काही वर्षांपूर्वी एक काहीसे वाह्यात लोकगीत फार प्रसिद्ध होते. काय राव तुम्ही, धोतराच्या धंद्यात भरपूर कमावलं, अन् बाईच्या नादानं, सारं लुगड्यात गमावलं… अशा त्याच्या ओळी होत्या… भारतीय जनता पक्ष नावाच्या स्वघोषित महाशक्तीच्या बाबतीत राज्यात मात्र या ओळी उलट्या होत आहेत. लोकांमधली विश्वासार्हता, प्रेम, आदर यांची त्यांची कमाई आधीच खोकेबाजी आणि सत्तापिपासेमुळे घसरत चाललेली आहे. त्यातही जे काही थोडेफार वाडवडिलांच्या पुण्याईने कमावले असेल, ते धोतरात गमावणे सुरू आहे.
धोतर हा आपल्या अनेक पिढ्यांपासूनचा राष्ट्रीय पोषाख होता. पण, बायकांना टिकल्या लावा, साडी नेसा, पदर घ्या, अमुक कपडे घाला, तमुक कपडे घालू नका, असले उपदेश करणारे स्वघोषित संस्कृतीरक्षक कधी पुरुषांना पँट शर्ट सोडून धोतर बंडी घालण्याचा उपदेश करताना दिसत नाहीत. संस्कृती जपण्याची जबाबदारी बहुदा पुरुषांवर नसावी. तरीही धोतर, कोट, टोपी अशा वेषातला कोणी साठी-सत्तरीपारचा मनुष्य दिसला की तरूण आणि मध्यमवयीनांमध्ये आदराची भावना निर्माण होते. या माणसाने अनेक पावसाळे पाहिले असणार. स्वातंत्र्यलढा पाहिला असणार, निदान स्वातंत्र्याची पहाट तरी अनुभवली असणार. त्या वेळच्या परिस्थितीपासून ७५ वर्षांत देशाने काय काय कमावले, केवढी झेप घेतली, हे पाहिले असणार, असे वाटून हा आदर दाटून येतो. पण, दुर्दैवाने आजकाल काही चहाटळ धोतरे पाहिली की ती फेडण्याचीच ऊर्मी दाटून येते लोकांच्या मनात. या धोतरांतील शकुनीमामांच्या डोक्यावरच्या टोपीत नेमकी किती जळमटे आहेत आणि ती आता झाडायची कशी, असाच प्रश्न लोकांना पडतो.
भाजपाच्या विचारधारेत अशी बरीच धोतरे सुप्तावस्थेत आहेत. काही पँट शर्ट, जाकीट, कुर्ता, सलवार वगैरेच्या आड दडलेली आहेत. पण आहेत जुनाट धोतरेच. ती जाहीरपणे ‘बडवण्या’च्या भानगडीत एरवी मराठी जनता पडली नसती. तिला इतर बरीच कामे आहेत आणि केंद्रीय सत्तेच्या कृपेने विवंचनाही खूप आहेत. पण, असे एखादे धोतर जेव्हा संविधानिक पदावर विराजमान होते आणि तिथून महाराष्ट्राच्या अस्मितेवर, अभिमानावर दुगाण्या झाडते, तेव्हा ते फेडायचीच इच्छा दाटणार ना.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्राच्या हिताचे आणि महाराष्ट्राची प्रतिमा उंचावणारे काय काम केले आहे, या प्रश्नाचे उत्तर त्यांच्या मातृसंघटनेचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान काय, या प्रश्नाच्या उत्तरासारखेच असेल… म्हणजे काय, ते सांगायला नको. अनेक मान्यवरांनी महाराष्ट्राचे राज्यपालपद भूषविले आहे. राज्यपाल हा केंद्र सरकारचा प्रतिनिधी बनून राज्याच्या कारभारात, विशेषत: विरोधी पक्षांचे सरकार असेल तेव्हा, अनावश्यक ढवळाढवळ करतात, काही गोष्टी अडवू पाहतात, हेही काही देशात नवीन नाही. काँग्रेसच्या राजवटीतही हे कमीअधिक प्रमाणात होतच होते. स्वपक्षीय सरकार असतानाही मुख्यमंत्र्यांचे पाय कापण्यासाठी राज्यपालांचा वापर झालेला आहे. मात्र, इतर अनेक घटनात्मक पदे आणि संस्था यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात जे अवमूल्यन झाले आहे, त्याइतके अवमूल्यन राज्यपालपदाचेही झालेले नसेल. पहाटेच्या शपथविधीचा राडा, महाविकास आघाडीच्या कामात खोडा आणि मिंधे सरकार सत्तेत येताच पदाची गरिमा, प्रतिष्ठा गुंडाळून ठेवून भरवलेला पेढा, असा उघड पक्षपाती व्यवहार या पदावरून त्यांनी केला आहे. तोही त्यांच्या पक्षाच्या सत्तालालसेला शोभणारा आहे. पण, कधी छत्रपती शिवाजी महाराजांना समर्थ रामदासांपेक्षा क्षुल्लक ठरवायचे, कधी महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीमाई यांच्या बालविवाहाच्या संदर्भात आंबटशौकीन, रुचीहीन पिंका टाकायच्या, कधी महाराष्ट्र अन्यप्रांतीयांमुळेच मोठा झाला, अशी देशव्यापी पोटदुखी व्यक्त करायची, असे अभ्यासक्रमबाह्य उद्योग त्यांना का सुचत असतील? त्यांनी नुकताच एका समारंभात छत्रपती शिवाजी महाराज हे जुने आदर्श झाले, असे तारे तोडलेले आहेत. कशाला करता तात्या या नसत्या उचापती?
एकीकडे राहुल गांधी यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील अनावश्यक शेरेबाजीमुळे भलतेच इंधन मिळाल्याने पेटून उठलेले खोकेबहाद्दर आणि भाजपेयी (यांच्या मातृसंघटनेने सावरकरांना कायम दूर ठेवले, आता राजकीय वापरापुरतेच त्यांचे महिमामंडन) राज्यपालांच्या या बेताल वक्तव्यानंतर चिडीचुप्प झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर राज्यपालांच्या विधानांचा विपर्यास झाला, अशी धडधडीत लोणकढी ठोकली. त्यांच्या विधानांचा निषेधही केला नाही. ते भाषण पाहणारा कोणीही सांगेल की त्यात विपर्यास काहीही नाही. वयोमानपरत्वे आणि परिवारातील संस्कारांमुळे महामहीमांची जीभ घसरली, असे फार तर म्हणता येईल. पण, घटनात्मक पदांवर बसलेल्यांनी अशी वारंवार घसरणारी जीभ ताब्यात ठेवली पाहिजे. उत्स्फूर्त भाषण हा आपला प्रांत नाही, त्यात आपण पायावर कुर्हाडच मारून घेतो, हे माहिती असेल तर सुज्ञ अधिकार्यांकडून लिहून घेतलेली भाषणे वाचून दाखवली पाहिजेत. तसे बंधन त्यांच्यावर घातले पाहिजेत. ज्यांने पुतीन ऐकतात, झेल्येन्स्की कानांत प्राण आणून ज्यांच्या फोनची वाट पाहतात, ट्रम्प ज्यांचे एकेरीतले मित्र आहेत, त्या विश्वनेते मोदींचे कोश्यारी ऐकणार नाहीत, असे होणारच नाही.
तसे होताना दिसत नाही. भाजपाच्या आणि संघाच्या संदर्भात काही योगायोगाने होत नाही. प्रत्येक गोष्टीमागे काही सुसूत्र नियोजन असते, काही ठोकताळे असतात. प्रबोधनकार डॉट कॉमच्या रिलाँच सोहळ्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, त्याप्रमाणे पिल्लू सोडून द्यायचे आणि ते मोठे झाले की त्याचे पितृत्त्व घ्यायचे असा हा खेळ सुरू असतो. मात्र, अशा काही योजनेनुसार कोश्यारी वारंवार महाराष्ट्राच्या अभिमानबिंदूंचा अधिक्षेप करणार असतील, तर त्या नीच खेळाचे तीन तेरा वाजवल्याशिवाय महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही. एखाद्या राज्याच्या राज्यपालाचे धोतर फेडा आणि एक लाख रुपये जिंका, अशी कोणीतरी सुपारी देण्याइतक्या खालच्या थराला हे सगळे प्रकरण गेले त्याला कसलाही विपर्यास कारणीभूत नाही. राज्यपालांनी महाराष्ट्राची माफी मागून यापुढे गप्प बसण्याची प्रतिज्ञा केली पाहिजे.