शिवसेनेच्या स्थापनेपासून हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अतिशय विश्वासू, निष्ठावंत आणि पहिल्या फळीतील नेते सुधीरभाऊ जोशी आज आपल्यात नाहीत. राजकारणापेक्षा समाजकारणात अधिक रस असलेल्या आणि राज्यातील सुशिक्षित मराठी बेरोजगार तरुणांचे तांडे पाहून अस्वस्थ होणार्या सुधीरभाऊंची प्रामाणिक आणि सेवाभावी वृत्ती पाहून बाळासाहेबांनी त्यांच्याकडे स्थानीय लोकाधिकार समितीच्या अध्यक्षपदाची किल्ली दिली; या किल्लीने चमत्कार केला आणि लाखो मराठी तरुणांना नोकर्यांची दारे खुली झाली. ६० सालाच्या आसपास मुंबईत अनेक कंपन्या आल्या. त्यातून अमराठी लोकांना नोकर्या मिळू लागल्या आणि मराठी बेरोजगारांकडे पद्धतशीर दुर्लक्ष करण्यात येऊ लागले. `मार्मिक’मधून बाळासाहेबांनी `वाचा आणि थंड बसा’ हा स्तंभ सुरू करून मुंबईतील कोणत्या कंपनीत अमराठी लोकांची संख्या कशी भरमसाठ आहे याची यादी छापण्यास सुरुवात केली. १९ जून १९६६ रोजी शिवसेनेचा जन्म झाला. बाळासाहेबांनी `वाचा आणि उठा’ अशी `मार्मिक’मधून गर्जना केली. त्यानंतर स्थानीय लोकाधिकार समितीने सुधीरभाऊंच्या नेतृत्वाखाली एलआयसी, एअर इंडिया, इंडियन एअरलाइन्स, अनेक बँका, हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम, शिपयार्ड यासारख्या अनेक बड्या आस्थापनांना धडक दिली. एअर इंडियातील भरतीसाठी त्या कार्यालयावर निघालेल्या प्रचंड मोर्चाने त्या व्यवस्थापनाची झोप उडाली. त्यानंतर अनेक कंपन्यांबरोबर त्यांनी वाटाघाटी केल्या. त्याला यश येत गेले आणि लाखो मराठी तरुणांना नोकर्या मिळाल्या. आजही ते कार्य व्यवस्थित सुरू आहे. सुधीर जोशी आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांच्याकडे स्थानीय लोकाधिकार समितीची सूत्रे त्यावेळी होती. सुशिक्षित पदवीधर तरुणांची फौज सुधीरभाऊंच्या मागे होती आणि शिवसेनाप्रमुखांचे आशीर्वाद होते. त्यामुळे ही चळवळ फोफावली आणि त्याबरोबरच शिवसेनेच्या विस्तारालाही त्याचा मोठा हातभार लागला.
सुधीरभाऊंच्या कामाची पद्धत अतिशय शिस्तबद्ध होती. त्यामुळेच शिवसेनेच्या बांधणीसाठी, निवडणूक प्रचाराच्या शिस्तबद्ध आखणीसाठी बाळासाहेबांनी त्यांचा चांगला आणि योग्य उपयोग करून घेतला. नेता म्हणून त्यांनी कधीच बडेजाव केला नाही. उंच, देखणे आणि आकर्षक व्यक्तिमत्व, शांत स्वभाव, मुद्देसूद आणि प्रभावी बोलणे व समाजकार्याची प्रामाणिक आस यामुळे भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कासाठी आवाज देणारा सहृदयी व्रतस्थ नेता सतत सामान्य माणसाचा, मध्यमवर्गीय तरुणांच्या भवितव्याचा विचार करत असे. वयाच्या ३३व्या वर्षी ते शिवसेनेचे दुसरे महापौर झाले. मुंबईचे ते सर्वात तरूण महापौर होते. मुंबईकरांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ते पाहणी दौरे करत त्यावेळी सूट-बूट, टाय, गॉगल या वेषात त्यांचे उमदे आणि स्मार्ट व्यक्तिमत्व खुलून दिसे. मुंबईतील गटारे, नाले यांची पाहणी करताना आजूबाजूच्या कचर्याच्या ढिगाची, चिखलाची, गाळाची तमा न बाळगता त्या ढिगावर उभे राहून पालिका अधिकार्यांना विधायक सूचना सांगताना त्यांना अनेकांनी पाहिले असेल.
महापौरपद असो वा मंत्रिपद, त्यांची समाजाभिमुख भूमिका कधीच बदलली नाही. नि:स्पृहता, निस्वार्थीपणा आणि सेवाभावी वृत्ती हेच त्यांचे भांडवल होते. शिवशाही सरकारमध्ये शिक्षणमंत्री असताना शिक्षणाला त्यांनी नवी दिशा दिली. रूपारेल कॉलेजातून रसायनशास्त्रात पदवीधर झालेल्या सुधीरभाऊंनी शिक्षणक्षेत्रात अनेक विद्यार्थीहिताचे निर्णय घेतले आणि ते अंमलात आणले. त्यापूर्वी राज्यात पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी कोणतेही धोरण नव्हते. त्यामुळे बालवाड्यांमध्ये नेमके काय शिक्षण द्यावे, लहान मुलांना लिहायला देणे योग्य आहे की नाही, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी कायदा असणे आवश्यक आहे ही त्यांची भूमिका होती. त्यासाठी त्यांनी प्राचार्य राम जोशी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमून तो कायदा संमत केला. मुलांच्या पाठीवरचे दप्तरातील पुस्तके-वह्यांचे ओझे कमी करून त्यांनी मुलांना दिलासा दिला. `बालभारती’ची पुस्तके विद्यार्थ्यांना वेळेत मिळण्यासाठी त्यांनी विशेष मेहनत घेतली. १९९२-९३मध्ये विधान परिषदेत विरोधी पक्षनेते असताना त्यांनी राज्यातील सिंचन प्रकल्पांना भेट देऊन त्या संदर्भातील अहवालाच्या निष्कर्षावर ते पुस्तक शासनाला सादर केले. ज्या ज्या पदावर ते होते त्या त्या पदावर त्यांनी स्वत:च्या कामाचा ठसा उमटविला. अनेक शैक्षणिक संस्था, वाचनालये, शिक्षण संस्था, ग्राहक संस्था, बँक कर्मचारी संस्था यावर त्यांनी विश्वस्त, अध्यक्ष, सल्लागार पदे भूषविली. शिवाजी पार्कच्या अनेक शिवसेना मेळाव्यात त्यांनी केलेले सूत्रसंचालन सराईत निवेदकासारखे उत्स्फूर्त, कल्पक आणि त्यांच्या मार्मिक आणि मिश्किल शैलीची साक्ष देणारे असे.
समाजकारणात आल्यावर त्यांना दादर येथील वडिलोपार्जित भोजनालयाच्या व्यवसायाकडे फारसे लक्ष देता आले नाही. मात्र पैसा, प्रसिद्धी आणि पदाच्या मागे न लागता त्यांनी शिवसेनेला आणि बाळासाहेबांच्या विधायक कार्याला वाहून घेतले होते. मोटार अपघातात जबर जखमी झाल्यावर शारीरिक दौर्बल्यामुळे त्यांना काही काळानंतर सक्रीय निवृत्ती घ्यावी लागली. तरी शिवसेनेच्या प्रत्येक मेळाव्यात त्यांची आवर्जून उपस्थिती असे. त्यांना व्यासपीठावर सन्मानपूर्वक आसनस्थ केले जात असे. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाई. राजकारणातील एक सभ्य, सुसंस्कृत अजातशत्रू आणि साधे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख कोणीच विसरणार नाही. त्यांच्या जाण्याने शिवसेनेच्या स्थानीय लोकाधिकार समितीचा आधारवड कोसळला आहे, तसेच समाजसेवेचा वसा घेतलेले व्रतस्थ व्यक्तिमत्व अनंतात विलीन झाले आहे. `मार्मिक’तर्फे त्यांना विनम्र श्रद्धांजली!