एकशे पाच बहाद्दर मुंबई/महाराष्ट्र प्रेमींनी आपल्या प्राणांची ‘आहुती’ दिली आणि १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी झाली, परंतु दीडशे वर्षे राज्य केलेल्या ब्रिटिशांच्या पाऊलखुणा तशाच होत्या. सात बेटांची मुंबई, आगरी कोळ्यांची मुंबई, भूमिपुत्रांची मुंबई, मुंबादेवी ही देवता असलेली मुंबई, गिरणी कामगारांच्या घामातून, त्यांच्या श्रमातून उभी राहिलेली मुंबई ही ‘बॉम्बे’ म्हणून परिचित होती. या ब्रिटिशांच्या पाऊलखुणा पुसायचे भगीरथ कार्य करण्यासाठीच जणू हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला जन्म दिला. मुंबई महाराष्ट्राची राजधानी झाली असली, तरी मुंबईत महाराष्ट्र दिसत नव्हता. म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी साप्ताहिक मार्मिकमधून मराठी माणसांवरच्या अन्यायाला वाचा फोडली आणि १३ ऑगस्ट १९६० रोजी १९ जून १९६६ रोजी मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेना स्थापन केली. ३० ऑक्टोबर १९६६ रोजी दादरच्या शिवतीर्थावर शिवसेनेचा पहिला दणदणीत दसरा मेळावा झाला. अरबी समुद्राला लाजवील अशा लाखोंच्या जनसागराच्या साक्षीने झालेल्या विराट सभेने शिवसेनेने मुंबईत पाय रोवायला सुरुवात केली.
मजल दरमजल करीत शिवसेनेने मुंबई, ठाणे कवेत घेत महाराष्ट्र पादाक्रांत करण्यासाठी घोडदौड सुरू केली. मुंबई महानगरपालिका ताब्यांत घेतली आणि १९८५ साली माझगांवचे शिवसेनेचे झुंझार नगरसेवक छगन चंद्रकांत भुजबळ यांच्या गळ्यात शिवसेनाप्रमुखांनी महापौरपदाची माळ घातली. त्यावेळी नगरसेवक विधानसभेत सदस्य होऊ शकत होता, म्हणून १९८५ साली महापौर असलेले छगन भुजबळ हे माझगांवचे आमदार सुद्धा झाले. मनोहर जोशी, सुधीर जोशी आणि प्रमोद नवलकर हे शिवसेना नेते विधान परिषदेचे सदस्य होते, तर विधानसभेत शिवसेनेचे एकमेव आमदार छगन भुजबळ होते.
शिवसेनेच्या दृष्टीने ‘बॉम्बे’चे ‘मुंबई’ आणि मराठी राज्यभाषा ही अस्मिता आणि स्वाभिमानाची बाब होती, आहे आणि राहील. मुंबईत सत्ता शिवसेनेची असतांना महापौर छगन भुजबळ यांनी ४ मे रोजी हुतात्मा चौक येथे मुंबईचा फलक झळकावून शिवसेनेची वाटचाल अधोरेखित केली. अवघ्या तेहतीस दिवसांत छगन भुजबळ यांनी उद्यानशिल्प उभे केले. १९८९च्या सुमारास भारतीय जनता पक्षाचे नेते प्रमोद महाजन यांच्याबरोबर चर्चा करून शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्वाच्या आधारावर शिवसेना-भाजप युती घडवून आणली. १९९० साली विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला ५२ आणि भारतीय जनता पक्षाला ४२ जागा मिळाल्या. युतीच्या हाती सत्ता येतायेता राहिली. पण बाळासाहेबांच्या झंझावाती प्रचाराने ही कसर भरून काढीत १९९५ साली शिवसेना-भाजप युतीची सत्ता स्थापन करण्यात यश मिळविले. ज्याचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री या सूत्राप्रमाणे १४ मार्च १९९५ रोजी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर गजानन जोशी यांना दादरच्या शिवतीर्थावर मुख्यमंत्री म्हणून राज्यपाल पी. सी. अलेक्झांडर यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ पांडुरंग मुंडे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. देवदुर्लभ सोहळ्यात शिवशाही सरकार महाराष्ट्रात अधिकारारुढ झाले.
मनोहर जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत ‘बॉम्बे’चे ‘मुंबई’ नामांतर करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात ‘बॉम्बे’चे ‘मुंबई’ करण्याबरोबरच औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव हेही ठराव मंजूर करण्यात आले. वि. वा. शिरवाडकर म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके कुसुमाग्रज यांनी मराठी ही राज्यभाषा सोनेरी मुकुट लेवून फाटक्या वस्त्रानिशी मंत्रालयाच्या पायथ्याशी उभी आहे, अशी कविता लिहिली होती. त्यात सहाव्या मजल्यावर मराठी भाषेची प्रतिष्ठापना होईल ही अपेक्षा होती. या, मंत्रालयाच्या पायथ्याशी उभ्या असलेल्या मराठी भाषेला भरजरी वस्त्रे परिधान करून तिची सन्मानाने प्रतिष्ठापना करण्याचे महत्कार्य, पवित्र कर्तव्य शिवशाही सरकारने केले.
आजपर्यंत मराठी भाषेत कामकाज करण्यासाठी मंत्रालयाचे सनदी अधिकारी सतत चालढकल करीत होते. परंतु मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी १ मे १९९५पासून मंत्रालयाचे कामकाज मराठी भाषेतच करण्यात यावे, असा सुस्पष्ट आदेशच काढला. १९६० सालापासून मराठी ही कामकाजाची भाषा करण्याबाबत अनेक शासन निर्णय निघाले होते. परंतु सनदी अधिकार्यांनी त्यात घातलेला कोलदांडा मनोहर जोशी यांनी शिवसेनेच्या पद्धतीने दूर केला. मराठी भाषा सन्मानाने प्रतिष्ठापित झाली. ‘बॉम्बे’चे ‘मुंबई’ आणि मराठी ही राज्यभाषा अस्तित्वात आणण्याचे भगीरथ कार्य शिवसेनेनेच केले. शिवसेनाप्रमुखांच्या आदेशानुसार महापौर छगन भुजबळ यांनी रचिला पाया आणि मनोहर जोशी झालेसे कळस, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी मराठी भाषेचा हा भगवा झेंडा मंत्रालय आणि विधानभवनावर फडकविण्यासाठी भुजबळ, जोशी यांचा वारसा पुढे चालविला. मंत्रालयाला त्यांनी हुतात्मा राजगुरू चौक आणि मादाम कामा मार्ग हा हक्काचा पत्ता मिळवून दिला. मंत्रालय आणि विधानभवनात मराठी भाषेच्या पाऊलखुणा उमटविल्या.
कुणी कितीही म्हणत असले तरी मुंबई आणि मराठी यांना सन्मान मिळवून देण्याचे श्रेय निश्चित शिवसेनेलाच आहे. जय महाराष्ट्र!
मो. ९८९२९३५३२१