या कार्निव्हलच्या चित्ररथासाठी तापमानामध्ये होणार्या अकल्पित बदलात तग धरू शकणारा मनुष्य वा प्राणी कसा असेल, या विचारावर विचारांचे दळण दळायला लागलो. प्रकाशाच्या वेगापेक्षाही वेगाने होणार्या तापमानीय बदलामुळे उत्तर ध्रुवावर वाळवंट तयार झाले तर अशा वातावरणात पर्यावरणाशी जुळवून घेण्यासाठी तेथील रहिवासी एस्किमो आणि पेंग्विनसारखे पाठीवर पाण्याची मदार घेऊन जन्माला येतील. त्यासाठी ‘उत्तर ध्रुव वितळतोय’ अशा घोषवाक्याची माझी कल्पना नीस कार्निव्हल २००५च्या परीक्षकांनी उचलून धरली.
—-
दुडदुडीत पाऊले, किलकिले डोळे, बोबडे शब्द बोलणार्या एकविसाव्या शतकाच्या बाललीलांचा आनंद घेण्यात विश्व तल्लीन असताना अचानक ग्लोबल वॉर्मिंग… ग्लोबल वॉर्मिंग… हे शब्द अवकाशात कल्लोळ माजवू लागले… कोणी म्हणू लागले, सूर्याभोवती असणार्या ओझोन वायूचा थर पातळ झाल्याने (जो सूर्यकिरणांची गाळणी करून पृथ्वीवर सोडतो) आग ओकणार्या सूर्यकिरणांनी वातावरण अतिउष्ण होईल व अवाढव्य हिमनग वितळतील… जगभर पुराचे थैमान माजेल, बर्फाच्छादित प्रदेशावर वाळवंटाचे डोंगर निर्माण होतील, समुद्रामध्ये अतिविराट त्सुनामी लाटा निर्माण होऊन त्या गावे-शहरे विक्राळ जबड्यात सामावून घेऊन फस्त करतील… त्या अतिऊष्ण किरणांनी प्राणीमात्रांना मरणयातना भोगाव्या लागतील… अशा भीतीदायक विचारांच्या काळ्याकुट्ट ढगांच्या छायेखाली लोक अस्तित्व टिकविण्यासाठी धडपडू लागले.
जगभर सगळीकडे चर्चासत्रे, सभा, प्रचारयंत्रणांचा वापर करून त्याचे धोके, घ्यावयाची काळजी व त्यातून सहीसलामत टिकून राहण्यासाठी लोकजागृती करण्यासाठी अनेक माध्यमांचा उपयोग होऊ लागला…
फ्रान्समधील नीस या गावी भरणार्या नीस कार्निव्हलसाठी हीच थीम घेण्यात आली २००४ साली. २००५च्या कार्निव्हलमध्ये चित्ररथ ‘पर्यावरणातले बदल आणि बिघाड’ या विषयावर आधारित चार संकल्पना, व्यंगचित्रांच्या माध्यमातून साकारण्यासाठी मला निमंत्रण मिळाले. साहजिकच या विषयावर व्यंगचित्रे साकारण्यासाठी माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. मी ज्या जाहिरातसंस्थेमध्ये नोकरी करत होतो, त्या ठिकाणी ग्लोबल वॉर्मिंगचे पूरक बाळकडू मिळाले.
ख्रिस्ती समुदायामधला ४० दिवसांचा लेंट हा उपवास करण्यापूर्वी नीस येथे हा मौजमजेचा कार्निव्हल आयोजित केला जातो. नीस टुरिझम, फ्रान्स ही संस्था हे कार्निव्हल आयोजित करते. ‘Karne levare’चा अर्थ आहे ‘मांस घेऊन जा’… म्हणजेच भरपूर, मनसोक्त खा, प्या आणि नाच-गात जीवनाचा आनंद लुटा. अशी ही लयलूट करण्यासाठी जगभरातून आलेले लाखो प्रवासी नीस कार्निव्हलमध्ये बेभान होतात आणि पुढच्या कार्निव्हलपर्यंत धमाल जीवन व्यतीत करण्यासाठी ऊर्जा घेऊन जातात.
या कार्निव्हलच्या चित्ररथासाठी तापमानामध्ये होणार्या अकल्पित बदलात तग धरू शकणारा मनुष्य वा प्राणी कसा असेल, हा विचार मनात पक्का करून त्यावर विचारांचे दळण दळायला लागलो. प्रकाशाच्या वेगापेक्षाही प्रचंड वेगाने होणार्या तापमानीय बदलामुळे उत्तर ध्रुवावर वाळवंट तयार झाले तर अशा वातावरणात पर्यावरणाशी जुळवून घेण्यासाठी तेथील रहिवासी एस्किमो आणि पेंग्विनसारखे पाठीवर पाण्याची मदार घेऊन जन्माला येतील. पेंग्विन तर अर्धा शरीराचा भाग उंटासारखा धारण करतील. त्यासाठी ‘उत्तर ध्रुव वितळतोय’ असे घोषवाक्य असलेली माझी कल्पना नीस कार्निव्हल २००५च्या परीक्षकांनी उचलून धरली. त्याच बरोबर तीन मुखवटेही त्याच विषयावर आकृतिबद्ध करून दिले.
१) जलप्रलयात मासे नष्ट होणार म्हणून माशाचे मोठ्ठे तोंड सांगाड्यासहित
२) पेंग्विनचा मुखवटा उंटाच्या कानासहित
३) आग ओकणारा सूर्य
अर्थातच कबूल केल्याप्रमाणे समाधान देणारे मानधनही मिळाले.
या कार्निव्हलमध्ये निवडलेल्या चित्रावरून अनेक प्रकारचे साहित्य वापरून भव्य त्रिमित चित्ररथ तयार केला जातो. आकार साधारण २५ मीटर, उंची २०/२२ मीटर. चित्ररथासाठी कोणते सामान/वस्तू वापरणार याची आगाऊ कल्पना दिली जाते. जर काही बदल करावयाचे असतील तर त्या-त्या व्यंगचित्रकाराला त्याची आगाऊ कल्पना दिली जाते. असे अचाट आकाराचे १६ चित्ररथ निवडण्यात आले १० देशांमधून. भारतामधून मी आणि दिल्लीच्या एका व्यंगचित्रकाराची निवड झाली.
फेब्रुवारी १२ ते २७पर्यंत देहभान विसरून या कार्निव्हलचा आनंद लुटायचा असतो. निमंत्रणानुसार नीसच्या भूमीवर आठ दिवसांसाठी पाय ठेवला. चकचकीत धुवून-पुसून ठेवल्यासारखे रसरशीत निळे आकाश, निळ्या रंगाच्या साम्राज्याला हुलकावणी देणारे पांढर्या ढगांचे पुंजके. छोट्या-छोट्या टेकड्यांवर गर्द हिरव्या रंगात वेढलेल्या पांढर्या स्वच्छ इमारती, बंगले इत्यादी. अशा या टुमदार शहराला भूमध्य सागराने कुशीत घेतलेले असून समुद्रकिनार्यावर वाळूचा लवलेशही नाही. संपूर्ण किनार्यावर छोट्या गुळगुळीत दगडांचा गालिचा पसरला आहे. निसर्गवेडे त्याच गालिच्यावर लोळून जीवनाचा आनंद द्विगुणित करीत असतात. घाणीचा स्पर्शही न झालेले हे श्रीमंत शहर आहे. त्या ठिकाणी कला-संस्कृती गुण्यागोविंदाने नांदत असून जगावर त्यांनी ठसा उमटविला आहे. नीसमधूनच जगाला १८ व्या शतकापासून ‘कार्निव्हल’ची ओळख झाली.
इथे जस-जसा सूर्य विश्रांती घ्यायला लुप्त होत जातो, तसतसे माणसांचे घोळके रंगीबेरंगी पोशाख लेवून गात-नाचत संगीताचा शरीराच्या रंध्रारंध्रातून आस्वाद घेत समुद्रकिनार्यावर कार्निव्हलमध्ये सामील होत जातात. विविध आकर्षक फुलांनी मढवलेले चित्ररथ, त्यावरून फुलांची उधळण करणार्या, दिलखेचक, कल्पक वेष धारण केलेल्या कमनीय ललना, व्यंगचित्रकारांनी तयार केलेल्या संकल्पनेवर आधारित आकर्षक, कलात्मक, भव्य, उत्कृष्ट, सृजनशीलतेचा परमोच्च आविष्कार दाखवणारे त्रिमित चित्ररथ. ते मुख्य मार्गाने रंगीबेरंगी फुलांच्या वर्षावातून मार्गक्रमण करतात. माझ्या व्यंगचित्रावर आधारित चित्ररथ (पोलार कॅप्स मेल्टिंग) समोर येताच आश्चर्यचकित होऊन क्षणभर स्तब्ध झालो आणि रक्त गोठवणार्या थंडीतही बँडच्या तालावर नाचत असलेल्या देखण्या, फॅन्सी वस्त्र ल्यालेल्या आप्रिâकन ललनांच्या बेभान शृंगारिक नृत्यावर माझीही पावले आपोआप ताल धरू लागली. कार्निव्हलमध्ये २०-२५ फुटांचे अजस्र प्राण्यांच्या आकाराचे बलून हवेत तरंगत होते. माझी अवस्था तशीच झाली. त्या शोभायात्रेत संगीताच्या तालावर आनंदोत्सव साजरा करणार्यांच्या अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या… उणे ५/६ अंश तापमान असतानाही… रंगांची उधळण, बेभान करणारे विश्वव्यापी संगीत, कला आणि संस्कृतीच्या अथांग सागरात कुटुंबासहित मनसोक्त डुंबणारे कार्निव्हलवेडे… जणू काही स्वप्नच!
उत्तर ध्रुव वितळतोय या व्यंगचित्राच्या मागे बरेच काही लपलेले… ते सहज गवसले… ग्रीक साम्राज्य असलेले नीस १९व्या शतकात युरोपियन राज्य झाले, साधारण परीघ ७२ कि.मी., जगप्रसिद्ध चित्रकार हेन्री मातीसची नवता व युरोपियन आधुनिक चित्रकलेचा प्रणेता मार्क शगालची आधुनिक चित्रशैली न्याहाळता आली. दुसर्या महायुद्धात धारातीर्थी पडलेल्या सैनिकांचे, डोंगरामध्ये पांढर्या खडकात कोरलेले, नजर खिळवून ठेवणारे स्मारक, जुन्या नीसमधील चित्रांचा बाजार, एका चित्रकर्तीने दिलेली चित्रांची भेट, छोट्या टेकडीवर गावरान पद्धतीने बांधलेल्या खोल्यांत विक्रीसाठी ठेवलेली चित्रे, शोभेच्या हस्तकला वस्तू, बोचर्या थंडीत त्या टेकडीवरून दिसणारा, अद्भुत जगात घेऊन जाणारा भूमध्य समुद्र, पाहुणचार म्हणून प्रâेंच सेव्हन कोर्स जेवणाची मेजवानी कधीही विसरू शकत नाही… उंच टेकडी, त्यावर छोट्या अरुंद गल्ल्या व त्यामध्ये दाटीवाटीने मांडलेली कलात्मक वस्तूंची दुकाने. खडबडीत भिंती, छप्पर कौलांचे. जणू काही लहान मुलांनी तयार केलेले खेडे. खालच्या बाजूस नयनरम्य, अथांग, विलोभनीय भूमध्य महासागर. असे हे नैसर्गिक ‘इझ’ आर्टिस्ट व्हिलेज. अचानक समाधानी, प्रेमळ ज्यांचा प्रवास मावळतीकडे वळलेल्या स्विस जोडण्याची आनंददायी क्षणिक भेट झाली. भारताबद्दलच्या ओढीबद्दल सांगताना त्या सहज बोलून गेल्या. आमची मुलगी आहे, जिने अहमदाबाद येथे राहणार्या भारतीयाशी लग्न केले. आमच्या नातीचे नाव आहे ‘निषाद’. आणि नीससारखेच दिसणारे, हिरवागार समुद्र असलेले ‘कान’ शहर पहाण्यासाठी जाताना रेल्वे स्टेशनवर भेटलेल्या इस्रायली बुजुर्गाचे उद्गार… ‘तुम्ही महात्मा गांधींच्या देशामधून आला आहात का?…’
(नीस कार्निव्हल २००७’साठीही व्यंगचित्राची निवड होण्याचा बहुमान मला दुसर्यांदा मिळाला.)