शाश्वत नोकरी असलेल्या सरकारी कर्मचार्यांचा शाश्वत पेन्शन हवी या मागणीसाठी संप सुरू असताना, नोकरीचाच भरवसा नसलेल्या असंघटित क्षेत्रातील एका माणसाची गोष्ट सांगणारा ‘झ्विगाटो’ हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. ओरिसा राज्यातील भुवनेश्वर शहरात घरोघरी अन्न पोहोचवणार्या मानसची ही गोष्ट आहे. मानस, त्याची आजारी आई, घर सांभाळणारी पत्नी, शाळेत जाणारी दोन मुले असं त्याचं कुटुंब. फॅक्टरीमधील फ्लोअर मॅनेजरची नोकरी गमावल्यानंतर उदरनिर्वाहासाठी मानस फूड डिलिव्हरी अॅपसाठी डिलिव्हरी बॉयचं काम स्वीकारतो. त्यानंतर त्याचं जीवन ग्राहकांनी त्याला दिलेलं रेटिंग, दंड आणि इन्सेन्टिव्हच्या मागे धावतं. मानसच्या कामात प्रगती होत नसल्याने त्याची पत्नी प्रतिमा सफाई कर्मचारी म्हणून मॉलमध्ये काम करण्याचा निर्णय घेते, तेव्हा त्याचा पुरुषी अहंकार दुखावतो. मानसला चांगली नोकरी मिळते का? तो अडचणींवर मात करेल का आणि त्याच्या कुटुंबाचं पुढे काय होतं हे पाहायला हा चित्रपट पाहावा लागेल.
नोकरी नसल्याने किंवा नोकरी गेल्याने, सुशिक्षित माणसांना जगण्यासाठी रोज कमवा रोज खा, अशा प्रकारची नोकरी करणं आज भाग पडत आहे. या गिग इकॉनॉमीमध्ये उद्योजकाला पर्मनंट नोकर नको आहेत. याच शहरी मनरेगा कामाचे प्रतिनिधित्व करणार्या डिलिव्हरी बॉयला काम करताना काय अडचणी येतात हे चित्रपटात दिसतं. अॅप कंपन्या ‘इन्सेन्टिव्ह’ नावाचे गाजर देऊन डिलिव्हरी बॉयना जास्तीत जास्त डिलिव्हरी करायला भाग पाडतात. त्यांचे विविध स्तरांवर कसे शोषण केले जाते, ते दाखवणारे ‘वो मजबूर है, इसलिए मजदूर है’ (तो मजूर आहे कारण तो असहाय्य आहे) ‘वो मजदूर है, इसलिए मजबूर है’ (तो असहाय्य आहे कारण तो मजूर आहे) गुलामी यह भी है सिर्फ मालिक नहीं दिखता, मानसचे असे संवाद मनाला स्पर्शून जातात.
मोठ्या वर्गाचं प्रतिनिधित्व करणार्या सामान्य माणसाची गोष्ट मांडताना दिग्दर्शिका नंदिता दास यांनी चित्रपटाची मांडणी साधी सरळ ठेवली आहे. कथेत कोणतेही चढउतार नसल्याने एका सरळ रेषेत ही गोष्ट आपल्यासमोर येते. बाईकवरून डिलिव्हरी करणार्या मानसला, एक गरीब माणूस सायकलवर डिलिव्हरी होईल का असं विचारतो आणि मध्यांतर होतं. सिनेमाच्या गोष्टीला कलाटणी मिळून पुढे काहीतरी घडेल असं वाटतं, पण नंतर त्या विषयाचं काहीच होत नाही. बायकोच्या नोकरीला विरोध करणार्या मानसचे अचानक होणारे हृदयपरिवर्तन हेही सिनेमाच्या शेवटासारखं अकल्पित आहे.
अर्थव्यवस्था, सामाजिक व्यवस्था आणि राजकारण हे एकमेकांशी निगडित आहेत हे माहीत असूनही, सिनेमात जेव्हा या गोष्टी तुकड्या तुकड्यांनी येतात तेव्हा कथेच्या प्रवाहात अडथळा येतो. सामाजिक कार्यकर्ता गोविंदराज (स्वानंद किरकिरे) आंदोलन करत आहे, वेगळ्या श्रद्धेच्या माणसाला टार्गेट केले जाणे, इत्यादी अनेक सिक्वेन्स कथेत घुसवल्यासारखे वाटतात. चित्रपट संथ गतीने पुढे सरकतो. छायाचित्रकार रंजन पालित यांनी भुवनेश्वरच्या कोंदट रस्त्यांमधून सामान्यांचे जग कुशलतेने चित्रित केले आहे.
मानसची गंभीर भूमिका करून कपिल शर्माने विनोदी इमेज तोडली आहे. कपिल या ओव्हर-द-टॉप कॉमेडियनची झलक तुम्हाला एकदाही मिळणार नाही. बनियानमध्ये वावरणारा घरगुती पुरुष, उद्या काय होईल याची चिंता करणारा कुटुंब प्रमुख, इन्सेन्टिव्हसाठी ग्राहकांना सेल्फी मागणारा, वेळेत डिलिव्हरी करण्यासाठी सिग्नल तोडणारा अशा वेगवेगळ्या भूमिकेत कपिल छाप सोडतो. प्रतिमाच्या भूमिकेत शहानाने उत्तम अभिनय केला आहे. स्थानिक झारखंड भाषेतील उच्चार आणि देहबोलीतून ती दखल घ्यायला भाग पाडते.
चित्रपटाला डॉक्युमेंटरीसारखी ट्रीटमेंट दिली आहे, ज्यामुळे कंटाळा येऊ शकतो पण एक वेगळा विषय आणि चांगला अभिनय यासाठी एकदा पाहायला हरकत नाही.