एक सूचना : हा लेख शक्य असल्यास जेवणाआधी वाचावा.
पहिले चित्र – छान ताट, त्यात वाफाळता भात, पिवळे धमक वरण, बाजूला रसरशीत लिंबू आणि मग त्यावर वाढले जाते टोमॅटो केचप!!… हो हो, टोमॅटो केचप… ढवळलं ना पोटात?
चला दुसरे चित्र बघू.
मस्त घमघमणारी सामिष बिर्याणी, सुंदर सजलेली, केशर, बरिस्ता, पुदिना यांचा शिडकावा झालेली… आता तिच्यावर ओतला जातोय चिली सॉस… अरारारारा!
आता आपल्या जबाबदारीवर पुढची चित्रं डोळ्यांसमोर आणा…
पुरणपोळी वर किसलेलं चीझ…
बटाटावड्यासोबत मेयोनिज
पोह्यांवर घातलेली मॅगी…
मळमळले का पोटात?
म्हणूनच सांगितलं होतं की हे रिकाम्या पोटी वाचा.
तर लोकहो, हे जे वर काही वाचलेत ते काल्पनिक नाही, भुकेल्या पोटीच्या झोपेत पडलेल्या दु:स्वप्नात चमकून गेलेल्या पाककृती नाहीत… हे नसून वास्तव आहे. कोणत्याही चित्रपट, नाटक किंवा तत्सम कलाकृतीमध्ये डिस्क्लेमर असतो बघा, ही कलाकृती काल्पनिक आहे, त्यातल्या कशाचाही वास्तवाशी संबंध नाही, इत्यादी… तर त्याच धर्तीवर मी सांगतेय की वरील सर्व भयावह पाककृतीजोड हे वास्तव आहे, अजिबात काल्पनिक नाही.
हे पाहा, बदल हाच जगाचा स्थायीभाव यात वाद नाही. ते आपल्याला मान्यही आहे. पण म्हणून सर्व बदल चांगले असतात असेही नाही.
बटाटावड्यात चीझ आणि मिसळीमध्ये मेयोनिज असल्या अभद्र संकराचा उगम हा बहुदा कोरोना काळात झाला असावा. आणि कोरोना जवळपास गायब झाला असला तरी त्या काळात माफीयोग्य मानले गेलेले हे अन्न-गुन्हे मात्र डोक्याला शॉट होऊन बसलेत.
ख्रिस्ती धर्मप्रचारक विहिरीत पाव टाकून लोकांना बाटवतात, इराण्याच्या हॉटेलात गेल्याने धर्म बुडतो, असल्या कर्मठ आणि बुरसटलेल्या विचारांपासून शंभरएक वर्षांत भारतीय समाज खूपच पुढे आलाय.
हॉटेलात पाऊल टाकणं हे संस्कृती बुडवणं असल्यापासून आज हॉटेलला गेलं नाही तर उपाशी मरू इथपर्यंत परिस्थिती आलेली असून एकेकाळी बाटवण्याचं हत्यार असलेल्या पाव किंवा ब्रेडने भारतीय स्वयंपाकघरात अढळपद मिळवले आहे. त्याने कोणीच बाटलेलं नाही. पण इथेच अलीकडे कुठेतरी चीझ मिसळ आणि मॅगी उपमा असली पापे फोफावली.
लॉकडाऊनमध्ये हातात वेळही खूप होता आणि फोनही होता. त्यामुळे अनेकांनी सोशल मीडिया मनसोक्त वापरला. ती फेट फेट फेटायची डेलगोना कॉफी आठवते का? माझे दोन कप धराशयी झालेत तिच्या नादात, तर मुद्दा होता अन्नविकृतीचा.
दोश्यात म्यागी, पिझ्झ्यावर गुलाबजाम, डोसा आइस्क्रीम, चीझ भेळ, ग्रीन थाई करी पाव भाजी, जिलेबी/सुशी चाट, पिझ्झा बिर्याणी, थाई खिचडी, पास्ता बिर्याणी, नुडल्स समोसा, सेझवान सुशी, पेस्तो पुलाव, मॅगी इडली, नुटिला गुलाबजाम, ढोकळा आइस्क्रीम, गुलाबजाम खाखरा आणि श्वास रोखून धरा… चक्क सेझवान बिर्याणी… होय, हे खरोखरचे पदार्थ आहेत लोकांनी बनवलेले, अजूनही अनेक ठिकाणी कौतुकाने दिले आणि खाल्ले जाणारे. लोकहो, विश्वास बसत नसेल तर गुगलअण्णाला विचारा. झीट येईल असल्या पदार्थांची नावं वाचून.
आता प्रश्न असा पडतो की का? का करायचाय हा अन्नभेसळीचा व्यवहार?
एकच उत्तर विकृती.
मला सेझवान सुशी अथवा गुलाबजाम पिझ्झा आल्याने काही फरक पडत नाही, कारण त्या मूळ पदार्थांचीच मी काही फार चाहती नाही. पण बॉस, बिर्याणी, बटाटा वडा, डोसा इडली… ये जिगर के टुकडे हैं अपने, इनके साथ मजाक नहीं.
भारतीय जेवणाचे काही मानबिंदू आहेत ते तसेच राहावेत. असेही आपण सगळे शाकाहारी बिर्याणी मोठ्या मनाने सहन करतोय, ते खूप आहे.
या असल्या आचरट पदार्थाचा डोक्याला शॉट होतो. पाव भाजी मागवली की ‘जैन चाहिए क्या’ हा प्रश्न येतो. जैन सुशी इज अव्हेलेबल, असे कमावलेल्या धंदेवाईक सौजन्याने सांगितले जाते. श्रीखंड चॉकलेट आणि स्ट्रॉबेरी, सीताफळ फ्लेवरमध्ये पण आहे अशी मौलिक माहिती मिळते.
इथपर्यंत ठीक. कारण पर्याय असतात.
पण वरील सर्व भयानक पदार्थ हल्ली नेटिझन्समध्ये चर्चेत असतात. त्यामुळे दाटून येणारी भीती ही आहे की पुढे हीच भ्रष्ट रूपे रूढ होतील.
तुम्ही म्हणाल, हे फक्त शहरांत, महानगरांत घडतं. तर नाही रे भाऊ, गावात पण आजकाल ‘स्ट्रॉबेरी, गुलाब फ्लेवरच्या हात शेवया मिळतील,
चॉकलेट पुरणपोळी मिळेल’ असले बोर्ड, जाहिराती दिसतील.
उत्तम डोसा कसा असतो? बाजूने अंमळ कुरकुरीत आणि मध्ये गुबगुबीत, वडा पावतील चटणी कोणती असते, निव्वळ लसणीची सुकी आणि हिरवी ऐच्छिक, भेळेत कोणी मका चिवडा आणि सुकलेले बीट गाजर कीस घालते का? सँडविचवर वरून शेव घालण्याची दळभद्री कल्पना कोणाला सुचली असावी बरं? पाणी पुरीत कांदा का घातला जातो?
उत्तर आहे का?
भारतात अन्न दहशतवादी नवे नाहीत. पर्युषण काळात मांसविक्री बंद ठेवा आणि इथे सोसायटीत मांसाहारी लोकांना घर दिले जाणार नाही असले भिकारऽऽ तालिबानी फतवे प्रसिद्ध आहेतच. पण त्याच्यावरही या किळसवाण्या ट्रेंडने मात केलीय. असे प्रकार म्हणजे जेवणातील उर्फी जावेद म्हणायला हरकत नसावी (अर्थात या सुकड्या पोरीने वाघिणीच्या जबड्यात हात घालून दात पाडण्याचा पराक्रम केला आहेच). तिच्या कपड्यावर (म्हणजे त्यांच्या अभ्ाावावर) चर्चा होते आणि ते नंतर विसरले जातात… कधी ना कधी हे भ्रष्ट पदार्थही असेच फॅड म्हणून ओसरून जातील, माझी हीच आशा आहे आणि आशेवर माणूस जगतो.