शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षाचे चिन्ह मिंधे गटाला देण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या दावणीला बांधलेल्या निवडणूक आयोगाने जाहीर केला आणि महाराष्ट्रभर संतापाचा उद्रेक उसळला. शिवसेना हेच आमचे नाव, शिवसेनाप्रमुख हेच आमचे दैवत आणि मातोश्री हेच आमचे मंदिर अशी ज्यांची अजोड निष्ठा आहे, त्या सर्व वयोगटांतल्या शिवसैनिकांवर झालेला हा वङ्काप्रहार होता. मात्र, ज्यांनी शिवसेनेला आजवर कधीही मत दिलेले नाही, ज्यांची शिवसेनेच्या विचारांवर कधीही श्रद्धा नव्हती, असे असंख्य मराठीजनही ही बातमी ऐकल्यावर हळहळले आणि खवळले. महाशक्तीचे पगारी आणि बिनपगारी मेंदूगहाण भक्त आणि मेंदूचाही पत्ता नसलेले मिंध्यांचे मिंधे सोडले, तर या निर्णयाने कोणालाही आनंद झाला नाही, न्याय झाला, असे वाटले नाही.
निवडणूक हा हास्यास्पद निर्णय किती एकांगी आहे, त्यात ज्या सादिक अली प्रकरणाचा आधार घेतला आहे, तोही किती सोयीस्कर पद्धतीने अर्धवटच आधाराला घेतला आहे, ते याच अंकात ‘देशकाल’ या सदरातून समजावून घेता येईल. मुळात गद्दारांच्या अपात्रतेचा मुद्दा न्यायप्रविष्ट असताना निवडणूक आयोगाने ही कालाकांडी करण्याची गरजच नव्हती. वर ते करताना लोकप्रतिनिधींची संख्या हा निकष धरला आहे, त्यातही मिंध्यांच्या सोयीच्या सदनांतील संख्याच मोजली आहे. पक्ष म्हणजे निवडून आलेले लोकप्रतिनिधी असा घातक पायंडा या आयोगाने पाडला आणि तो उद्या सर्वोच्च न्यायालयानेही मान्य केला, तर भारतीय लोकशाहीची काय लक्तरे निघतील, याचा विचार करून पाहा. दोन पाचशे कोटी रुपये खर्च करून उद्या कोणी उद्योगपती ज्या पक्षाचा एकच आमदार, खासदार असेल, त्याला सहज खरेदी करून तो पक्ष त्याचा म्हणून दावा करतील, तो या निवाड्याप्रमाणे मान्य करावा लागेल, नाव, चिन्ह त्याला द्यावं लागेल. हे त्या त्या पक्षाच्या प्रमुखांना, कार्यकर्त्यांना चालेल का? काही बडे उद्योगपती सर्वोच्च नेत्यांनाच खिशात ठेवून असतात, उद्या ते डोईजड झाले तर अख्खा पक्षच (म्हणजे निवडून आलेले लोकप्रतिनिधी) दहा वीस हजार कोटी खर्च करून विकत घेणं आणि नंतर कोणाही मिंध्याला बाहुलं म्हणून सर्वोच्च पदावर बसवणं या उद्योगपतींना अशक्य आहे का? लाखो कोटी रुपयांचा नफा होणार असेल, तर ही गुंतवणूक किरकोळच म्हणायला हवी. भारतीय लोकशाहीवर भांडवलशाहीचा थेट कब्जा बसवण्याकडेच ही वाटचाल दिसते आहे.
आम्ही लोकांतून निवडून आलो आहोत, हे तोंड वर करून गद्दार बरळत आहेत, तर लोकांनी काय फक्त तुमची तोंडे पाहून मते दिली आहेत का? काय होती त्या तोंडांची किंमत? अनेक माकडांना माणूस बनवले ते शिवसेनाप्रमुखांनी टाकलेल्या विश्वासाने. जे काही मिळवलेत ते शिवसेनेच्या बळावर. आम्ही जनतेत असतो, लोकांची कामे करतो, म्हणून सांगता; उपकार करता का? राजकारणात आहात, तर तुम्हाला लोक निवडून कशासाठी देतात, त्यासाठीच ना? ज्याच्यापाशी कसलेही मोठे पद नाही, त्या पदाची प्रतिष्ठा नाही, त्याबरोबर येणार्या सुखसोयी नाहीत, मलिदा नाही, असा रस्त्यावरचा साधा शिवसैनिकही पोटासाठी वेगळा कामधंदा करून जनसेवा करतो, अहोरात्र लोकांमध्ये काम करतो, तो फक्त साहेबांचा आदेश म्हणून. तुम्ही सगळं खाऊन, ढेकर देऊन ढेर्यांवर हात फिरवून लोकांमध्ये कामे केल्याच्या गमजा मारता?
आम्हाला लोकांनी निवडून दिले आहे, आमच्या मागे लोकांचे पाठबळ आहे, या गद्दारांच्या गमजा निवडणूक आयोगाने ग्राह्य धरलेल्या आहेत. शिवसेनेत शिवसेनाप्रमुख किंवा शिवसेना पक्षप्रमुख ज्या दगडाला शेंदूर लावतात, तो दगड निवडून येतो; तिकीट आपल्याला मिळायला हवे होते, अशी ज्याची इच्छा असते, तो कार्यकर्ताही साहेबांचा आदेश शिरसावंद्य मानून ‘आपला’ उमेदवार निवडून आणण्यासाठी आकाश पाताळ एक करतो, अशा वेळी लोक खरोखरच गद्दारांच्या मागे उभे आहेत की नाहीत, हे तपासण्याचा एकमेव मार्ग म्हणजे निवडणुका. त्या घेतल्या तर लोक गद्दारांच्या मागे उभे आहेतच, पण त्यांना रौरव नरकाच्या खाईत कायमचे ढकलून देण्याकरता, हेच दिसून येईल, याची प्रत्येक गद्दाराला कल्पना आहे. म्हणूनच कोणतीही निवडणूक घेण्याचा धोका न पत्करता ही वरच्यावर सेटिंग करून फिरवाफिरव केली जाते आहे ती कशासाठी, कशाच्या भीतीने, हे न ओळखायला महाराष्ट्रातील जनता दुधखुळी आहे का? तीही तयारच बसलेली आहे एकेकाचा हिशोब करायला.
निवडणूक आयोग काहीही सांगो आणि उद्या सुप्रीम कोर्टातही काहीही निकाल लागो- कोट्यवधी शिवसैनिकांसाठी एकमेव शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच आहेत. ठाकरे आणि शिवसेना यांची फाटाफूट करून हे शिवधनुष्य उरावर घ्यायला निघालेले उताणे पडणार आहेत. उद्धव ठाकरे म्हणूनच अगदी पहिल्यापासून सांगत आहेत की शिवसेना नाव हिरावून घ्या, शिवसेनेचा धनुष्यबाण काढून घ्या आणि माझ्यासमोर या, समोरून लढा, मी हातात मशाल घेऊन लढायला सज्ज आहे. शिवसैनिकांच्या हातातच नव्हे तर मनामनांत पेटलेली धगधगती मशाल या चोराचिलटांना जाळायला आतूर झालेली आहेच.
शिवसैनिकांसाठी आणि मराठी जनतेसाठी पुढची लढाई बिलकुल सोपी नाही. शिवसेना पक्षप्रमुखांनी म्हणूनच स्पष्टपणे सांगितले आहे की भविष्यात पक्षाचे नाव देतानाही अशाच प्रकारे अडवणूक केली जाऊ शकते. मशाल हे चिन्ह लोकप्रिय होते आहे, शिवसैनिकांना ऊर्जा देते आहे, हे लक्षात आले की ते चिन्हही हिरावून घेण्याचे प्रयत्न होतील. कारण काहीही करून मुंबईला गुजरातची आणि दिल्लीची बटीक बनवून सुरतेच्या लुटीपासून संयुक्त महाराष्ट्रनिर्मितीपर्यंत सगळ्याचा सूड घ्यायचा आहे. त्यात महाराष्ट्रातले घरचे भेदी, अस्तनीतले निखारे साथ द्यायला सज्ज आहेतच. महाराष्ट्राला छत्रपती श्री शिवरायांच्या पराक्रमाचा जसा देदीप्यमान वारसा लाभलेला आहे, त्याचप्रमाणे सूर्याजी पिसाळांसारख्या गद्दार अवलादीही याच मातीत जन्माला आल्या आहेत.
आता सर्वोच्च न्यायालयात काय होईल, निवडणूक आयोगाचा निकाल स्थगित होईल का, गद्दार अपात्र ठरून हे बेकायदा सरकार अवैध ठरेल का, या सगळ्या न्यायालयीन लढाईच्या गोष्टी आहेत. त्या लढूच. पण, या सगळ्या न्यायालयांच्या वर एक न्यायालय आहे… ते आहे जनतेचे न्यायालय. तेच सर्वोच्च न्यायालयाच्याही वरचे सर्वोच्च न्यायालय आहे. फक्त गद्दारांना गाडण्याचीच नव्हे, तर देशाला, लोकशाहीला, संविधानाला उन्मत्त कमळासुरापासून वाचवण्याची ऐतिहासिक जबाबदारी महाराष्ट्राला पार पाडावी लागणार… दरवेळी, हिमालय शत्रूराष्ट्रांकडूनच संकटात येईल असे नाही; काही वेळा अंतर्गत शत्रूच त्याला पोखरायला निघतात, तेव्हाही सह्याद्रीच त्याच्या साह्याला धावणार आहे. सज्ज राहा.