• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

शाबास पोरांनो, मनापासून अभिनंदन!

संपादकीय

टीम मार्मिक by टीम मार्मिक
July 21, 2021
in संपादकीय
0

दहावीचा निकाल नुकताच लागला. तो ९९ टक्क्यापेक्षा जास्त लागला, सगळ्या राज्यात मिळून ७५७ मुलंच नापास झाली, बाकी सगळी पास झाली. त्यामुळे अनेक सुखवस्तू बुद्धिजीवींच्या पोटात मुरडा धरला. कोरोनाकाळामुळे दीड वर्षांत ना शाळा भरली आहे ना दहावीची परीक्षा झाली आहे. हा निकाल नववी-दहावीच्या अंतर्गत गुणांना विचारात घेऊन लावण्यात आलेला आहे. त्यात शाळांनी गुणांची लयलूट केली आहे, ज्या विषयांसाठी शाळेत हजर राहावं लागतं, सर्वसामान्य जीवनव्यवहार सुरू असावे लागतात, त्या विषयांचे गुणही खिरापतीसारखे वाटण्यात आले आहेत, हे यांच्या पोटदुखीचं कारण आहे.
खरं तर अशा बुद्धिजीवींची मुलं ज्या सीबीएसई आणि आयसीएसईच्या शाळांमध्ये शिकतात, त्या केंद्रीय मंडळांनीच दहावीच्या, बारावीच्या परीक्षांमध्ये गुणांच्या खिरापती वाटून आपल्या बोर्डांत शिकणारी मुलं हुशार बनतात, असं मार्वेâटिंग केलं आहे. यांची ‘गुणवान’ मुलंबाळं अशाच खिरापतींची लाभार्थी आहेत. हा प्रकार इतका वाढला की आता प्रत्येक महत्त्वाच्या अभ्यासक्रमासाठी वेगळी प्रवेश परीक्षा घेतली जाते. तिथे यातल्या बहुतेक गुणवंतांचं पितळ उघडं पडतंच.
या बुद्धिजीवींना ना सरकार चालवायचं असतं, ना शिक्षण व्यवस्था चालवायची असते. त्यांना दिवसाला हजार शब्दांचा रतीब घालायचा असतो किंवा फेसबुकवर पोस्टी पाडायच्या असतात. त्यात उंटावरून शेळ्या हाकण्याची सोय असते. मग ते एकदा युरोपातली, भारताला लागू न होणारी आणि दीर्घ मुदतीत चुकीची ठरलेली उदाहरणं देऊन ‘उठवा ही अशास्त्रीय टाळेबंदी’ अशी हाकाटी देतात आणि पुढच्याच दिवशी ‘टाळेबंदी असूनही गर्दी जमवणारे उपक्रम कसे सुरू आहेत’ याबद्दलही कानउघाडणी करतात. त्यामुळे यांच्या हे लक्षात येत नाही की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या एखाद्या स्वयंभू, स्वयंप्रज्ञ आणि सर्वविषयज्ञानसंपन्न नेत्याचा अपवाद वगळता बाकीचे सगळे शीर्षस्थ नेते आणि सरकारं इतके महत्त्वाचे निर्णय घेताना त्या विषयातल्या तज्ज्ञांच्या समित्या आणि टास्क फोर्स नेमून त्यांनी दिलेल्या सल्ल्यावर साधकबाधक चर्चा करतात आणि मगच एखादा निर्णय घेतात. दहावीच्या परीक्षेचा निकाल हा कुणाला तरी पहाटे पहाटे झालेला साक्षात्कार नाही, त्यामागे काहीएक विचार आहे, धोरण आहे, मांडणी आहे.
मुळात दहावीच्या या निकालाला खिजवणे म्हणजे या काळात नववी, दहावीचं शिक्षण घेतलेल्या मुलांच्या कष्टांचा घोर अपमान करणे आहे. परीक्षा झाली नाही म्हणजे मुलांनी अभ्यास केला नाही, असं होत नाही. परीक्षा होणारच नाही, अशी घोषणा कुणी दीड वर्षापूर्वी केली नव्हती. उलट अभ्यासाचं टेन्शन आणि परीक्षा ऑनलाइन होणार की ऑफलाइन होणार, कधी होणार, कशी होणार याचं टेन्शन असा दुहेरी तणाव या मुलांनी भोगला आहे. त्याला ही मुलं जबाबदार होती का? कोरोना त्यांनी आणला का? कोरोनास्थितीची उत्सवबाज भंपक हाताळणी त्यांनी केली का? कोरोनाकाळात सरसकट करकचून टाळेबंदी त्यांनी लादली का? त्या काळातही आरोग्यव्यवस्था सुदृढ न होण्यात त्यांचा दोष आहे का? मग या गुन्ह्यांची शिक्षा या कोवळ्या मुलांना द्यायची होती का?
एरवीही नववीपर्यंत अभ्यासाच्या बाबतीत गंभीर नसलेली मुलं नववीपासून गंभीरपणे अभ्यास करू लागतात, शाळा आणि क्लास अशी डबल मेहनत बहुतेक मुलं करतात. यावेळी तर ती अनेकांना ऑनलाइन करावी लागली. सकाळी सात वाजता शाळेसाठी मोबाइलवर बसणारी मुलं नाश्ता कशी करायची, दुपारचं जेवण कसं खायची आणि पुन्हा संध्याकाळपर्यंत ऑनलाइन क्लासेस कसे अटेंड करायची, हे त्यांच्या आईबापांना विचारा. इतक्या मेहनतीनंतरही आपल्या परीक्षेचं काय होणार आणि शैक्षणिक भविष्य काय असणार, याबाबतीत त्यांच्या डोक्यावर टांगती तलवारच होती.
हे झालं मोबाइल, इंटरनेट आदी सुविधा उपलब्ध असलेल्या भाग्यवान विद्यार्थ्यांच्या बाबतीत. राज्यात अनेक विद्यार्थ्यांना या सुविधाच उपलब्ध नव्हत्या. तिथे शिक्षकांनी काय मेहनत घेऊन शिकवलं असेल, गुणांकन केलं असेल, मुलांनी कसं शिक्षण घेतलं असेल, याची आपण कल्पनाही करू शकत नाही. राष्ट्रीय आपत्तीच्या काळात काही मूठभरांची ‘मेरिट’ची बावळट कल्पना राबवून या विद्यार्थ्यांच्या कष्टांवर पाणी ओतायला हवं होतं का? त्याने कुणाचं आणि कसलं भलं होणार होतं?
आज दहावीचा निकाल ९९ टक्क्यांहून जास्त लागला म्हणजे सगळ्या मुलांना ९० टक्क्यांच्या पुढे मार्क मिळालेत, असं झालेलं नाही. जास्तीत जास्त मुलं बर्‍या गुणांनी पास झालेली आहेत इतकंच घडलेलं आहे. शिवाय, इथून पुढे कॉलेजात प्रवेश घेताना या मुलांना सामायिक प्रवेश परीक्षा द्यावी लागणार आहेच. दहावीच्या गुणपत्रिकेवर कितीही मार्क दिसू देत, प्रत्येक विद्यार्थ्याला त्याची मूळ पात्रता व्यवस्थित माहिती आहे आणि पुढचा मार्ग खडतर आहे, हेही माहिती आहे.
दहावीच्या या निकालाने एकतर सगळ्या मुलांच्या कष्टांचा सन्मान केलेला आहे आणि करोनाच्या माराने पिचलेल्या, नोकरीधंदा, रोजगार गमावल्याने खचलेल्या त्यांच्या कुटुंबांना थोडासा हुरूप दिलेला आहे. ही मुलंही पुढच्या लढाईला सज्ज झाली आहेत आणि त्यांची कुटुंबंही. त्यामुळे भावनिक क्षुद्रत्व दाखवणारा काटेकोर करवादा किरटेपणा न करता त्यांचं मन:पूर्वक अभिनंदन केलं पाहिजे आणि पुढच्या लढाईसाठी शुभेच्छाच दिल्या पाहिजेत.

Previous Post

२४ जुलै भविष्यवाणी

Next Post

सुसंस्कृत, संवेदनशील मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे

Next Post

सुसंस्कृत, संवेदनशील मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.