कोणतीही भाषा येत नाही, कळत नाही तरी ती येतेय हे दाखवण्याचा आटापिटा विजय पाटकरने चेहर्यावरून, डोळ्यांमधून, आंगिक अभिनयातून ज्या पद्धतीने दाखवला त्याला तोड नाही. विजयच्या या प्रकारची तुलना चार्ली चॅप्लिनच्या शैलीशीच होऊ शकेल, इतका तो ती परिणामकारक करायचा… चार्लीला देव मानणारा विजय स्वत:ला त्यांच्याशी कुठेही तुलनात्मक रीतीने पाहत नाही; पण प्रेक्षकांना मात्र त्याला पाहताक्षणी मनोमन चार्ली आठवल्याशिवाय राहत नाही.
—-
पन्नासएक वर्षांपूर्वीची गोष्ट असेल… तो काळ म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सवाचा भरभराटीचा काळ होता… गिरगाव खेतवाडी, लालबाग, परळ, दादर वगैरे विभागातले जवळजवळ सर्वच गणेशोत्सव मोठे मानले जात होते. कोणा एका गणपतीबाप्पाची मोनोपॉली नव्हती. विशेष म्हणजे गिरगाव खेतवाडी मला जवळ असल्याकारणाने तिथल्या गणेशोत्सवात होणार्या कार्यक्रमांची, नाटकांची अथवा ऑर्केस्ट्राची आम्हाला इत्थंभूत माहिती असायची. विनोद गीध झंकार, मिलन ऑर्केस्ट्रा, पी. रमेश, मेलडी मेकर्स, यांच्यासारखे ऑर्केस्ट्रा तुफान गर्दी खेचत. कुठे ऑर्केस्ट्रा असल्याची कुणकुण लागली की मी आणि माझा मित्र, आम्ही हमखास ती गल्ली शोधत, गिरगाव खेतवाडीत फिरत असू. एका गणेशोत्सवात, अलंकार टॉकीजच्या शेजारच्या गल्लीत झंकार ऑर्केस्ट्रा होता. तिथे त्या खचाखच गर्दीत घुसलो. एकापेक्षा एक अशी सरस हिन्दी गाणी चालली होती. तेवढ्यात अनाऊन्सरने अमीन सायानीच्या आवाजात घोषणा केली, ‘आइये अब पेश करते है… एक अजूबा… हमारे ऑर्केस्ट्रा का मशहूर गिटारिस्ट ‘दयाळ पाटकर’ जो गिटार बजाते बजाते किशोर कुमार की आवाज में हुल्लड मचायेगा… टाळ्या आणि शिट्यांच्या गजरात कोपर्यात उभा असलेला ‘दयाळ पाटकर’ नामक एक कलाकार, केसांची झुलपं सांभाळीत गळ्यातली गिटार छेडीत पुढे आला आणि त्याने ‘मै हूँ झुम झुम झुम झुम झुमरू, फक्कड घुमूँ बनके घुमरू’ हे किशोर कुमारचे हिट गाणे गिटार वाजवत म्हणायला सुरुवात केली आणि प्रेक्षकांनी अक्षरश: समोर प्रत्यक्ष किशोरदा असल्यासारखी दाद द्यायला सुरुवात केली. त्यातले यॉडलिंग आणि रॅप अतिशय ताकदीने आणि जबाबदारीने म्हणत दयाळ पाटकरने ती गल्ली डोक्यावर घेतली… आणि टाळ्यांच्या कडकडाटात वन्समोअर घेऊन तो पुन्हा आपल्या जागेवर गिटार घेऊन उभा राहिला.
तेव्हापासून ‘दयाळ पाटकर’ हे नाव माझ्या पक्के ध्यानात राहिले. कारण त्याचा लुक, त्याची गाणं सादर करण्याची तर्हा आणि घेतलेला वन्समोअर… पुढे कधी त्या ‘दयाळ पाटकर’ला पुन्हा स्टेजवर पाहायचा योग आला नाही… पण त्याच्याहीपेक्षा मोठा कलाकार आणि चमत्कार पाहायला मिळाला… तो म्हणजे ‘विजय पाटकर…’
उन्मेष आणि आयएनटीची इंटरकॉलेजिएट एकांकिका स्पर्धेची धामधूम सुरू होती… आमच्या ‘या मंडळी सादर करू या’ या हौशी नाट्यसंस्थेतर्पेâ ‘अलवरा डाकू’ या नाटकाचे छबिलदासला प्रयोग सुरू होते. अगदी दिल्लीपर्यंत जाऊन आलो आम्ही… शिवाय एकांकिका सादर करीत दुसर्याचे प्रयोग पाहणेही सुरूच होते. आमच्या जे. जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्ट्समधला एक माजी विद्यार्थी आणि एक जबरदस्त अभिनेता सतीश पुळेकर नुकताच दिग्दर्शक म्हणून आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत गाजत होता. गेल्या वर्षी त्याने सिद्धार्थ कॉलेजची एकांकिका बसवून त्या कॉलेजला प्रथम क्रमांक मिळवून दिला होता… यावर्षीही त्याच कॉलेजसाठी त्याने ‘धिंड’ नावाची एकांकिका बसवली होती. त्या एकांकिकेची अंतिम फेरीसाठी निवड झाली होती आणि त्यातल्या ‘विजय पाटकर’ नामक कलावंताची तुफान कौतुके झडत होती… ज्याच्या त्याच्या तोंडी एकच नाव, विजय पाटकर… साहित्य संघात स्पर्धा होती… धावत पळत ती अंतिम फेरी पाहायला संघात आम्ही सगळे गेलो… तुफान गर्दी.. ‘धिंड’चीच हवा होती… अनाऊन्समेंट झाली… सिद्धार्थ कॉलेज सादर करीत आहे… वगैरे वगैरे… दिग्दर्शक सतीश पुळेकर, कलाकार… अनेक नावे आणि नंतर…. आणि विजय पाटकर… हे नाव येताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट… पडदा उघडताना टाळ्या आणि थोड्या वेळाने एका शिडशिडीत शरीरयष्टीच्या गावंढळ वेषातल्या मुलाचा प्रवेश झाला आणि पुन्हा टाळ्या पडल्या.. त्याने एकेक करामती करीत स्टेज ताब्यात घेतले… हशा आणि टाळ्यांची बरसात सुरूच होती… त्यातले इतर कलाकारही तेवढेच तगडे… हर्ष शिवशरण, प्रदीप पटवर्धन, जयवंत वाडकर आणि प्रशांत दामले… आणि तो शिडशिडीत मुलगा म्हणजे आम्ही ज्याला बघायला गेलो होतो तो… विजय पाटकर…
भेंडीबाजार म्हणजे मुंबईतला अत्यंत गजबजाट असलेला, हमखास ट्रॅफिकजाम होणारा हमरस्त्यांचा भाग. तिथलं सगळं वातावरण म्हणजे अगदी जणू भारतापासून वेगळा न झालेला पाकिस्तानच… त्या भेंडीबाजारातल्या इमामवाडा विभागातल्या एकमेव हिंदू वस्ती असलेल्या चाळीत लहानाचा मोठा झालेला विजय पुढे ‘विजय पाटकर’ बनून अगदी अनिल कपूर, सलमान खान, अजय देवगण आणि रणवीर सिंह यांच्याबरोबर एकापेक्षा एक सुपरहिट हिन्दी सिनेमात दिसेल असे भेंडीबाजारातल्या आजूबाजूच्या तमाम मुस्लिम बांधवांना कधी वाटलेही नसेल…
राहतोस कुठे? म्हटल्यानंतर ‘भेंडी बाजार’ हे उत्तर कानाला जरा खटकतेच… पण विजय पाटकर खरंच तिथे लहानाचा मोठा झाला. वडील मिल मजदूर, तर आई ‘सिपला’ या औषध कंपनीत नोकरी करीत होती. दोन भाऊ आणि एक बहीण आणि धाकटा विजय यांचे शिक्षण त्या दोघांनी कुठेही कमी पडू दिलं नाही. मात्र सकाळी आठ ते रात्री आठ आई नोकरीवर गेल्यानंतर विजयचे सगळे पालनपोषण त्याची ताई, म्हणजे जयश्रीने केलं… त्यामुळे विजयला एक सोडून दोन आया मिळाल्या… एक सख्खी आई, आणि दुसरी सख्खी ताई. त्यामुळे विजयवर डबल संस्कार झाले. रात्री आठ ते दुसर्या दिवशी सकाळी आठ आईचे पारंपरिक संस्कार आणि सकाळी आई कामावर गेल्यावर ताईचे सकाळी आठ ते रात्री आठ आधुनिक संस्कार. विजयला युनिफॉर्म घालून शाळेत पाठवण्यापासून ते त्याचा अभ्यास घेण्यापर्यंतचे सगळे सोपस्कार जयश्रीताईनेच केले. विजय सगळ्यात लहान असल्यामुळे सगळ्यांचा लाडका होता. शिवाय अडखळत बोलायचा. त्यामुळे त्याला चारचौघांत बोलायला भीती तर वाटायचीच पण लाजही वाटायची. त्यामुळे त्याची मोठी भावंडं त्याला सांभाळून घेण्यात मग्न असायची. त्याचा सगळ्यात मोठा भाऊ दयाळ… हो… तोच दयाळ पाटकर, ज्याने ऑर्केस्ट्रा विश्वात चांगलेच नाव कमावले होते गायक आणि उत्तम गिटारिस्ट म्हणून. त्याचे अमूल्य संस्कार विजयवर झाले. त्यात दयाळ हाही सर जे. जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्टमधून रीतसर कमर्शियल आर्टिस्ट झालेला आणि जाहिरात एजन्सीमध्ये मोठ्या पदावर कार्यरत असलेला. विजयपेक्षा चौदापंधरा वर्षांनी मोठा असलेला दयाळ हाही विजयचा गुरू, खरंतर पहिला गुरू, शुभचिंतक आणि मार्गदर्शकच ठरला. दयाळने विजयचे अनेक सुप्त गुण लहानपणीच ओळखले होते. काटक शरीरयष्टीमुळे त्याच्यातला चपळपणा, बोलणे स्वच्छ नसल्यामुळे हावभाव करीत बोलणं हे सर्व दयाळने हेरलं होतं. त्याला भरपूर आत्मविश्वास मिळावा म्हणून दयाळ त्याच्यावर संगीताचे संस्कार करू लागला. विजयने ते सर्व इतक्या वेगाने आत्मसात केले की तो लहानपणी उत्कृष्ट डान्सर म्हणून ओळखला जाऊ लागला. दयाळमुळे त्याच्या अंगात एक रिदम आला. तेवढ्यावरच दयाळ थांबला नाही. त्या काळात विज्याला त्याने असंख्य कार्टून फिल्म्स दाखवल्या. अगदी थिएटरमध्ये नेऊन दाखवल्या. त्यामुळे विजयला रिगल, इरॉससारख्या थेटरांची लहानपणापासूनच ओळख झाली. जयश्रीताईमुळे त्याला तत्कालीन रोमँटिक सिनेमाची ओळख झाली. आईमुळे मराठी सिनेमे आणि मधला भाऊ कुंदन याच्याबरोबर विजय दारासिंगचे मारामारीचे सिनेमे बघायचा. त्यामुळे पिला हाऊस या कामाठीपुराजवळच्या परिसरातल्या एकापेक्षा एक थेटरांची ओळख झाली. त्याच्यातल्या कलात्मक दृष्टिकोनाला दयाळमुळे गती मिळाली; रंगांचं महत्व कळलं ते दयाळमधल्या चित्रकारामुळे. लहानपणापासून घरगुती आणि भावंडांच्या संस्कारांमुळे त्याच्यातला कलाकार सतत जागृत राहिला. पुढे अभिनयक्षेत्रात भरारी मारणारा विजय अगदी शाळा कॉलेजात जाईपर्यंत अभिनयाच्या बाबतीत अनभिज्ञ होता.
पहिला ब्रेक
शाळा-कॉलेजात एक उत्तम डान्सर असलेला विजय सिद्धार्थ कॉलेजात नाटकवाल्या मित्रांमध्येही डान्सर म्हणून ओळखला जात होता. कॉलेजच्या अॅक्टिंगच्या ऑडिशनला, सतीश पुळेकर यांच्यासमोर विजयला जबरदस्तीने घेऊन गेला तो अलीकडचा थोर समाजमित्र आणि विजयचा त्यावेळचा वर्गमित्र जयवंत वाडकर. वाड्याने विज्याला जबरदस्तीने ओढून एकांकिकेत घुसवले आणि नुसता डान्स नव्हे, तर अभिनयही करायला लावला. आणि वड्याबरोबर बन पाव आणि बुरून मस्का खात खात विजयला अभिनयही कशाशी खातात, हेही कळू लागले. सिद्धार्थ कॉलेजच्या एकांकिका दरवर्षी गाजत होत्या. लागोपाठ दोन तीन वर्षे या सर्वांचा बोलबाला होत होता. आजपर्यंत नाटक या प्रकाराशी फारशी लगट नसलेला विजय अखेर नाटकाच्या प्रेमात पडला. पुढे याच सर्व मित्रांनी म्हणजे पट्या (प्रदीप पटवर्धन), वाड्या (जयवंत वाडकर), पाट्या (विजय पाटकर) यांनी मिळून ‘अतरंग’ नावाची संस्थाही काढली आणि त्यातून ते एकांकिका करीत राहिले. विज्या शिक्षण पूर्ण होताच बँकेत नोकरीला लागला. बँक ऑफ इंडियाच्या कलाकार शाखेत त्याला नोकरी मिळाली आणि तिथेही जयवंत वाडकर सावलीसारखा त्याच्याबरोबर होताच. बँकेत अनेक कलाकार काम करीत होते आणि बघता बघता विजय व्यावसायिक नाटकात दिसू लागला.
विजय पाटकरला घेऊन नाटक करणे हे एखाद्या दिग्दर्शकाला खरेच आव्हानात्मक वाटे. कारण त्याला ज्यांनी ज्यांनी एकांकिकेत पाहिले असेल त्यांच्या लक्षात हे नक्की येणार की हा आंगिक अभिनयात बाप माणूस आहे. पण मराठी रंगभूमी ही एकापेक्षा एक अशा शब्दप्रभू नाटककारांनी भरलेली आणि बहरलेली आहे. शब्दांच्या ताकदीवर नाटके लिहिली जात. पल्लेदार वाक्ये आणि मोठमोठी स्वगते नसतील तर ते नाटकच नव्हे, या निष्पत्तिपर्यंत सगळे जवळ जवळ पोचले होते. अशा परिस्थितीत विजय पाटकरसारख्या मूकाभिनयसम्राटाला घेऊन कुठच्या तख्तावर बसवायचे, हा खरा प्रश्नच होता. तरीही दिलीप कोल्हटकरने त्याला ‘उचल बांगडी’ या नाटकात कास्ट केले. संवाद कमी असले तरी जागा भरून काढणे यात स्वत: विजय आणि दिलीप कोल्हटकर माहीर होते. त्यानंतर खास रामदास पाध्ये यांच्या बोलक्या बाहुल्या आणि त्यात विजय पाटकर हा अबोल बाहुला घेऊन दिलीप कोल्हटकरने ‘बोल बोल म्हणता’ नामक नाटक केले. त्यातल्या बाहुल्यांबरोबर विजयचे मायमिंग उठून दिसले. विनय आपटेने तर त्याला आचार्य अत्रे लिखित ‘कवडीचुंबक’ या नाटकात भूमिका देऊन त्याच्या या अलौकिक गुणांचा वापरही करून घेतला… त्या नाटकाचे संगीत मी करीत होतो. त्यावेळी मला एक चमकदार कल्पना सुचली, जी पुढे मी अमलात आणली..
विजयची ही नाटकं सुरू असताना माझ्या मनात एक नवीन नाटक घोळत होतं, ज्यात नायकाला अत्यन्त कमी बोलायचं होतं… म्हणजे तो मुका वगैरे नसतो, पण तामिळनाडूतून आल्यामुळे त्याला मराठी बोलणे आणि समजणे कठीण तर असतेच, शिवाय त्याची भाषाही मराठी लोकांना कळणे मुश्किल असते… असा हा मुलगा मुंबईत येतो आणि आधीच दाक्षिणात्यांच्या लोंढ्याला कंटाळलेल्या मुंबईकरांच्या तावडीत सापडतो… खरे तर त्याला महाराष्ट्र राज्य लॉटरीचे पंधरा लाखाचे तिकीट लागलेले असते आणि ते तो कॅश करायला आलेला असतो…
ही संकल्पना मी अजित भुरेला ऐकवली, कारण त्याला एक नाटक प्रोड्युस करायचे होते व ते मी लिहून दिग्दर्शित करावे असे त्याला वाटत होते… पण ‘टूरटूर’ या नाटकाच्या प्रचंड यशानंतर मी नवीन काहीच लिहिले नव्हते… त्यानंतर मी फक्त जयवंत दळवी लिखित पर्याय आणि वसंत सबनीस यांचे ‘विच्छा माझी पुरी करा’ हे विजय कदमला घेऊन नाटक केले होते आणि ‘झपाटा’ व ‘मंगलगाणी-दंगलगाणी’ या वाद्यवृंदांचे दिग्दर्शन… पण लेखन असे काहीच केले नव्हते… आणि ही गोष्ट अजितला आवडली असली तरी मी त्याला सांगितले की ह्या नाटकात विजय पाटकर काम करणार असेल तरच मी हे नाटकं लिहीन, नाहीतर त्या तामिळनाडूतल्या मुलाची भूमिका कोण करणार- जिच्यात भरपूर मायमिंग व मूकाभिनय आणि आंगिक अभिनय आहे.
अखेर मी आणि अजित भुरेने विजय पाटकरला भेटायला जायचे ठरवले. तो गिरगावात बँकेसाठी सादर होतं असलेल्या एका नाटकात काम करीत होता. तिथे जाऊन त्याला बाजूला घेतले आणि असे असे नाटक माझ्या डोक्यात आहे, पण तू ती प्रमुख भूमिका करणार असशील तरच मी लिहायला घेतो… नाहीतर नाही, असं सांगितलं… ही माझी ऑफर विजयसाठी खूप मोलाची होती… व्यावसायिक रंगभूमीवर केवळ आपण हो म्हटले तर एक नाटकं लिहिले जाणार आणि प्रोड्युस होणार या ऑफरमध्येच एक थ्रिल होते… नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता… विजयकडून होकार येताच मी आणि अजित निघालो आणि त्यानंतर मी नवीन नाटक लिहायला घेतले… त्याचं नाव होतं… ‘मुंबई मुंबई’.
दुसरा ब्रेक
‘मुंबई मुंबई’ हे नाटक पाट्याच्या आयुष्यातील महत्वाचे ठरले. खरे तर व्यावसायिक रंगभूमीवरचा त्याचा हा मोठा ब्रेकच होता… संपूर्ण नाटकात विजयला साताठ वाक्ये होती आणि तीही शेवटी… पण आपल्या हातातले पंधरा लाखाचं तिकीट कोणी चोरू नये यासाठी त्याचा, कोणतीही भाषा येत नाही, कळत नाही तरी ती येतेय हे दाखवण्याचा आटापिटा त्याने चेहर्यावरून, डोळ्यांमधून, आंगिक अभिनयातून ज्या पद्धतीने दाखवला त्याला तोड नाही. विजयच्या या प्रकारची तुलना करण्याची हिंमत करायचीच झाली तर चार्ली चॅप्लिनच्या शैलीशीच होऊ शकेल, इतका तो ती परिणामकारक करायचा… चार्लीला देव मानणारा विजय स्वतःला त्यांच्याशी कुठेही तुलनात्मक रीतीने पाहत नाही; पण प्रेक्षकांना मात्र त्याला पाहताक्षणी मनोमन चार्ली आठवल्याशिवाय राहत नाही. विजय मात्र स्वत:वर चार्लीपेक्षा लहानपणी ‘टॉम अँड जेरी’ यांच्या धुडगुसाचा परिणाम अधिक झाल्याचे मानतो. पुढे त्याला एक डॉक्युमेंट्रीच्या निमित्ताने चार्ली भेटला आणि विजयने तो मायमिंगच्या अंगाने आत्मसात केला.
‘मुंबई मुंबई’ नाटकात सर्व ताकदीनिशी पाट्या उतरला. संपूर्ण रिहर्सलमध्ये भूमिकेकडे अत्यंत गांभीर्याने पाहून त्याने ती सजवली. त्या व्यक्तिरेखेचा मुंबईमध्ये आल्यानंतरचा उत्साह, आनंद, त्यानंतर त्यात आलेली असहायता, त्यातलं कारुण्य, या सर्व गोष्टी पाट्या ज्या पद्धतीने चेहर्यावर भाव आणि आंगिक अभिनयाने दाखवायचा, ते पाहून रसिकांनी त्याला प्रचंड दाद दिली. मुंबई मुंबई नाटकाच्या जाहिरातीत मी खास एका उपाधीनिशी पाट्याला इंट्रोड्यूस केले… ‘रबर स्टार’ विजय पाटकर… कारण कोणत्याही अँगलमध्ये शरीर वळवून तो हवे ते एक्स्प्रेशन द्यायचा… अडीचशे प्रयोग होऊनसुद्धा ते नाटक अखेरच्या प्रयोगापर्यंत ताजे ठेवण्याची किमया पाट्याने केली.
नाटकातून सर्वांना आवडलेला पाट्या, एकदम हिंदी सिनेमांत दिसू लागला… ‘तेजाब’ या एन. चंद्रा यांच्या सिनेमांत पाट्या आणि वाड्या या दोघांचंही कास्टिंग झालं अनिल कपूरचे मित्र म्हणून जॉनी लिव्हरसह… एन. चंद्रा सिनेमांत अनेक मराठी कलावंत घेत. कारण मराठी नाटक-सिनेमा ते आवर्जून पाहात… त्यामुळे ‘रबर स्टार’ तिथपर्यंत सहज पोचला होता.. . याचा पुढे मलाच फायदा झाला. कारण मी ‘हमाल दे धमाल’ हा चित्रपट करीत असताना पाट्या आणि वाड्या त्यात होतेच… पण या दोघांमुळे मला त्यात हवा असलेला सुपरस्टार अनिल कपूर सिनेमात आला.. विजय पाटकर म्हणजे पाट्या हा एक विशेष लक्षवेधी अभिनेता आहे. नाटकात तो हमखास लक्ष वेधून घेतो. त्या एक गुणावरच त्याला एकांकिकेतून नाटकं मिळाली, नाटकातून लक्ष वेधल्यामुळे सिनेमा मिळाले, आणि सिनेमा करता करता तो जाहिरातींमध्ये दिसू लागला… पार्ले प्रॉडक्ट असलेल्या ‘क्रॅक जॅक’ या बिस्किटांच्या जाहिरातीत त्याचं बोमन इराणीबरोबर कास्टिंग झालं… या जाहिराती आणि बिस्किटे दोन्ही हिट झाली…
टॉम अँड जेरी, लॉरेल हार्डी या जगप्रसिद्ध जोडीप्रमाणे ही जोडी भारतात लोकप्रिय झाली… त्यानंतर पाट्याने शंभरेक जाहिराती केल्या असतील. या सर्व नाटक-सिनेमा प्रवासातली महत्वाची गोष्ट म्हणजे ‘पाट्या’चा अभ्यासू आणि जिज्ञासू स्वभाव. त्यातलं तंत्र शिकून घेणं आणि आत्मसात करून स्वत: त्यातून काहीतरी निर्माण करणं. याचा अनुभव मी स्वत: घेतला.
‘मुंबई मुंबई’ नाटकाच्या वेळी त्याने मधल्या वेळात माझ्या परवानगीने सहकलारांच्या रिहर्सल्स पॉलिश्ड केल्या… त्यातून त्याचा कल दिग्दर्शनाकडे आहे हे कळत होतं… ‘शेम टू शेम’ या चित्रपटात मी आणि वाड्या जुळ्यांची भूमिका करीत होतो. त्याकाळी डबल रोल शूट करणं अतिशय कठीण होतं. आणि सिनेमांत प्रत्येकाचा डबल रोल होता, शिवाय मोठा पसारा होता. टी. सुरेंद्र सहदिग्दर्शक असूनसुद्धा दुसरे युनिट केले आणि विजयला दिग्दर्शक म्हणून कॅमेरा सोपवला… त्याने ती कामगिरी न डगमगता पार पडली. या संधीचा त्याला पुढे स्वतंत्र दिग्दर्शक म्हणून खूप उपयोग झाला.
ब्रेक के बाद
या जिज्ञासेपोटी पुढे संधी मिळताच ‘हलकं फुलकं’ हे नाटक त्याने दिग्दर्शित केले आणि दिग्दर्शक विजय पाटकर एक वेगळ्याच सर्जनशील रूपात समोर आला. अरुण नलावडे, रसिका जोशी आणि विजय कदम यांना दिग्दर्शन करून त्यांच्यापेक्षा दोन पावलं पुढे असणं सोप्पं नव्हतं… ते त्याने अनुभवाच्या जोरावर केलं आणि नाटकही अप्रतिम सादर करून हिट केलं.
पुढे ‘लावू का लाथ?’ हा मराठी सिनेमा त्याने दिग्दर्शित केला आणि त्यात अप्रतिम भूमिकाही केली. दादा कोंडके यांची
कॉपी करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. पण त्यातून ढोबळपणा पलीकडे काहीच निष्पन्न झाले नाही. मात्र विजयने खर्या अर्थाने या सिनेमांत दिग्दर्शन आणि अभिनयात कमाल केली आहे. हे सर्व पाहून दादांची कॉपी न वाटता केवळ सहजपणे त्यांची आठवण होते. तो सिनेमा यूट्यूबवर उपलब्धही आहे. केव्हाही पाहू शकता.
दयाळ पाटकर, सतीश पुळेकर, एन. चंद्रा, पुरुषोत्तम बेर्डे यांना गुरुस्थानी मानून आजही कारकीर्द सजवत असलेला विजय हा आता अजय देवगण, अक्षय कुमार, रणबीर सिंग, रोहित शेट्टी यांच्या सिनेमांत हमखास दिसतो.. ही सर्व मंडळी ‘विजयदादा’ म्हणून त्याच्या सिनियॉरिटीला मान देतात. एकेकाळी कामानिमित्त रात्री एकशिवाय घरी न परतणारा विजयदादा काम संपले की कुटुंबात रमतो.. पत्नी सरोज आणि मुलगा शार्दूल यांच्यासह विजय कदम आणि जयवंत वाडकर यांच्या सहकुटुंब मैत्रीत रमतो… आजही मोठा भाऊ दयाळ आणि जयश्रीताईशी जिव्हाळ्याचे संबंध कायम आहेत…
लहानपणीची वैगुण्ये मोठेपणी जाणवल्यावर त्या वैगुण्यांचेच भांडवल करून स्वत:ची देदीप्यमान कारकीर्द अतिशय कष्टाने सफल केलेला हा कष्टाळू कलाकार आज मराठी चित्रपटसृष्टीचा लीडर म्हणूनही पुढे आला आहे.. एकेकाळी ‘स्पष्ट उच्चार’ हे वैगुण्य असलेला विजय पाटकर आज चित्रपट महामंडळाच्या सभांमधून पोटतिडकीने स्पष्ट शब्दात विचार मांडतो तेव्हा लक्षात येतेय की त्याने ‘भाषा’ या गोष्टींवर गेल्या अनेक वर्षांत मात केली आहे… त्याचा हा सभाधीटपणा आणि उच्चारांचे सामर्थ्य अजून नाटक सिनेमांत दिसले नसले तरी…
ज्याप्रमाणे चार्ली चॅप्लिन या वंदनीय कलाकाराने आयुष्यभर मूक चित्रपटातील अभिनयाने अख्या जगाला हसत हसत खिळवून ठेवले आणि जेव्हा बोलायची वेळ आली तेव्हा ‘ग्रेट डिक्टेटर’ सिनेमांत पल्लेदार भाषण ठोकून आपण बोलपटाचेही सम्राट आहोत हे दाखवून दिले, तद्वतच पुढे मागे विजय पाटकर गडकर्यांचा ‘तळीराम’ नाटकात सादर करताना आणि एखादा ‘डिक्टेटर’ सिनेमात भाषण ठोकताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको… कारण ‘दिसतं तसं नसतं’ या उक्तीप्रमाणे ‘विजय पाटकर’ काहीही करू शकतो, हेही तितकच खरं असतं…
– पुरुषोत्तम बेर्डे
(लेखक नाट्य व चित्रपटसृष्टीतील सिद्धहस्त अष्टपैलू कलावंत आहेत)