महाराष्ट्रात खोकेबाज गद्दारांचे मिंधे सरकार स्थापन झाल्यापासून आसपासच्या राज्यांतले चिल्लरखुर्दा नेतेही संधी मिळेल तेव्हा महाराष्ट्राचा पाणउतारा करताना दिसत आहेत. इथले भाजपचे नेते मुळातच महाराष्ट्राला दिल्लीच्या दावणीला नेऊन बांधण्याच्या कामावरच नियुक्त झालेले आहेत आणि मिंधे सर्वार्थाने मिंधे आहेत- हे काय आवाज करणार, हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळेच, कर्नाटकातल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसकडून पराभव होण्याची शक्यता दाट असल्याने तिकडचे निष्प्रभ मुख्यमंत्री एस. आर. बोम्मई यांनी सीमाप्रश्नात तेल ओतणारी विधाने केली आणि सीमाभागात कानडी दडपशाहीचा नंगानाच करून दाखवला. आता गुजरातचे मराठी प्रदेशाध्यक्ष सी. आर. तथा चंद्रकांत पाटील यांनी जळगावात येऊन महाराष्ट्राबद्दल गरळ ओकले आहे. हे चंपा क्र. २ मराठी मातीत जन्माला आले आहेत, हे मात्र महाराष्ट्रासाठी खरोखरच लाजिरवाणे आहे.
कधीकाळी पोलिस कॉन्स्टेबल असलेले हे गृहस्थ अनेक खटपटी, लटपटी, उद्योग, उपक्रम करून, तुरुंगाची हवा खाऊन गुजरातेत सुरतेत जाऊन पोहोचले आणि तिथे त्यांचे नशीब फळफळले. तिथे मोदींनी काढलेल्या वॉशिंग पावडरच्या कारखान्याच्या सुरुवातीच्या लाभार्थींपैकी ते एक आहेत. तिथे धुवून निघाल्यामुळेच आज ते तिथले विक्रमी मतांनी निवडून येणारे खासदार आहेत आणि तिथले सगळे उद्योगधंदे त्यांचे अंकित आहेत. भारतीय जनता पक्षाचे गुजरात प्रदेशाध्यक्ष या नात्याने त्यांनी गुजरातची विधानसभा निवडणूक भाजपला जिंकून दिली, ही त्यांची मोठी कामगिरी मानली जाते. मात्र, त्याचवेळी त्यांच्या कन्येला जळगावात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पॅनेल निवडून आणता आले नव्हते, हेही विशेष.
हा ‘पात्र’परिचय करून देण्याचे कारण त्यांनी नुकतेच जळगावात एका खासगी कार्यक्रमात काही कारण नसताना तोडलेले तारे आणि झाडलेल्या दुगाण्या. भारताचे प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निधनाला आता ६० वर्षे होतील, तरी मोदी-शहांप्रमाणे या चंपा नं. २ यांची पिनही नेहरूंमध्येच अडकली आहे. यांना कोणत्या शिक्षणाच्या आधारावर कॉन्स्टेबलची नोकरी मिळाली होती, याची कल्पना नाही; कारण, पं. नेहरूंनी देशासाठी काहीही केले नाही, असे शाळेतही न गेलेल्याला शोभावेत असे उद्गार त्यांनी काढले आहेत. अर्थात, देशासाठी नेहरू-गांधी आणि काँग्रेस यांनी स्वातंत्र्यलढा उभारला होता, तेव्हा ब्रिटिशांची चाकरी आणि त्यांच्यासाठी गुप्तहेरगिरी करणार्या परिवारातल्या अर्धहळकुंडी नेत्यांना ही माहिती असण्याची शक्यता नाही. पाटील, तुमचे दिल्लीतले नेते ज्या संस्था, आस्थापना विकत सुटले आहेत, मित्रपरिवाराला आंदण देत आहेत, त्या सगळ्या नेहरूंनी सुरू केल्या होत्या बरे का! तुम्ही नेहरूंच्या योगदानाविषयी बोलणे म्हणजे चिलटाने हत्ती हा काही फार मोठा प्राणी नाही, असे म्हणण्याइतके खुळचटपणाचे आहे.
मग हे महोदय महाराष्ट्रावर घसरले. महाराष्ट्रात जातपातीचे राजकारण आहे, म्हणून महाराष्ट्र मागे पडला आहे, गुजरात नंबर वन झाला आहे, अशा जळगावी तुपाला लाजवणार्या लोणकढ्या थापा यांनी मारल्या. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आजही गुजरातच्या अर्थव्यवस्थेच्या अडीच पटींपेक्षा मोठी आहे आणि दरडोई उत्पन्नात पण महाराष्ट्रच अग्रेसर आहे. गुजरात खरोखरच नंबर वन असता आणि महाराष्ट्रात जातीयवादाचा बुजबुजाट असता, तर महाराष्ट्रात येऊन वसलेले गुर्जर बांधव बुलेट ट्रेन सुरू होण्याची वाट न पाहता कधीच आपल्या जातभेदमुक्त मायभूमीला परतले असते ना! तसे काही रिव्हर्स मायग्रेशन सुरू असल्याचे दिसत नाही. महाराष्ट्रात मराठी माणूस स्वीकारशील आहे, इथे सन्मानाने जगता येते, इथले जीवनमान गुजरातपेक्षा चांगले आहे, म्हणूनच महाराष्ट्रातील गुजराती बांधवांनी इथेच राहणे पसंत केले आहे, हे लक्षात घ्या पाटील.
गुजरातच्या प्रगतीचे २०१४ साली वाजवलेले ढोल किती पोकळ होते, हे नंतर वेळोवेळी उघड झाले आहे. काही मोजक्या शहरांमधले चकचकीत रस्ते आणि इकडून तिकडून पळवून नेलेल्या उद्योगांचा चमचमाट म्हणजे विकास नव्हे, प्रगती नव्हे. डोनाल्ड ट्रम्प यांना अहमदाबादच्या रस्त्यावरून प्रवास करताना गरीब वस्त्या दिसू नयेत म्हणून त्या कापडाने झाकल्या होत्या, ते विसरलात काय पाटील? कोरोनाकाळात तर गुजरातच्या प्रगतीचे पितळ आणखी उघडे पडले.
ऑक्सिजनअभावी हॉस्पिटलबाहेर तडफडणारे पेशंट आणि जागा मिळेल तिथे पेटवलेल्या चिता ही दृश्ये सगळ्या जगाने पाहिली. त्या काळात देशातल्या महाराष्ट्रात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सरकार होते आणि कोरोनाकाळात या सरकारने केलेल्या कामगिरीचे कौतुक आंतरराष्ट्रीय स्तरावर केले गेले होते. त्यावेळी तुम्ही स्वत: गुजरातेत केली तशी रेमेडिसिविर इंजेक्शनांची भुरटेगिरी करणारे कोण होते, याची माहिती घ्या महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्रावर लाथा झाडण्याच्या आधी.
पाटलांची ही सगळी मळमळ महाराष्ट्रात भाजपला कधीही पूर्ण बहुमत मिळालेले नाही आणि आता शिवसेनेत फोडाफोडी करण्याचा गलिच्छ उद्योग केल्यानंतर आधी होत्या तेवढ्याही जागा मिळण्याची शक्यता नाही, म्हणून बाहेर पडते आहे. महाराष्ट्रात जातीवाद आहे, याऐवजी गुजरातच्या पद्धतीने महाराष्ट्राला भाजपेयी भोंदुत्वाची प्रयोगशाळा बनवता येणार नाही, याची ही खदखद आहे. पाटील, या मातीतून तुमच्यासारखे काही गद्दार पैदा झाले असतील; पण ही माती देशाला दिशा देणार्या नेत्यांची, सुधारकांची, क्रांतिकारकांची भूमी आहे. तिला वैचारिकतेचा वारसा आहे. या मातीला राष्ट्रीयत्व हेच हिंदुत्व अशी मांडणी करणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाही वारसा लाभला आहे. शेंडीजानव्याचे, मंदिरात जाऊन घंटा बडवणारे तुमचे हिंदुत्व इथे खपणार नाही. तेव्हा हा सडका माल उचला आणि तुमच्या हुकमी बाजारपेठेत तो विकायला बसा! महाराष्ट्र पै-पाहुण्यांचे स्वागत करणारी आतिथ्यशीलता बाळगतो, त्याचप्रमाणे इथे येऊन तंगड्या वर करणार्यांना पिटाळायला प्रसंगी दगड उचलण्याचीही हिंमत ठेवतो, हे विसरू नका. महाराष्ट्राच्या मनोरंजनासाठी एक पाटील आहेत, ते पुरेसे आहेत.