‘कर्मा कॉलिंग’ बघण्याचं एकमेव कारण केवळ रविना टंडन हेच असू शकतं. जवळपास पन्नाशीला आलेल्या रविनाचं सौंदर्य प्रेक्षकांना अजूनही भुरळ पाडतं. तिचा वावर संपूर्ण स्क्रीन व्यापून टाकतो. रविना ज्या ज्या प्रसंगात दिसते तिथून तिच्यावरची नजर हटत नाही. आपल्या सौंदर्याने, अभिनयाने, संवादफेकीने रविना इंद्राणी कोठारी जिवंत करते. ‘अलिबागची राजमाता’पेक्षा ‘अलिबागची राणी’ म्हणून ती जास्त शोभून दिसते.
– – –
ओटीटी माध्यम भारतात आल्यापासून इथल्या मनोरंजन क्षेत्रात अनेक संधी निर्माण झाल्या. मूठभर लोकांच्या हातात असलेल्या या क्षेत्रामध्ये लक्षणीय वाढ झाली. विस्मृतीत गेलेले अनेक अभिनेते, अभिनेत्री, तंत्रज्ञ पुन्हा मुख्य प्रवाहात सामील झाले. गेल्या कित्येक वर्षांपासून अज्ञातवासात गेलेल्या कलाकारांनी दमदार पुनरागमन केलं. ‘आश्रम’ या छोटेखानी वेबसिरीजमधून पुन्हा प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवणार्या बॉबी देओलसारख्या अभिनेत्याचं उदाहरण आपल्यासमोर आहेच. आपला काळ गाजवणार्या माधुरी दीक्षित, सुनील शेट्टी, काजोल, विवेक ओबेरॉय, सुश्मिता सेन अशा अनेक कलाकारांची पडद्यावर घरवापसी झाली. यातलंच एक नाव आहे रविना टंडन या नव्वदीचं दशक गाजवणार्या अभिनेत्रीचं. ‘आरण्यक’ या नेटफ्लिक्सवरील वेबसिरीजमधून २०२१मध्ये ओटीटी माध्यमावर पदार्पण करणार्या रविनाला प्रेक्षकांची पसंती तर मिळालीच, शिवाय सर्वोत्तम अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कारही तिने पटकावला. त्यानंतर रविनाने मागे वळून पाहिलं नाही. नुकतीच तिची ‘कर्मा कॉलिंग’ ही नवी वेबसिरीज डिज्नी हॉटस्टारवर प्रदर्शित झाली आहे.
अरबी समुद्राच्या किनारी वसलेल्या अलिबागमध्ये या सिरीजचं कथानक घडतं. इंद्राणी कोठारी (रविना टंडन) ही ‘अलिबागची राजमाता’ म्हणून ओळखली जाते. कोठारी कुटुंब हे अलिबागमधलं मोठं प्रस्थ मानलं जातं. ‘कायदे हे जनतेसाठी असतात, राजांसाठी नव्हे’ अशी इंद्राणीची विचारसरणी असते. तिच्या मर्जीशिवाय अलिबागमध्ये काहीही करणं अशक्य असताना कर्मा तलवार (नम्रता शेठ) ही तरूणी कोठारींच्या बंगल्याला लागून असलेला ‘आशियाना’ हा बंगला काबीज करण्यात यशस्वी होते. खरं तर डॉली
भाटीया (वलुशा डिसूजा) या इंद्राणीच्या जवळच्या मैत्रिणीचा बंगला असूनही कर्मा तो स्वत:च्या नावे करते आणि तिथे आपलं बस्तान बसवते. इंद्राणीच्या एका पार्टीत तिचा मुलगा अहान (वरूण सुद) कर्माला भेटतो. अहानला त्याची कारकीर्द स्वत:च्या मेहनतीने घडवायची असते. परंतु ‘कोठारी’ या आडनावाच्या ओझ्याखाली तो दबलेला असतो. कर्माने कमी वयात मिळवलेल्या यशाने अहान तिच्यावर भाळतो. आधीच इंद्राणीच्या निशाण्यावर असलेली कर्मा तिला आणखी खुपू लागते. परंतु कर्माचा भूतकाळ इंद्राणी आणि तिच्या जवळच्या लोकांमुळे कलुषित झालेला असतो. झेन खान (विराफ पटेल) या मित्राच्या मदतीने कर्मा आपल्या भूतकाळातील अन्यायाचा सूड उगवण्यासाठी इंद्राणीच्या परिवाराच्या निकट जाण्याच्या प्रयत्नात असते. इंद्राणीही कर्मावर प्रतिवार करण्याची संधी शोधत असते. यानंतर या दोघींमधला उफाळणारा संघर्ष सात भागांच्या या सिरीजमध्ये दाखवला जातो.
२०११ साली प्रसारित झालेल्या ‘रिवेंज’ या अमेरिकन सिरीजची ‘कर्मा कॉलिंग’ ही अधिकृत भारतीय आवृत्ती आहे. सध्या याचा पहिला सीजन प्रदर्शित झाला असला तरी मूळ सिरीजचे चार सीजन प्रसारित झाले होते. त्यामुळे या सिरीजचेही भविष्यात आणखी सीजन येण्याची शक्यता आहे. कथेचा पसारा मोठा असल्याने या सीजनची कथा अर्थातच पूर्णत्वास गेलेली नाही. त्यामुळे या सीजनमध्ये बरेचसे प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत. पण हा सीजन पाहिल्यानंतर प्रेक्षकांना पुढचा सीजन पाहण्याची कितपत उत्सुकता असणार आहे इथेच खरी मेख आहे.
रूची नारायण यांनी ‘रिवेंज’च्या या भारतीय आवृत्तीची पटकथा लिहिली आहे. याशिवाय सिरीजचं दिग्दर्शनही त्यांचंच आहे. ओटीटी हे लेखकांचं माध्यम आहे असं म्हटलं जातं. कारण जवळपास सात ते आठ भागांत तुम्ही कथा सांगणे अपेक्षित असल्याने लेखकाला प्रत्येक व्यक्तिरेखेच्या मानसिकतेत डोकावण्याचा पुरेसा वेळ मिळतो. एखादी व्यक्तिरेखा विशिष्ट प्रकारे का वागते याचा पुरेसा संदर्भ देता येऊ शकतो. परंतु ‘कर्मा कॉलिंग’मध्ये असं काही घडताना दिसत नाही.
सिरीजमधील ‘कर्मा’ ही मुख्य व्यक्तिरेखाच तकलादूपणे लिहिली गेली आहे. तिच्या भूतकाळातील ठराविक प्रसंग वारंवार दाखवून तिच्या सूड घेण्याच्या हेतूचं समर्थन केलं जातं. परंतु प्रेक्षकांपर्यंत त्यामागची भावना पोहोचत नाही. भावनिकरित्या प्रेक्षक कर्माच्या व्यक्तिरेखेशी जोडले न गेल्याने तिच्या सुडाचा एकूणच प्रवास नीरस वाटतो. ज्या व्यक्तिरेखेवर सूड उगवला जात आहे त्याचा वाईटपणाही सखोलपणे पडद्यावर येत नाही. त्यामुळे प्रेक्षकांना ना त्या व्यक्तिरेखेचा राग येतो, ना त्यांना कर्माबद्दल आत्मीयता वाटते. आपल्या शत्रूंना नामोहरम करण्यासाठी कर्माला फार कष्ट घेण्याचीही गरज दिसून येत नाही. कारण तिचे शत्रू आपसूकच तिच्या जाळ्यात अडकताना दाखवले जातात. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता टिकवून ठेवणे जिकरीचे बनते. इंद्राणी आणि तिच्या जवळच्या लोकांना धडा शिकवण्यासाठी अलिबागमध्ये दाखल झालेल्या कर्माला जेव्हा झेन खान मदत देऊ करतो, तेव्हा ती आत्मविश्वासाने त्याला नकार देते. परंतु नंतर मात्र तिच्या सुडाची सगळी योजना त्याच्यावरच अवलंबून असलेली दिसून येते. त्यामुळे झेन खान नसताना कर्मा नक्की काय करणार होती असा प्रश्न निर्माण होतो. इंद्राणीला जेव्हा कधी कर्माचा संशय येतो तेव्हा एखाद्या मोठ्या प्रस्थाशी कर्माची ओळख असल्याचं दाखवलं जातं. परंतु अगदी अलीकडच्या काळापर्यंत आयुष्यात काहीच ठोस न केलेल्या कर्माकडे अचानक इतकी संपत्ती कुठून येते आणि मोठमोठ्या प्रसिद्ध लोकांशी तिच्या ओळखी कशा होतात याचं कसलंच स्पष्टीकरण प्रेक्षकांना मिळत नाही. कर्मा आणि अहान यांच्या नात्यातही धरसोड वृत्ती दिसून येते. त्यामुळे त्यांचं नातं भावनिक पातळीवर प्रस्थापित होऊ शकत नाही.
सिरीजमधली दुसरी महत्वाची व्यक्तिरेखा अर्थातच इंद्राणी कोठारीची आहे. या व्यक्तिरेखेतही बरेच कच्चे दुवे आढळून येतात. ‘अलिबागची राजमाता’ हे बिरूद मिरवणार्या इंद्राणीला तिच्या नजरेसमोर असणारा ‘आशियाना’ बंगला कर्मासारखी बाहेरची व्यक्ती घेत आहे याची खबर लागत नाही हे अनाकलनीय वाटते. इंद्राणीचा नवरा कौशल (गौरव शर्मा) बराच काळ तिची फसवणूक करत असतो हेही तिच्या लक्षात येत नाही. ही फसवणूक उघड झाल्यानंतरही तिच्याकडून फारशी प्रतिक्रिया येत नाही. खरं तर तिच्यासारख्या बेधडक व्यक्तिरेखेपासून अशावेळी प्रखरतेने व्यक्त होण्याची अपेक्षा होती. यातून तिच्या व्यक्तिरेखेच्या लिखाणातील विसंगती दिसून येते. कर्माबद्दलची माहिती मिळवण्यासाठी ती एकाच व्यक्तीवर अवलंबून राहाते. अलिबागमध्ये मोठमोठ्या पार्ट्या आयोजित केल्यामुळे इंद्राणी लोकप्रिय असते असा एक आभास निर्माण केला जातो. परंतु त्याव्यतिरिक्त तिची ओळख काय ते प्रस्थापित होत नाही. एक कणखर व्यक्तिमत्व म्हणून इंद्राणीची व्यक्तिरेखा उभी करण्यात पटकथा अपयशी ठरते असं जाणवतं.
पूर्वा नरेश यांनी सिरीजचे संवाद लिहिले आहेत. अलिबागमधील एका मराठी कुटुंबातील मुलगा एका प्रसंगात आपल्या वडिलांना ‘बाबा काय झाला?’ असा प्रश्न विचारून मराठी असल्याचा दाखला देण्याचा प्रयत्न करतो. खरं तर हे कुटुंब मराठी दाखवण्याचं प्रयोजन काय तेच लक्षात येत नाही. हे कुटुंब नखशिखांत कर्जात बुडालेलं आहे असं त्यांच्या वागण्या-बोलण्यावरून कुठेही जाणवत नाही. या कर्जाचा पुढे कुठे संदर्भही येत नाही. उच्चवर्गातील बरेचसे संवाद थेट इंग्रजीमध्ये बोलले जातात. सिरीजची सर्वात कमकुवत बाजू म्हणजे एखाद्या मालिकेप्रमाणे यातील प्रसंगांची योजना केली गेली आहे. साधारणपणे ओटीटीवर ‘ड्रामा’ चालतो आणि टीव्हीवर ‘मेलोड्रामा’ चालतो असं म्हटलं जातं. पण या सिरीजमधले अनेक प्रसंग ‘मेलोड्रामा’चं अधिक प्रदर्शन करतात. त्यामुळे बरेचदा आपण ओटीटीवरील वेबसिरीज पाहतोय की टीव्हीवरील एखादी मालिका पाहतोय असा संभ्रम निर्माण होतो. कथेतील व्यक्तिरेखा एकमेकांवर सतत कुरघोडी करत असतात तरीही पाहतांना मात्र सगळं नीरस, एकसुरी आणि रटाळ वाटत राहतं. याचा दोष कमकुवत दिग्दर्शनाला द्यायला हवा.
कर्मा तलवार ही मध्यवर्ती भूमिका साकारणारी अभिनेत्री नम्रता शेठ अजिबातच व्यक्तिरेखेची लय पकडू शकलेली नाही. कर्माची सूड घेण्याची उर्मी, इंद्राणीबद्दलचा तिरस्कार आणि तिला धडा शिकवण्याची अस्वस्थता तिच्या चेहर्यावर दिसून येत नाही. संपूर्ण सिरीजमध्ये तिचे हावभाव एकसुरी वाटतात. संवाद म्हणतानाही आवाजातील चढउताराचा वापर न करता एकाच पट्टीत ती संवाद बोलत राहते. त्यामुळे प्रसंगाचं गांभीर्य निर्माण होऊ शकत नाही. सिरीजचे इतर सहकलाकारही फारसा प्रभाव पाडू शकत नाही.
तांत्रिकदृष्ट्या सिरीज बर्यापैकी कामगिरी करते. खासकरून वेशभूषा, रंगभूषा आणि प्रॉडक्शन डिझाईन विशेष लक्षात राहतं. सिरीजचं छायाचित्रण मात्र टीव्हीवरील मालिकांची आठवण करून देतं. तसेच संकलनातही सिरीजची लांबी कमी करण्यासाठी प्रयत्न करायला हवा होता असं जाणवतं.
‘कर्मा कॉलिंग’ बघण्याचं एकमेव कारण केवळ रविना टंडन हेच असू शकतं. जवळपास पन्नाशीला आलेल्या रविनाचं सौंदर्य प्रेक्षकांना अजूनही भुरळ पाडतं. तिचा वावर संपूर्ण स्क्रीन व्यापून टाकतो. रविना ज्या ज्या प्रसंगात दिसते तिथून तिच्यावरची नजर हटत नाही. आपल्या सौंदर्याने, अभिनयाने, संवादफेकीने रविना इंद्राणी कोठारी जिवंत करते. ‘अलिबागची राजमाता’पेक्षा ‘अलिबागची राणी’ म्हणून ती जास्त शोभून दिसते. तिची व्यक्तिरेखा सदोष असतानाही रविना ते जाणवू देत नाही. तिच्या अभिनयातील वैविध्याने तिच्यातील आणि इतर अभिनेत्यांतील फरक आणखी ठळक होतो. इंद्राणीचा राजेशाही रूबाब रविनाच्या मोहक अदाकारीमुळे विश्वसनीय वाटतो. त्यामुळे केवळ रविनाच्या ‘कर्मा’वर ही सिरीज टिकलेली आहे यावर शिक्कामोर्तब होतं.