बाबरी मशिदीचा ढाचा पडला, तेव्हा देशभरात दंगली उसळल्या. हिंदु-मुस्लीम समाजात तेढ निर्माण झाली. हिंदुस्थानच्या जातीय सलोख्याला धक्का पोहोचला. हिंदुस्थानात अल्पसंख्यांक असुरक्षित आहेत, असा आरोप सेक्युलरवाद्यांनी केला. शिवसेना, संघ, विहिंप, बजरंग दल या फॅसिस्ट संघटनांवर बंदी घाला आणि त्यांच्या नेत्यांना अटक करा अशी मागणी जोर धरू लागली. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बाबरी मशिदीचा ढाचा पडल्यानंतर केलेल्या निर्भीड वक्तव्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. लखनऊच्या कोर्टात केस उभी राहिली आणि १९९४ साली बाळासाहेबांना लखनऊ कोर्टात हजर राहण्याचे आदेश कोर्टाने दिले. महाराष्ट्राबाहेर कधीही न गेलेल्या बाळासाहेबांना हिंदुत्वाची बाजू मांडण्यासाठी, रक्षणासाठी उत्तर प्रदेशातील लखनऊ कोर्टात जावे लागले. तेव्हा महाराष्ट्रातीलच नव्हे, तर उत्तर हिंदुस्थानातील शिवसैनिक, हिंदू कार्यकर्ते बाळासाहेबांच्या संरक्षणासाठी मोठ्या प्रमाणात लखनऊ येथे पोहोचले.
लखनऊ कोर्टात हिंदुहृदयसम्राट
उत्तर प्रदेशातील लखनऊ कोर्टात बाळासाहेब ठाकरे आणि भाजप खासदार उमा भारती यांना विशेष न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी विजय वर्मा यांनी जारी केले. शिवसेनाप्रमुखांना जामीनपात्र वॉरंट देण्यात आले. सीबीआयने बजावलेले. हे वॉरंट त्यांनी स्वीकारले आणि एक हजार रुपयांच्या जामिनावर त्यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले.
८ एप्रिल, १९९४ रोजी शिवसेनाप्रमुख लखनऊला गेले. त्यांचे उत्तर प्रदेशातील शिवसैनिकांच्या वतीने लखनऊ विमानतळावर भव्य स्वागत करण्यात आले. शहराबाहेर १२ किमी अंतरावर असणार्या इंदिरा नगर येथील न्यायालयात उपस्थित राहण्यासाठी ते रवाना झाले, त्यावेळी हजारो कार्यकर्त्यांचा ताफा त्यांच्यासमवेत होता. शिवसेनाप्रमुखांनी न्यायालयात प्रवेश केला आणि ते येताच त्यांच्या नावाचा जयजयकार करण्यात आला. यावेळी अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. शिवसेनाप्रमुखांबरोबर त्यावेळी उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शिवसेना नेते मनोहर जोशी, सुभाष देसाई, आनंद दिघे, खासदार सतीश प्रधान, मोरेश्वर सावे, गजानन कीर्तीकर, बाळा नांदगावकर, शिशिर शिंदे इत्यादी प्रमुख कार्यकर्ते हजर होते.
न्यायालय बोलावेल त्यावेळी आम्ही उपस्थित राहू, अशी शिवसेनाप्रमुखांनी हमी दिली आणि एक हजार रुपयांच्या जामिनावर त्यांची मुक्तता करण्यात आली. न्यायालयाच्या आवारात पत्रकारांशी बोलताना बाळासाहेब म्हणाले, ‘हिंदू, हिंदुत्व, हिंदुस्थानसाठी मी आजन्म लढत राहीन.’ लखनऊच्या पत्रकारांनी त्यांना सहज विचारले, ‘साब, आप वापस लखनऊ कब आयेंगे?’ यावर शिवसेनाप्रमुख विनोदाने म्हणाले, ‘दुसरा ढाचा गिरेगा तभी देखेंगे.’ यावर पत्रकारांत एकच हंशा पिकला. कडक पोलीस बंदोबस्तात शिवसेनाप्रमुख लखनऊ विमानतळाकडे गेले आणि दुपारी ४.३० वाजता त्यांचे विशेष विमान मुंबईच्या धावपट्टीवर उतरले. ‘मातोश्री’वर त्यांचे भव्य स्वागत झाले.
संभाजीनगरात पत्रकारांवर हल्ला!
शिवसेनाप्रमुखांनी १९ फेब्रुवारी, १९९४ रोजी संभाजीनगर येथील रमा इंटरनॅशनल हॉटेलमध्ये एक पत्रकार परिषद बोलावली होती. वेळ होती दुपारी १२.३०ची. पत्रकार परिषदेची सुरूवात करताना त्यांनी मीडियाच्या निषेधाने मी पत्रकार परिषद सुरू करीत आहे, असे सांगितले. तेथील ‘सिटीझन्स’ या हिंदी दैनिकाची कात्रणे दाखवीत त्यांनी सिटीझन्सचा निषेध केला. सदर दैनिकाने ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे का ठंडा स्वागत’ या शीर्षकाखाली त्यांच्या स्वागताचा वृत्तांत दिला होता. इतर दैनिकात आलेले वृत्त व ‘सिटीझन्स’मधील वृत्त यांची तुलना करीत संतप्त स्वरात ठाकरे म्हणाले, ‘मी पत्रकारांना शिव्या देतो असं म्हटलं जातं. मला पत्रकारितेची नीतिमत्ता शिकवली जाते. माझा निषेध केला जातो. मग ‘सिटीझन्स’मध्ये हे छापून आले, त्या पत्रकारितेचा निषेध का केला जात नाही? तुम्ही सर्व पत्रकारांनी ‘सिटीझन्स’चा निषेध केला पाहिजे.’ त्या हिंदी दैनिकाचे कोणी प्रतिनिधी असतील तर, त्यांनी बाहेर चालते व्हावे असेही सांगितले. ‘सिटीझन्स’चे प्रतिनिधी मुस्तफा आलम खान उभे राहिले. त्यांनी बाळासाहेबांना सांगितले की त्यांचे एकूण तीन प्रतिनिधी उपस्थित आहेत. तेव्हा बाळासाहेब म्हणाले की, आपण तिघेही बाहेर जाईपर्यंत पत्रकार परिषद सुरू होणार नाही.
उपस्थित काहींनी त्या पत्रकारांना हॉलमधून काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सर्व पत्रकार निषेध व्यक्त करीत बाहेर पडू लागले. पत्रकारांचे म्हणणे असे होते की बाळासाहेबांनी वृत्तपत्राच्या संपादकाचा निषेध करावा, परंतु वार्ताहरांना असे वागविणे योग्य नाही. पण बाळासाहेब काहीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. शेवटी प्रचंड गोंधळ उडाला. व्यासपीठावर असणारे मनोहर जोशी, राज ठाकरे, चंद्रकांत खैरे, संजय राऊत यांनी वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो निष्फळ ठरला.
शेवटी पत्रकार बाहेर पडले. काही संतप्त शिवसैनिकांनी पत्रकारांवर हल्ला केला. पत्रकारांवरील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी जिल्हा मराठी पत्रकार महासंघ व जिल्हा श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने बैठक घेण्यात आली. दुसर्या दिवशी बाळासाहेबांनी निवेदनाद्वारे पत्रकारांच्या मारहाणीबद्दल दिलगिरी व्यक्त केली. परंतु तरीही मारहाणीचा निषेध म्हणून त्या दिवशी ‘काळा दिवस’ पाळण्याचा निर्णय विविध वर्तमानपत्रांच्या संपादकांनी घेतला. बॉम्बे युनियन ऑफ जर्नलिस्टच्या सभागृहात विविध पत्रकार संघटना आणि वार्ताहर यांची सभा झाली आणि शिवसेनेच्या दहशतवादाचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. यापुढे ठाकरे आणि शिवसेना यांनी माफी मागेपर्यंत बहिष्कार उठवणार नाही, असे ठरविण्यात आले.
‘बीयूजे’च्या बैठकीत सर्वांनी बाळासाहेबांवर टीका केली आणि शिवसेनेच्या सर्व कार्यक्रमांवर बहिष्कार टाकण्याचे जाहीर केले. मुख्यमंत्र्यांकडून कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय पत्रकारांनी घेतला. शेवटी संभाजीनगरमधील सिडको पोलीस ठाण्यामध्ये पत्रकारांवरील हल्ला प्रकरणी शिवसेनाप्रमुखांविरोधात कलम ३५५, ३२३, ५०४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच आमदार चंद्रकांत खैरे यांच्याविरुद्ध सीआरपीसीच्या कलम १०७ अन्वये चॅप्टर केस दाखल करण्यात आली.
जिल्हा मराठी पत्रकार संघाने आणि इतर पत्रकारांच्या संघटनांनी शिवसेनेच्या बातम्यांवर पंधरा दिवसांसाठी बहिष्कार घोषित केला. मुख्यमंत्री शरद पवार यांनी जाहीर केले की ‘मारहाण प्रकरणी कोणाचीही गय करण्यात येणार नाही.’ शिवसेना नेते मनोहर जोशी म्हणाले, शिवसेना पत्रकारांच्या विरुद्ध नाही. आता नाही आणि भविष्यातही राहणार नाही. शिवसेनाप्रमुख पुण्याला गेले असता त्यांच्या निवासस्थानासमोर पत्रकारांनी धरणे धरले. त्यांनी शिवसेनाप्रमुखांबरोबर चर्चा करण्यास नकार दिला. या सर्व प्रकाराने शिवसेनाप्रमुख चिडले आणि त्यांनी जाहीर केले की, माझी पत्रकारांशी दुष्मनी नाही, परंतु मी अनावश्यक दबाव सहन करणार नाही. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने हलकट अग्रलेख लिहिला आहे. अशा प्रकारचे लेख चालू राहिले तर ‘टाइम्स’ची महाराष्ट्रभर विक्री होऊ देणार नाही असा इशारा त्यांनी दिला.
पत्रकारांच्या हल्ल्याचा विषय वर्तमानपत्रांतून अनेक दिवस गाजत राहिला. काहीजण बाजूने होते तर काहीजण पूर्ण विरुद्ध होते. ज्येष्ठ पत्रकार माधव गडकरी म्हणाले, ‘चुकीचं वृत्त प्रसिद्ध करणार्या पत्रकारांची चौकशी होणं आवश्यक आहे.’ दै. ‘शिवनेर’चे संपादक विश्वनाथ वाबळे म्हणाले, ‘शिवसेनाप्रमुखांना कोणीही पत्रकारिता शिकवू नये.’ सुप्रसिद्ध साहित्यिक दुर्गा भागवत म्हणाल्या, ‘एखाद्या नेत्यावर वा पक्षावर पत्रकारांनी बहिष्कार टाकणं हे अयोग्य आहे.’ ज्येष्ठ पत्रकार द्वा. भ. कर्णिक यांनी महाराष्ट्र टाइम्समध्ये लिहिले की, शिवसेनेची महाराष्ट्राला गरज असून ‘बहिष्कार अयोग्य’ आहे तर जयंत साळगावकर यांनी स्पष्टपणे सांगितले की, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्यात शिवसेनेचा मोठा वाटा आहे. ‘समकालीन’ या गुजराती दैनिकाचे संपादक हसमुख शहा यांनीही अशा पत्रकारांना खडे बोल सुनावले. ते म्हणाले, ‘पत्रकार म्हणजे राजा हरिश्चंद्राचे अवतार नाहीत.’
अशा तर्हेमने काही ज्येष्ठ व अभ्यासू पत्रकारांनी शिवसेनेची बाजू घेतली. परंतु तरीही काही शिवसेनाविरोधी उथळ पत्रकारांनी व त्यांच्या वृत्तपत्राने शिवसेनेवरचा बहिष्कार सुरूच ठेवला. दरम्यान, तामिळनाडूमधील मदुराई येथे एका तमिळ वृत्तपत्राच्या पत्रकाराला दिवसाढवळ्या नग्न करून मारहाण झाली. तर उत्तर प्रदेशातील ‘अमर उजाला’ या वर्तमानपत्राच्या एका पत्रकारावर अज्ञात इसमाने गोळ्या झाडून त्याला जखमी केले. या पत्रकारांवरील हल्ल्यांवर शिवसेनाप्रमुखांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘तमिळनाडू आणि उत्तर प्रदेशात पत्रकारांवर हल्ला होऊन देखील पत्रकारांनी जयललिता व मुलायमसिंग यांच्या घरांसमोर धरणे धरले नाहीत आणि निषेधही व्यक्त केला नाही.’ या गांडूंना माझा सलाम!