इसवी सनानंतर चौदाव्या शतकापर्यंत मानव जात हे विश्व कुठल्यातरी अदृश्य शक्तीच्या मर्जीने चालतं या भयाखालीच जगत होती. चौदाव्या शतकापासून आधुनिक विज्ञानाची सुरुवात पश्चिमेत झाली. त्यानंतरच्या गेल्या पाचशे वर्षात जणू काही सगळं विश्व विज्ञानाच्या कब्जात आहे अशा भ्रामक समजुतीपर्यंत येण्याचा मानवाचा प्रवास झाला. याच काळात विज्ञानातल्या प्रत्येक शोधाला सर्वसामान्यांच्या उपयोगासाठी परावर्तित करणे या शाखेचा जन्म झाला. ती शाखा म्हणजे अभियांत्रिकी, इंजीनियरिंग. व्हीलचा (चाकाचा) शोध लागला आणि औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली असे म्हणतात. हे औद्योगिक क्रांतीचं युग युरोपमध्ये व त्यातही विशेषत: जर्मनीत उदयास आलं. हे इंजीनियरिंगचं युग होतं.
सकाळी उठल्यापासून जी प्रत्येक गोष्ट आपण वापरतो ती या अभियांत्रिकीच्या कृपाप्रसादानेच आपल्याला प्राप्त झालेली असते. आपण राहतो ते घर, वापरतो तो टूथ ब्रश, पेस्टची ट्यूब, चहाचा कप, गॅस, मायक्रोवेव्ह ओव्हन, नदीवर किंवा विहिरीवर पाणी भरण्यास जावं न लागता धरणं, पाइपलाइनमधून घरात अगदी हवं त्या खोलीत येणारं पाणी, ऑफिसला जिच्यावर बसून जातो ती दुचाकी किंवा चारचाकी, ज्याच्यावरून जातो तो रस्ता, ब्रिज, फ्लायओव्हर, ऑफिसमध्ये वरच्या मजल्यावर चढून जातो ती लिफ्ट, वापरतो तो कॉम्प्युटर, मोबाईल फोन, सतत थंडावा देणारा एअर कंडिशनर, थंड पाणी देणारा प्रिâज, मनोरंजनासाठी वापरतो तो टीव्ही, थिएटर, व्यायाम करण्यासाठी वापरतो ती ट्रेडमिल, दोन तासात देशात कुठेही पोचू शकतो ते विमान, पुस्तकं, वर्तमानपत्र वाचतो ते प्रिंट करणारा छापखाना, हे सगळं काही आपल्याला अभियांत्रिकीच्या कृपेने प्राप्त झालेलं आहे.
आयुर्वेद, होमिओपॅथी या सगळ्या परंपरागत औषधशास्त्रांना मागे टाकून अॅलोपॅथी आज खूप पुढे गेलेली आहे. पण या पुढे जाण्यात इंजीनियरिंगच्या मदतीशिवाय अॅलोपॅथीलाही आजची ही उंची गाठता येणे शक्य नव्हते. विज्ञानाने एक्स-रेजचा शोध लावल्यावर एक्स-रे मशीनचा शोध लावून अचूक निदानाचे एक अस्त्र अभियांत्रिकीनी अॅलोपॅथीच्या हाती दिलं. त्यानंतर सीटीस्कॅन, एम.आर.आय. अशी त्याही पलीकडचे अस्त्र दिलीत. एंडोस्कोपी, अँजिओग्राफी, इकोकार्डियोग्राफी, कॉम्प्युटरच्या सहाय्याने होणार्या रक्त तपासण्या, सीटीस्कॅन, एम.आर.आय. अशा अचूक निदानांसाठी सध्या वापरात असलेल्या सगळ्या गोष्टी अभियांत्रिकीनी अॅलोपॅथीला दिलेल्या आहेत. अॅलोपॅथीसाठी हे एक मोठं वरदान ठरलेलं आहे. नुस्त निदानच नाही तर ‘कम्प्युटर एडेड की-होल सर्जरी’ किंवा ‘रोबोटिक सर्जरी’ अशा अॅलोपॅथिच्या उपचारांच्या क्षेत्रातही अभियांत्रिकी एक एक पाऊल उत्साहाने समोर टाकते आहे.
आम्ही शिकत असताना ‘मेडिकल’ किंवा ‘इंजिनिअरिंग’ या दोनच शाखांना सगळ्यात जास्त महत्त्व होते. त्यावेळेस ‘इंजीनियरिंग’ श्रेष्ठ की ‘मेडिकल’ हा या दोन शाखांच्या विद्यार्थ्यांमध्ये मजेच्या भांडणाचा मुख्य मुद्दा असे. तेव्हाची ती अपरिपक्वता आता माझ्यात उरलेली नाही. पण आताही प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर या दोन शाखांमध्ये श्रेष्ठत्त्वाचा प्रश्न मनात आला तर मला अभियांत्रिकी हीच शाखा श्रेष्ठ वाटते. असे म्हणणे धाडसाचं आहे आणि आता या करोनाच्या काळात तर मार खायला लावण्यासारखं आहे. पण तरीही मला प्रामाणिकपणे हेच म्हणावसं वाटतं. मेडिकल ही शाखा आयुष्यातून वजा केली तर समाजातल्या २० ते ३० टक्के लोकांना त्रास होईल वा प्रत्येकालाच आयुष्यात काही वेळा व शेवटच्या काळात जगायचा त्रास होईल. पण अभियांत्रिकी ही शाखा मानवी जीवनातून वजा केल्यास शंभर टक्के जनतेचं रोजचं जगणं किती कठीण होईल हे अभियांत्रिकीनी दिलेल्या आयुष्यातल्या गोष्टी वजा करून पाहिल्यात म्हणजेच कळतं.
पण अजून पुष्कळ मंजिल पुढे गाठायची आहे. देव / निसर्ग हा जगातला सगळ्यात मोठा इंजिनियर आहे. एक मिनिटही विश्रांती न घेता ७०-८० वर्ष सतत चालणारा हृदयासारखा पंप अजून एकाही इंजिनीयरला डिझाइन करता आलेला नाही. हाताची बोटं, मनगट, कोपर, खांदा यांच्यावर आधारलेलं ‘एस्काव्हेटर मशीन’ मानवी शक्ती पेक्षा कितीतरी पट मोठं काम करू शकत असलं तरी हाताची सगळी फंक्शन्स अजूनही आपल्याला त्याच्यात आणता आलेली नाहीत. अश्मयुगात दगडांना धार लावून शिकारीसाठी त्यांची शस्त्र बनवण्याचे ज्याला कुणाला पहिल्यांदा सुचलं असेल तो या जगातला पहिला इंजिनीयर होता. लोखंड या धातूचे जमिनीवर सापडणारे तुकडे आगीत वितळतात हे निरीक्षणास आल्यावर त्यांना वितळवून, साच्यात टाकून, त्यापासून धारदार शस्त्रे बनवावीत हे ज्याला कुणाला सुचलं असेल तो विश्वेश्वरय्यापेक्षाही मोठ्या प्रतिभेचा इंजिनियर असेल. शिकारीवर अवलंबून न राहता धान्याची उपज करणाच्या कृषीयुगातल्या नागरीकरणाला सुरुवात झाल्यावर ज्यांना कुणाला नांगर बनवायचं, पाण्याच्या बारमाही साठयासाठी विहीर खोदणं, ती बांधणं, त्यावर रहाट चालवणे हे सुचलं असेल ते त्या त्या काळचे अभियंतेच होते. जिओस्टॅटिक डोम गेल्या शतकात शोधण्यासाठी आपण अमेरिकेचे प्रसिद्ध आर्किटेक्ट रिचर्ड फुलर यांना श्रेय देतो, सिमेंट कॉंक्रिटचा शोध गेल्या दोन शतकात लागलेला आहे. पण इसवीसनाच्या पूर्वीच डोम व सिमेंट काँक्रीटशिवाय बहुमजली मंदिर, मस्जीद, पॅगोडा, राजवाडे बांधणार्यांना तुम्ही अभियंते म्हणणार नाही का? श्रीकृष्ण कुशल सारथी होता, पण रथ तयार करणारा इंजिनीयरच असेल नं? श्रीराम निष्णात धनुर्धारी होते, पण धनुष्य आणि बाणांचा शोध लावणार्या इंजिनिअरच्या प्रतिभेमुळेच त्यांना त्या विद्येचं सामर्थ्य मिळालेलं होतं.
गरज ही शोधाची जननी असते असं म्हणतात. पण मला हे मुळीच पटत नाही. कोलंबसला अमेरिका शोधण्याची कुठली गरज होती? मेरी क्युरीला जीव धोक्यात घालून व शेवटी तो सांडवून ‘रेडिएशन’ शोधण्याची काय गरज होती? राईट बंधूंची आकाशात उडणे ही गरज होती की ग्राहम बेलला फोन वर बोलण्याशिवाय जगणंच शक्य नव्हतं? वैज्ञानिकांची आणि प्रतिभावंताची ‘शोध’ हीच ‘गरज’ असते असं मला वाटतं. गरजेमधून ते शोधाला सुरुवात करत नाहीत तर नवीन शोध या त्यांच्या गरजेपोटी प्रसंगी ते आपला जीवही सांडवण्यास तयार होतात. आणि ते जे शोधत असतात ते त्यांना सापडल्यावर आपल्या पुढील अनेक पिढ्याचं जीवन सुखकर होत असतं. विज्ञान व अभियांत्रिकी शाखांमधली गेल्या ४-५ शतकातली प्रगती ही ‘स्थूला’मधली आहे. ‘सूक्ष्मा’च्या विज्ञानाला आता गेल्या शतकाच्या मध्यापासून सुरुवात झालेली आहे. आणि त्यात आपण जसे अधिकाधिक शिरतो आहोत तसे तसे आपण आध्यात्मातल्या विज्ञानाकडे जात आहोत. अध्यात्म हे ‘सूक्ष्मा’ची ‘अभियांत्रिकी’ आहे. गेल्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत अणु हा या विश्वाचा सगळ्यात छोटा कण आहे असं आपण समजत होतो. पण तो अणु रुदरफोर्ड फोडू शकल्यावर त्यानंतरचे जे विविध मॉडेल्स आलेत त्यातून आपल्याला विश्वाची रचना ‘पिंडी ते ब्रह्मांडी’ एकच आहे हे कळलेलं आहे. अणूचा इलेक्ट्रॉन हा छोटा कण सुद्धा फोडत गेल्यावर त्याचा शेवटचा छोटा कण हा एका क्षणात ऊर्जा व एका क्षणात कण बनतो हे लक्षात आल्यावर तुकोबारायांची ‘तुज सगुण म्हणू की निर्गुण रे’ ही द्विधा मनस्थिती आता आपल्याला कळते आहे. अवकाश (स्पेस) वा काळ (टाइम) या मधे आपण कितीही पुढे किंवा मागे गेलोत तरी विश्व कुठेच संपत नाही हे लक्षात आल्यावर आता आपल्याला ‘हे विश्व अनादि व अनंत आहे’, या वेद वाक्याचा अर्थ कळतो आहे. ईश्वराला सुद्धा प्रयोगशाळेत सिद्ध करता यावे म्हणून या विश्वाच्या सगळ्यात मूलभूत कणाचा, ‘गॉड पार्टिकल’चा शोध घेण्याचे आपले प्रयत्न आता सुरू आहेत. चार वर्षांपूर्वी त्यात यश येईल अशी अगदी खात्री वाटत असलेला प्रयोग अयशस्वी झालेला आहे. पण विज्ञानातला प्रत्येक अयशस्वी प्रयोग हा यशाकडे चढणारी एक पायरीच शेवटी ठरत असते. त्यामुळे हा ‘गॉड पार्टिकल’ या वर्तमान शतकाच्या मध्यापर्यंत आपण नक्कीच शोधू शकू अशी आशा बाळगायला काहीच हरकत नाही. अभियांत्रिकीच्या आजवरच्या या देदिप्यमान वाटचालीसाठी माझ्याआधी होऊन गेलेल्या आणि आताच्या बरोबरीच्या सगळ्या इंजिनियर्सचे अभिनंदन आणि यापुढची वाटचाल याहूनही देदिप्यमान व्हावी यासाठी भविष्यात येणार्या सगळ्या इंजिनीअर्सना खूप खूप शुभेच्छा.
सलाम इंजिनियर…