(स्थळ :- विवाहेच्छू तरुण आणि मध्यस्थ मुलगी बघण्याच्या कार्यक्रमाला मुलीच्या घरात बसलेले. घरात मुलीचा चुलता. एक जख्खड आजोबा नि पोरीचा बाप, मामा उपस्थित.)
चुलता :- येताना काही अडचण नाही ना आली? कसा झाला प्रवास?
मध्यस्थ :- अडचण कसली येतीय? सकाळी सहाला उठवलं तुमच्या बहिणीनं. झिरो मिंटात आंघोळपांघोळ आवरली. देवपूजा केली. घोटभर चहा घेतला. गेलो याच्या घरी.
पोरगा :- हां काका सकाळी आठला आलेले घरी…
मध्यस्थ :- याच्या घरी गेलो तं गडी अंडरपॅन्टवर दात घाशीत दगडावर बशेल. त्याला आवर म्हंटलं, तवर वहिनीनं दोन भाकर्या थापल्या, चिलाची भाजी करेल होती, लई आग्रेव झाला म्हणून दोन घास दोघांनी खाल्ले अन् तडक इकडं निघालो. हात सुकेपर्यंत हे दारात! तुम्ही यायच्या पाचच मिन्टं आधी इथं पोहोचलो.
म्हातारं : – म्हंजे हेलिकॉप्टरपेक्षा फाष्ट आला पार तू! लाल ऐवजी निळं पेट्रोल प्यायला लागला का तू?
मामा :- हेच पाव्हणे का ते?
मध्यस्थ :- हा हेच्च ते! म्हणजे यांच्या चुलत भावाच्या यय्हीनीच्या…
मुलीचा बाप :- नाही, सगळे नातेसंबंध माहित्ये त्यांना.
चुलता :- हे बघा, पोरीची पीचडी झालीय केमिस्ट्रीत. पेट्रोकेमिकल्स कंपनीत तिला मोठ्ठं पॅकेज आलं होतं…
मामा :- अन् पिचडी व्हायच्या आधीच तिला चांगले स्थळं येऊन गेले, पण आम्ही सांगितलं, पोरीला शिकायचंय. तिचं शिक्षण झालं की मग…
म्हातारं :- पण पोरगा काय शिकलाय?
मध्यस्थ :- तो तसा बीए झालाय, त्यालाबी बारावीची परीक्षा झाल्या झाल्या स्थळ आलं होतं, पण वय बसत नव्हतं.
चुलता :- त्याचं?
मध्यस्थ :- नाही, पोरीचं!
मामा :- पण आमची पोरगी केमिस्ट्री विषयात…
मध्यस्थ :- त्याची काळजी सोडा, आमच्या कारभार्याला सांगितलं का निर्णय झटपट होत्यात. पोराला पण पीचडीला अॅडमिशन घेयला लावतो, ते पण केमिस्ट्रीत. पुढलं विचारा.
चुलता :- तो जर पीचडी आता करणारे तर नोकरीबीकरीचं काय?
मध्यस्थ :- नाही तो त्याच्या कल्पनेवर काम करतोय, लवकरच तो कंपनी काढेल…
मामा :- कसली?
मध्यस्थ :- पेट्रोकेमिकल्सची! दारात दोन आडवे उभे बोर मारले का येतंय पेट्रोल वर, अन् बाजूचं बंद पडेल वॉटर फिल्टर मशीन घेतलं का तिथंच प्रक्रिया!
मुलीचा बाप :- एव्हढा पैसा?
मध्यस्थ :- काळजी सोडा, कारभार्यानं निर्णय घेतला की होतं सगळं. पुढलं विचारा.
मामा :- जमीन? जमीन कितीय?
पोरगा :- जमीन दोन बिघे आहे, पण जिरायती आहे.
चुलता :- जिरायती?
मध्यस्थ :- आहो, तेचं काय घेऊन बसलात. उद्याच तिथं कारभार्याला सांगून जमीन बागायती करायला सांगतो. ट्रॅक्टर घेतला का होतं. ऊस लावायचा, आणि थेट लंडनच्या मार्केटमधी विकायचा! फक्त विहीर खणावा लागंल.
मामा :- म्हणजे येवढ्या दिवस विहीर पण नाहीय का? मग घरात पाणीबिणी?
मध्यस्थ :- ते आणायचे की खालच्या वाडीतून. पण आता काही गरज नाही. अगदी घरात पाणी येईल आता, फक्त नळजोडणी घ्यावा लागेल. कारभार्याला सांगितलं का…
म्हातारं :- तो कारभारी करतो काय नेमका असा? अन् दोन दिवसात असा काय जादू करणारे?
मध्यस्थ :- त्याचा आधी देशी दारूचं दुकान होतं, पण दोनेक वर्षाआधी धाड पडली, मग आता सहाएक महिन्यापासून वाळूच्या ट्रकवर जातो…
पोरीचा बाप :- मग् एव्हढं कसं करील?
मध्यस्थ :- सायेबाच्या जवळचा आहे तो. साहेबाचे फोन येत्या त्याला. मागं मुंबैत सभा झाली ना? तव्हा पाचपाचशे रुपडे देउन त्यानंच लोक निले होते सभेला ट्रकीतून! आतापण अयोध्येला जायचं म्हणतोय.
मामा :- हा, पण एव्हढं करणार कसं?
मध्यस्थ :- त्याला बाहेर जाऊन फोन फिरवला का पुढल्या पाच मिन्टात मंत्रालय हलवतो का नाही बघाच! साहेबाचा डावा हाते तो. सगळं तोच धुतो. भांड्यापासून…
पोरीचा बाप :- अशी कोणती जाहिरात पाह्यली तुम्ही?
मध्यस्थ :- ही काय ‘निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान!’ याच्यात नाही का त्या पोराला झटपट पीचडी मिळतीय, नळाला पाणी येतंय, शेतकर्याला सुखाचे दिवस येताय, नवीन उद्योगाला लोन मिळतंय….. आणखी काय पाह्यजेल?
म्हातारं :- पोरा, माकडाचं शेपूट कापून त्याचा माणूस होतं नाही…