ओटीटी मनोरंजन ही काळाची गरज आहे हे ओळखून अक्षय बर्दापूरकर या मराठमोळ्या तरुणाने थेट मराठी माणसांसाठी, मराठी प्रेक्षकांसाठी ‘प्लॅनेट मराठी’ हे खास मराठी ओटीटी माध्यम सुरू केले. जगभरातले २० कोटी मराठी लोक कोठेही बसून या मराठी मनोरंजनाचा आस्वाद घेऊ शकतात.
—-
मराठी माणसाने उच्चशिक्षणासारखी मोठी झेप घेतली तरी तो विदेशात जाऊन स्थायिक झाल्याशिवाय राहात नाही. पण इंग्लंडमध्ये जाऊन ब्रॅण्ड मॅनेजमेंटसारखी पदवी मिळवूनही भारतातच आणि त्यातही आपल्या महाराष्ट्रात राहून मराठी माणसांसाठी झटणारे फार थोडे तरूण असतात. अक्षय बर्दापूरकर हे अशाच मोजक्या तरूणांपैकी एक… मराठी लोकांना मराठीतच मनोरंजन देण्याची जिद्द त्यांनी उरी बाळगली… आणि त्यावर अंमल करत ‘प्लॅनेट मराठी’ हा ओटीटी प्लॅटफॉर्म त्यांनी सुरूही केला.
ग्रामीण बाजाचा सिनेमा, एखादे नाटक किंवा फार तर घरातच बसून पाहिलेले दूरचित्रवाणीवरचे कार्यक्रम, मालिका… यापलीकडे मराठीत मनोरंजन नव्हतेच. दाक्षिणात्य किंवा हिंदी, इंग्रजी भाषांमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर बरेच पर्याय उपलब्ध आहेत, त्या भाषांचे ओटीटी प्लॅटफॉर्म आहेत; पण मराठीत याबाबतीत खडखडाटच दिसतो… मराठीत वेगळ्या प्रकारचं कंटेंट पाहायला मिळण्याची बोंबच होती. म्हणूनच अक्षय बर्दापूरकर यांनी मराठीत जागतिक दर्जाचं मनोरंजन उपलब्ध करून द्यायचं ठरवलं आणि ‘प्लॅनेट मराठी’ हे फक्त मराठी प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करणारं ओटीटी माध्यम सुरू केलं.
यामागची संकल्पना स्पष्ट करताना ते सांगतात, मराठी भाषेत कंटेंट उपलब्ध करून देणारं आणि फक्त मराठी प्रेक्षकांसाठीच असलेलं हे जगातलं पहिलंच ओटीटी माध्यम आम्ही सुरू केलंय. हिंदी व इंग्रजीत वेगवेगळं आणि दर्जेदार कंटेंट देणारी अनेक ओटीटी माध्यमं आहेत. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर तर अशा ओटीटींचं पेवच फुटलंय… त्यात वेगळेपण सिद्ध करण्यासाठी ‘प्लॅनेट मराठी’ला काहीतरी वेगळं देणं भाग आहे… पण याचाही विचार या ओटीटीचे प्रमुख, संस्थापक बर्दापूरकर यांनी केलेला आहे. ते म्हणतात, या माध्यमावर ज्यांना ओरिजनल्स म्हटलं जातं त्या वेबसीरिज प्रामुख्याने असतील, त्याचबरोबर वेबफिल्म्स असतील. इतर लोकांनी बनवलेले काही चित्रपटही आम्ही या चॅनेलवर दाखवणार आहोत… आणि म्युझिक असेल, स्पोर्ट्स असणार आहे. नाटकंही आहेत. बेसिकली मराठीतलं सर्व प्रकारचं मनोरंजन यावर पाहायला मिळणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
मोठ्या स्तरावर ओटीटी प्लॅटफॉर्म चालवायचं तर त्यासाठी खर्चही तगडा होणार हे सरळ आहे. त्यामुळे या ओटीटीवरही सबस्क्रिप्शनद्वारे फी आकारावी लागणारच असल्याचं बर्दापूरकर सांगतात. पण हे सबस्क्रिप्शन भरमसाठ नसून मराठी माणसाला सहज परवडेल असेल असेल अशी ग्वाही त्यांनी दिली. ते म्हणतात, महिन्याचे ३० रुपये, दिवसाचा एक रुपया आणि वर्षाचे ३६५ रुपये एवढेच ते ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
टकल्यांच्या देशात कंगवे विकण्याचा धंदा कितीही मोठ्या स्तरावर आणि मन लावून केला तरी त्यात नुकसान हे ठरलेलंच आहे… म्हणजेच कुठलीही वस्तू, उत्पादन विकायचे तर त्यासाठी मार्वेâटची आवश्यकता असतेच. मराठीत ‘प्लॅनेट मराठी’साठी किती मार्केट आहे? हा प्रश्न उपस्थित केला तेव्हा बर्दापूरकर म्हणाले, हिंदी भाषा सोडल्यास बंगाली भाषेनंतर दुस-या क्रमांकाची बोलली जाणारी भाषा मराठी आहे. बंगाली भाषेतलं कंटेंट बांगला देशातही पाहिलं जातं, म्हणून प्रादेशिक भाषांमध्ये ती नंबर एकवर आहे. पण त्यानंतर मात्र मराठीच… मराठी लोकांची लोकसंख्या जगात १८ ते २० कोटी आहे, जी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या दोघांना एकत्र केलं तरी त्याहून जास्त भरेल. आपल्याकडचे पंजाबी सात कोटी आहेत, गुजराती साडेपाच कोटी आहेत, तेलुगू सहा कोटी आहेत, पण मराठी लोक त्याहून जास्त जगभरात आहेत. हे २० कोटी मराठी लोक जगात कोठेही बसून ‘प्लॅनेट मराठी’चे मराठी मनोरंजन पाहू शकतात. म्हणजे मार्केट मोठेच आहे असंच म्हणता येईल.
ओटीटी मनोरंजन ही आजच्या काळाची गरज असल्याचे अक्षय यांनी सांगितले. हे एक असं माध्यम आहे, जे तुम्ही तुमच्या सोयीनुसार, आपापल्या वेळेनुसार कधीही आणि कितीही वेळा बघता येते. तुम्हाला वाटलं तर मोबाईलवर, मोठ्या टीव्हीवर, बसमध्ये बसल्या बसल्या, कसेही पाहू शकता. हे टेलीव्हिजनच्या कार्यक्रमांच्या बाबतीत होऊ शकत नाही, सिनेमांच्या वा नाटकांच्या बाबतीत होणार नाही. त्यांचे शो ठरलेल्या वेळेतच पाहता येतात. कोरोना संकट आल्यावरच ओटीटी माध्यमाचं महत्त्व लोकांना पटलं आहे. त्यामुळे पुढची दहा वर्षे तरी ओटीटीच्या नावावरच असतील, अशी शक्यताही त्यांनी बोलून दाखवली.
‘प्लॅनेट मराठी’ची माहिती अजून लोकांपर्यंत पोहोचलेली नाही. ती पोहोचावी यासाठी बर्दापूरकर यांनी एक खास गाणे रिलीज केले आहे. याला ते गौरवगीत म्हणतात. ‘प्लॅनेट मराठी’ काय देणार हे अजून गुलदस्त्यातच असले तरी त्याला मराठी सिनेविश्वात किती पाठिंबा मिळतोय हे चित्र त्यांनी या गौरवगीतातून लोकांपुढे आणलं आहे. या गाण्यात मराठीतले तब्बल ४० प्रथितयश कलाकारांनी पाठिंबा दर्शवला आहे. यात सचिन पिळगावकर, विक्रम गोखलेंपासून ते अगदी आत्ताची सगळी बडी स्टारकास्ट त्यात पाहायला मिळते. याबाबत बर्दापूरकर म्हणाले, या सगळ्यांना फोर्सही करावा लागला नाही. त्यांना फक्त कळवण्यात आलं, ते आपापल्या सवडीनुसार येऊन एकेक वाक्य चित्रित करून गेले. तीच एक ऊर्जा आम्हाला मिळाली आहे. म्हणजे एखादं मराठी चॅनेल निघाल्यावर त्याला एवढ्या कलाकारांचा पाठिंबा आहे ते लोकांना या गौरवगीतातून कळले आहे, असेही ते म्हणाले. ‘म… मानाचा, म… महानतेचा, म… मनोरंजनाचा’ असे या गाण्याचे बोल असून प्लॅनेट मराठी ओटीटीच्या लोगोला अनुसरून हे बोल आहेत. मराठी सिनेसृष्टीतील कलावंत ‘प्लॅनेट मराठी’वर अवतरल्याने हे गाणे अधिकच बहारदार झाले आहे. हे गाणे समीर सामंत यांनी लिहिले असून कौशल इनामदार यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. स्वप्नील बांदोडकर, आदर्श शिंदे, योगिता गोडबोले आणि वैशाली माडे यांनी ते गायले असून पुष्कर श्रोत्री यांनी गाण्याचे दिग्दर्शन केले आहे.
‘जून’ या पहिल्याच कसदार चित्रपटातून रसिकांची वाहवा मिळवून या ओटीटीने मनोरंजनाच्या क्षेत्रात दमदार ओपनिंग केलेलं आहे. वर्षाला अवघ्या ३६५ रुपयांत मनोरंजनाचा केवढा मोठा खजिना मराठी प्रेक्षकांसाठी खुला होणार आहे, याची उत्सुकता रसिकांना लागून राहिलेली आहे.
– नितीन फणसे
(लेखक ‘मार्मिक’चे उपसंपादक आहेत)