• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

त्या क्लिकची भीती अजून मनातून गेलेली नाही…

- घनश्याम भडेकर (शूटआऊट)

टीम मार्मिक by टीम मार्मिक
December 23, 2021
in शूटआऊट
0

त्यात आम्ही वृत्तपत्र छायाचित्रकार. सार्वजनिक ठिकाणी जे काही दिसेल त्याचा आम्ही बिनधास्त फोटो घेऊ शकतो, हीच आमची धारणा. गोव्यातली ही वेगळी बाजू म्हणून मी क्लिक केले. तिने पाहिले नाही, पण क्लिक केल्याचा आवाज आल्यावर ती दचकली. नो…नो… यू बास्टर्ड! यू हॅव नो राइट टू स्नॅप माय फोटोग्राफ विदाऊट परमिशन!’ ती रागावली, चिडून लालबुंद झाली, जागेवरून उठली आणि वाघिणीसारखी चवताळून माझा कॅमेरा हिसकावून घेऊ लागली.
—-

तरूणपणी उमेदीच्या काळात आपण सर्वच जण स्वप्नं पाहत असतो. चांगली नोकरी मग छोकरी, गाडी, बंगला. माझीही काही स्वप्नं होती. खूप कष्ट करून ती पूर्ण केली, तो भाग वेगळा; सांगायचा मुद्दा असा की ‘मनी वसे ते स्वप्नी दिसे’ असे म्हणतात. पण मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती ते माझ्या प्रत्यक्ष जीवनात घडलं. एक फॉरेनर तरुणी अंगावर कोणतेही वस्त्र नसताना माझ्या मागे धावत येते आणि तिला पाहून मी चक्क पळत सुटलोय… बावळट कुठला… ती थांब थांब म्हणते आणि मी जीव घेवून पळतोय…
१९८२ सालची ही घटना. आजही आठवली की पोट दुखेपर्यंत हसायला येते. तुम्हीही हसाल पुढे वाचल्यानंतर. आमदार शंकरराव कोल्हे यांचे ‘राजधानी’ नावाचे साप्ताहिक होते. कार्यकारी संपादक कविवर्य नरेंद्र बोडके आणि वितरक व्यवस्थापक सुरेंद्र तांबडे होते. गोवा संघप्रदेशावर कव्हरस्टोरी करण्याचे ठरले, ‘राजधानी’चा तो अंक खास गोवा विशेषांक म्हणून प्रसिद्ध होणार होता.
बोडके यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांच्याशी फोनवरून बोलणी केली. बोडके मूळचे गोव्याचे. गोव्यात त्यांचं सुंदर टुमदार घर आहे. गोव्यातील पत्रकार, राजकीय पुढारी यांच्याशी त्यांचे विशेष संबंध. गोव्यात कितीही मोठ्या हुद्द्यावर अधिकारी असला तरी त्याला अरे तुरे करण्याची पद्धत आहे. बोडकेही राणूचं सरकार असे म्हणायचे. अरे राणू, तुका खंय सांगू, अशा शब्दांत बोडके राणेंशी बोलताना सुरुवात करायचे…
आम्ही गोव्याला येणार असे समजल्यावर राणूंना खूप आनंद झाला. गोव्यातील निसर्ग, सरकारच्या नव्या योजना, पर्यटन इत्यादी गोष्टींवर भरपूर लिहिण्यासारखे आहे. तेव्हा अवश्य या असे राणूंनी प्रेमाचे निमंत्रण दिले. मी, बोडके आणि तावडे आठवडाभर मुक्काम करण्याच्या बेताने बॅगा भरून प्रवासाला निघालो. आम्ही तिघेही बडबडे आणि खुशालचेंडू. प्रवासात धमाल केली. गोव्यात पोहचल्यावर स्थानिक वर्तमानपत्राच्या एका ज्येष्ठ पत्रकाराला सोबत घेऊन आम्ही मुख्यमंत्री राणूंची भेट घेतली. दीड-दोन तास चर्चा झाली. त्यात गोव्याविषयी भरपूर माहिती मिळाली. `आता गोवा पाहून या’ असे म्हणून मुख्यमंत्र्यांनी प्रसिद्धी खात्याची अॅम्बॅसेडर कार आमच्या दिमतीला दिली. तिघांची सर्किट हाऊसमध्ये राहण्याची सोय केली. आम्ही मुख्यमंत्र्यांचे पाहुणे म्हटल्यावर काय विचारता? कशाचीही कमतरता नाही. ज्याची इच्छा व्यक्त कराल ते पुढ्यात हजर. खुल जा सिम सिम… जे पाहिजे ते मागवा आणि मनसोक्त चंगळ करा.
गोव्यातील चर्च, मंदिरे, व्यापार, उद्योगधंदे यांची माहिती आणि फोटो घेत आम्ही कलंगुट बीचवर येऊन पोहोचलो. नयनरम्य समुद्रकिनारा, नारळी-पोफळीची झाडे. दुपारची वेळ, समुद्रावर खळखळणार्‍या लाटा. शेकडो गोरेपान परदेशी पाहुणे नागडे उघडे किनार्योवर पहुडलेले. टुरिस्ट हॉस्टेलकडच्या बोळातून एक गौरांगना आली. तिला बहुधा `सन बाथ’ हवा असावा. अंगावरचा तोकडा झिरझिरीत झगा उतरवला, चेहर्‍यावर लज्जा-शरमेचा लवलेश नाही. तिने हळूहळू करून अंगावरची सर्वच वस्त्रे उतरवून बाजूला टाकली. अंतर्वस्त्रही काढून बाजूला सारलं. थंड्या व निर्विकार रीतीने तिने हातात कसलेसे पुस्तक घेतले आणि वाळूवर निवांत झोपी गेली.
इतक्यात एक कलिंगडविक्रेता आला. त्याच्याकडील कलिंगड तिने घेतले आणि उठून बसली. तो काळ अशा मोकळेपणाचा नव्हता. आम्ही कपडे घातलेले पत्रकार `मामा’ वाटायला लागलो. माझ्याकडे झूम लेन्स नव्हती, त्यामुळे कोणत्याही प्रसंगाचे मला जवळ जाऊन फोटो घ्यावे लागत असत. त्या काळात खासगीपणाचा अधिकार वगैरे कल्पनाही आपल्याकडे फार कुणाच्या परिचयाच्या नव्हत्या. त्यात आम्ही वृत्तपत्र छायाचित्रकार. सार्वजनिक ठिकाणी जे काही दिसेल त्याचा आम्ही बिनधास्त फोटो घेऊ शकतो, हीच आमची धारणा. गोव्यातली ही वेगळी बाजू म्हणून मी क्लिक केले. तिने पाहिले नाही, पण क्लिक केल्याचा आवाज आल्यावर ती दचकली. नो…नो… यू बास्टर्ड! यू हॅव नो राइट टू स्नॅप माय फोटोग्राफ विदाऊट परमिशन!’
ती रागावली, चिडून लालबुंद झाली, जागेवरून उठली आणि वाघिणीसारखी चवताळून माझा कॅमेरा हिसकावून घेऊ लागली. कॅमेरा घेऊन त्यातील रोल काढून समुद्रात फेकून देणार असे म्हणाली. आता मात्र माझी पाचावर धारण बसली. कारण तो काही डिजिटल फोटोग्राफीचा काळ नव्हता. तसा असता तर तिच्यासमोर तिचे फोटो डिलिट करता आले असते. इथे माझ्या
कॅमेर्‍यात मुख्यमंत्र्यांचे आणि इतरही महत्त्वाचे फोटो असतात. तिने खरोखरच कॅमेरा हिसकावून रोल काढून फेकला तर ते सगळे महत्त्वाचे फोटो नष्ट होणार. सगळ्या दौर्‍यातल्या मेहनतीवर पाणी पडणार. हे सगळं एका क्षणात आठवून मी पळण्याच्या बेतात होतो, पण ती माझी पाठ सोडायला तयार नाही. तिने माझा हात पकडला.
मोठा बांका प्रसंग माझ्यावर गुदरला. अशी कशी वेळ असे स्वप्नातही वाटलं नव्हतं. मी उसनं अवसान आणून म्हटलं, तू हात धर नाहीतर काहीही धर, पण कॅमेरा तुला देणार नाही. कॅमेरा माझा आहे. आणि फोटो काढण्याचा अधिकार माझा आहे. तुझ्या घरात येऊन तर मी फोटो काढले नाही ना? तुम्ही सार्वजनिक ठिकाणी असे वागता हा अपराध आहे. तुमच्या सर्वांवर, जे इथे सर्व उघडे नागडे झोपलेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. (गोवा हे राज्य या पर्यटकांकडून मिळणार्‍या उत्पन्नावर चालतं आणि तिथे युरोपातल्याप्रमाणे मनमोकळं वावरता येतं, म्हणूनच ते इथे येतात आणि इथे काही त्यांना कायद्याची मनाई नाही, हे तेव्हा लक्षात येण्यासारखी परिस्थिती कुठे होती?)
ती अजून खवळली. पोलीस! पोलीस! आक्रोश करू लागली.
मला वाटलं, एकवेळ पोलीस आले तर बरे होईल. त्यांना राणेंची ओळख सांगता येईल पण गर्दी नको जमायला. किनार्‍यावरील झोपड्यातून काही कोळी धावत तिच्या मदतीला आले. आता मार पडणार या भीतीने पाय लटपटायला लागले. हे कोळी पर्यटकांना मादक द्रव्ये पुरवत असत म्हणे त्या काळी. या पर्यटकांमुळे त्यांचा भरपूर धंदा व्हायचा. ते माझा कॅमेरा मागतात आणि मी बोडके आणि ताबडे यांच्याभोवती गोल गोल फिरून त्यांना चकवण्याचा प्रयत्न केला. बोडके गोव्याचे असल्यामुळे त्यांना स्थानिक भाषा उत्तम अवगत होती. ते त्यांच्या भाषेत समजूत घालत होते. तांबडे मुंबईचे, त्यांना गोव्याची भाषा येत नाही, पण मार वाचवण्यासाठी ते बोडके बोलत होते तसे बोलायला लागले, पण त्यांना नीटसं जमत नव्हतं. कोळ्यांनी तांबडेंचं सोंग ओळखलं आणि एकानं खडकन तांबडेंच्या कानाखाली मारली.
एका कोळ्याने माझे मनगट पकडले. दरडावून म्हणतो कसा, ही मुंबै नाय! तू गोव्यात आलायस. तुला वाळूत पुरुन टाकीन आणि मानगूट वर ठेऊन तोंडावर खेकडे सोडीन.
अरे बापरे! हे दहशतवाद्यांसारखे आपल्यावर अत्याचार करणार या भीतीने मी गर्भगळित झालो. मी त्याला मंगेशीची शपथ घातली. मारशील तर बघ! मंगेशची शपथ. ‘मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश’ गाणं आठवलं. पुढे बोडके मागे तांबडे. मी बचावाच्या पवित्र्यात. मध्येच उभा. बोबडेंनी मुख्यमंत्र्याचं व्हिजिटिंग कार्ड दाखवलं. राणेंच्या निमंत्रणावरून इथं आलो. आम्ही राणेंचे पाहुणे आहोत सांगितलं. राणेंच्या नावाचा आदर राखला गेला. मारायला आलेले कोळी संरक्षण देण्याची भाषा करू लागले. ते आपुलकीने बोलू लागले.
या बाईचा एक निग्रो उंच धिप्पाड मित्र आहे. तो इथेच कुठेतरी गेला असेल, तेव्हा तो येण्याअगोदरच तुम्ही पळ काढा, असे त्यांनी सांगितले. (मंगेश पावला तर) कोठून पळायचे तो मार्गही दाखवला. आम्ही एकमेकांना डोळे मारले. एक… दोन… तीन… शर्यतीत पळतात तसे आम्ही तिथेही भन्नाट पळत सुटलो. पळा पळा कोण पुढे पळे तो!
मला नेहमीच पळायची सवय आहे. पण कार्यकारी संपादक जीव घेऊन पळताना मी प्रथमच पाहात होतो. कळंगुट बीचचा किनारा फार मोठा मैल दोन मैल अंतर आम्ही धावतोच आहे. वाळूवर धावताना पाय सटकत होता. मी कॅमेर्‍याची बॅग तांबडेंच्या हातात दिली, जरा धरा म्हटलं आणि सर्वात पुढे पळत सुटलो!
भडेकर थांब! थांब भडेकर!
मला दम लागलाय. संपादक धापा टाकीत मागून ओरडत होते. त्यांच्या मागून जाडजूड व्यवस्थापक तांबडे वाळूमुळे पायात गोळे आल्याची विनवणी करून सांगत होते.
आमच्या तिघांच्या मागे एक विवस्त्र मुलगी रडत आरडाओरडा करत धावत येत आहे, हे दृष्य पाहून लोक आमच्याकडे संशयाने पाहू लागले. त्यांचा असा समज झाला असावा की या पर्यटक मुलीवर या तिघांनी अतिप्रसंग केला असावा आणि तिची कपड्याची, इतर मौल्यवान वस्तूंची बॅग घेऊन हे स्थानिक गुंड पळत असावेत.
गैरसमजुतीने किनार्‍यावरचे सर्वच लोक आम्हाला पकडायला धावू लागले. आता काही खैर नाही. आपण थांबलेच पाहिजे. आम्ही थांबलो. धापा टाकीत त्या सर्वांना हात जोडून विनंती केली की आम्ही पत्रकार आहोत. मुख्यमंत्र्यांचे पाहुणे आहोत. आम्ही पांढरपेशी सभ्य माणसं आहोत. आम्हाला आयाबहिणी आहेत.
उपस्थित विशाल जनसमुदायाला मी शरण गेलो. म्हटलं मी काहीही केलेले नाही, उलट या मुलीनेच माझा हात पकडला. मी एका कलिंगडवाल्याचा फोटो घेतला आणि हिला वाटले मी तिचा फोटो घेतला आहे.
गर्दीतून एकजण म्हणाला, जाऊ द्या हो. ती अशा अवस्थेत रडते आहे. ती मागते तर देऊन टाका कॅमेर्‍यातला रोल.
दुसरा इसम त्या मुलीला म्हणाला हे जास्तच शहाणे दिसतात. पत्रकार म्हणतात, मुख्यमंत्र्यांचे पाहुणे म्हणतात, मग मुख्यमंत्र्यांनी यांना बायकांचे अश्लील फोटो काढायला पाठवले आहे काय? सोक्षमोक्ष करा. यांना पोलिसांच्या ताब्यात द्या.
आम्हाला तेच हवे होते. द्या पोलिसांच्या ताब्यात, बोलवा पोलिसांना.
एकाने टॅक्सी बोलावली आणि टॅक्सीवाल्याला सांगितले यांना पोलीस ठाण्यात घेवून जा. पण ती मुलगी यायला तयार नाही. तिला कपडे पाहिजे होते आणि ती निग्रो मित्राची वाट पाहात होती. (त्या काळी मोबाईल नव्हता.)
बोडकेंनी कोंकणी भाषेत टॅक्सीवाल्याला पटवला, तोही चलाख निघाला. मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर चल म्हणाल्यावर त्याने तिला न घेताच गाडी स्टार्ट केली नि आमचा जीव भांड्यात पडला. टॅक्सीत मागे वळून पाहण्याची आमची हिंमत झाली नाही. कदाचित त्या निग्रो मित्राला घेऊन ती आजही ४० वर्षानंतरही आम्हाला कुठेतरी शोधत असेल ही भीती कायमची मनात घर करून राहिली आहे.

(दुर्दैवाने नरेंद्र बोडके साहेब, सुरेंद्र तांबडे साहेब आज हयात नाहीत. पाच-सहा वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. हा लेख मी त्यांच्या स्मृतीस अर्पण करून त्यांना वंदन करतो.)

Previous Post

फरक दोन काशींमधला…!

Next Post

उत्तर ध्रुव वितळतोय…

Next Post
उत्तर ध्रुव वितळतोय…

उत्तर ध्रुव वितळतोय...

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.