मी स्वत: तत्त्वज्ञान विषयाचा सखोल अभ्यास केला आहे. चार वर्षे काशी नगरीत अध्ययन केलेले आहे. ह्या आधुनिक काळात असे विषय मला देखील अचंबित करतात. मी देखील ह्या कथा, राजघराण्याचे कागद हे सगळे एक भाकडकथा समजत होतो. पण तुम्हाला सांगतो, त्या दैत्याला मी स्वत:च्या डोळ्याने पाहिले आहे हो. त्याला प्रत्यक्ष समोर पाहिले आणि माझा सगळा दंभ, अभ्यास कुठल्या कुठे पळाला…’ बोलता बोलता बुवांनी सारंगसमोर ठेवलेला पाण्याच्या ग्लास स्वत:च भसकन रिकामा केला.
– – –
बाहेर मस्त पाऊस कोसळत होता आणि सारंग रजईच्या उबेचा आनंद घेत मस्त लोळत पडला होता. आज बरेच दिवसांनी त्याला असा निवांतपणा मिळाला होता. शक्य झाले आणि निद्रादेवीने आशीर्वाद दिले तर पुन्हा तासभर तरी गाढ झोपावे असे त्याचे मन त्याला सांगत होते. पण निद्रादेवीचा अनुग्रह बहुदा त्याच्या नशिबी नसावा. सारंगने पुन्हा एकदा रजई अंगावर गुरफटली आणि त्याचवेळी दारावरची बेल कर्कशपणे केकाटली. इतक्या पावसाचे कोण आता बोंबलत आले असावे असा विचार करत सारंगने रजई भिरकावली आणि सपाता पायात ढकलत तो दरवाजा उघडायला गेला. अर्धवट झोपेत त्याने दरवाजा उघडला आणि तो पाहतच राहिला. दरवाज्यात एक अप्रतिम लावण्यवती उभी होती. नजर हटवू नये असे त्याला वाटत असतानाच, तिच्या शेजारी उभा असलेला गृहस्थ खाकरला आणि सारंग भानावर आला.
‘सारंग दर्यावर्दी आहेत का?’
‘आहेत ना.. या आत या..’ त्यांना जागा करून देत तो आता सरकला.
‘त्यांना जरा बोलावता का? आमचे खूप महत्त्वाचे काम आहे त्यांच्याकडे,’ लावण्यवतीचा आवाज तिच्या रूपाला साजेल असाच मधुर होता.
‘त्यांना बोलावण्याची आवश्यकता नाही,’ सारंग मिश्किलपणे म्हणाला.
‘म्हणजे?’ लावण्यवतीने पापण्यांची मनमोहक फडफड करत विचारले.
‘कारण ते तुमच्यासमोरच उभे आहेत,’ सारंग पुन्हा मिश्किलपणे म्हणाला आणि समोरचे दोघेही त्याच्याकडे आश्चर्याने पाहत राहिले. भल्याभल्या गुन्हेगारांना घाम फोडणारा प्रसिद्ध गुप्तहेर सारंग दर्यावर्दी म्हणजे कोणी ४०-४५ वर्षाचा, चष्मा लावणारा बेरकी गृहस्थ असणार, अशी बहुदा त्यांची समजूत असावी.
‘बसा… मी पाणी आणतो,’ त्यांना जरा मोकळा वेळ देऊन सारंग आत शिरला.
चहापाणी झाल्यावर दोघेही जरा सावरलेले दिसले.
‘माफ करा, सगळ्या गडबडीत ओळख करून द्यायची राहिली. ह्या राजकुमारी कनकलता, या राधानगरीच्या राजकुमारी आणि मी बळवंत शास्त्री, ह्यांचा दिवाणजी.’
‘राधानगरी म्हणजे अंबोली घाट उतरल्यानंतर..’
‘अगदी बरोबर. तिथेच आमची मोठी इस्टेट आहे. पण सध्या ती इस्टेटच आमच्यासाठी जिवाला घोर झाली आहे.’
‘म्हणजे?’
‘आधुनिक काळात तुम्हाला कदाचित माझी कथा म्हणजे भाकडकथा वाटेल. पण विश्वास ठेवा, तिच्यातले एकही अक्षर खोटे नाही.’
‘तुम्ही नि:शंकपणे बोला, दिवाणजी.’
‘ह्या गोष्टीला खरेतर १५० वर्षांपूर्वी सुरुवात झाली असे म्हणायला हरकत नाही. कनकलता देवींचे पणजोबा राजे भूपेंद्र त्यावेळी राज्यकारभार बघायचे. राजा कसा नसावा ह्याचे उदाहरण म्हणजे हे राजे भूपेंद्र. एकही असा अत्याचार नसेल, जो त्यांनी जनतेवर केला नाही. सत्ता आणि पैसा ह्याची धुंदी चढलेल्या राजा भूपेंद्रनी शिकारीला गेला असताना एकदा एका वनवासी स्त्रीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी वनातून जात असलेल्या साधूने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. हैवान बनलेल्या राजा भूपेंद्र यांनी साधूला ठार मारले. मात्र मरता मरता साधूने दिलेल्या शापाने राजा भूपेंद्रचे मात्र ब्रह्मराक्षसात रूपांतर झाले. त्या दिवसापासून जनतेत प्रचंड क्रोध निर्माण झाला होता. त्यांनी वाड्यावर हल्ला देखील केला; मात्र भूपेंद्रचा नवा अवतार पाहून त्यांची बोबडीच वळली. त्यानंतर कधी मानवाच्या तर कधी ब्रह्मराक्षसाच्या रूपात भुपेंद्र वाड्यात आणि परिसरात हिंडतच राहिला. काही काळानंतर गिरनार पर्वतावरून आलेल्या एका तपस्व्याने शेवटी त्याचा बंदोबस्त केला आणि त्याला एका गुहेत डांबून टाकले. त्यानंतर बरीच वर्षे तो कोणाला दिसला नाही. मात्र स्वातंत्र्यपूर्व काळात तो पुन्हा एकदा वाड्यावर परतल्याची नोंद आहे. त्यानंतर त्याचा काही ठावठिकाणा नाही. मात्र गेल्या महिन्यात तो पुन्हा दोन वेळा वाड्यावर दिसला आहे. आम्ही सगळे प्रचंड घाबरून गेलो आहोत.‘
‘आम्ही म्हणजे कोण कोण? मला सविस्तर सगळे सांगा.’
‘राजघराण्याच्या मागच्या पिढीचे राजे होते राजे राघव, म्हणजे राजकुमारी कनकलतांचे तीर्थरूप. राघव राजांना एकूण तीन अपत्ये. सर्वात मोठे युवराज प्रबळ, त्यानंतर दुसरे युवराज प्रताप आणि शेवटचे अपत्य म्हणजे देवी कनकलता.‘
‘आणि त्यांच्या राणी सरकार?’ सारंगने विचारले आणि दिवाणजी जरा गांगरल्याचे त्याला जाणवले.
‘म्हणजे असे आहे की, युवराज प्रबळ हे राजमाता शिवांगीचे पुत्र आहेत, तर युवराज प्रताप आणि देवी कनकलता हे दोघे काननदेवींच्या पोटी जन्माला आले आहेत.’
काननदेवींचा उल्लेख करताना दिवाणजींनी ’राजमाता’ शब्द टाळल्याचे सारंगने अचूक हेरले होते.
‘अच्छा, पण आता हा ब्रह्मराक्षस परत कशासाठी आला आहे?’
‘वंशाचा नायनाट करायला…’ थरथरत्या आवाजात शास्त्रीबुवा बोलले आणि सारंग चमकला.
‘म्हणजे?’
‘साधारण महिन्याभरापूर्वी युवराज प्रबळ ह्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न झाला आणि त्यापाठोपाठ काही दिवसात युवराज प्रताप ह्यांच्यावर देखील हल्ला झाला. हे कमी म्हणून की काय काल कनकलतादेवींवर देखील प्राणघातक हल्ला झाला आहे.’
‘तुमचे म्हणणे आहे की हे सर्व हल्ले त्या ब्रह्मराक्षसाने केले आहेत?’
‘हो! मी स्वत: त्याला माझ्या डोळ्यांनी बघितले आहे…’ कापर्या आवाजात कनकलता बोलली. तिचे डोळे असे विस्फारलेले होते की जणू आता देखील तो ब्रह्मराक्षस तिच्यासमोर उभा आहे.
‘काय आणि कसे घडले ते मला नीट सांगाल का?’
‘युवराज प्रबळ ह्यांना रात्री अचानक जाग आली. त्यांचा जीव घुसमटला होता. पाणी पिण्यासाठी ते उठले तर समोर खुद्द तो ब्रह्मराक्षस. त्याने हातातला साप युवराजांवर फेकला, जो त्यांना दोन वेळा डसला. वेळीच मदत मिळाली म्हणून युवराज वाचले.’
‘आणि युवराज प्रताप?’
‘त्यांच्यावर देखील हल्ला झाला. अमावास्येच्या रात्री त्यांचा गळा दोरीने आवळण्याचा प्रयत्न झाला. मात्र त्यांची धडपड ऐकून शेजारच्या खोलीत झोपलेले युवराज प्रबळ आणि इतर लोक धावत आले, त्यामुळे त्यांचे प्राण वाचले. त्यावेळी देखील खोलीत आधी शिरलेल्या चार पाच लोकांना त्या भयावह राक्षसाचे दर्शन घडले.’
‘तिथे धोका आहे हे तुम्हाला कळले आहे, तर तुम्ही काही दिवस इथे शहरात येऊन का राहत नाही?’
‘सारंग साहेब, माझ्यावर मी मुंबईत असताना हल्ला झालाय…’ संथ शब्दात कनकलता बोलली आणि सारंग पुन्हा एकदा चमकला.
‘प्रतापवर झालेल्या हल्ल्यानंतर आम्ही पोलिसात तक्रार दिली होती. पण पोलिस तरी अशा प्रकरणात काय करू शकणार? त्यांनी शक्य तेवढे प्रयत्न केले आणि काही दिवसांसाठी सुरक्षा म्हणून माणसे आमच्यासोबत ठेवली. माझ्यावर हल्ला झाला तेव्हा पोलिस शिपाई घरातच होता, त्यामुळे मी वाचले,’ कनकलताच्या डोळ्यात पाणी तरारले होते.
‘हम्म! तुमच्या हवेलीला भेट देऊन एकदा ह्या ब्रह्मराक्षसाचे दर्शन घ्यायलाच लागणार आता,’ उत्साहाने सारंग म्हणाला. त्याच्या त्या शब्दांनी कनकलता आणि दिवाणजींना आलेला धीर त्यांचे चेहरेच सांगत होते.
—
’रामसे बंधू’च्या चित्रपटासारखी ती हवेली पाहून सारंग विस्मयचकित झाला. तब्बल ३२ खोल्या असलेली ती दुमजली हवेली म्हणजे एक भुलभुलय्या होता. भव्य अशा त्या हवेलीत स्थिरस्थावर व्हायला त्याला दोन दिवस लागले. मात्र मधल्या काळात तो आपली जबाबदारी विसरला नव्हता. त्याचे शोधक डोळे आणि हुशार मेंदू आजूबाजूच्या सर्व तपशिलांना व्यवस्थित टिपून घेत होते. हवेलीतले चाकर मोजके होते, मात्र त्यातील सखारामने त्याचे विशेष लक्ष वेधून घेतले होते. लहानपणापासून हवेलीवर चाकरीला असलेला सखाराम हवेलीपासून ते गावापर्यंत सगळ्या बातम्या राखून असायचा. बोलण्यात गोड आणि कामात चोख असलेला सखाराम त्याने बोलता बोलता वश करून घेतला होता. नवा पाहुणा हा असल्या आधुनिक पोषाखात वावरत असला, तरी तो मोठा मांत्रिक होता, यावर सखाचा विश्वास बसला होता. अर्थात सारंगनेच तशी समजूत करून दिली होती म्हणा. खाजगीत तर तो सारंगला ’स्वामी’च म्हणायला लागला होता.
‘काय हो स्वामी, हा ब्रह्मराक्षस तुम्ही मारून का टाकत नाही? राधानगरीचे संकट कायमचे संपून जाईल,’ सारंगला वारा घालता घालता सखा म्हणाला.
‘त्यासाठीच तर माझ्या गुरूंनी मला पाठवले आहे बघ सखारामा. गतजन्मी माझ्या गुरूंच्या गुरूंनी इथे येऊन त्याचा बंदोबस्त केला होता. पण तो पुन्हा मोकाट सुटलाय आता. त्याचा कायमचा बंदोबस्त करायची आज्ञा झाली आहे मला. पण त्यासाठी पूर्वी माझ्या गुरूंच्या गुरूंनी त्याचा कसा बंदोबस्त केला होता, ते जाणून घ्यायला पाहिजे आहे.’
‘मग तुम्ही बुवांना भेटा. त्यांना सगळी हिष्टरी माहिती आहे जी.’
त्याच्या ’हिष्टरी’ शब्दाचे सारंगला हसायलाच आले. ‘कोण आहेत रे हे बुवा?’
‘मोठे ज्ञानी आहेत जी. भविष्य बघतात, तोटके सांगतात. हवेलीतले एक पण काम त्यांना विचारल्याशिवाय होत नाही. जडीबुटीची औषधे पण देतात.’
सखारामच्या बोलण्याने सारंगची उत्सुकता चांगलीच वाढली होती. सकाळ होताच त्याने बुवांच्या घराची वाट धरली. हवेलीच्या मागच्या बाजूला असलेल्या दुमजली जुन्या घरात त्यांचे वास्तव्य होते. बुवांना भेटण्याच्या आधी सारंगने त्यांच्या घराभोवती सहज एक चक्कर मारली. बुवाचे घर देखील हवेलीच्या काळातलेच असावे. भक्कम बांधकाम असलेल्या त्या घरात सारंग शिरला आणि त्याने दार वाजवले.
‘या या सारंगजी…’ धोतर आणि बंडी घातलेल्या घार्या डोळ्याचा एका तेजस्वी माणसाने त्याचे स्वागत केले.
‘बुवा?’
‘हो मी बुवा. खरे नाव दिगंबर शास्त्री. तुमच्या दिवाणजींचा धाकटा भाऊ. आमची हवेलीच्या चाकरीत ही चौथी पिढी,’ नम्रपणे बुवा म्हणाले.
पाहताक्षणी आदर वाटावा असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते.
‘तुम्ही मला कसे काय ओळखले?’
‘अहो, हवेलीत माशी उडाली तरी गावात खबर पोहोचते. तुम्ही आलेले कसे लपणार?’ हसत हसत बुवा म्हणाले.
शिळोप्याच्या गप्पा संपत आल्या, तसे सारंगने हळूच विषयाला हात घातला.
‘बुवा, हे ब्रह्मराक्षसाचे प्रकरण..’
बुवांनी इकडचा तिकडचा कानोसा घेतला आणि पटकन बाहेरचे दार बंद करून घेतले.
‘सारंग बरे झाले तुम्हीच विषय काढला. मी खरे सांगून का, मी स्वत: तत्त्वज्ञान विषयाचा सखोल अभ्यास केला आहे. चार वर्षे काशी नगरीत अध्ययन केलेले आहे. ह्या आधुनिक काळात असे विषय मला देखील अचंबित करतात. मी देखील ह्या कथा, राजघराण्याचे कागद हे सगळे एक भाकडकथा समजत होतो. पण तुम्हाला सांगतो, त्या दैत्याला मी स्वत:च्या डोळ्याने पााहिले आहे हो. त्याला प्रत्यक्ष समोर पाहिले आणि माझा सगळा दंभ, अभ्यास कुठल्या कुठे पळाला…’ बोलता बोलता बुवांनी सारंग समोर ठेवलेला पाण्याच्या ग्लास स्वत:च भसकन रिकामा केला.
‘तुम्ही स्वत: त्याला पाहिलेत? आणि राजघराण्याचे कोणते कागद?’
‘हो ह्या ह्या डोळ्यांनी पाहिले आहे मी त्याला. युवराज प्रतापांचा गळा आवळताना. मी आणि युवराज प्रबळ धावलो, तेव्हा कुठे पळाला तो दैत्य.’
‘आणि ते कागद?’ सारंगच्या प्रश्नावर बुवा लगबगीने उठले आणि आतल्या खोलीत निघाले. सारंग देखील त्यांच्या मागे गेला. आतल्या खोलीत एक भव्य लाकडी कपाट होते. बुवांनी कपाट उघडले. आतली एक खुंटी त्यांनी पिरगाळली, त्याबरोबर वरचा एक खण उघडा झाला. त्यातील एक जाडजूड ग्रंथ त्यांनी बाहेर काढला आणि सारंगकडे दिला.
‘राज घराण्याचे मूळ आडनाव ’महाजन’. ह्या घराण्याचा पूर्ण इतिहास ह्यात दिला आहे. प्रत्येक पिढीत असलेल्या शास्त्रीबुवांनी त्यात आपली भर घालत तो पुढे नेला आहे. ह्यामध्ये राजे भूपेंद्र, संन्यासी, शाप, ब्रह्मराक्षस असा सगळा इतिहास नोंदवलेला आहे.
‘तुमची हरकत नसेल, तर हा ग्रंथ मी घेऊन जाऊ शकतो का? फक्त दोन दिवसासाठी.’
‘हो हो..जरूर. तुम्हाला माझी काही मदत झाली तर मला आनंदच वाटेल. पण ह्यातील काही मजकूर सांकेतिक भाषेत आहे. त्याचा अर्थ मला देखील लावता आलेला नाही.’
—
त्याच रात्री सारंगच्या खोलीत साप निघाला आणि पुन्हा एकदा हवेलीत हलकल्लोळ माजला. सारंग सावध होता त्यामुळे थोडक्यात निभावले. अन्यथा तो साप चक्क कोब्रा जातीचा प्रचंड विषारी साप होता. सखारामने अत्यंत शिताफीने त्याला ताब्यात घेतले. हा प्रकार घडल्यापासून सारंग थोडा चिंतेत दिसत होता. दुसर्याच दिवशी त्याने ’मुंबईला अत्यंत तातडीचे काम आले आहे; ते उरकून दोन दिवसात येतो,’ असे सांगून निरोप घेतला. दोन दिवसांसाठी म्हणून गेलेला सारंग चार दिवसांनी हजर झाला आणि सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. सारंगने आल्या आल्या सगळ्यांना दिवाणखान्यात बोलावले, तेव्हाच प्रकरण काहीसे गंभीर असल्याचा अंदाज सगळ्यांना आला.
‘सगळ्यात आधी मी असा अचानक गेलो, त्याबद्दल तुम्हा सगळ्यांची माफी मागतो. पण माझे जाणे अत्यंत गरजेचे होते. तुमच्या सगळ्यांच्या मागे हात धुऊन लागलेल्या त्या ब्रह्मराक्षसाचा कायमचा बंदोबस्त करण्याचा इलाज मी घेऊन आलो आहे,’ सारंगने आपले वाक्य पूर्ण केले आणि सगळ्यांच्या चेहर्यावर समाधान पसरले.
‘कसला इलाज सारंगजी?’ युवराज प्रताप विचारते झाले.
‘युवराज, तुमच्या घराण्याचा इतिहास असलेला ग्रंथ मला शास्त्रीजींनी वाचायला दिला होता. त्यातील काही मजकूर सांकेतिक लिपीत आहे.मी माझ्या प्रोफेशनल मित्राची मदत घेऊन त्याचा अर्थ शोधून काढला आहे.’
‘तो ग्रंथ तुम्हाला देण्याची शास्त्रींची हिंमत कशी झाली? इतकी अनमोल वस्तू… शास्त्रींकडे तर आम्ही नंतर बघू. पण आता ह्या क्षणी तुम्ही इथून चालते व्हा,’ युवराज प्रबळ कडाडले.
‘शांत व्हा युवराज. इतक्यात चिडलात? अजून तर बरेच काही सांकेतिक उघड व्हायचे आहे,’ थट्टेच्या सुरात सारंग बोलला आणि संतापून युवराजांनी त्याच्यावर झडप घातली. मात्र सारंगच्या ताकदीपुढे त्यांचा काही इलाज चालला नाही.
‘सारंगवर हल्ला करणे हे ब्रह्मराक्षस बनण्याएवढे सोपे नाही युवराज,’ सारंग कडाडला.
‘काय? काय बोलताय तुम्ही हे?’ कनकलता ओरडली.
‘तुमच्या घरात फिरणारा ब्रह्मराक्षस दुसरा तिसरा कोणी नसून हा प्रबळ आहे!’
‘पण तो राक्षस तर शेकडो वर्षे जुना…’
‘असा कोणताच राक्षस कधीच नव्हता दिवाणजी. राजा भूपेंद्रकडून जो अपराध घडला त्यावर जनता प्रचंड चिडली. काही तरुणांनी वाड्यावर हल्ला करण्याचा बेत आखला. त्यावेळी शास्त्रींच्या पूर्वजांनी ही कल्पना राजा भूपेंद्रच्या डोक्यात भरवली आणि हवेलीत ब्रह्मराक्षसाचा जन्म झाला. रात्री वाड्यावर हल्ला करणार्या तरुणांच्या गटाला मशालींच्या उजेडाचा अचूक वापर करत घाबरवण्यात आले आणि त्यांना नकली ब्रह्मराक्षसाचे दर्शन देखील घडवण्यात आले. त्यानंतर सावधगिरी म्हणून अधेमध्ये लोकांना ह्या ब्रह्मराक्षसाचे दर्शन घडवले जात होते. त्यामुळे वाड्यावर पुन्हा हल्ला करण्याचे कोणाचे धाडस झाले नाही. घाबरलेले राजा भूपेंद्र देखील त्यानंतर वाड्याबाहेर पडले नाहीत. त्यांचा मृत्यू झाला आणि हा ब्रह्मराक्षस देखील नाहीसा झाला. त्यावेळच्या शास्त्रींनी एका कलाकाराला साधू बनवून आणले आणि ब्रह्मराक्षसाचा बंदोबस्त केल्याचे नाटक वठवले.’
‘पण त्यानंतर देखील तो पुन्हा एकदा आला..’ दिवाणजी शंका घेत म्हणाले.
‘हो आला ना. स्वातंत्र्यपूर्व काळात. त्यावेळी गावातील काही लबाड लोकांनी क्रांतिकारकांच्या वेषात हवेली लुटण्याचा बेत आखला होता. मात्र त्याचा वेळीच सुगावा लागलेल्या त्या वेळच्या राजांनी पुन्हा एकदा ह्या ब्रह्मराक्षसाला जिवंत केले आणि संकट टाळले. पुढे राजेशाही गेली आणि ह्या सगळ्याची गरज उरली नाही. ब्रह्मराक्षस देखील विस्मृतीत गेला.’
‘पण मग आता असा अचानक?’ कनकलताने विचारले.
‘आता आलाय तो खरा ब्रह्मराक्षस आहे.’
‘म्हणजे?’
‘माणसाच्या वाईट प्रवृत्तीने त्याचा ताबा घेतला की, त्याचा बनतो ब्रह्मराक्षस. ह्या प्रबळसारखा.’
‘पण युवराज प्रबळने हे सगळे का केले? उलट पहिला हल्ला तर खुद्द त्यांच्यावर झाला होता.’
‘तो सगळा बनाव होता. संपत्तीसाठी केलेला.’
‘संपत्ती?’
‘हो.. तुमच्या वडिलांनी जरी तुम्हा सगळ्यांमध्ये संपत्तीची समान वाटणी केलेली असली, तरी त्य्ाात एक नियम असा आहे की तुमच्यापैकी कोणी लग्नापूर्वी मृत्यू पावल्यास त्याची संपत्ती इतर दोघांमध्ये विभागली जाईल. प्रबळला हे शास्त्रींकडून आधीच माहिती झाले होते. मुंबईत जाऊन नाना शौक करण्याची हौस असलेल्या प्रबळला जुगार, दारू आणि बायकांसाठी तसाही पैसा कमीच पडत होता. अशावेळी एकदा मद्याच्या धुंदीत त्याच्या डोक्यात शास्त्रींनी हा ब्रह्मराक्षसाचा किडा घुसवला.’
‘काय? माझा भाऊ ह्या सगळ्या मागे होता?’
‘हो दिवाणजी. तुमच्या भावाने त्या सांकेतिक लिपीचा अर्थ शोधून काढला होता. त्याला ब्रह्मराक्षसाचे गुपित कळले होते. प्रबळच्या नादाने तो देखील वाममार्गाला लागलाच होता. अनासाये प्रबळच्या मदतीने पैसा मिळाला तर त्याला हवाच होता. तोटा काहीच नव्हता. अडकला असता तर प्रबळच अडकला असता. शास्त्री नामानिराळे राहिले असते. त्यांच्या ह्याच अतिआत्मविश्वासाने त्यांना दगा दिला आणि त्यांनी तो ग्रंथ मला वाचायला दिला. तिथेच ते फसले.’
‘पण तुम्हाला प्रबळवर शंका कशी आली?’
‘मी एकदा प्रबळला भेटायला गेलो असताना त्याने काही कामानिमित्त कपाट उघडले. त्या कपाटात सेम तशीच एक खुंटी होती, जशी शास्त्रींच्या कपाटाला होती. एक दिवशी मी संधी साधून त्या खुंटीशी खेळून पाहिले. ती खुंटी पिरगाळली की वरचा गुप्त कप्पा उघडत असे, ज्यात मला दारूच्या बाटल्या, रेसची तिकिटे सापडली आणि ती खुंटी दाबली की एक गुप्त रस्ता उघडतो जो थेट हवेलीच्या मागच्या बाजूला शास्त्रींच्या कपाटात उघडतो. हा ब्रह्मराक्षस तिथूनच ये जा करायचा.’
‘पण मग तुमच्यावर हल्ला का झाला?’
‘मला इथून पळवून लावायला. मी आहे तोवर ब्रह्मराक्षसाला येता येत नव्हते. का कोण जाणे पण त्याला माझी धास्ती वाटत असावी. त्यामुळे मग पुन्हा एकदा सापाचा वापर झाला. अर्थात तो माझ्यासाठी फायद्याचा ठरला.’
‘तो कसा काय?’
‘मी सापाला मारणार तोच सखारामने त्याला शिताफीने ताब्यात घेतले. एखादा जाणकार किंवा सर्पमित्रच अशी शिताफी दाखवू शकतो. तिथेच मला शंका आली आणि मी सखारामला माझ्या पद्धतीने व्यवस्थित बोलते केले. त्याच्याकडूनच मला मृत्युपत्राविषयी माहिती मिळाली आणि प्रबळने बिनविषारी सापाच्या मदतीने स्वत:वर बनावट हल्ला कसा घडवला ते देखील कळलं.’
‘पण सारंग, माझ्यावर हल्ला झाला तेव्हा खुद्द प्रबळ दादानेच मला वाचवले होते.’ प्रताप शंका घेत म्हणाला.
‘त्याला तुम्हाला वाचवावे लागले. तुमच्यावर हल्ला झाला तेव्हा तो बाहेर दारातच पहारा देत होता. त्याच्या अपेक्षेपेक्षा लवकर नोकर धावत आले आणि त्याचा बेत फसला. मग त्याला बचावाचे नाटक करावे लागले.’ सारंगचे बोलणे संपत असतानाच पोलिस हजर झाले आणि अखेर ब्रह्मराक्षस बेडीत अडकला.