मागच्या आठवड्यात १७ नोव्हेंबरला आदरणीय शिवसेनाप्रमुख आणि थोर व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. त्यांच्या मुलाबाळांपासून आणि निष्ठावान शिवसैनिकांपासून त्यांना सध्या हिरावून घेण्यात आलं आहे. अर्थात हा आभास आहे, चंद्रग्रहणासारखा, काही काळ टिकणारा. उभ्या महाराष्ट्रात त्यांची आदरयुक्त जरब होती. कुठलंही जरबेचं राजकारण न करता केवळ ब्रशच्या फटकार्यांनी ते अनेकांना घाम फोडायचे. हे आठवल्यावर मला ‘आवाज’मधलं माझंच एक चित्र आठवलं. मराठेशाहीत संताजी धनाजी या मराठी मावळ्यांनी अनेक मोगलांत दहशत निर्माण केली होती. अक्षरश: त्यांनी धसका घेतला होता. वाटेतल्या ओहोळावर जर घोड्यांनी पाणी प्यायचं नाकारलं तर ते आपसात म्हणत, घोडी का बिथरलीत? त्यांना पाण्यामध्ये संताची धनाजी तर दिसत नाहीत ना! अशीच दहशत बाळासाहेबांबद्दल वाटे. ती मी त्या चित्रात चितारली होती.
अनेकदा वाचक विचारतात, ‘तुम्हाला चित्रं सुचतात कशी?’ लहरीने जगणारे कलावंत वेगळे. व्यावसायिक कलावंत वेगळे. व्यंगचित्रकार हा पेशा पत्करल्यामुळे दैनिकाची असोत, वा दिवाळी अंकाची, चित्रं वेळेवर द्यावीच लागतात. गावकरीत बॉक्स कार्टून द्यायचो, त्यावेळी त्यांचा शिपाई रोज नियमाने सहा वाजता हजर व्हायचा. जवळपास तीस वर्षं. नंतर ऑनलाइनची सोय झाली. मात्र कल्पना सुचण्यासाठी एकांत लागतो. वाचन, मनन, चिंतन याबरोबर नारद मुनींची चौफेर, तिन्ही लोकांत भ्रमण करणारी नजर हवी असते. भूत-भविष्याचा, वर्तमानाचा वेध घ्यावा लागतो. सर्व हौसमौजेला फाटा द्यावा लागतो. त्यामुळेच लाखाच्या वर व्यंगचित्रे मी काढू शकलो. मात्र आजूबाजूच्या आयाबायांमध्ये माझी ओळख वेगळीच होती. गेली तीसेक वर्षे माझ्या बंगल्यात झोपाळा टांगलेला आहे. सकाळ संध्याकाळ मी त्यावरच बसून मंदसा झोका घेत राही. तेथे बसूनच मला कल्पना सुचत. विशेषत: दिवाळी अंकाच्या खिडक्या, चित्रमाला, जाहिरातींची चित्रे. जाणार्या-येणार्यांना वाटे, हा कोणीतरी मंदबुद्धी माणूस वा रिकामटेकडा येडा असावा. आजूबाजूच्या बायका वा मिसेसच्या मैत्रिणीदबक्या आवाजात विचारत, काय हो, सोनार काका कुठे नोकरीला जात नाहीत का?
मिसेस सांगे, ते व्यंगचित्रकार आहेत. चित्रे काढतात. ते ठीक, पण पोटपाण्याचे काय? शिवाय, गाडी, बंगला सगळं काही जिथल्या तेथे दिसते? बरे तसे सज्जन वाटतात. बरेच उच्चभ्रू लोकही तुमच्याकडे येत असतात. हे कसे? चित्रे काढून सुखात जगता येते हे लोकांना ठाऊकच नव्हते.
आता चित्रमालेची प्रोसेस सांगतो. उदाहरणार्थ मत्स्यकन्या हा विषय घेऊ. खरे तर मत्स्यकन्या अस्तित्वात आहेत की नाही हेच अजून निश्चित व्हायचं आहे… हिममानव, परग्रहावरील तबकड्यांप्रमाणे. पण सगळ्या जगाला अजून कुतूहल आहेच. त्यावर अनेक अंगांनी विचार करीत राहायचे. आठ चित्रे सुचेपर्यंत. वेळोवेळी कशी चित्रे सुचलीत, त्याचे नमुने पहा. सध्या संपूर्ण उघडी पाठ दाखवणारे ब्लाऊज आले आहेत. लांबून पाहिले तर पाठ व काळे निळे डाग दिसतात. नीट पाहिलं, तर त्याला टॅटू म्हटलं जातं. शक्यतो ते दुरूनच पहावेत. कारण कधी विनयभंगाचा आरोप होईल याचा नेम नाही. अशीच उघडी पाठ १९७०च्या दरम्यान इंट्रोड्यूस झाली होती. त्यावर मी मुखपृष्ठ काढलं होतं, एक मंत्री फोटोग्राफरकडे पाहात उद्घाटनाची रिबन कापण्याऐवजी ब्लाऊजच्या गाठीकडे नकळत कात्री नेतोय.
चित्र छापून आल्यावर एका प्रमदेने मला पत्र लिहिले, तरुणींचा अपमान करणारी अशी चित्रे आपण काढताच कशी?
त्यावर मी लिहिले की, ‘अशा तरुणी पाहूनच. फॅशन आपण करता, मी फक्त चित्र काढलं, कपडे कसे नसावेत ही चूक दाखवली इतकेच.’
या फॅशनची उबळ पुन्हा आता या काळात नव्याने आली आहे. त्यावरच अलीकडचं एक चित्र.
गावकरीतील तीन कॉलमी चित्रं काही वेळेला खूप वाहवा मिळवून जायची. त्यातले एक आठवते. ते असे- १९६०-७०च्या दशकात रशिया आणि अमेरिका हे अत्यंत प्रभावी शत्रू मानले जायचे. ते व्हेटो वापरून एकमेकांना नामोहरम करण्याची संधी सोडायचे नाहीत. त्यांच्या या अरेरावीला कंटाळून युनोचे सरचिटणीस यू थांट यांनी राजीनामा दिला. थांट यांचा लौकिक फार प्रतिष्ठेचा होता. ते अत्यंत कार्यक्षम होते. जगाने त्यांच्या राजीनाम्याला विरोध केला. पण ते निर्णयावर ठाम होते. त्यावर मी चित्र काढलं, युनोमधून U (यू थांटचा यू) गेला की खाली काय उरणार फक्त NO वाचकांना चित्र खूप आवडलं. इतकं की काहींनी कॉमेंट्स केल्या की तुमचं चित्र पाहून थांट यांनी राजीनामा मागे घेतला आहे.
असेच एक चित्र. पुण्याच्या जोशी-अभ्यंकर खून खटल्याचं. खुनी तरुणांनी गळा आवळण्यासाठी नायलॉनच्या दोर्या वापरल्या होत्या. त्यांना फाशीची सजा झाली, तेव्हा फाशीच्या दोरखंडाला त्यांनी विरोध केला. (म्हणे गळ्याला त्याचा त्रास होईल.) कोर्टाला प्रश्न पडला. कारण आजपर्यंत फाशीचा दोरच प्रमाण मानला गेला आहे. पुन्हा तारीख पे तारीख. शेवटी खंडपीठाने दोरानेच फाशी देण्याचा निर्णय कायम केला. असो! मंगेश तेंडुलकर यांच्या चित्रमाला मला खूप आवडायच्या. एक चित्र आठवलं की हसू येतं. हातभट्टीचा सेटअप असलेला बाप नापास झालेल्या पोराच्या कानफटात देतो. त्याचे प्रगतीपत्रक पाहताना म्हणतो, इतर विषयांत नापास झालास हे समजू शकतो, पण निदान रसायनशास्त्रात तू नापास व्हायला नको होतंस!’
वीस-पंचवीस वर्षांपूर्वी दिवाळी अंक, दैनिके, मासिके निवांतपणे पाहता यायची. काळापांढरा टीव्ही अँटिनाच्या मर्जीवर खरखरत मन:स्ताप देत दिसायचा. एक पोरगं अँटिना अॅडजस्ट करण्याकरता सतत गच्चीवर लोंबकळत असायचं. दूरदर्शनवरचे माफक कार्यक्रम आनंद द्यायचे. हमलोग, बुनियाद, रामायण, महाभारत यांसारख्या सिरीयल्स घरदार पाहत बसायचं… हा हा म्हणता चॅनल्सची सुनामी आली आणि दाही दिशांनी कंठाळी, आक्रस्ताळी लाटांनी जगाचे मन:स्वास्थ पार बुडवून टाकलं. इत्यलम!