अनेक वर्षांपासून मला बुद्धाची शिकवण समजून घ्यायची होती. जॉब करत असल्याने ऑनलाईन कोर्सच्या शोधात होते आणि मला डॉ. मुग्धा कर्णिक यांच्या फेसबुक वॉलवर instucen ट्रस्टच्या ‘डिप्लोमा इन बुद्धीस्ट स्टडी’ या कोर्सची माहिती मिळाली. मी तेव्हा जॉबसाठी पेणमध्ये होते.
मी डिप्लोमा जॉईन केला. त्यासाठी दिलेले ‘बुद्धा टीचिंग’ हे ई-बुक वाचले. मला तशी फिरण्याची आवड कमीच आहे. पण डिप्लोमासाठी आर्किऑलॉजी म्हणजे उत्खननशास्त्रातील तज्ज्ञ शिक्षकांनी संपूर्ण जगात बुद्धिझम कसा पसरला होता, हे शिकवले आणि तेथे असलेल्या वास्तूंचे फोटोही दाखवले. त्यामुळे ते बघण्याची इच्छा निर्माण झाली.
डिप्लोमामधून मुंबईच्या जवळ काही फील्ड व्हिजिट होत्या, पण सुट्टी न मिळाल्यामुळे मी जाऊ शकले नाही. एप्रिल २०२३मध्ये मी पेणचा जॉब सोडला आणि मग बुद्ध समजून घेण्यासाठी कुठे जाता येईल, याचा विचार करू लागले.
बुद्धाने स्वत:च सांगितले आहे की माझ्या आयुष्यातील चार ठिकाणे महत्त्वाची आहेत. भविष्यात माझ्या अनुयायांनी तेथे जावे.
१) जिथे जन्म झाला ते स्थान. हे लुंबिनी नेपाळमध्ये आहे.
२) जिथे त्याला ज्ञानप्राप्ती झाली. ते बोधगया बिहारमध्ये आहे.
३) त्याचे पहिले प्रवचन सारनाथ येथे झाले. हे उत्तर प्रदेशात आहे.
४) जेथे महापरिनिर्वाण झाले, ते कुशीनगर उत्तर प्रदेशात आहे.
हिंदूंचे जसे चार धाम आहेत, तसेच मला हे बुद्धाचे चार धाम वाटले.
बाकी तीन भारतात आहेत आणि एकाच ट्रिपमध्ये जाऊ शकतो. पण लुंबिनीसाठी स्वतंत्रपणे जावे लागेल असे वाटत असताना अचानक मला आयआरसीटीसीची ईमेल आली. बुद्धिस्ट सर्किट ट्रेनने आठ दिवसांत ही चार ठिकाणे आणि आणखीही दोन ठिकाणे बघता येणार होती. मी लगेच त्याचे बुकिंग केले. ट्रिप नोव्हेंबरमध्ये होती, पण मी ऑगस्टमध्ये हरियाणामध्ये जॉबसाठी जॉईन झाले. ट्रिप दिल्लीहून सुरू होणार होती. मला रजा तर मिळालीच, पण मला माझ्या एम्प्लॉयरनी दिल्लीपर्यंत कारसुद्धा करून दिली.
४ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता मी सफदरजंग रेल्वे स्टेशनवर पोचले.
आयआरसीटीसीतर्फे सगळ्या यात्रिकांचे गंध लावून आणि गळ्यात तुळशीची माळ घालून स्वागत केले गेले. बसण्याची सोय होती आणि मंगलवाद्ये वाजत होती. चहा/ कॉफी/ सॉफ्ट ड्रिंक्स/स्नॅक्स सगळे काही होते. दोन वाजता ट्रेन आली. ही खास टुरिस्ट ट्रेन आहे. यात फक्त फर्स्ट क्लास आणि सेकंड एसी एवढेच क्लास आहेत. आम्ही फक्त ३०जण होतो. कोविडनंतर पहिलीच यात्रा असल्यामुळे एवढे कमीजण असूनही ट्रेन सोडण्यात आली. ह्यात आठ परदेशी प्रवासी, एक श्रीलंकेतील, बाकी संपूर्ण भारतातून आलेले लोक होते. आश्चर्य म्हणजे माझी हॉटेलमधील रूम पार्टनर मराठी आणि पुण्याची होती तर एक मराठी जोडपे नागपूरहून आलेले होते. आठ दिवसांत आमची खूप चांगली मैत्री झाली. सगळे जण बुद्धाची शिकवण पाळणारे होते.
ट्रेनमध्ये अंघोळ करण्याची सोय, रेस्टॉरंट, टॉयलेट, लायब्ररी अशा सोयी होत्या (पण लायब्ररीत बुद्धावरची एक दोन जर्मन पुस्तके सोडली, तर बाकी ‘बीजेपीचा नवा चेहरा’ या पुस्तकाच्या २५/३० कॉपी होत्या.)
काही रात्री आम्ही ट्रेनमध्ये तर काही हॉटेलमध्ये काढणार होतो. ट्रेन सुटली की तिथूनच आमची बस निघायची आणि रात्रभर प्रवास करून आम्ही जिथे उतरणार असू तिथे पोचायची. बस पोचली नाही, असे कधीच झाले नाही. आमच्याबरोबर आयआरसीटीसीचा गाईड होता. अभय हे तत्त्वज्ञान घेऊन पीएचडी झालेले होते. ते आम्हाला बसमध्ये बसल्यावर त्या त्या ठिकाणची पूर्ण माहिती देत होते.
प्रवासाच्या कार्यक्रमाप्रमाणे क्रम वेगळा होता, पण मी चार ठिकाणांचीच माहिती सांगणार आहे.
लुंबिनी
लुंबिनी हे गौतम बुद्धाचे जन्मस्थान. ज्ञानप्राप्तीच्या आधी बुद्ध हा राजपुत्र सिद्धार्थ होता. त्याचे वडील राजा शुद्धोदन ह्याची राजधानी कपिलवस्तू ही आताच्या बिहारमध्ये आहे, तर लुंबिनी नेपाळमध्ये आहे, जे त्याच्या आईचे माहेर होते. नेपाळच्या प्रथेप्रमाणे गौतम बुद्धाची आई महामाया ही सासरहून माहेरी जाण्यासाठी निघाली, कारण पहिल्या बाळाच्या जन्मासाठी स्त्रिया माहेरी जातात. वाटेत रुमिनदेई (देवी) या देवीच्या दर्शनासाठी थांबली. पण तेव्हाच तिला कळा सुरू होऊन सिद्धार्थचा जन्म झाला. जन्माच्या ठिकाणी दोन साल वृक्ष होते. त्यांच्या फांदीला तिने धरले होते. रुमिनदेवीचे स्थान या जागेच्या समोरच आहे. तसेच तिथल्या प्रथेप्रमाणे मुलाच्या जन्मानंतर महामायेने तलावात स्नान केले. तो तलावही तिथेच आहे. या परिसरात अशोकाने एक मंदिर बांधले होते. साल वृक्षांच्या जागी एक इमारत होती. हा सर्व परिसर आक्रमकांकडून नष्ट करण्यात आला. नेपाळ सरकारने उत्खनन केले तेव्हा खालील गोष्टी सापडल्या.
जुन्या महामाया मंदिराचे अवशेष सापडले तसेच ठेवले आहेत. साल वृक्षांच्या जागी जी इमारत होती तेथे आता नवीन महामाया मंदिर आहे (ते साल वृक्ष आता तेथे नाहीत, पण परिसरात असलेले दोन साल वृक्ष आम्ही पाहिले). मधल्या जागेत खूप व्होटिव्ह स्तूप (बुद्धांचे वास्तव्य जिथे जिथे झाले, तिथे उभारलेल्या स्तूपांना उद्देशिका स्तूप किंवा व्होटिव्ह स्तूप म्हणतात) आणि विहारांचे अवशेष आहेत.
रुमिनदेई – पिंपळाच्या खोडाजवळ देवी आहे. तिला अजूनही निरांजन-उदबत्ती लावतात.
अशोकस्तंभ – नवीन मंदिराजवळ अशोकस्तंभ आहे. त्यावर बैलाचे शीर्ष होते पण ते आता नाहीये. ह्या स्तंभावरील कोरलेल्या लेखात असे लिहिले आहे की हे बुद्धाचे जन्मस्थान असल्यामुळे राजा अशोक त्यांचे कर १/६ पासून कमी करून १/८ करत आहे. मंदिराच्या मागेही काही व्होटिव्ह स्तूप आहेत. सर्व बांधकाम विटा आणि काही ठिकाणी दगडांचे आहे.
उत्तर प्रदेशातील नौतनवा स्टेशनवर उतरून आम्ही बसने लुंबिनीला गेलो. वाटेत एकदा भारताच्या बाजूला तर एकदा नेपाळच्या बाजूला इमिग्रेशनचे सोपस्कार करावे लागले. भारतीयांना व्होटर आयडी दाखवले तरी चालते, मात्र परदेशी पर्यटकांना विसा जरुरी आहे.
नेपाळ सरकारने परिसर स्वच्छ आणि जसाच्या तसा ठेवला आहे. अशोक स्तंभ बघून खूप छान वाटले कारण हे सर्व पुरावे आहेत, ज्यामुळे बुद्ध खरोखरच होऊन गेला हे समजते.
बोधगया
गया स्टेशनवर उतरून आम्ही बसने बोधगयेला पोचलो. गया-बोधगया बिहारमध्ये आहे. गौतम बुद्ध ज्ञानप्राप्ती होण्याआधी राजपुत्र सिद्धार्थ होता. तो सर्व सुखांचा उपभोग घेत होता. २९ वर्षे वयापर्यंत भोग घेण्याच्या अत्युच्च पातळीवर होता. पण त्याला त्यातला फोलपणा समजला आणि तो ज्ञानप्राप्तीसाठी संसार त्यागून धर्मारण्य या ठिकाणी आला. त्या काळच्या श्रमणाप्रमाणे त्याने उपभोग तर सोडलेच, पण गरजाही सोडल्या. त्याने अन्न, पाणी, कपडे सगळ्याचा त्याग केला. असे अनेक वर्ष शरीर कष्टवून तो अस्थिपंजर झाला पण त्याला ज्ञान मिळाले नाही. ही त्यागाची अत्युच्च पातळी होती. धर्मारण्य याच ठिकाणी त्याने मध्यम मार्ग अवलंबण्याचा निश्चय केला. म्हणजेच भोग सोडायचे, पण गरजा भागवायच्या. शरीर जगवण्यापुरते अन्न घ्यायचे. त्याने ज्या दिवशी हे ठरवले त्याच दिवशी सुजाता नावाची स्त्री तिथे आली. सिद्धार्थ ज्या पिंपळवृक्षाखाली बसला होता त्या वृक्षाला वाहायला तिने खीर आणली होती. तिने वृक्षदेवता समजून बुद्धाला खीर दिली. त्याने ती खाल्ली. त्याच क्षणी ज्ञानप्राप्तीची प्रक्रिया सुरू झाली. पण बाकीच्या श्रमणांना हे आवडले नाही. स्वत: बुद्धाचे पाच मित्र होते, त्यांनीही त्याला सोडले. म्हणून तो धर्मारण्य सोडून निरंजना नदी पार करून गेला. तिथे पिंपळवृक्षाखाली ध्यान लावून बसला. तेथे काही काळाने त्याला ज्ञानप्राप्ती झाली. धर्मारण्य येथे सुजाता मंदिर आहे. सुजाताचे घर जिथे होते, तिथे तिच्या स्मरणार्थ स्तूप बांधला आहे. हे दोन्ही आम्ही पाहिले. जिथे बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली त्या पिंपळ वृक्षाला बोधीवृक्ष म्हणतात. तिथे महाबोधी टेंपल आहे.
हे मंदिर बोधीवृक्षाच्या समोर सम्राट अशोकाने ख्रिस्तपूर्व तिसर्या शतकात बांधले. मात्र मूळ बोधीवृक्ष अशोकाच्या राणीने-तिस्यरक्षिता हिने कापला. पण त्याची एक फांदी अशोकाने आधीच आपल्या मुलांबरोबर श्रीलंकेला पाठवली होती. त्याचा तोपर्यंत वृक्ष झाला होता. त्याची फांदी पुन्हा मूळ जागी लावली. आता जो बोधीवृक्ष आहे तो मूळच्या बोधीवृक्षाचा नातू आहे. बोधी टेंपल खूपच सुंदर आहे. चारी बाजूंना कोरीव काम केलेल्या बोधिसत्वांच्या मूर्ती आहेत. बुद्धमूर्तीवरून नजरच हटत नाही. तिला सोनेरी मुलामा दिलेला आहे. पिवळी वस्त्रे घातली आहेत. डोळे, भुवया छान निळ्या रंगाच्या आहेत. डोळे अर्धवट मिटलेले, ओठ गुलाबी, सरळ नाक, कानाच्या पाळ्या खांद्यापर्यंत डोक्यावर केसांचा उंच बुचडा! फोटो काढायचा नसल्याने दोन वेळा जाऊन डोळ्यांत साठवून घेतला. नंतर बोधीवृक्षाचे दर्शन घेतले.
ज्ञानप्राप्तीनंतर बुद्ध सात आठवडे त्या परिसरात राहिला. सहाव्या आठवड्यात त्याची परीक्षा पाहण्यासाठी वादळ आले, अनेक प्राणी अंगावर आले, पण त्याचे ध्यान तुटले नाही. तेव्हा एका नागराजाने त्याच्यावर फणा धरून त्याचे रक्षण केले. तर पावसाच्या पाण्याचे तळे बनले. हे तळे आणि बुद्धमूर्ती फारच सुंदर आहे. सातवा आठवडा एका झाडाखाली घालवला. ४९व्या दिवशी दोन व्यापारी त्याची कीर्ती ऐकून तिथे त्याची शिकवण घेण्यासाठी आले. त्यांना बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि हे मंत्र दिले. त्यांनी दिलेली मिठाई खाऊन ४९ दिवसांचा उपास सोडला.
भारत आणि नेपाळमध्ये हा फरक जाणवला की भारतात सर्वांना देव बनवले जाते. इथे सुजाताला देवी बनवून तिचे मंदिर बनवले आहे, जणू तिने खीर दिल्यामुळे बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली. खीर किंवा सुजाता महत्त्वाची नसून बुद्धाने ती खाल्ली हे महत्त्वाचे आहे. त्यानंतर खूप ध्यान केल्यावर त्याला ज्ञानप्राप्ती झाली. असो. तरीही उत्खनन विभागाने ही सर्व ठिकाणे नीट जतन केली आहेत हे चांगले आहे. आणखी दु:खाची गोष्ट म्हणजे या सर्व ठिकाणी गरिबी खूपच आहे. छोट्या मुलांना घेऊन लोक भीक मागत असतात. एकाला दिले तर दहाजण जमा होतील, म्हणून कोणालाच द्यावेसे वाटत नाही. शिवाय रस्ते फारच वाईट आहेत.
सारनाथ
वाराणसी स्टेशनवर उतरून आम्ही बसने सारनाथ येथे पोचलो. सारनाथ हे ही बुद्धाच्या जीवनातील महत्त्वाचे स्थान आहे. जेव्हा सिद्धार्थने सुजाताकडून खीर घेतली तेव्हा तेथील श्रमणांनी त्यांच्यावर खूप टीका केली. त्याचे पाच मित्रही त्याला सोडून गेले. ज्ञानप्राप्तीनंतर गौतम बुद्ध ४९ दिवस त्या आनंदात डुंबत बोधगयेमध्येच राहिला. पण त्यानंतर त्याने त्या पाच मित्रांचा शोध घेतला. तेव्हा ते सारनाथ येथे आहेत हे त्याला समजले. मग तो पायी चालत तेथे आला. ज्या ठिकाणी ते पाच मित्र भेटले तेथे पंचायतन मंदिर आहे. बुद्धाचा चेहरा इतका तेज:पुंज दिसत होता की त्यांना लगेच पटले की याला ज्ञानप्राप्ती झाली आहे. ते त्याचे अनुयायी झाले. त्यांना त्याने प्रवचन दिले (फर्स्ट सर्मन) तसेच त्यांच्याबरोबर भिक्षुसंघ स्थापन केला.
येथेच ‘संघम् शरणं गच्छामि’ हा तिसरा मंत्र दिला. त्या जागेवर धर्मचक्रप्रवर्तन स्तूप बुद्धाच्या मृत्यूनंतर बांधला गेला. तेव्हा छोटा होता. नंतर अशोकाने मोठा स्तूप बांधला. परंतु ११९९मध्ये हा सर्व परिसर जाळला गेला. त्यानंतर १९व्या शतकात उत्खनन होऊन याचे अवशेष सापडले. आता या स्तूपाला धम्मेक स्तूप असे म्हणतात. या परिसराला ऋषिपत्तन मृगदा असे नाव होते. म्हणजे ऋषी आणि सर्व जीवांचे राहण्याचे ठिकाण.
उत्खननानंतर या परिसरात सापडलेल्या इमारती
मूलगंध कुटी विहार : या ठिकाणी बुद्ध जेव्हा सारनाथला येईल तेव्हा राहत असे. त्या जवळ पंचायतन मंदिर, अशोकस्तंभ हेही होते. अशोकस्तंभाचे पाच तुकडे झाले आहेत. ते पाच तुकडे त्या ठिकाणीच आहेत. भारताची राजमुद्रा असलेले चार सिंह असलेले स्तंभशीर्ष आता जवळच असलेल्या म्युझियममध्ये आहे. त्याच्या जवळ धम्मेक स्तूप आणि मधल्या जागेत अनेक व्होटिव्ह स्तूप आहेत. ते त्यात एक व्यक्ती बसून ध्यान करू शकेल एवढे आकाराने आहेत. (आता फक्त पाया शिल्लक आहे). व्होटिव्ह स्तूप हे नवस पूर्ण झाल्यास बांधले जात.
मृगवन : बाजूला खूप हरणे असलेले मृगवन आहे.
धर्मराजिक स्तूप : हा मोठा गोलाकार स्तूप आहे. याचाही पाया आणि प्रदक्षिणा मार्ग फक्त शिल्लक आहे. अशोकाने बुद्धाच्या अवशेषांचे ८४,००० तुकडे केले आणि त्यावर स्तूप उभारले. धर्मराजिक स्तूप हा असाच स्तूप आहे. उत्खननात ते अवशेष सापडले, पण काशीला तोपर्यंत हिंदू राजा मिळाला होता आणि त्याने हिंदू प्रथेप्रमाणे ते अवशेष गंगेत विसर्जित केले.
या सर्व इमारती विटांनी बांधल्या आहेत. त्यांना बाहेरून कोरीव काम केलेल्या दगडांनी सुशोभित केले होते. मात्र आता थोडेच दगड जागेवर आहेत. असे खूप दगड उत्खननात मिळाले. ते म्युझियममध्ये ठेवले आहेत. आक्रमकांनी हे सर्व परिसर नष्ट केले याचे खूप दु:ख होते, पण उत्खनन विभागामुळे आज हे अवशेष तरी आपण बघू शकतो हे एक समाधान आहे.
कुशीनगर
कुशीनगर हे बुद्धाच्या जीवनातील चौथे महत्वाचे ठिकाण. या ठिकाणी बुद्धांचे महापरिनिर्वाण झाले. निर्वाण म्हणजे नुसता मृत्यू नाही तर मोक्षासह मृत्यू. हा ती व्यक्ती कुठे होणार कधी होणार हे स्वत: ठरवते. त्याप्रमाणे बुद्धाने कुशीनगर ही जागा त्यासाठी ठरवली. त्याचा जन्म दोन साल वृक्षांच्या मध्ये झाला तसाच मृत्यूही दोन साल वृक्षांच्या मध्ये झाला. वर्षावासासाठी वैशाली नगरीत असलेला बुद्ध २५० किमी पायी चालत कुशीनगरमध्ये आला. ज्या दिवशी परिनिर्वाण होणार होते त्या दिवशी तो दोन साल वृक्षांच्या मध्ये उजव्या कुशीवर पहुडला. त्याचे डोके उत्तरेला, पाय दक्षिणेला तर चेहरा पश्चिमेला होता. नंतर तो ध्यानात गेला. ध्यानाच्या चार अवस्था पार करून तो पुन्हा उलट्या क्रमाने नॉर्मल स्थितीत आला आणि मग पुन्हा ध्यानाच्या चौथ्या अवस्थेत जाऊन तो निर्वाणात गेला. शेवटी त्याने उपदेश केला की सर्व भौतिक गोष्टी या नष्ट होणार आहेत. तेव्हा कोणत्याही गोष्टीच्या मागे न लागता आपले कर्तव्य करा, तोच तुमच्या मोक्षाचा मार्ग असेल.
बुद्धाच्या मृत्यूनंतर त्याचे दहन केले गेले. त्याच्या अस्थींचे आठ भाग करून वेगवेगळ्या ठिकाणी त्यावर स्तूप उभारण्यात आले. त्यानंतर अशोकाने सात स्तूपांमधील अस्थी ८४,००० भागांत विभागून तेवढे स्तूप बांधले. महापरिनिर्वाण झालेल्या जागी असाच एक स्तूप होता. ६.१ मीटर उंचीची कुशीवर झोपलेली बुद्धमूर्ती आणि इतर अनेक विहार होते. हा परिसर बख्तियार बिन खिलजीने नष्ट केला. नंतर ५०० वर्षे तो पूर्णपणे विसरला गेला. पण फा हीन या चिनी प्रवाशाने त्याचे वर्णन लिहून ठेवले होते. त्यावरून अलेक्झांडर कनिंघम याने कुशीनगर या ठिकाणी उत्खनन सुरू केले आणि ही बुद्धमूर्ती आणि त्या परिसराचे अवशेष मिळाले. दोन साल वृक्षांच्या जागेत बुद्धमूर्ती होती तर तिच्यामागे स्तूपाचे अवशेष होते. तेथे तांब्याच्या पात्रात अवशेषही होते हे त्यावरील कोरीव मजकुरावरून समजले. आता भारत सरकारने त्याच्या बाहेरून स्तूप बांधला आहे आणि त्याच्याच पुढे महापरिनिर्वाण मंदिर बांधले आहे. त्या मूर्तीला कमळाची फुले किंवा पिवळी शाल वाहतात. ६.१ मीटर लांबीची ही मूर्ती गुलाबी सँड स्टोनमध्ये बनवलेली आहे.
परिसरात अनेक इमारतींचे पायाचे भाग आहेत, मंदिराच्या चारी बाजूंनी अनेक स्तूप आहेत.
बुद्धाच्या दहनाच्या जागी असलेला स्तूपही खूप मोठा आहे. तोही नष्ट करण्याचा प्रयत्न झाला, पण खूपच मोठा असल्याने अजून बराच भाग चांगल्या अवस्थेत आहे. ह्या स्तूपाच्या जवळही अनेक व्होटिव्ह स्तूप आहेत. यालाही कमळे वाहतात. मेणबत्त्या लावतात.
कुशीनगरची प्रचंड बुद्धमूर्ती पाहिली. तिला स्पर्शसुद्धा करता येतो. प्रदक्षिणा करता येते. हे केल्यावर मन एकदम शांत झाले. सगळे विचार गेले. काहीजण बोधगयेला तर काही येथे खूप रडले. मला या ठिकाणी अश्रू अनावर झाले. गाईड खूप छान माहिती देत होता. सर्व इतिहास डोळ्यापुढे उभा राहत होता.
हे चार धाम आणि नालंदा, राजगीर, श्रावस्ती ही ठिकाणे पाहिली. आयआरसीटीसीने अगदी चोख व्यवस्था ठेवली होती. खूप देशी परदेशी मित्र मैत्रिणी मिळवून मी परत आले.