महाराष्ट्राला सुसंस्कृत आणि संवेदनशील राजकारणाची परंपरा आहे. महाराष्ट्राने यशवंतराव चव्हाणांपासून ते वसंतराव नाईकांपर्यंत आणि शरदराव पवारांपासून ते बाळासाहेब ठाकरेंपर्यंत अनेक महान नेते पाहिले. त्यांचे राजकारणही जवळून पाहिले आणि महाराष्ट्राने सदैव सुसंस्कृत आणि संवेदनशील राजकारणाला प्रथम पसंती दिली. असेच एक सुसंस्कृत व संवेदनशील व्यक्तीमत्व म्हणून आताचे एकोणीसावे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे नाव घ्यावेसे वाटते. बाळासाहेबांनंतर शिवसेनेचे काय होणार असे अनेक प्रश्न राजकीय जाणकारांना/विश्लेषकांना पडले होते. कारण बाळासाहेबांसारखा दुसरा नेता होणे नाही; बाळासाहेब हे बाळासाहेबच! परंतु, उद्धवजींनी ज्या पद्धतीने पडत्या काळात शिवसेना पुढे नेली हे पहाता त्यांचे विशेष अभिनंदन करणे क्रमप्राप्त ठरते. उद्धव ठाकरे यांनी कोरोनाकाळात, निसर्ग व तौक्ते चक्रीवादळांच्या नैसर्गिक आपत्तींच्या काळात केलेले कार्य व प्रामुख्याने महाराष्ट्राला कुटुंबप्रमुख म्हणून दिलेला धीर पाहता ते कौतुकास पात्र आहेत. एक उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे, तर सगळा देश त्यांच्याकडे आदराने पाहतो आहे.
आमच्या खोपोलीत बाळासाहेबांनी निर्माण केलेले रमाधाम वृद्धाश्रम आहे. या वृद्धाश्रमावर उद्धवजींचे विशेष लक्ष असते आणि म्हणूनच मुख्यमंत्री झाल्यानंतर नागपूरचे अधिवेशन संपल्यावर तेथील संत्रा बर्फी घेऊन ते पहिल्यांदाच मुख्यमंत्री म्हणून वृद्धाश्रमात येत होते. प्रोटोकॉल म्हणून मोठा फौजफाटा तेथे उपस्थित होता. उद्धवजींचे मामा चंदूमामा वैद्य, स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर, बबन पाटील आणि अनेक कार्यकर्ते व जनता उपस्थित होती. तसेच विशेष पोलीस सुरक्षा, बॉडीगार्ड, कोकण आयुक्त, पोलीस कमिशनर, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, प्रांताधिकारी, तहसीलदार यांसारखे अनेक विभागांचे अधिकारी रमाधाम वृद्धाश्रमात उपस्थित होते. उद्धवजींनी नागपूरहून आणलेली संत्रा बर्फी वृद्धाश्रमात वाटली. संपूर्ण वृद्धाश्रमाची पाहणी केली. वृद्धाश्रमात बनवलेले जेवण जेवले. उपस्थित सर्व अधिकारीही जेवले.
जेवण झाल्यानंतर पुन्हा पाहणी करण्यास निघाले असता तेथील एक कुत्री त्यांच्या दिशेने जोरात धावत आली. तसे लगेच त्यांच्या बॉडीगार्डने त्या श्वानाला अडवले आणि तिला अशा पद्धतीने रोखले की मुख्यमंत्री साहेबांना काहीही इजा होणार नाही. त्या बॉडीगार्डचे ते कृत्य प्रोटोकॉलप्रमाणे एकदम योग्यच होते. परंतु उद्धवजींच्या संवेदनशील मनाला वाटले की आपल्यामुळे त्या श्वानाला त्रास होतोय. त्याला इजा होईल म्हणून ते लगेच त्या बॉडीगार्डला म्हणाले, ‘अरे नको पकडू तिला. ती काहीही करणार नाही. वाटल्यास मीच माझा मार्ग बदलून या दुसर्या दिशेने जातो पण तिला सोड.’ हे बोलून त्यांनी आपला मार्ग बदलला तसे बॉडीगार्डने त्या श्वानाला सोडले. त्या मुक्या श्वानाला काहीही त्रास होऊ नये म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी भूतदया दाखवून आपलाच मार्ग बदलला… केवढी मोठी ही संवेदनशीलता!… आपल्यामुळे दुसर्याला त्रास नको आणि त्यातही मुक्या प्राण्यांना तर अजिबात नको ही त्यामागील भावना!!…
या घटनेचा मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे. संवेदनशीलता, सुसंस्कृतता जात नाही तर मुळात ती रक्तातच असावी लागते. असे सुसंस्कृत व संवेदनशील मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले हे येथील जनतेचे भाग्यच आहे. आजही उद्धवजी हे मुख्यमंत्री व एका राजकीय पक्षाचे प्रमुख असले तरी त्यांच्यात कोणताही बडेजावी अहंकार दिसून येत नाही. बायको गावची साधी सरपंच झाली म्हणून पायाऐवजी डोक्याने चालणारी अनेक माणसे आपल्याला दिसून येतात. परंतु उद्धवजी हे साधे आहेत, ते संयमी, सुसंस्कृत व संवेदनशील आहेत, तसेच ते कर्तबगार आणि कणखरसुद्धा आहेत.
दिनांक २७ जुलै शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींचा वाढदिवस!… त्यांना महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा! महाराष्ट्रातील जनतेची स्वप्नं साकार करण्यासाठी आई भवानी त्यांना उदंड आशीर्वाद आणि बळ देवो!