□ विद्यार्थ्यांची गृहपाठातून सुटका करण्याचा राज्य सरकारचा विचार.
■ त्यांना शिक्षणातूनच मुक्त करा लवकरात लवकर… नाहीतरी त्यांच्यासाठी दहीहंड्या फोडायचं आणि डीजे वाजवून नाचायचंच काम राहणार आहे तुमच्या राज्यात.
□ दिवाळीत अख्ख्या मुंबईला लायटिंग करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
■ एवढा खर्च करण्यापेक्षा तुम्ही मंत्रालयाच्या टेरेसवर उभे राहा… सगळी मुंबई तुमच्या दिव्य तेजाने आपोआप उजळून जाईल.
□ सोमय्याच्या पार्टनरच्या जमिनीतून जाणार बुलेट ट्रेन!
■ बुलेट ट्रेन गुजरातच्या सोयीची, ती महाराष्ट्रातही जाणार गुजरात्यांनी विकत घेतलेल्या जमिनीतून!
□ सरकार नव्हे, सर्कस सुरू आहे : आदित्य ठाकरे यांची टीका.
■ तीही फक्त विदूषकांची!
□ आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या व्यायामशाळेला ठाणे महापालिकेचे सील.
■ हवी कशाला व्यायामशाळा? फक्त दिल्ली आणि गुजरातपुढे माना डोलावण्याचाच तर व्यायाम करायचा आहे यापुढे.
□ भ्रष्टाचार्यांना मतदान करू नका : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
■ निदान तो भारतीय जनता पक्षाचा उमेदवार आहे, याची खात्री तरी करा… नंतर त्याच्यामागे ईडी लावून, वॉशिंग मशीनमध्ये धुवून भाजपमध्ये आणताना बरेच कष्ट पडतात!
□ वेदांताकडून महाविकास आघाडी सरकारने लाच मागितली होती का? : आशिष शेलार यांचा सवाल.
■ प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या काळात गुजरातला गेला की ईडी सरकारच्या काळात? : शेलारांना राज्यातल्या जनतेचा सवाल
□ मंत्रिपद मिळूनही कारभार सुरू नाही, असे हे अजब सरकार : धनंजय मुंडे यांचा टोला.
■ सगळा खेळ औटघटकेचा आहे, याची खोकेबाजांना कल्पना आहे… हसं तरी किती करून घेतील?
□ सरकार बदलताच वेदांताचा प्रकल्प गुजरातला कसा गेला? : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सवाल.
■ वेदांताचा प्रकल्प पळवण्यासाठीच काही खोके खर्च करून महाविकास आघाडी सरकार पाडले गेले असण्याचीच शक्यता अधिक आहे, उद्धवसाहेब!
□ ‘धर्मवीर’ची कमाल लोकांनी पाहिली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
■ …आणि आता गोळीबार, दमबाजी आणि रावडी डॅन्स करणारे गद्दार आणि उत्सवमूर्ती मुख्यमंत्री पाहून बिचारे आपल्या कर्माला दोष देत आहेत.
□ आधीचे सरकार १० टक्के लाचवाले : देवेंद्र फडणवीस.
■ त्याच सरकारमध्ये सगळ्यात महत्त्वाच्या खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे होते ना हो फडणवीस साहेब! त्याच्या आधीच्या, तुमच्याच सरकारमध्येही ते होतेच की! एखादा टक्का तरी ‘लाज’ बाळगायला हरकत नाही.
□ स्मार्ट कल्याण-डोंबिवलीच्या दर्शनाने केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर संतापले.
■ जरा भाजपशासित राज्यांमधल्या स्मार्ट शहरांचीही अवस्था पाहा ठाकूर साहेब, राग पण येईल आणि लाज पण वाटेल.
□ कोरोना काळात मोदी सरकारच्या दुर्लक्षामुळे ऑक्सिजनअभावी मृतांची संख्या वाढली : संसदीय समितीचा ठपका.
■ मेले ते गेले, आपण महाराजांच्या वाढदिवसाला आलेले चित्ते पाहून हरखून जाऊ या!