अरे बाबांनो, आताच्या काळाला धरून मायक्रोफॅमिलीचे प्रश्नबिश्न दाखवा काहीतरी सिरीअलमध्ये! किती वर्षं त्याच जात्यावर तेच दळण दळणार तुम्ही! जातं तरी बदला किंवा दळण तरी बदला! किमान जातं ज्या पोत्यावर ठेवलंय ते पोतं तरी बदला रे भावांनो! पोतं बदललं तरी वैचारिक पोत बदलून फरक पडू शकतो.
—-
सिरीअलने किल मारलेले लोक आणि ‘लोकी’ हल्ली घरोघर दिसायला लागलेत.
जेवायला बसल्यावर जसं आपण निमूटपणे काय पुढ्यात असेल ते खातो… तसं लोक टीव्हीसमोर बसून अरबट चरबट बघत असतात. कुणाकुणाची रंगतदार लफडी, काळजीपूर्वक जोपासत ठेवलेली, तेलपाणी देवून तुकतुकीत ठेवलेली वैरं… त्यांची मोठीमोठी घरं, (त्यांच्या पावण्यांची गावातली घरं पण छान प्रशस्त पॉश एकदा रिसॉर्ट सारखी ) मोठमोठ्या बेडरुमा… जेवणाचे थाटमाट, सणावाराला ओथंबलेलं वैभव… दागदागिने… एक चुरीही न पडलेले आणि आयुष्यात फक्त एकदाच वापरले जाणारे कपडे हे सगळं लोक (आणि लोकी) या किंमती आयुष्यातला मोलाचा वेळ देवून वर्षानुवर्षे बघत असतात. त्यांचा एक एक दिवस रोज बघताना आपण आपलं आयुष्य संपवत आणतो.
जर घरातल्या प्रत्येकाने प्रत्येक सिरिअल बघताना एक खडा जर एका हंड्यात टाकला… सॉरी रांजणात टाकला (रांजण म्हटलं की नंतर कधीतरी तो हिर्यामोत्याने भरून जाईल असं वाटायला लागतं… लहानपणी वाचलेल्या लोककथांचा परिणाम); तर तो रांजण आठ दिवसात शिगोशिग भरून जाईल. ज्या सिरिअलमधे पुढील पन्नास भागात काय घडणार आहे याचा अंदाज पहिल्या दोन भागात येतो, फणसातल्या आठळीसारखा (घोट्या) जिचा शेवट पष्टपणे डग्गळ लक्षात येतो, ती सिरिअल का एवढी बघतात जीव तोडून?
कोण कोण लहान मुलं पण आजी आजोबांबरोबर एवढी मन लावून सिरिअल बघतात की परवा आमच्या शेजारची लहान मुलगी तिच्या आईला म्हणाली, तुला माहितेय, मिकी माऊस माझा नवरा आहे (नशीब बॉय प्रâेंड आहे, असं नाही म्हणाली… असं तिची आई म्हणाली). तिची आई एवढी धास्तावली हे ऐकून! बरं टीव्हीच बंद ठेवला तर ज्येष्ठांचं मनोरंजन कसं होणार? त्यांना समवयस्क माणसं सिरिअलमधेच भेटतात… सुखदुःख शेअर करायला आहेत कुठे माणसं? हल्ली एकामेकांना टाळण्यातच बराचसा वेळ जातो. घरातला टीव्ही बंदच केला तर वयस्क लेकरांचे मोठे हाल होतील. बाहेर फिरायला म्हणा किंवा देवळात बागेत गेलेली ही मंडळी एखाद्या सिरिअलच्या ओढीने तर घरी परत येतात. त्यातली पात्रं आपली वाट बघतायत असा छानसा फील त्यांना येतो.
(माझी एक मैत्रीण सांगत होती… तिच्या सासुबाई चार सिरिअल रोज तीन वेळा बघतात (प्रक्षेपण वाया नको जायला), वैताग आलाय! घर सोडून जावंसं वाटत कुठेतरी!
म्हटलं, तू किती वेळा बघतेस?
एकदाही नाही. पण डायलॉग कानावर पडत राहतात ना सारखे! सारखा डोक्यात एको वाजत राहतो. काय करू सांग! दिवस पुढे सरकतोय की नाही, हेच कळत नाही.
मानसिक छळाचे हे नवीनच प्रकार आहेत. तीच कारस्थानं दरवेळी नव्या उत्सुकतेने डोळे मोठे करून बघायची म्हणजे मोठं हेच आहे. एवढा अभिनय सिरिअलमधील पात्रं पण करत नसतील आणि अशा माणसांना आपण नॉर्मल म्हणून बघायचं हीसुद्धा मोठी कमाल!
त्यात एखादी सून चांगली दाखवली असेल तर ‘किती चांगली आहे अरुंधती,’ असे सुनेकडे बघत टोमणे मारता येतात.
‘तिच्या सासुबाई काय डावपेच करत नाहीत… सरळ काय ते बोलून टाकतात. किती छान आहेत त्या,’ असं सुनेला सासूच्या हातात गरम चहाचा कप देताना बोलता येतं. काही रागावून बोलावं तर गरम चहाचा कप हातात असतो. त्याची नाही म्हटलं तरी जरब बसतेच.
आलं लक्षात? सिच्युएशन लक्षात घ्या.
आणखी एक गंमतीची गोष्ट म्हणजे, बर्याचशा सिरिअलमधे माणसं दहा दहा वर्ष निर्मळपणे हसतच नाहीत. हसली तर कुत्सितपणे हसतात. जसं काही निर्मळपणे हसलं तर सिरिअलमधला अवघा चार्म निघून जाईल असं त्यांना वाटतं!
तर मला फक्त एक आवर्जून गोष्ट सांगावीशी वाटते की कारस्थानं बर्यापैकी नव्याने रचली गेली पाहिजेत. हाल भोगणार्यांपेक्षा हाल करणार्यांची दया यायला लागलीय. परमेश्वरा, काय वेळ आणली आहेस तू आमच्यावर! अजूनही लाडकी सून पाय घसरून पडावी म्हणून किचनमधे तेल ओतून ठेवलं जातंय! तिने गॅसवर ठेवलेले पदार्थ नीटपणे करपवले जातायत. तिने केलेल्या जेवणाचा त्रास व्हावा म्हणून जेवणात विष मिसळलं जातंय! ते पण तिला कळणार नाही पण आम्हाला नीट म्हणजे अतिच कळेल याची खबरदारी आजही घेतली जातेय. अरे कितीदा दाखवाल तोच पुन्हा पुन्हा शॉट! ती क्रूर हसत आणि आमच्याकडे बघत वाटीत- बहुधा खिरीच्या, विष मिसळणार, नेत्रपल्लवी बिल्लवी करणार (प्रत्येक सिरिअलमधे विषाचं बजेट किती असतं कोण जाणे), खरं म्हणजे जिच्या वाटीत ते विष मिसळलं गेलंय तिच्या पण ते लक्षात येतं… ती किंचित हुशार असते. पण तिला वाटतं खास आपल्यासाठी ती वेलची पूड किंवा बदाम पिस्ते ओबडधोबड कुटून टाकत असेल म्हणून ती दुर्लक्ष करते. काय समजलाव?
मला तर तो आमच्या बुद्धीचा अपमान वाटायला लागलाय. किंचित ओझरतं दाखवायचं! मग आम्ही आमची विचक्षण (म्हणजे कशी, माहित नाही) बुद्धिमत्ता वापरून वापरून धागेदोरे शोधून काढू. म्हणजे आम्हालाही कपटीपणा शोधण्याचा निष्कपट आनंद मिळेल. पण नाही… एवढं फोडून विस्कटून सगळं सांगतात की आम्ही शापच बुद्दु असल्याचा फील आमच्यामध्ये चारही अंगांनी डेव्हलप व्हायला लागलाय (म्हणून मी मुळात सडसडीत असले तरी दिसताना जाड दिसते).
बरं जिच्याविरुद्ध कपट केलं जातंय ती एवढी महाबुद्दु दाखवतात की तिच्या बेडरूममध्ये बोर्ड लिहून जरी ठेवला की कपट क्रमांक अमुक तमुक, वेळ अमुक, सहभागी व्यक्ती ढमुक, कपटाचे स्वरूप असे, किती काळ चालेल… हे सर्व लिहून जरी ठेवलं तरी तिला ते दिसणार नाही…म्हणजे तो बोर्ड कदाचित ती नीट पुसून काढेल. एखादा कोळी त्यावरून फिरत असेल तर त्याला मोठ्या प्रेमाने गॅलरीत शिफ्ट करेल… यू नो… बोर्डाला पुष्पमाला अर्पण करेल… पण बोर्ड वाचणार नाही.
शेवटी विधिलिखितापुढे काही चालत नाही हेच खरं!
पूर्वी असे प्रसंग बघितले की मी खूप म्हणजे खूपच हळहळायची. पण हल्ली नाही हळहळत! म्हणजे माझ्यात आता वैचारिक प्रगल्भता यायला लागलीय, ही गोष्ट नक्की झाली… हे ही नसे थोडके!
काही सिरिअलमधल्या सुना एवढ्या प्रारंप्रारिक दाखवतात की बसच! बरं बोलताना चेहर्यावरचे भाव एकदम मॉडर्न असतात आणि भाषा गावरान! काय करशीला आता हिच्यापुढे? मला तर जीन्स आणि टी शर्टवरच तिने साडी गुंडाळलीय असा फील येत राहतो… यू नो!
सिरिअलपोटी लाखो रुपये खर्च होतात. ती लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आधुनिक टेक्निक वापरलं जातं. तर सदानकदा भारी भारी साड्या पेहनून आणि झुमके घालून घरात वावरणार्या, सतत घरातल्या सासू-सासर्यांना फेस करत फेस आणणार्या सुना दाखवण्यापेक्षा त्यातली एखादी तरी करिअर करणारी सून दाखवा. तिचे प्रश्न दाखवा. स्त्रिया करिअर करायला लागल्यालाही पन्नासहून जास्त वर्षं होवून गेलीत. आम्हाला काही राग येणार नाही. आम्ही सहजतेने पचवू या गोष्टी!
अरे बाबांनो, आताच्या काळाला धरून मायक्रोफॅमिलीचे प्रश्नबिश्न दाखवा काहीतरी! किती वर्षं त्याच जात्यावर तेच दळण दळणार तुम्ही! जातं तरी बदला किंवा दळण तरी बदला! किमान जातं ज्या पोत्यावर ठेवलंय ते पोतं तरी बदला रे भावांनो! पोतं बदललं तरी वैचारिक पोत बदलून फरक पडू शकतो.
आणखी एक गंमत म्हणजे एक सोशिक बाई वर्षानुवर्ष सोशिकच दाखवतात. ती आपली नित्यनेमाने व्रत केल्यासारखं छळून घेतेय. सोताचे हाल करून घेतेय आणि व्हिलन मंडळी नव्या जोमाने म्हणजे नवे कपडे घालून आणि नवीन दागिने घालून (आयडिया त्याच जुन्या टुकार) तिला छळतायत! शेवटी तिची दया यायच्याऐवजी राग यायला लागतो. एकदा तरी ती चिडते, ताड ताड बोलते किंवा व्हिलन अँड व्हिलन कंपनी छळून छळून बोअर होते आणि माफी मागते! किंवा काही ग्रे शेड (यू नो… हल्ली ग्रे शेडची फॅशन आलीय) दाखवा. निदान म्हातार्यांचे केस पिकलेले तरी दाखवा.
हे म्हणजे आमटी जर रोज त्याच चवीची होत असेल तर बिघडली तरी चालेल… पण चव बदलू दे, असं म्हणण्यासारखं आहे.
हा सगळा विचार करून मन विषण्ण होतं… दोन पाचसात तेरा-सतरा मिनिटं… एवढाच काळ… पण विलाज नाही हेच खरं!
– सई लळीत
(लेखिका खुसखुशीत ललित लेखन आणि सादरीकरणासाठी प्रसिद्ध आहेत)