वा शिक्षिका तो त्याला हवं ते बोलत असे म्हणजे बडबड करत असे.
एकदा त्याने वर्गात विडी पिण्याचं म्हणजे विडी ओढण्याचं प्रात्यक्षिक करून दाखवलं. त्यावेळी परिसरात तेलगु समाजातील स्त्रिया फावल्या वेळात सामुदायिक पद्धतीने विड्या तयार करण्याच्या रोजगारावर असत. विड्यांची बंडले तयार करणे, त्याचे गठ्ठे तयार करणे इत्यादी कामे केल्यावर त्यांना महिना किंवा रोजंदारीवर पगार मिळत असे. कावळ्याची आई तिच्या एका तेलगु मैत्रिणीबरोबर घरातील काम आटोपल्यावर हा लघुउद्योग करण्यासाठी जाई. काही काम ती घरी घेऊन येई. तिथे कावळ्या तिला मदत करत असे तेव्हा त्यातील विड्या बनवता बनवता दररोज चार-दोन विड्या तो ढापत असे. आता त्याच्या गुप्त खजिन्यात जवळ जवळ शंभर विड्यांचा स्टॉक झाला होता. एकदा ऑफ तासाला त्याने वर्गात मुलांसमोर येऊन विड्या कशा बनवतात याचं प्रात्यक्षिक दाखवलंच पण भर वर्गात विड्या ओढून नाकातून तोंडातून, कानातून धूर काढण्याची जादूही दाखवली. उद्या असाच छोटा उद्योग सुरु करून तुम्ही विड्या किंवा सिगारेटचा कारखाना काढू शकाल. शिक्षण-बिक्षण सगळं फुकट असतं, असं वर लेक्चरही दिलं. ज्याना हवा होत्या त्यांना त्याने फुकट विड्याही वाटल्या. हा पुढे शिकून इडीच्या कार्यालयात याची नियुक्ती होईल, असं त्यालाही कधी वाटलं नव्हतं. मी त्याला नेहमीच इडीच्या कार्यपद्धतीबद्दल खोदून खोदून विचारत असे, पण तो ताकास तूर लागू देत नव्हता.
मग आम्ही चालू राजकारणावर बोलण्यास सुरुवात केली. तो म्हणाला, मला अडचणीत आणणारं असं काही बोलू नकोस आणि गुपचूप टेपही करू नकोस. नाहीतर माझा फडणवीस व्हायचा. तेव्हा मी म्हटलं, तुझ्यासाठी एकवेळ जीव देईन पण तुला अडचणीत कधीच आणणार नाही. पुढे मी त्याला म्हणालो, `मला खरं सांग, हे फडणवीस, ते राज्यपाल, ते पाटील याचं नेमकं चाललंय तरी काय?’
`ही नुसतीच खडखडी आहे. त्यातून काहीच निष्पन्न होणार नाही. परवा धुळवडीच्या दिवशी आम्ही काही कट्टर भाजपवाली मंडळी एकत्र जमवून धूळवडीपेक्षा धमाल केली. मात्र तू कुणाला सांगू नकोस माझ्या एका मित्राकडून असली भांग घोटून आणली होती. तीही दुधाच्या जर्मनच्या मोठ्या कॅनभर. मस्त बर्फ वगैरे टाकून, बदाम, पिस्ते केसर मिसळून टेस्टी लज्जत आली होती. सर्वांनी आपल्या नेतेपदाची वस्त्रे उतरवून इथे सांगितलेल्या गुप्त ठिकाणी यायचं आहे आणि मनसोक्त भांग पिऊन स्वर्गसुखाचा आनंद लूटायचाच अशी महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांना आमंत्रणं जाताच `त्या’ आलिशान बंगल्याच्या तळघरात प्रमुख नेत्यांचं लपतछपत आगमन झालं. आल्या आल्या राज्यपालांनी विचारलं तुम्ही ते येताना वस्त्रे उतरवून यायची. सूचना कशी काय लिहिलीत? आता मी या धोतराचं काय करूं?
-अहो, असं कसं? तुम्ही नीट ते आमंत्रण वाचा… फडणवीस बोलले राज्यपालांनी बटव्यातून आमंत्रण काढून वाचायला दिलं तर त्यात खरोखरच कुणीतरी नेतेपदाची हा शब्द पांढरीशाई लावून खोडला होता. मग बाकीच्या नेत्यांनी आपापली आमंत्रण वाचली. त्यातही हाच चावटपणा कुणी तरी केला होता.
`हे तर आपल्यातल्याच कोणतरी केलेलं कटकारस्थान आहे. याचा शोध लावलाच पाहिजे. उद्या हा दिल्लीच्या नेत्यांनाही अशी पत्र आमंत्रण पाठवील चंद्रोबा पाटील बोलले.
इथे परवीन दरेकर कुठे दिसत नाहीत…. त्यांनी सूडबुद्धीने ही कारवाई केली असावी. `सोडा हो, मनात येईल ते बोलता, तो बिचारा चौकशीच्या फेर्यात अडकलाय.’
`अडकला नव्हे, त्याला आपल्याच काही लोकांनी अडकवलाय. पक्षात आपल्याशिवाय कोणी पुढे जायला नको ना.’
`तुम्हाला कुणाचा संशय येतो? कारण बँक व्यवहार, चेकची खाडखोडी बनावट सह्या, अफरातफर यात आपल्यातला एकच माणूस बदनाम आहे.’
`तुम्ही त्याचं नाव का नाही घेत डायरेक्ट?’
`नको रे बाबा. आपलीच चौकशी लावतील तीही आपलीच माणसं’
तेवढ्यात पाच मिनिटं आधी आलेले किरिटजी सोमैया ही सगळी मजा पाहात पोट धरून पोटातल्या पोटात हसत होते. माईक हातात घेऊन सर्वांना शांततेचं आवाहन करीत ते म्हणाले, `कीप सायलेन्स. आजचा दिवस सर्वांना सारे काही माफ आहे. म्हणूनच तर `बुरा न मानो होली है’ असं म्हणतात.
`अहो, होळी होऊन आठ दिवस होऊन गेले आणि आता ही वस्त्र उतरवण्याची खुमखुमी कुणाला आली? नशिब येथे आपल्या कुणी मायभगिनी नेत्या नाहीत. `त्यांना मी पाठवलीच नव्हती.’ कुठूनतरी हा आवाज ऐकल्यावर मात्र एकच खळबळ उडाली. `कोण बोलला तो कोण बोलला. एकच गलबला उडाला. हलकल्लोळ माजला. जो तो एकमेकाकडे संशयाने पाहू लागला. तेवढ्यात राज्यपाल आणि फडणवीस एकदम म्हणाले, शुरु करो. त्याबराेबच सर्वांना शेलारजींनी भांगेची थंडाई ग्लास ग्लास भरून दिली. विनोदजींनीही त्यांना मदत केली आणि पाच मिनिटात सारा माहोल बदलून गेला. जो तो आपल्या तंद्रीत गाऊ लागला. मी मात्र भांग न पिता खिशातून आणलेल्या चपटीचा एक पेग मारून सारी मजा बघत होतो. एवढ्यात राज्यपाल आणि फडणवीसांचे मोर-नृत्य सुरू झाले तर दुसरीकडे चंद्रोबा पाटील, मुनगंटीवार, शेलार मामा, विनोदीजी, गेस्ट आर्टिस्ट नारायणे यांचा र्होंबासोंबा सुरू होता. राज्यपाल धोतर सावरत पुढे आले. आणि अडखळत म्हणाले, मी जे लिहिलेच नाहीत, असे चुकीचे आदेश माझ्या नावाने सरकारकडे कोण पाठवतो? मी तर बारा आमदारांची यादीही मंजूर केली होती. विचारा पाहिजे तर या फडणवीसांना. या पेनड्राइव्हमध्ये मी सरकारला पाठवलेली ऑल पत्रे आहेत. पण माझी पत्र आणि सरकारला मिळालेली पत्रे यात फरक आहे. मग ही कारस्थानं करून मला बदनाम कोण करतं? हे मी भांगेच्या तारेत बोलत नाही. वाटल्यास तुम्ही पाटलांना विचारू शकता. तेवढ्यात पाटील पुढे आले आणि म्हणाले, राज्यपाल ज्या अर्थी म्हणताहेत त्याअर्थी ते खोटं असूच शकत नाही. आता माझ्या डोळ्यासमोर फक्त कोल्हापूरचा इस्टमनकलर तांबडा आणि पांढरा रस्सा दिसतोय. तेवढ्यात राज्यपाल म्हणाले, माझी डोक्यावरची काळी टोपी कुठे गेली?
तिने ते पत्र वाचलं की काय?
इतक्यात नारायणे पुढे आले आणि म्हणाले मला भांग चढलेली नाही. भांग घेतल्याशिवाय मी ती घेतल्यासारखा बोलू शकतो. अर्जुनाला जसा पोपटाचा डोळा दिसत होता तशी मला फक्त मोदींची पांढरीशुभ्र दाढी जिकडे तिकडे भासते नव्हे दिसते. ती दाढीच या देशाचा आधार आहे. आणि ती जगात श्रेष्ठ आहे. मी जगातील सगळ्या नेत्यांच्या दाढ्यांचा जेव्हा कणकवलीत अभ्यास केला तेव्हा माझ्या लक्षात हे सत्य आलं आणि आज मी ते राज्यपालांच्या साक्षीने या भांग महोत्सवात जाहीर करत आहे. मुनगंटीवार तर एका कोचावर झोपून मुख्यमंत्रीपदाची स्वप्न बघत होते आणि मधूनच त्यांच्या स्वप्नाआड येणारे राजकीय मच्छर मारत होते. एवढ्यात शेलारमामांनी मोठ्ठा आवाज काढला आणि ते म्हणाले, आता आपण सर्वांनी आपली बसण्याची आणि उभं राहण्याची ताकद संपली असल्यामुळे सरळ प्रत्येकाच्या नजरेसमोर ठेवलेल्या जिलब्या खाऊन हेच शयनगृह समजून झोपी जावे… सगळे डाराडूर झाल्यावर मी तिथून कल्टी मारली आणि सरळ इडीच्या ऑफिसात आलो.