बाबा… आईचे वडील पांढरे शुभ्र धोतर सदरा अन् गुलाबी रंगाचा पाल्कुर पटका घातलेले बाबा शेकडोंच्या गर्दीत उठून दिसायचे. चालता चालता छोट्याशा फिरकीच्या पितळी खलबत्त्यातून पान तंबाखू कात चुना सुपारी टाकून पान वाटून घ्यायची अन् चालता चालता वाटून बारीक झालेलं पान तोंडात टाकतानाची बाबांची ती दिमाखदार पाल्कुर पटक्यातली लकब खरंच बघण्यासारखी… फोटो खरंच काढायला हवा होता. पण हे मोबाईल प्रकरण कुठे होतं तेव्हा…
मला आठवत नाही केव्हापासून… पण बाबा सोबत होते… आहेत… राहतील…!!
…शाळेत पहिल्या दिवशी नाव घालायला गेल्यावर मुख्याध्यापकांनी विचारले मुलीच्या पालकांचे नाव सांगा.
बाबा चळबळले, ‘पालक म्हणजे?’
मुख्याध्यापक काहीसे घुश्शातच, ‘अहो म्हणजे मुलीचे पालनपोषण, सांभाळ कोण करतंय… आजोबा म्हणाले मीच की…
मुख्याध्यापक : काय नाव तुमचं?
बाबा : दगडूराव.. लिहा… सुषमा दगडूराव अंधारे!!!
माझ्या शिक्षणाला घरात विरोध होता. बाबा ठामपणे पाठीशी उभे राहिले.
रहायला डोक्यावर नीटसं छप्पर नव्हतं. जागा गावच्या पाटलाने सहानुभूतीपोटी गोठ्याला लागून दिलेली. पाटलांच्या चिरेबंदी वाड्याच्या एका भिंतीचा आधार घेत कोटा उभा केलेला… आईने कुणा कुणाच्या शेतात काम करून तुराट्याचे भारे आणले अन् तीन भिंतींचा कुड उभा राहिला… आत तीन दगडाची चूल…
बाबा आठवडी बाजारात बैलांची शिंगं तासण्याची कामं करायचे. गाई, म्हशी, बैल यांच्या खुर, नख्या काढणं. शिंगांना शेंब्या बसवणं हे एक कलाकुसरीचं काम. शिंगं सुबक आकार देऊन ऐटदार अन देखणी बनवणं हे काम तसं जोखमीचं… कारण दीड दोन क्विंटलचा बैल उधळला तर पायखाली तुडवले जाण्याची किंवा शिंगं पोटाबिटात घुसण्याची भीती. पण बाबा तन्मयतेने हे काम करायचे. तालुक्यातील प्रत्येक गावच्या पाटलाची बैलजोडी ऐटबाज दिसायची, कारण बाबांचा कलाकुसरीचा हात त्यांच्या शिंगावरून फिरलेला असायचा…
बाजारदिवस नसेल तेव्हा शेतात मोलमजुरीची कामं.. अधूनमधून लग्नमुंजीत सहभाग. लग्नमुंजीतलं बाबांना येणारं निमंत्रण हे मानाचं असायचं. कारण बाबा जातपंचायतीतील एक महत्वाचे पंच.
पंचायतीतले त्यांचे युक्तिवाद कबिरांच्या दोह्यांनी काठोकाठ भरलेले असायचे. माझ्यावर संत कबीरांचा प्रभाव असण्याचं हे महत्त्वाचं कारण आहे.
रूढार्थाने देवीदेवतांना बाबांनी कधी नमस्कार केल्याचं आठवत नाही. घरात मामीने कधी अशा पूजा मांडल्या, तरी बाबा ओरडायचे. ओरडतानाही, ‘जत्रा में बिठाए फत्रा, तीरथ बनाए पानी…’ हा कबिरांचा दोहा सांगत ओरडायचे.
जातपंचायती किंवा लग्नकार्यात ते ठरवून मागे लांब बसायचे अन् मग कुणा ज्येष्ठ वयोवृद्धाने हे चित्र बघितलं की ते बाबांना सन्मानाने उठवून पुढे नेत. मी बाबांनी विचारायची, बाबा लोक तुम्हाला मान देतात, मग आधीच का बरं पुढं जाऊन बसत नाहीत? उगाच खोळंबा होतो सगळ्यांचा. यावर बाबांचा ठरलेला दोहा असायचा, ऐसी बात बोलो कि कोई न बोले झूठ, ऐसी जगह बैठो कि कोई न बोले ऊठ…!!
रझाकाराच्या काळात रोहिले कापल्याच्या आठवणी बाबा सांगत. उस्मानाबादमधला नळदुर्गचा किल्ला अन त्याच्याशी निगडित मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या आठवणी… पण बाबा स्वातंत्र्यसैनिक म्हणून लाभार्थी कधी झाले नाहीत; किंबहुना त्यांनी तसा प्रयत्नही कधी केला नाही.
बाबा तसे दूरदृष्टीचे. शाळेची एकही इयत्ता न शिकलेले बाबा व्यवहारज्ञानात मात्र कुशल… घरात हातातोंडाचं भांडण संपत नव्हतं. आई संसाराचा जाडजोड करायला पहाटे चारपासून रात्री उशिरापर्यंत काबाडकष्ट करायची. घरात काहीच उत्तम नव्हतं पण तरीही बाबांनी मोठ्या मामाचं नाव उत्तमराज ठेवलं. उत्तमराज मामा, ज्यांना आम्ही आदराने अण्णा म्हणतो, ते शिकले, पदवीधर झाले. दोन तीन सरकरी नोकर्या सोडल्या अन् काही वर्षापूर्वी ते मंत्रालयातून अवर सचिव पदावर सेवानिवृत्त झाले.
बाबा छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधणारे. चिखलमातीच्या भिंतीचं हक्काच्या जागेत घर बांधलं, तेव्हा अशा घरात लाईटचं कनेक्शन घेतलं, तेव्हा ६० वॉटच्या बल्बाचा उजेड बघत, ‘लेकरांमुळे घरात रामराज्य आलं’ हे वाक्य उच्चारताना केवढा आनंद होता त्यांच्या चेहर्यावर…
बाबांच्या आईचा अंत्यसंस्कार एका गावात केला. बाबांचे वडील दुसर्या गावात… आता बाबांची समाधी तिसर्याच गावात… जगण्याची सगळी चित्तरकथा..!
आज सगळे स्थिरस्थावर आहेत. सगळी नातवंडं सन्मानाने कष्टाची भाकरी कमवून खाताहेत. विविध क्षेत्रात प्रत्येकाने स्वतःची अशी ओळख निर्माण केलीय. पण कष्टात राबलेले बाबा आता हे सगळे वैभव बघायला नाहीत.
बाबा मला रुबाब म्हणायचे. त्यांच्या मते मी त्यांचा रूबाब होते. माझ्या शिक्षणाचं केवढं कौतुक होतं त्यांना!!
आज खरोखरच रुबाब बघायला बाबा हवे होते…