सध्याच्या दगदगीच्या आणि धावपळीच्या जगात कामाच्या वेळा आणि स्वयंपाकासाठी हातात असणारा वेळ बघता बर्याचदा साग्रसंगीत स्वयंपाक करण्याऐवजी वन डिश मिलचा पर्याय रात्रीच्या जेवणात बर्याच घरांमध्ये वापरला जातो. भारतीय-पारंपारिक पदार्थांमध्ये वन डिश मिल म्हणून खाता येणारे अनेक पदार्थ असले तरी सगळी पोषणमूल्ये असणारे ‘वन डिश मिल’ पदार्थ तुलनेने कमीच आहेत. आपल्या रोजच्या जेवणात कर्बोदके (कार्बोहायड्रेट्स), प्रथिने (प्रोटिन्स), जीवनसत्त्वे (व्हिटॅमिन्स), तेल (फॅट) या सर्व घटकांचा समन्वय असणे गरजेचे आहे. एकाच अन्नपदार्थामधून हे सगळे घटक पुरेशा प्रमाणात मिळू शकणार्या अन्नपदार्थाला खर्या अर्थाने वन डिश मिल म्हणता येईल.
जीवनसत्वांसाठी भरपूर भाज्या, प्रथिनांसाठी अंडी/ चिकन/ मटण/ मासे/ पनीर/ कडधान्ये किंवा डाळी, कर्बोदकांसाठी धान्य किंवा धान्यापासून बनलेले घटक (भात, दलिया, पास्ता, नूडल्स, भाकरी, चपात्या इत्यादींपैकी एखादा पदार्थ) एकत्र शिजवून बनवायच्या वन डिश मिलमध्ये सगळ्यात सोपा पदार्थ म्हणून भाज्या आणि प्रथिने घातलेली वेगवेगळ्या प्रकारची खिचडी पहिल्यांदा आठवते. भाज्या घालून केलेली वरणफळे किंवा दाल-ढोकली हा पण असाच एक पूर्ण अन्न मानता येईल असा पदार्थ आहे.
पण जरा वेगळ्या चवीचे, सोपे, सहज करता येऊ शकतील अशा वन डिश मिलच्या प्रकारांचा विचार केल्यावर परदेशी पदार्थांमध्ये सूप सगळ्यात पहिल्यांदा आठवते. आपल्याला माहिती असणार्या आणि नेहमी खायला मिळणार्या सूपमध्ये बहुदा फक्त भाज्या किंवा चिकन/मटण हेच घटक असतात. त्यामुळे सूप पूर्णान्न कसे बनू शकेल असा प्रश्न पडू शकतो. नूडल्स सूप आणि पास्ता सूप हे सूपचे प्रकार पूर्णान्न म्हणून खाता येतात. यात नूड्ल्स किंवा पास्ता, भाज्या आणि अंडी/ चिकन किंवा इतर मांसाहारी पदार्थ किंवा तोफू/ पनीर /डाळी /कडधान्ये घातलेले असतात.
वेगवेगळ्या प्रकारचे नूडल्स किंवा पास्ता घातलेल्या सूपचे अनेक प्रकार जगभर प्रसिद्ध आहेत. आपल्याकडे उत्तर-पूर्वेकडच्या राज्यांमध्ये किंवा लडाखमध्ये किंवा नेपाळ आणि तिबेटमध्ये मिळणारा थुपका, व्हिएतनाममधला प्रसिद्ध फो, मलेशियन लाक्सा सूप, थायलंडमधले टॉम याम सूप, जपानमधले उडॉन नूडल्स सूप, कोरिया आणि जपानमध्ये मिळणारे रामेनचे प्रकार आणि सोबा नूडल सूप हे नूडल सूपचे काही प्रसिद्ध प्रकार आहेत. यामधल्या काही सूप्समध्ये नेहमी बाजारात मिळणारे मैद्याचे नूडल्स वापरले जातात, तर काहींमध्ये तांदळाचे, काही प्रकारांमध्ये गव्हाच्या पिठाचे किंवा कुट्टूच्या पिठाचे नूडल्स वापरले जातात. नूडल्स बनवण्यासाठी वापरलेले पीठ, नूडल्सचा आकार (गोल, चपटे, बारिक, जाड) आणि त्या सूपमध्ये वापरलेले इतर घटक यावरून नूडल्स सूपचे वेगवेगळे अनेक प्रकार केले जातात. बर्याचवेळा विकत नूडल्स न आणता अंडी आणि पीठ एकत्र मळून हाताने शेवयांप्रमाणे ताजे नूडल्स घरी बनवून सूप केले जाते.
बहुतेक सगळ्याच नूडल सूपचा बेस म्हणून व्हेजिटेबल स्टॉक किंवा चिकन/ मटण स्टॉक वापरला जातो. वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या भाज्या आणि मसाल्याचे पदार्थ वापरून हा स्टॉक बनवतात. बाजारात या स्टॉकची पावडरसुद्धा विकत मिळते. पण बाजारातून अशी स्टॉकची पावडर विकत घेताना त्यातले घटक पदार्थ वाचून घ्यावेत. बर्याचवेळा बाजारातल्या स्टॉकमध्ये मिठाचे प्रमाण जास्त असते. काही वेळा यात उमामी चव यावी म्हणून जास्त प्रमाणात एमएसजी वापरले जाते.
नूडल सूपप्रमाणेच इटालियन पास्ताचे वेगवेगळे प्रकार वापरून पास्ता सूपही केले जाते. लसानिया पास्ता, सॉसेजेस, पालक आणि चीझ घालून केलेला इटालियन वेडिंग लसानिया सूप, छोट्या ट्युबसारखा पास्ता, राजमा आणि टॉमॅटो वापरून केलेले सूप, चिकन सूपमध्ये तांदळाच्या आकाराचा छोटासा पास्ता आणि वेगवेगळ्या भाज्या घालून केलेले पास्ता सूप, पालक, चीज आणि अंडी घालून बनवलेले पास्ता सूप, वेगवेगळ्या भाज्या आणि बीन्स (राजमा/ चवळी किंवा त्या प्रकारचे इतर बीन्सचे प्रकार) किंवा छोले किंवा डाळी वापरून केलेले पास्ता घातलेले सूप असे वेगवेगळ्या चवींचे पास्ता सूप बनवले जाते. पास्त्याचा प्रकार, त्यात घातलेल्या प्रथिनाचा प्रकार (डाळ की कडधान्य की चिकन/ मटण किंवा इतर मांसाहारी पदार्थ) आणि वापरलेले भाज्यांचे प्रकार यावरून पास्ता सूपचे वेगवेगळे प्रकार ठरतात. बर्याच वेळा ताज्या नूडल्ससारखाच ताजा पास्तासुद्धा बनवून सूप केले जाते.
व्हेजिटेबल राईस नूडल सूप
साहित्य : एक इंच आल्याचा तुकडा, ४-५ लसूण पाकळ्या, एक छोटा कांदा, एक छोटे गाजर, मूठभर बीन्स, ५-६ बेबी कॉर्न, ४-५ मशरूम, मूठभर पालकाची पाने, कांद्याची पात, २०० ग्रॅम पनीर किंवा टोफू, १ चमचा सोया सॉस, अर्धा चमचा चिली सॉस/ हॉट सॉस (ऐच्छिक), अर्धा चमचा ताहिनी, दीड ग्लास व्हेजिटेबल स्टॉक, थोड्या फ्लॅट राईस नूडल्स (२-३ मिमी), चवीप्रमाणे मिरेपूड, मीठ आणि तिखट, तिळाचे तेल, चिली ऑइल (ऐच्छिक), अर्धे लिंबू (ऐच्छिक).
कृती : थोड्या तेलावर बारीक चिरलेले आले-लसूण आणि उभा चिरलेला कांदा परतावा. त्यात गाजराच्या गोल चकत्या, बेबी कॉर्नच्या चकत्या, बीन्स आणि मशरूमचे तुकडे घालून थोडे परतावे. नंतर यात व्हेजिटेबल स्टॉक घालावा. सूप उकळत आल्यावर त्यात अर्धा चमचा ताहिनी, चमचाभर सोया सॉस आणि हवा असल्यास चिली सॉस किंवा हॉट सॉस घालावा. चवीप्रमाणे मिरेपूड, तिखट आणि मीठ घालावे. सूप उकळत असतानाच यात पालकाची पाने हाताने तोडून घालावी. यानंतर यात पनीर किंवा टोफूचे तुकडे घालावे व लिंबू पिळून घ्यावे. सूप बनत असतानाच दुसर्या भांड्यात गरम पाण्यामध्ये राईस नूडल्स १०-१५ मिनिटे (किंवा पाकिटावर दिलेल्या सूचनेनुसार) भिजत ठेवाव्या. राईस नूडल्सना पास्ताप्रमाणे शिजवून घ्यावे लागत नाही.
सूप वाढून घेताना आपापल्या बाऊलमध्ये आधी हव्या तितक्या राईस नूडल्स घालाव्यात. त्यावर सूप ओतावे आणि कांद्याची पात व चिली ऑइल घालून गार्निश करावे.
या सूपसाठी व्हेजिटेबल स्टॉक बनवण्यासाठी थोडी मुळ्याची पाने व मुळ्याचा पाठीमागचा छोटा तुकडा, फ्लॉवरचे देठ आणि पाने, थोडासा पत्ता कोबी, थोड्या बीन्स, एक आल्याचा तुकडा, एक तमालपत्र, ३-४ मिर्याचे दाणे, कोथिंबीरीचे देठ किंवा कोथिंबीर पाणी घालून कुकरमध्ये एक शिट्टी येईपर्यंत शिजवून घ्यावे. यात किंचित मीठ घालावे आणि हा स्टॉक गाळून घ्यावा. घरात स्टॉक नसेल तर बाजारात मिळणारी स्टॉकची पावडर आणि पाणी वापरले किंवा स्टॉकऐवजी नुसते पाणी वापरले तरी चालू शकेल, फक्त त्यानुसार चवीत फरक जाणवेल.
हिरवी-लाल आणि पिवळी शिमला मिरची, बॉक चॉय, पत्ता कोबी, स्वीट कॉर्न, ब्रोकली या भाज्यासुद्धा या सूपमध्ये वापरता येऊ शकतात.
बदल म्हणून हवे असल्यास तोफू किंवा पनीरऐवजी वाफवलेल्या चिकनचे तुकडे, उकडलेले अंडे या सूपमध्ये घालता येईल. अंडे घालायचे असल्यास आधीच सूपमध्ये न घालता शेवटी बाऊलमध्ये घालून घ्यावे.
मिनस्ट्रोनी सूप
साहित्य : १ मोठी वाटी शिजवलेला पास्ता (या सूपसाठी छोट्या आकाराचा मॅकरोनी पास्ता), दीड वाटी शिजवलेला राजमा, १ मोठा कांदा, १ मध्यम आकाराचे गाजर, १ छोटा बटाटा, १ वाटी चिरलेल्या इतर भाज्या (झुकिनी, बीन्स, मटर, पिवळा छोटा भोपळा, हवे असल्यास थोडा पालक, पत्ता कोबी, फ्लॉवर, मशरूम, बेबी कॉर्न यापैकी ज्या हव्या त्या भाज्या घेता येतील), १-२ सेलरीचे दांडे, ३-४ लसणाच्या पाकळ्या, ३ मोठे टॉमॅटो, १ तमालपत्र, १ चमचा ऑरगॅनो, १ चमचा चिली फ्लेक्स, मूठभर बेसिलची पाने, ३-४ वाट्या व्हेजिटेबल स्टॉक किंवा पाणी, थोडे ऑलिव्ह ऑइल, चवीप्रमाणे मीठ आणि मिरेपूड.
कृती : कांदा आणि लसूण बारीक चिरून घ्यावा. गाजर आणि बटाट्याचे मध्यम आकाराचे तुकडे करून ठेवावे. सेलरी बारीक चिरून घ्यावी. टॉमॅटो उकळून त्याची ओबडधोबड प्युरी करून घ्यावी. अगदी मऊ प्युरी या सूपमध्ये तितकीशी चांगली लागत नाही. बाकीच्या हव्या त्या भाज्या चिरून घ्याव्यात. यातल्या सगळ्याच भाज्या लवकर शिजणार्या असल्याने खूप बारीक चिरायची गरज नाही.
एका जाड बुडाच्या मोठ्या भांड्यात (सॉसपॅनमध्ये) थोड्या तेलावर तमालपत्र, कांदा, लसूण आणि सेलेरी २-३ मिनिटे परतावी. यानंतर यात गाजर, बटाटा आणि इतर भाज्या घालून ५-६ मिनिटे अधूनमधून परतत भाज्या शिजू द्याव्या. यानंतर टॉमॅटो प्युरी, ऑरगॅनो आणि मिरेपूड, चिली फ्लेक्स व मीठ घालून परतावे. आता यात व्हेजिटेबल स्टॉक किंवा पाणी घालून सूप उकळू द्यावे. भाज्या शिजत आल्यावर यात शिजवलेला राजमा घालावा. राजमा घातल्यावर सूपला एक-दोन मिनिटे उकळू द्यावे आणि नंतर त्यात शिजवलेला पास्ता घालावा. पास्ता घातल्यावर सूप व्यवस्थित मिक्स करून अर्धा-एक मिनिट उकळू द्यावे. पास्ता जास्त शिजू द्यायचा नाही. यानंतर यात चिरलेली बेसिलची पाने घालून सूप सर्व्ह करावे.
या सूपमध्ये सर्व्ह करताना हवे असल्यास पार्मेजान चीज घालता येते. या सूपमध्ये शक्यतो पांढर्या रंगाचा राजमा किंवा राजमासदृष्य बीन्स घातले जातात. आपल्याकडे पांढरा राजमा सहजासहजी मिळत नसल्याने त्याएवजी शक्यतो हलक्या गुलाबी/ फिक्क्या रंगाचा (चित्रा राजमा नावाने ओळखला जाणारा), मोठे दाणे असलेला राजमा घ्यावा.