प्रिय तातूस,
एकदम सांज खुलते, आकाश खुलतं तसं काहीसं वातावरण सगळीकडे झालंय. अरे मध्यंतरी मी पुण्यात लग्नाला गेलो तर जेवताना दोन पाट सोडून बसायला सगळ्यांना सांगितलेले. अगदी जुन्या पद्धतीने लग्न होते. अर्थात मला ते आवडलेही, नाहीतर इतके जवळजवळ बसवतात की जेवताना कोण कुणाच्या वाटीत हात घालतोय तेच समजत नाही. पण काही म्हणा, लग्न करावं तर पुण्यातच. आता आपल्याला ते शक्य नाही ही गोष्ट सोडा म्हणा! आहेर देणारांची रांग वेगळी. त्यांच्यासाठी वेगळा काऊंटर ठेवलेला. तिथे रीतसर रिसीट व त्यावर टॅक्स एक्झम्पशनचा शिक्का व आहेराप्रमाणे वेगवेगळी कुपन्स देत होते. साऊथ इंडियन चायनीय, चाट पंजाबी वगैरे आणि जनरलसाठी साधा वरणभात वगैरे पण तिथे थोडी गर्दी होती. ऑफिसात कसे उतरती भाजणी असते, मॅनेजरला जास्त पगार, त्याच्याखाली असिस्टंट मग ऑफिसर, क्लार्क, प्यून वगैरे. तसं कितीही समता आली तरी केबिन मॅनेजरलाच असणार. क्लार्क किंवा प्यूनला थोडेच कुठे केबिन मिळणार आहे, मंत्री वगैरे कोणी मोठे येणार असतील तर त्यांना सगळे घ्यायला येतात. मला काहीवेळा वाटतं मंत्र्यांना कुणाकडे व कुठे बोलावलंय हे सगळं कळवलेलं असतं. ते जीपीएसमध्ये टाकलं तर बरोबर न चुकता गाडी त्या पत्त्यावर जाऊ शकते. त्यांना घ्यायला येवढ्या गाड्या कशाला येतात हे मला कळत नाही. किती माणसांचे तास अन् पेट्रोल उगाचच जातं? आता खरे तर बॅगेला चाके पण असतात. त्यामुळे कुणीही सहज सामान ढकलत नेऊ शकतो. (अरे, मी परवा वाचलं की या व्हीलच्या बॅगांमुळे साठ टक्के हमाल कमी झाले म्हणे.)
अरे, आपण इतके व्यवस्थित कळवूनही स्टेशनवर घ्यायला कुणी आलेलं नसतं. फोन केला तर म्हणतात ‘आम्हाला वाटलं तुम्ही उद्या येणार!’ ही अशी आपली कथा. अरे घरी आल्यावर तर अजून दोनतीन दिवस राहणार होतात ना विचारतात.
ते जाऊ दे. सांगायचा मुद्दा म्हणजे सगळं पूर्वीसारखं चालू झालंय. त्यामुळे मोहोळ फुटावं ना तशी माणसे नुसती सर्वत्र दिसतायत. पाचपेक्षा अधिक लोकांनी एकत्र यायचं नाही. हे म्हणे पांडवांपासून निघालं असं नाना गमतीने म्हणतो. नाहीतर नकुल वा सहदेवाला बाहेर काढलं असतं. त्याला काय काय सुचेल काही सांगता येत नाही. मध्यंतरी आम्ही नाटकाला गेलो तर प्रत्येकजण डबलरोल करत होता. पात्रेपण पन्नास टक्केच घ्यायची म्हणे. आता मात्र सगळीकडे शंभर टक्के उपस्थितीला परवानगी दिलीय.
सगळ्या कार्यालयात शंभर टक्के उपस्थिती सक्तीची केलीय. त्यामुळे अनेकांना धडकी भरलीय. अक्षरश: बेडवर आडवं होऊन अनेकजण कॉल अटेंड करत होते. अरे, सगळे नवरोजी घरात असल्याने या बायकांचे चांगलेच फावले. एकतर साफसफाईची कामे करायला कोणीच येत नव्हते अथवा सगळ्या सोसायट्यांत बाहेरच्यांना बंदीच होती. त्यामुळे बरेचसे नवरे कम घरगडी झाले. अरे, फेसबुकवर तर फ्लोअर क्लीनिंग मॉप हाती घेतलेले फोटोदेखील टाकले. यावरून तर एकमेकांनी कॉमेंट टाकताना ‘खरी लायकी कळली?’ असे देखील टाकले. बघ. अरे तिकडे विदेशात बायकांच्या बरोबरीने पुरुष सगळी कामे करतात.
अरे गेली दोन वर्षे सकाळी उठून झाडूपोता करून, सगळी भाजी निवडून चिरून बहुतेक नवरे लॅपटॉपवर बसत होते. त्यामुळे चहा, चहा, चहा असं किचनचं स्वरुप झालेलं. अरे पण या काळात इस्त्रीचे एका वेळचे दीडशे रुपये वाचले. गाडीचे पेट्रोल, डिझेल वाचले. म्हणजे देशाचे कोट्यवधी रुपये वाचले म्हणतात. ऑफिसला गिरगावातून चालत जाणार्या लोकांना पण कन्व्हेयन्स अलाऊन्स मिळतोच. यावर्षी सर्वात जास्त थंडी पडलीय. त्याचं कारण वाहनांमुळे होणारे प्रदूषणच थांबले. म्हणून पाऊस पण पडला आणि दात तडतड वाजावेत अशी थंडी यंदा पडली. बघ. सकाळ संध्याकाळ काय आणि शनिवार रविवार काय, सगळे जेवायला घरात. त्यामुळे म्हणे बायका स्वयंपाकाला विटल्या.
पुढच्या काही दिवसांत हक्काचा घरगडी आपण गमावणार यामुळे अनेक महिलांच्या डोळ्यांत अक्षरश: पाणी आले. आमच्या सोसायटीत तर महिला मंडळाने नारळ, उपरणे आणि एक खराटा देऊन या सर्व नवर्यांचा मोठा सत्कार केला. आमच्या इथल्या नगरसेविका प्रमुख पाहुण्या होत्या. त्यांनी या सर्व पुरुषांना शुभेच्छा दिल्या व अशीच प्रगती होवो असे म्हणाल्या.
पण अरे तातू, खरा संघर्ष तर पुढेच आहे. युनियनचे म्हणणे या दोन वर्षांत एकाही स्टाफने कॅज्युअल लीव्हदेखील घेतली नाही. मग इतर रजांचे तर नावच सोडा. या सर्व रजा एन्कॅश कराव्यात तसेच कार्यालयात प्रत्येक मजल्यावर एक वामकुक्षी कक्ष असावा व तिथे लंच टाइमनंतर अर्धा-पाऊण तास वामकुक्षीची सोय असावी अशी लेखी मागणीच केलीय त्यांनी, तर जपानचा संदर्भही दिलाय. तिथे स्टाफचा माणूस टेबलावर डोके टेकून म्हणे वीस मिनिटे विश्रांतीपण हक्काने घेऊ शकतो. अरे, नानाचा मुलगा तिकडे स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीत असतो. तिथे तर आता चार दिवसांचाच आठवडा करणार आहेत. अर्थात हे लोण आपल्याकडे येणारच.
अरे तातू, बर्याच शहरात आता लोकांना घरून काम करायची सवय लागलीय. त्यामुळे कुरीयर कंपन्यांच्या जागा मालाने भरल्यात. या जागेमध्ये ऑफिसबरोबरच वामकुक्षी कक्ष स्थापन होऊ शकतो. त्यावर पर्सोनेल डिपार्टमेंटने तुम्ही जेवढी मिनिटे वामकुक्षी घ्याल तेवढा वेळ जास्त काम करावे लागेल असा तिढा टाकलाय. हे पर्सोनेलचे लोक असतात ना त्यांना कधी कुणाचं चांगलं बघवत नाही. अरे गेली दोन अडीच वर्षे घरून काम करताना घरच्या जेवणामुळे डुलकी लागणे अगदी स्वाभाविक आहे. आता ही डुलकी सीसीटीव्हीत रेकॉर्ड झाल्याने अनेकांना मेमो द्यायला सुरुवात झालीय.
हा खरे तर अन्याय आहे आणि मी याचा निषेध नोंदवतो. पण आता डोळे मिटू लागल्याने मी आवरते घेतो.
तुझा
अनंत अपराधी