दही आंबट का असतं?
– शलाका घोसाळकर, मांगरूळ
दुधात विरजण घालतात म्हणून… जेवढं झाकून ठेवलं तेवढं कमी.
वृत्तवाहिनीवर बातम्या देताना मागे मोठ्या आवाजात ढ्याण ढ्याण पार्श्वसंगीत का वाजवतात?
– अन्वर शेख, महाड
तुम्ही ती बातमी भावनेने घ्यावा, तर्कसंगती तुटावी म्हणून.
उन्हाळ्यात कोणत्या रंगाची छत्री वापरली तर उन्हाचा त्रास सगळ्यात कमी होईल?
– सागर दौंडकर, आंबेगाव
मी नाही कधी वापरली हो… पण मला वाटतं गडद जांभळा लाभदायक असेल.
आपल्याला घाम उन्हाळ्यातच का येतो?
– सुवर्णा सुर्वे, अलिबाग
कारण घामाला थंडी आवडत नाही.
श्रीखंडाचा शोध कोणत्या खंडात लागला? त्यात वेखंड घालण्याची आयडिया कुणाची?
– बाळकृष्ण जुन्नरकर, सातारा
लोखंडात शोध लागला आणि आम्रखंडाची आयडिया आहे.
दम आलूत किती दम असतो?
– प्रवीण बारवे, चिखलदरा
दम मारून या… मग सांगतो.
वरणाला फोडणी देताना इतके सगळे चर्र चुर्र वगैरे आवाज होतात, घमघमाट सुटतो, धूर निघतो; त्याने जागतिक हवामानात काही बदल होत असेल का हो?
– माधुरी नेने, वर्सोवा
जागतिक माहित नाही, पण तुमच्या डोक्यातलं हवामान बदललंय, हे निश्चित.
समुद्राला आग लागली तर मासे कुठे जातील?
आणि
देवाचा धर्म कोणता?
– अशोक परशुराम परब, ठाणे
तुमच्या पोटात.
राजकीय नेते डिटेक्टिव्हगिरी करू लागले, तर डिटेक्टिव्हांनी कोणता व्यवसाय करावा?
– पंडित साने, इचलकरंजी
फोटोग्राफी करावी त्यांनी.
साखरेचे खाणार त्याला देव देणार, म्हणजे काय? देव मधुमेह देणार, यातला मधुमेह हा शब्द चुकून राहिला आहे का?
– दत्ता कांबळे, शिंगणापूर
काय माहित… मुळात हा प्रश्न तुम्हाला कळलाय का???
जगात कारल्यापेक्षा कडू काय आहे? मधापेक्षा गोड काय आहे? मिठापेक्षा खारट काय आहे?
– रॉनी डिसिल्व्हा, नालासोपारा
कारल्यापेक्षा कडू माणसाची जीभ, मधापेक्षा गोड लहान मुलाचं निरागस हास्य, मिठापेक्षा खारट गरिबांचे अश्रू
माझं एका मुलीवर प्रेम आहे. ती नेहमी एका मुलाबरोबर दिसते. तो कोण असं विचारल्यावर तिने आतेभाऊ असं सांगितलं आहे. आता मी तिच्यापाशी माझं प्रेम व्यक्त करू की नको? प्लीज मला सल्ला द्या.
– साहिल सोनार, कुडाळ
नको. आता तू मामेबहीण शोध.
यंदा होळयेची बोंब मारलाव काय? आनि काय बोंब मारलाव?
– सुंदर जाधव, रत्नागिरी
होय तर… तुझ्या खानदानाचा उद्धार केला आहे.