संतांचे भांडण एका अराजकाशी होते. ते कुठल्या धर्माविरोधी नव्हते. मुळात सगळ्याच थोर माणसांना त्यांच्या तथाकथित स्वकीयांनीच छळले आहे. संताचा संघर्ष हा कु-प्रवृत्तीशी होता. मग तो स्वधर्मीय असो की परधर्मीय. हा लढा समजून न घेतल्यामुळे बहुजनांचे वाटोळे झाले आहे. वारकरी चळवळ ही समतेची, सहिष्णुतेची चळवळ होती हे आपण विसरून गेलो आहे.
– – –
सध्या सुषमा ताईंचा एक व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होतोय. त्या दिंडीतील वारकऱ्यांसाठी पोळ्या लाटताहेत वगैरे. तसे पाहिले तर ही एक खूप साधीशी घटना आहे. दिंडीतील वारकर्यांना जेवू घालणे, त्यांना दंडवत करणे ही आपली, इथल्या मातीची परंपरा आहे. या वारकर्यां मध्ये आपण श्री विठ्ठल पाहात असतो. माऊलीच्या दर्शनाला जाणार्याला नमन करणे म्हणजे माऊलीला नमन करणे असते. खेळ मांडियेला वाळवंटी घाईचा आशय हा आध्यात्मिक लोकशाहीचा आहे. त्या आध्यात्मिक लोकशाहीचे रुपांतर सार्वत्रिक, सामाजिक, आर्थिक लोकशाहीत करणे ही आपली जबाबदारी आहे असे आपण मानतो का, हा खरा प्रश्न आहे.
अंधारे यांनी पोळ्या लाटल्या, ही एक घटना आहे. त्याकडे आपण कसे बघतो? त्यात काही लोकांना राजकारण दिसते. काहींना तथाकथित सनातन धर्माचा विजय दिसतो. काही म्हणतात, या बाईने हिंदू धर्मातील देवदेवतांना शिव्या दिल्या, ती आता पोळ्या लाटतेय. अजूनही बर्याच कुत्सित प्रतिक्रिया आहेत. या प्रतिक्रियांची चिकित्सा कशी करावी हा खरा प्रश्न आहे. तूर्तास बाई या राजकारणाचा भाग म्हणून कोणाच्या तरी संतुष्टीकरणासाठी पोळ्या लाटत आहेत, असे गृहीत धरूयात. त्या राजकारणात आहेत हे वेगळे सांगायची गरज नाही. त्या वेगवेगळ्या सभांमधून दादा, भाऊ वगैरे भाषेत काय बोलतात, हेही सगळेच बघतात. या निमित्ताने माझा प्रश्न हा तथाकथित वारकरी मानसिकतेचा आणि स्त्रियांकडे आपण कसे बघतो, याचा आहे.
१. अंधारे यांना काही लोक म्हैस म्हणतात. यात एकप्रकारे ‘मादीपण’ हे किती वाईट आहे याचाच संकेत मिळतो. जे मनूने आपल्यात रुजवले आहे.
२. त्या हिंदू देवतांचा अपमान करतात, अशीही एक ओरड असते. तिला आणखी आवाजी स्वरूप दिले जाते. कारण हा मार्ग सोपा असतो. धर्म ही अफूची गोळी असते, असे म्हणणारा कार्ल मार्क्स पुन्हा आठवतो. तुम्हाला सत्ता मिळवायची असेल तर लोकांमध्ये धार्मिक भांडणे लावून दिली की मार्ग सोपा होतो.
३. चिकित्सा म्हणजे अवमान, असे आपण का समजतो? चिकित्सा संतांनी केली नाही का? देवा तुझा मी महार, म्हणणारा चोखोबा चिकित्सा करत नव्हता का? याती हीन माझी देवा, न घडे तुझी सेवा, हा चोखोबाने केलेला प्रश्न आहे, असे तुम्हाला वाटत नाही का?
४. ज्ञानेश्वर माऊलींनी रेड्याच्या तोंडून वेद बोलवले, यावर आजही तुमची श्रद्धा आहे का? सृष्टीच्या उद्यापासून कुठलाही प्राणी आजवर मानवी भाषेत बोलला नाही, त्याचा पुरावा नाही, मग हा रेडा कसा बोलला?
निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई या भावंडांनी भिंत कशी चालवली? कोणीतरी सांगितली, गतानुगतिक आणि सिनेमात दाखवली म्हणून आपला त्यावर विश्वास आहे का?
आपला किमान बुद्धिप्रामाण्यावर विश्वास असेल तर हे आपल्याला पटते का?
चमत्कार दाखविल्याशिवाय संतांना मोठेपण येत नाही का?
मानवी संवेदनेच्या परिप्रेक्ष्यात आपण संतांना समजून घेऊ शकत नाहीत का?
असे कितीतरी प्रश्न आहेत. या प्रश्नांची चिकित्सा जाहीरपणे करणे म्हणजे संताचा अपमान करणे, हिंदू देव देवतांचा अपमान करणे येवढे बुद्धिभ्रष्ट आपण कधी झालो?
अंधारे बाईच नव्हे तर मीही म्हणतो की ही भिंत, हा रेडा हा सगळा भंपकपणा आहे. एवढेच नाही तर हे सनातनी कारस्थान आहे. ज्याचे आपण बहुजन कायम बळी आहोत. ज्या चुका या महान संतांनी केल्या नाहीत, त्या आपण करत आहोत. संत विशुद्ध मानवतावादी होते, आपण त्यांना भ्रष्ट करत आहोत.
५. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, असं बोलणारा तुकोबा नेमका कोण होता? खरोखरच इंद्रायणीने त्याच्या अभंगाच्या वह्या तारल्या की जनगंगेने तारल्या? तुकोबांच्या वह्या इंद्रायणीने तारल्या असे आपण म्हणत असू तर तुकोबा मोठा की इंद्रायणी? असे मानणे म्हणजे मंबाजी होणे असे आपल्याला वाटत नाही का?
तुकोबांच्या सदेह वैकुंठाला जाण्याची चिकित्सा आपण कधी केली का? खुनाचा पुरावा नष्ट करणे, या सदरात आपण या घटनेकडे पाहू शकत नाही का?
इथे पुन्हा तोच प्रश्न. तुकोबांना जे काही सोसावे लागले, तो कशाचा परिणाम होता? चिकित्सक असण्याचा की आणखी कशाचा?
आपण हे विसरतो की आपली सगळीच संत परंपरा ही चिकित्सक परंपरा आहे. तिला मांडणे म्हणजे कोणाचा अवमान नाही (मला इथे कोणाचे लटके समर्थन करायचे नाहीये किंवा कुठे माझे राजकीय हितसंबंध देखील नाहीत).
६. संत परंपरेचा पूर्ण आदर ठेवून मांडणी करणारी चिकित्सेची एक प्रबोधन परंपरा आपल्याकडे आहे. दुर्दैवाने तिचा कायम विसर आपल्याला पडतो. विचारांची ती बाजूच आपल्याकडे नसते. कारण आपल्यावर जे ‘चमत्कारिक’ बिंबवले गेले आहे त्याचे ‘पिढीजात संमोहन’ आपल्यावर आहे.
कोणाला हे विधान उगाच धाडसाचे वाटेल. मग मी देखील संताचा अपमान केला असे कोणी म्हणेल. जोतीराव फुले, बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड असे थोर लोक मला संताइतकेच महान वाटतात. मानवमुक्तीचा, दुःखाचा शोध ज्यांनी घेतला, त्यासाठी माणसे जमवली, माणसांचा मेळा केला. आपल्या संत परंपरेच्या प्रबोधनाचा हा दुसरा महत्वाचा कृतिशील टप्पा होता. ‘…त्याची भगवंताच्या मूर्ती’ असे म्हणून माणसात देवत्व शोधणारा तुकोबा आणि ‘मानवाचा धर्म सत्य आहे एक, भांडणे अनेक कशासाठी’ असा प्रश्न करणारा जोतिबा वेगळे आहेत का? बाबासाहेब आंबेडकर यांना संताचा समतेचा जो आशय कळला, तो आपण नाही समजून घेऊ शकत का? कबीराने जे विशुद्ध मानवतावादी तत्वज्ञान ईश्वराला साक्षी ठेवून मांडले ते आपण नाही समजून घेऊ शकत का? ‘कहत कबीर’ ही एक जगण्याची परिभाषा आहे, जी नाही आकळली आपल्याला. ‘तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी’ या पासून किती किती दूर गेलो आपण?
७. संतांचे भांडण एका अराजकाशी होते. ते कुठल्या धर्माविरोधी नव्हते. मुळात सगळ्याच थोर माणसांना त्यांच्या तथाकथित स्वकीयांनीच छळले आहे. संताचा संघर्ष हा कु-प्रवृत्तीशी होता. मग तो स्वधर्मीय असो की परधर्मीय. हा लढा समजून न घेतल्यामुळे बहुजनांचे वाटोळे झाले आहे. वारकरी चळवळ ही समतेची, सहिष्णुतेची चळवळ होती हे आपण विसरून गेलो आहे. भंपक सनातनी लोकांनी ही चळवळ हायजॅक केली आहे, हे अजूनही आपल्याला कळत नाही.
देव्हार्यात तुकोबांची गाथा आणि हरिपाठ ठेवून हे प्रश्न मिटणार नाहीयेत हे जाणत्या लोकांनी ध्यानी घ्यावे. संतांच्या ओवी अभंगातला केवळ अध्यात्मिक आशय लक्ष्यात घेऊन हा प्रश्न मिटणार नाही तर त्यातला सामाजिक सांस्कृतिक आशय प्रकर्षाने ध्यानी घ्यावा लागणार आहे.
तद्दन सुमारीकरणाकडे आपण प्रवास करत आहोत. सवंग सत्तावादी राजकारणासाठी धर्माचा वापर करणार्यांचा आपण निषेध करायला हवा. कोण नेता दिंडीत किती पायी चालला, कोण अधिकारी सायकलवर दिंडीत आला याला महत्व देणारे आपण, संतांचे मोठेपण नाही समजून घेऊ शकणार.
माझिया जातीचा मज भेटो कोणी, इथे जातिव्यवस्था नाही तर मानवी मूल्याची व्यवस्था आहे, हे ध्यानात घ्यायला हवे.
नासलेला, दुभंगलेला समाज जोडण्याचे कार्य आपल्या संतांनी केले, त्यांच्या नावाने समाज नासवण्याचा, भेद करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिलाय, हा प्रश्न विचारण्याचे धाडस करणारा हाच खरा संताचा पाईक असू शकतो, हे ठणकावून सांगण्याची वेळ फार पूर्वीपासूनच आहे. आता तरी सावध व्हावे.