• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

आमुचा ‘राम राम’ घ्यावा!

- योगेंद्र ठाकूर (गाथा शिवसेनेची)

Nitin Phanse by Nitin Phanse
March 23, 2023
in गर्जा महाराष्ट्र
0

आणीबाणी संपली होती. काँगे्रसच्या दिग्गज नेत्या इंदिरा गांधी यांचा पराभव होऊन केंद्रात जनता पक्ष सत्तेवर आला होता. देशात जनता पक्षाची विजयी घोडदौड सुरू होती. अशा वातावरणातच नोव्हेंबर १९७८मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा झाली. या निवडणुकीच्या निमित्ताने, ‘‘मराठी माणसाने शिवसेनेच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे,’’ असे आवाहन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केले.
या निवडणुकीसाठी एकूण ९९१ उमेदवार रिंगणात होते. शिवसेनेचे ११७ शिलेदार निवडणुकीच्या लढाईत उतरले. जनता पक्षाने १३०, इंदिरा काँग्रेसने ७६ तर संघटना काँग्रेसचे ६४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नशीब आजमावत होते. निवडणुकीचे निकाल जनता पक्षाला अनुकूल लागले. त्या लाटेवर स्वार होऊन त्यांचे ८५ नगरसेवक विजयी झाले. दोन्ही काँग्रेसचे मिळून २५ तर शिवसेनेचे अवघे २१ उमेदवार निवडून आले. जनता पक्षाच्या झंझावाताने विरोधकांची दाणादाण झाली. या निकालाचा जनता पक्षाला आनंद झाला, तर शिवसेना आणि काँग्रेसला धक्का बसला. याआधीच्या विधानसभा निवडणुकीतही शिवसेनेला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. हा पराभवाचा दुसरा धक्का शिवसेनेला बसला. शिवसैनिकांना पराभव जिव्हारी लागला तर शिवसेनाप्रमुखांनाही त्याचा खूप त्रास झाला.
महापालिकेतील दारुण पराभवानंतर शिवसेनाप्रमुखांनी शिवतीर्थावर जाहीर मेळावा घेतला. दोन लाखांच्या या प्रचंड मेळाव्यात त्यांनी ‘आमुचा राम राम घ्यावा’ ही भूमिका घेऊन शिवसैनिकांसमोर, जनता-जनार्दनासमोर आपला राजीनामाच सादर केला. पण शिवसैनिकांचे अलोट प्रेम, श्रद्धा आणि निष्ठा पाहून त्यांनी राजीनामा मागे घेतला. राजीनामा मागे घेतल्यानंतर ‘मार्मिक’मध्ये लिहिलेल्या अग्रलेखात ते म्हणतात, ‘‘आतापर्यंत शिवतीर्थावर शिवसेनेचे अनेक मेळावे झाले, पण परवाचा मेळावा आमच्या दृष्टीने वेगळा होता. एरवी त्या मेळाव्याची आवश्यकता नव्हती. पण तरीही आम्ही तो घेतला. कारण ज्या शिवतीर्थावर आम्ही आतापर्यंत महाराजांच्या समक्ष मराठी माणसांशी हितगुज करीत आलो, त्याच पवित्र भूमीवर आम्हाला आमचे मन मोकळे करायचे होते. दसर्‍याच्या दिवशी शिवतीर्थावर झालेल्या मेळाव्यात आम्ही जाहीर केले होते की, येत्या निवडणुकीत महापालिकेवर जर महाराजांचा भगवा फडकला नाही तर आम्ही शिवसेनाप्रमुखपदावरून दूर होऊ.
आयुष्यात आम्ही आमच्या शब्दांची कदर करीत असल्याने ती प्रतिज्ञा करीत असताना आम्ही आमचा विवेक शाबूत ठेवला होता. त्यानंतर महापालिकेची निवडणूक झाली. निवडणुकीच्या प्रचारात ‘ठाकर्‍यांना धडा शिकविण्यासाठी शिवसेनेचा पराभव करा,’ असाही प्रचार आमच्या विरोधकांनी केला. या निवडणुकीत शिवसेना नेस्तनाबूत व्हावी म्हणून ते पाण्यात देव ठेवून बसले होते. तरीही शिवसेनेला २१ जागा मिळाल्या. या निवडणुकीच्या निकालांनी आम्हाला अनपेक्षित काही धक्के दिले. ज्या दादर आणि गिरगावने आम्हाला मातापित्याचे प्रेम दिले होते, तिथे शिवसेनेच्या उमेदवारांचा पराभव झाला. मनोहर जोशी, सुधीर जोशी, गजानन वर्तक, प्रमोद नवलकर यांनी त्यांच्या भागात जनतेची चांगली सेवा केली होती. तरीही दादर-गिरगाव भागात शिवसेनेच्या उमेदवारांचा पराभव झाला. त्या पराभवाने आम्ही खचलो नाही, तर व्यथित मात्र निश्चित झालो. मात्र माहिम ते चेंबूरपर्यंत बिगरमराठी लोकांचे बहुमत असलेल्या मतदारसंघातून सुरेश गंभीर, अमरनाथ पाटीलसह काही नगरसेवक निवडून आले. अशा या परिस्थितीत आम्ही आमच्या शब्दाला जागून राजीनाम्याचे पत्र तयार केले. मनाची कितीही समजूत घातली तरी मुंबई मनपावर भगवा झेंडा फडकला नव्हता. त्या सत्याला स्मरूनच आम्ही राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला आणि त्यासाठी शिवतीर्थावर परवाचा मेळावा जाहीर केला. शिवसेनाप्रमुखपदावरून आम्ही दूर व्हायचे ठरवले होते, तरी शिवसेनेपासून दूर होण्याचा विचारही आमच्या मनात नव्हता आणि तो कदापि येणे शक्य नाही. आम्ही शब्द दिला होता म्हणून अट्टाहासाने शब्दाला जागून आम्ही शिवतीर्थावर लक्षावधी मराठी माणसांच्या चरणी आमचा राजीनामा सादर केला.
आम्ही आमच्या राजीनाम्याचा उच्चार करताक्षणीच शिवतीर्थावर जे वातावरण निर्माण झाले ते आमचे रक्त ओतले तरी आम्हाला शब्दांकित करता येणार नाही. एखादी वावटळ उठावी त्याप्रमाणे लक्षावधी श्रोते उभे राहिले आणि आम्हाला आमच्या निर्णयापासून परावृत्त करण्यासाठी व्यासपीठाच्या दिशेने आले. शेवटी शिवसैनिकांनी व्यासपीठाला वेढा घातला आणि भावनातिरेकाने त्यांनी आकाशाला भिडणार्‍या घोषणा सुरू केल्या. अनेक शिवसैनिक आमच्या निर्णयाने ओक्साबोक्सी रडू लागले आणि पुढे बसलेल्या महिलांनी डोळ्यांना पदर लावला. त्याक्षणी आम्हाला जाणीव झाली की आम्ही आमचे राहिलेलो नाही. आमच्या बाबतीत कोणताही निर्णय घेणे आम्हाला यापुढे कदापि शक्य नाही, इतका या मराठी माणसांनी आमच्यावर हक्क प्रस्थापित केला होता. ते दृश्य पाहून आम्ही अवाक् झालो, आमचे शब्द गोठले आणि आम्ही त्याप्रमाणे उफाळलेल्या लाटेची कदर करून आमचा राजीनामा मागे घेतला. क्षणार्धात ते वातावरण निमाले, त्याचे उत्सवात रुपांतर झाले.
आम्ही आमचा राजीनामा मागे घेतला. आम्ही नव्हे, तर लक्षावधी जनतेने तो मागे धाडला. तेव्हापासून आम्ही अंतर्मुख होऊन विचार करीत आहोत. कोणत्याही पक्षाला अथवा पक्षनेत्याला हे प्रेम कधी मिळाले नसेल. अशा या प्रेमाची बांधिलकी आम्हाला कधीच तोडता येणार नाही. शिवसेना ही मराठी माणसाची एक गरज आहे. वेळप्रसंगी आम्हाला फराटे मारले तरी प्रेम काही कमी झालेले नाही. आमचा राजीनामा परत करून आम्हाला जनतेने महाराजांच्या साक्षीने आमच्या वाढत्या जबाबदारीची जाणीव करून दिली आहे. राजकारण गढूळ झाले आहे. सर्व वाटा रोखल्या आहेत. वाटेत अनंत अडथळे निर्माण झाले आहेत. पण तरीही आम्ही डगमगणार नाही. जनतेच्या त्या प्रेमाने आमचे बळ शतपटीने वाढले आहे. हे प्रेम एकनिष्ठ असते, शपथबद्ध असते. त्याची कदर करून आम्ही आज तमाम मराठी जनतेला तहहयात सेवेचे आश्वासन देत आहोत आणि त्याचवेळी देवतासमान असलेल्या त्या मायबाप जनतेला निरोपाचा ‘राम राम’ नव्हे तर नतमस्तक होऊन मुजर्‍याचा कृतज्ञतापूर्वक ‘राम राम’ करीत आहोत!’’
शिवसेनाप्रमुखांनी महानगरपालिका निवडणूक प्रचाराच्या सभेत दिलेला शब्द कसोशीने पाळला. पण, तो शब्द शिवसैनिकांच्या अलोट प्रेमामुळे बाळासाहेब पूर्ण करू शकले नाहीत. परंतु त्यांच्या भावनोत्कट भाषणाने त्यांनी शिवसैनिकांना पुन्हा एकदा चेतना दिली, शिवसेनेत जान फुंकली. निवडणुकीच्या पराभवाने शिवसैनिक कधी खचत नाही. तो पुन्हा उभारी घेतो. निवडणुकांच्या राजकारणात पराभव झाला तरी शिवसेनेचे समाजसेवेचे व्रत अखंडपणे सुरूच राहते.

Previous Post

महाराष्ट्रद्वेषी तोंड’पाटील’की आवरा!

Next Post

मोदानी वि. राहुल : संसदेतल्या संघर्षाचे इंगित काय?

Next Post

मोदानी वि. राहुल : संसदेतल्या संघर्षाचे इंगित काय?

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.