□ एर्नाकुलमनंतर देशात गाढवांसाठी आणखी एक फार्म… मंगळुरूत गाढवं सुखाने नांदणार
■ नंतर त्यांना भाजपच्या आयटी सेलमध्ये भरती करणार आहेत का?
□ ‘पुरुषांनाही महिलांप्रमाणे प्रतिष्ठेने जगण्याचा हक्क’ उच्च न्यायालयाची टिप्पणी.
■ अरेच्चा, असं न्यायालयाने सांगण्याचे दिवस आले, म्हणजे बरीच प्रगती झाली म्हणायची देशाची.
□ रणजी करंडक उपांत्यपूर्व सामन्यात उत्तराखंडाच्या खेळाडूंच्या जेवणावर तब्बल १.७४ कोटी रुपये खर्च. क्रिकेटपटूंच्या जेवणाचे अवाच्या सव्वा बिल. चक्रावले बीसीसीआयचे अधिकारी. केवळ केळीखरेदीवर तब्बल ३५ लाख.
■ कोणीतरी काहीतरी वेगळंच ‘खाल्लेलं’ दिसतंय…
□ पक्षनिष्ठेसमोर मी बायकोचेही ऐकत नाही – चंद्रकांत पाटील
■ तरीच त्या दिवसापासून दादा नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत सगळं बाहेरच जेवताना दिसतायत… कोणती बायको असा अपमान सहन करील?
□ साईंच्या झोळीत १८८ कोटींचे दान. कोरोना निर्बंध शिथिलतेनंतर ४१ लाख भाविक शिर्डीत.
■ त्यांची शिकवण काय, लोक भक्तीच्या नावाखाली करतायत काय! तळतळत असेल त्या सत्पुरुषाचा आत्मा.
□ एलआयसीची बाजारकोसळण. समभागात २९ टक्के घसरण. १.७४ लाख कोटींचे नुकसान.
■ एलआयसी कंपनीने विमा काढला असला तर बचावले…
□ भारतीयांचे सरासरी आयुर्मान वाढले! दहा वर्षांत २ वर्षांची भर; भारतीयांचे सरासरी आयुष्य आता ६९.७ वर्षे
■ आपल्या खात्यात मोदीजी १५ लाख कधी जमा करतायत, हे पाहण्याच्या इच्छेने लोकांचं आयुर्मान वाढवलं असणार…
□ ‘नासा’च्या प्रमुखांनाही पृथ्वीच्या बाहेर जीवसृष्टी (एलियन्स) असल्याचे वाटते…
■ विश्वाचा आकार किती मोठा आहे, याची कल्पना असलेल्या कोणालाही असेच वाटते, अगणित सूर्यांच्या अगणित सूर्यमाला आहेत… त्यात कुठे ना कुठे जीवन असणारच…
□ बंगळुरूच्या रेव्ह पार्टीत अभिनेता शक्ती कपूरच्या मुलाला अटक
■ तो शाहरूख खानचा मुलगा थोडाच आहे त्याची चर्चा करायला, दिवसचे दिवस त्याच्या बातम्या द्यायला?
□ मोदींच्या पगडीवरील अभंग बदलला. ‘नाठाळाच्या माथी हाणू काठी’ रद्द… आता ‘भेदाभेद धर्म अमंगळ…’
■ नाठाळांच्या माथी पगडी असताना तिच्यावर तो अभंग शोभलाही नसता, मात्र, भेदाभेदाचा अभंग त्यांच्या पगडीवर म्हणजे त्याहून विनोदच आहे.
□ वडिलांचा पबजीला नकार. तरुणाने केली आत्महत्या
■ जिवंतपणी पबजीच्या इतक्या आहारी जाणं ही पण एक प्रकारची आत्महत्याच होती.
□ दहशतवादी प्रशिक्षणासाठी भारतातून पाकिस्तानात पाठवल्या गेल्या ३०० मुली
■ कोणतंही प्रशिक्षण न घेता मुली लग्न झाल्यावर संसारात दहशत माजवतातच… जगात कुठेही.
□ अदानी समूहालाच प्रकल्पाचे काम देण्याचा पंतप्रधान मोदींचा श्रीलंकेवर दबाव. मात्र राष्ट्राध्यक्ष राजपक्षेंनी आरोप फेटाळला, संबधित मंत्र्यानेही राजीनामा दिला…
■ मालकांसाठी सेवकांना एवढं करावंच लागतं, गैर काय त्यात!
□ मुंबई ठरले सर्वाधिक विसराळूंचे शहर
■ रोजच्या ठरल्या लोकलने ठरल्या ऑफिसात येऊन ठरलेलं काम करायचं विसरत नाहीत ना, मग झालं!
□ ८ वर्षांपूर्वी दोन कोटी; आता मोदी म्हणतात, १० लाख नोकर्या देऊ! हे तर महाजुमला सरकार- राहुल गांधींचा घणाघात
■ त्यांनी आयटी सेल आणि बिनपगारी मेंदूगहाण भक्तांसाठी केवढा कुटिरोद्योग उभा केलाय, हे दिसत नाही तुम्हाला राहुलजी!
□ कुटुंब रंगलंय ड्रग्सच्या व्यवसायात. मुलगा, मुलगी, यांच्यानंतर बापाला १२ लाखांच्या एमडीसह माहीमला अटक
■ हीच तर फॅमिलीची गंमत आहे…
□ ४ दिवस काम, ३ दिवस सुट्टी? भारतातही प्रयोग राबवला जाण्याची शक्यता
■ पगार पूर्ण द्याल ना? मग सातही दिवस सुटी दिलीत तरी चालेल!
□ जनता त्रस्त! महागाईचा नऊ वर्षांतील उच्चांक
■ संत्रस्त होणारी जनता संतप्त होत नाही, तोवर राज्यकर्ते सुस्त आणि मस्त राहणार.