‘सत्याचे प्रयोग’मध्ये गांधीजींनी वर्णन केलेली काशी आणि पंतप्रधान मोदींनी उभे केलेले काशी विश्वनाथ कॉरिडॉर!
—
सोमवार १३ डिसेंबर २०२१चा पूर्ण दिवस हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसी मतदारसंघातील काशी विश्वनाथ कॉरिडोरच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी खर्च केला.
पंतप्रधानांनी गंगेत घेतलेली डुबकी आणि सायंकाळी गंगा आरतीला असलेली त्यांची उपस्थिती, हे सगळे कोट्यवधी भारतीयांनी दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून दिवसभर पाहिले.
काशी विश्वनाथ मंदिर परिसराचा हा नवा चेहरा मोहरा निश्चितच बघायला गेले पाहिजे, असे मला वाटून गेले. आपल्या मतदारसंघासाठी मोदी यांनी हे फार मोठे योगदान दिले आहे, यात शंका नाही. पण त्याच्या पाठीमागचा हेतू अगदी स्पष्ट आहे आणि तो म्हणजे येत्या दोन-तीन महिन्यात उत्तर प्रदेशात होणार्या विधानसभेच्या निवडणुका.
दिवसभर या सोहळ्यातील अनेक क्षण पाहताना मला गांधीजींच्या ‘सत्याचे प्रयोग’ या आत्मकथेची आठवण झाली आणि गांधीजींनी १९०२मध्ये काशी विश्वनाथ मंदिराला भेट दिल्यानंतर आपल्या या पुस्तकात काय लिहिले होते हे मुद्दाम नमूद करावेसे वाटले.
‘सत्याचे प्रयोग’ या आत्मकथेच्या तिसर्या खंडात काशीत, हे विसावे प्रकरण आहे आणि त्यात गांधीजींनी या विश्वनाथ मंदिराला जी भेट दिली त्याचे वर्णन आहे.
गांधीजी लिहितात- बारा एक वाजता स्नानादिक आटोपून मी काशी विश्वनाथाच्या दर्शनाला गेलो. त्याची स्थिती पाहून वाईट वाटले. मुंबईत १८९१ साली मी वकिली करत होतो. तेव्हा एकदा प्रार्थना समाजाच्या मंदिरामध्ये ‘काशीची यात्रा’ या विषयावर व्याख्यान ऐकले होते. त्यामुळे निराशेसाठी थोडीशी तयारी झालेली होती, पण निराशा झाली ती अपेक्षेपलीकडे.
गांधीजी पुढे लिहितात- गल्लीतून जायचे, अरुंद घसरड्या गल्लीतून जायचे, शांततेचे नाव नाही. माशांचा बुजबुजाट, वाटसरू आणि दुकानदारांचा गोंगाट, हे सर्व असह्य झाले. ज्या ठिकाणी मनुष्य ध्यान व भगवत चिंतन यांच्या अपेक्षा ठेवतो, तेथे यापैकी काहीच मिळत नाही. ध्यान पाहिजे असेल तर ते अंतरीच्या भावनेतून मिळवले पाहिजे. अशा भाविक स्त्रियाही मला दिसल्या की, ज्यांना सभोवार काय चालले आहे, याची गंधवार्ता नव्हती, ज्या केवळ स्वतःच्या ध्यानामध्ये मग्न होत्या. काशी विश्वनाथाच्या सभोवार शांत, निर्मळ, सुगंधित व स्वच्छ वातावरण निर्माण करणे हे व्यवस्थापकाचे कर्तव्य आहे. त्याऐवजी ज्यामध्ये लुच्चेगिरीची परमावधी झालेली आहे, अशा तर्हेची मिठाई व खेळण्याची दुकाने मला दिसली..
पुढे गांधीजी लिहितात- मंदिराशी जातो तो दरवाजापाशी कुजलेल्या फुलांची घाण सुटलेली. आत सुंदर संगमरवरी दगडाची फरसबंदी होती, ती कोणा अंधश्रद्धाळू इसमाने रुपये जडवून विच्छिन्न करून टाकली होती. आणि त्या रुपयांमध्ये मळ साचून राहिला होता.
ज्ञानवापीपाशी गेलो. तेथे मी ईश्वराला हुडकून काढण्याचा प्रयत्न केला; पण तो आढळेच ना! ज्ञानवापी जवळही घाण आढळली. त्यामुळे मनात खळबळ झाली होती.
गांधीजीनी पुढे सांगितले आहे की, या भेटीनंतर मी दोनदा काशी विश्वनाथला गेलो आहे, पण तो ‘महात्मा’ झाल्यानंतर. अर्थात मग १९०२चे अनुभव कुठे मिळणार? बाकी दुर्गंधी आणि गोंगाट मी तशीच अनुभवली.
आज या काशी विश्वनाथ परिसराचा जो कायाकल्प कॉरिडोर रूपाने आपल्याला पाहायला मिळाला, त्यामुळे खरोखर आश्चर्य वाटले.
मी स्वतः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वृत्तपत्रविद्या विभागाचा विद्यार्थी असताना ‘सकाळ’मध्ये इंटर्नशिप करणारा बातमीदार म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे वाराणसी येथील राष्ट्रीय अधिवेशन कव्हर करण्यासाठी गेलो होतो. तिथे तीन दिवसांच्या मुक्कामात मी काशी विश्वनाथ मंदिरात दर्शनाला गेलो. अरुंद अशा गल्लीतून वाट काढत विश्वनाथाच्या गाभार्यापाशी आलो आणि तिथे बेलाची पाने अर्पण करून, नमस्कार करून निघालो.
देशातील कोट्यवधींचे श्रद्धास्थान असलेल्या काशी विश्वनाथ मंदिरातील दुरवस्था मी १९७७च्या नोव्हेंबर महिन्यात पाहिली होती. त्यानंतर मला काशीला जाण्याचा योग आला नाही. पण आज या मंदिर परिसराचा जो कायाकल्प पंतप्रधान मोदी यांच्या पुढाकाराने झालेल्या बघितला, तो पाहून मात्र अक्षरशः थक्क झालो!
यानिमित्ताने ते दिवसभर मंदिरात, मठात आणि परिसरात वावरताना दिसत होते. अनेक मंदिरात ते आरती करत होते. संध्याकाळच्या गंगा आरतीमध्येही ते सहभागी झाले होते.
उत्तर प्रदेशात निवडणुका आता तोंडावर आल्या आहेत. पंतप्रधानांना त्यांचा धर्म असलेल्या धर्माचरणाबाबत कोणीही बोलू शकत नाही. पण कधीतरी या देशाच्या घटनात्मक प्रमुखांनी ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना राजधर्माचे पालन करा, असा संदेश दिला होता.
आज उत्तर प्रदेशातील हाथरसमधील पीडित मृत युवतीच्या घरातील लोकांना काय वाटले असेल? केंद्रातील गृहराज्यमंत्र्यांच्या बेलगाम चिरंजीवांनी ऑक्टोबर महिन्यात शेतकर्यांच्या मोर्चात गाडी घुसवून, हिंसाचार करून चार जणांचा बळी घेतला होता. त्या शेतकर्यांच्या कुटुंबात आज कोणती मानसिक आंदोलने असतील?
आज दिवसभर संसदेचे कामकाज सुरू होते. या संसदेच्या पायरीवर पंतप्रधान झाल्यानंतर मोदी यांनी तिथे प्रवेश करताना माथा टेकवला होता; त्याच संसदेत उपस्थित राहण्यासाठी त्यांना काही कष्ट पडतात का; असा असा प्रश्न कोणी विचारणार आहे का?
आज ‘बम बम भोले’ आणि ‘हर हर महादेव’ असा जयघोष करताना समोरचे भक्तगण, कॉरिडॉरचे काम करणारे शेकडो कर्मचारी, कामगार, भाजपशासित ११ राज्यांचे मुख्यमंत्री, काही केंद्रीय मंत्री आणि शेकडोंच्या संख्येने उपस्थित असलेले संत, महात्मा, साधू, बाबा हे सर्वजण विलक्षण भारावून गेले असणार.
भारतीय राज्यघटनेने भारतीय संघराज्य धर्मनिरपेक्ष ठरवले आहे आणि या राज्य संस्थेचा कार्यकारी प्रमुख पूर्ण दिवस धार्मिक कार्यात वेळ दवडतो, याबद्दल प्रश्न विचारण्याची कोणाचीच शामत नाही!
पंतप्रधानांनी आपल्या भाषणात देशातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या तीर्थक्षेत्र विकास योजनांच्या बाबतीत माहिती दिली. असा तीर्थक्षेत्रांचा विकास व्हायला पाहिजे त्यात शंकाच नाही. पण देशाच्या कार्यकारी प्रमुखाने त्यात लक्ष घालताना किती वेळ द्यायचा हा प्रश्न उपस्थित केला पाहिजे की नाही?
पंतप्रधानांच्या भाषणातील ३ संकल्प निश्चितच महत्त्वाचे आहेत. त्यातील पहिला स्वच्छतेचा, दुसरा सृजनतेचा किंवा इनोव्हेशनचा.आणि तिसरा हा आत्मनिर्भर भारताच्या उभारणीचा.
अशा अनेक संमिश्र गोष्टी आज दिवसभर पहात होतो, ऐकत होतो आणि मला पदोपदी भारताच्या पहिल्या पंतप्रधानांची आठवण येत होती. या देशातील परंपरा, संस्कृती यांचा गाढा अभ्यास असलेल्या पंडितजींनी १९५०च्या दशकात विकसनशील भारताच्या भविष्यासाठी काय आवश्यक आहे याचा एक अजेंडा आखून दिला होता आणि त्यानुसार सगळे जण काम करत होते.
पंतप्रधान मोदी हेही विकासाचा अजेंडा मांडत असतात. पण त्याचवेळी आपला धार्मिक प्रतिक असलेला चेहरा सतत समोर न दाखवता तसे मर्यादीत रूप त्यांना दाखवता येणे शक्य नव्हते का, असा प्रश्न निर्माण होतो. या देशातील कोणत्याही सुजाण नागरिकांच्या मनातील हे प्रश्न आहेत.
गांधीजींनी १९०२ साली काशी विश्वनाथ मंदिर बघितल्यावर जे टीका केली होती, त्यातील तथ्य लक्षात घेऊन, एक मोठा काशी विश्वनाथ कॉरिडोर पंतप्रधान मोदी यांनी साकार करून नक्कीच मोठी मजल मारली आहे…
तरीही काही प्रश्न उरतातच…
आज मोदींच्या विरोधात राजकीय आघाडी उभी करणारे, देशातील ज्येष्ठ नेते असे काही प्रश्न त्यांना विचारतील का, हा प्रश्न माझ्या मनात वारंवार डोकावतो. नव्या भव्य देखण्या काशी विश्वनाथ कॉरिडोरला भेट देण्यासाठी उत्तर प्रदेश निवडणूक काळात एक दौरा तिकडे करावा, असे मनात आहे. भोलेनाथ शंकराने त्यासाठी कृपा करावी, एवढीच मनोकामना व्यक्त करतो.
– अरुण खोरे संपादक: लोकशाहीसाठी समंजस संवाद, पुणे.
पूजापाठ करण्यात वेळ घालवणे परवडणारे नाही
रणजित देसाई यांच्या स्वामी कादंबरीत एक प्रसंग आहे.
थोरले माधवराव पेशवे यांनी पेशवाईची वस्त्रे सांभाळली. थोडे दिवसांनी न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे पेशव्यांना भेटायला त्यांच्या वाड्यावर गेले. पेशवे पूजा करीत होते.
रामशास्त्रींना बराच वेळ थांबावं लागलं. त्यांचा वेळ वाया गेला. अखेरीस साग्रसंगीत पूजा आटोपून पेशवे रामशास्त्रींना भेटले. तेव्हा रामशास्त्रींनी पेशव्यांना खडे बोल सुनावले, ‘श्रीमंत, आपण आता पेशवे आहात. राज्याच्या रक्षणाची जबाबदारी तुमची आहे. त्यामुळे तुम्ही आता ब्राह्मण नसून क्षत्रियधर्म स्वीकारला आहे. पूजापाठ करण्यात इतका वेळ घालवणे राज्याला परवडणारं नाही.’ पेशव्यांचे वय लहान होते. रामशास्त्री त्यांना पित्यासमान होते, म्हणून माधवरावांनी निमूटपणे ते ऐकलं आणि तसे आचरणही केले.
राजाच्या पूजापाठावरून आठवला किस्सा. असो.
बरीच वर्षे झाली वाचून. शब्द पुढेमागे झाले असतील तर सांभाळून घ्यावे.
– धीरज कुलकर्णी