ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपवासी झाल्याच्या धक्क्यातून माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या अजून सावरलेला नाही. त्याच्या स्वप्नातही हातात कमळ घेऊन पंतप्रधान मोदींची आरती करताना अशोकराव त्याला दिसतात. मला त्याने हे सांगताच तू खुद्द अशोकरावांना भेटूनच हे सांग आणि तुला पडलेले प्रश्नही त्यांना विचार, असा सल्ला देऊन मी त्याला पिटाळले. त्या दोघांच्या भेटीतील ही प्रश्नोत्तरे…
– नमस्कार अशोकराव.
– नमो नम:
– च्यामारी, खूपच बदल झालाय तुमच्यात.
– हे बघ पोक्या, माझे तू पाहिलेले ते पूर्वीचे दिवस विसर. तू तेव्हा माझा चांगला मित्र होतास. आपण मुंबईत केलेल्या पार्ट्या, आलिशान बंदिस्त जागेत माझ्या जवळच्या मित्रांसोबत रंगलेल्या चिंब मैफली, मनमोकळ्या गप्पा हे सारं आता विसर. माझे पूज्य पिताजी शंकरराव यांच्या कडक शिस्तीच्या दबावाखाली गुदमरून गेलेला मी मुख्यमंत्री झालो तरी तुझ्यासारख्या ठरावीक मित्रांबरोबर मोकळा श्वास घेत होतो. आपण जेवढी मजा केली तेवढी कुठल्याच मुख्यमंत्र्याने केली नसेल. अगदी सुशीलकुमारांनी सुद्धा. कसं असतं पोक्या, माणसाला एखादं सत्तापद चिकटलं की तो कसा बहकत जातो याचं आदर्श उदाहरण म्हणजे माझा राजकीय प्रवास. तुला तर सगळंच माहीत आहे. सत्ता प्रवासात, जीवन किंवा प्रेमप्रवासात काही अपघात नकळत तर काही जाणूनबुजून घडतात. आपणच त्याला जबाबदार असतो.
– हे तर तुम्ही एखाद्या तत्त्ववेत्त्यासारखं किंवा महान योग्यासारखं साक्षात्कार झाल्याप्रमाणे बोलायला लागलात. एकदम असा बदल कसा काय झाला तुमच्यात?
– ते तुला नाही कळायचं. एकदा एखादा कलंक एखाद्यावर लागला की तो कुठल्याही वॉशिंग मशीनमध्ये धुतला, तरी जात नाही.
– मग तुम्ही का गेलात या भाजपच्या महाकाय वॉशिंग मशीनमध्ये? मला तर तुम्ही हातात कमळाचं फूल घेऊन आरती करताना दिसलात पंतप्रधानांची.
– तू म्हणतोस ते सत्य आहे. कमळात अडकलेल्या भुंग्यासारखी माझी अवस्था झाली होती. त्या पांढर्याशुभ्र श्वेतपत्रिकेमध्ये माझ्यासारख्या आदर्श पुरुषाचं काळ्या अक्षरातील ठसठशीत नाव पाहून घाबरगुंडी उडाली माझी. भाजपाच्या विशाल वॉशिंग
मशीनमध्ये घुसळण करून प्रायश्चित्त घेतल्याशिवाय गत्यंतर नाही, अशी खात्री पटली, तेव्हाच मी माझ्या लाडक्या काँग्रेसला सोडचिट्ठी देऊन भाजपमय झालो. त्यांची वॉशिंग मशीन हाऊसफुल्ल झाली असली तरी त्यांनी मोठेपणा दाखवून मला तिच्यात सामावून घेतलं. आज मनावरचं मणामणाचं ओझं हलकं झाल्यासारखं वाटतंय. त्यात मला राज्यसभेची उमेदवारी देऊन मला त्यांनी इतक्या उंचावर बसवलंय की अडगळीत पडत चाललेल्या माझ्यासारख्या नेत्याच्या अंगात आता छप्पन्न हत्तींचं बळ आलंय.
– पण, काँग्रेस संस्कृती आणि भाजप संस्कृती या परस्परविरोधी टोकाच्या प्रवृत्ती आहेत. काँग्रेसमध्ये धर्मांधतेला थारा नाही असा सर्वधर्मसमभाव आणि भाजपात आत्यंतिक टोकाची धर्मांधता. असं असताना तुम्ही एकदम नवा जन्म घेतला असं वाटत नाही तुम्हाला?
– हो. माझा नवा जन्मच आहे हा. सुरवंटाचं जसं फुलपाखरू व्हावं तसा स्वच्छंद अवस्थेत बागडतोय मी आता. पूर्वीचं सारं काही विसरायचं आणि या पुनर्जन्मात भाजपाच्या चरणी जीवन सार्थकी लावायचं असं ठरवलंय मी. मानसोपचारात जुन्या स्मृतींचा विसर पाडण्यासाठी शॉक ट्रीटमेंट देतात. त्याची मला मुळीच आवश्यकता नाही. आता महान योगाचार्य रामदेवबाबा यांच्यामार्फत काही औषधी वनस्पतींच्या सहाय्याने माझ्यावर उपचार करण्याची व्यवस्था दिल्लीवरून करण्यात आलीय. हळूहळू जुनं सगळं विसरून जाईन मी, असा विश्वास वरिष्ठ भाजपा नेत्यांनी व्यक्त केलाय.
– मग आता कोणत्या नव्या सवयी, नव्या प्रथा सुरू करणार आहात?
– सकाळी ध्यानधारणा, भाजपानामाचा जप, कमलपुष्प हाती घेऊन अमित शहा यांनी रचलेली त्यांच्याहून वरिष्ठ नेत्याची महाआरती, त्यांना खमण ढोकळ्याचा फाफड्यासह नैवेद्य दाखवल्यानंतर त्या प्रसादाचं ग्रहण, असा साधारण कार्यक्रम कच्च्या स्वरूपात मी सुरू केलाय. तोच पक्क्या स्वरूपात पुढे चालू राहील. दुपारी परमनन्ट रांगोळीत केळीच्या पानावर सुग्रास शाकाहारी अन्नग्रहण. अन्नसेवन करण्यापूर्वी एक मोठा ग्लास जलजीरा प्राशन.
– हे तुमच्या पूर्वीच्या आहारापेक्षा मिळमिळीत वाटत नाही का?
– मुळीच नाही. त्याशिवाय जेवल्यानंतर शतपावली नव्हे तर सहस्रपावली.
– मग दुपारी वामकुक्षी असेलच.
– मला दुपारी झोपायची सवय नाही. या काळात माझं वाचन, चिंतन, मनन चालू असतं. आता रा. स्व. संघाच्या पूर्वपीठिकेपासून भाजपाच्या उत्तरोत्तर उत्कर्षावर आधारलेली पवित्र ग्रंथसंपदा वाचणं आणि भाजपाचा इतिहास, भूगोल आणि धर्मशास्त्र लवकरात लवकर जाणून घेणं भाजपाश्रेष्ठींनी सक्तीचं केलंय. त्यामुळे भाजपाचं कुळ, मूळ आणि त्यांची भविष्यातील झेप याविषयी मला साग्रसंगीत जाणून घेता येईल. त्याशिवाय सायंकाळी वेळ मिळेल तेव्हा संघशाखेत जाऊन लाठीकाठी फिरवण्याचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्यासही त्यांनी फर्मावलं आहे.
– अहो अशोकराव, लाठीकाठी फिरवून आत्मसंरक्षण करण्याचा काळ केव्हाच गेला. आता पिस्तुलं आणि बंदुका वापरतात. अगदी सत्ताधारी पक्षाचे आमदारसुद्धा. केवढा खूनखराबा झालाय या महाराष्ट्रात गेल्या महिनाभरात. तुम्ही डोळ्याला पट्टी बांधून बसलायत का त्या आंधळ्या धृतराष्ट्रासारखे? हा महाराष्ट्र आता महाराष्ट्र राहिलेला नाही. तो आता गुंडराष्ट्र बनण्याच्या तयारीत नाही, तर तसा बनलाय पोसलेल्या गुंडांमुळे. तुम्ही उगाच वेड पांघरून पेडगावला जाण्याचं नाटक करत असाल तर हा महाराष्ट्र तुम्हाला कधीच क्षमा करणार नाही. मग तुम्ही राज्यसभेत जा नाहीतर कौरवांच्या मयसभेत. महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश आणि बिहार होत चालला असताना तुम्ही नको त्या हुकूमशाही प्रवृत्तींना मिठ्या मारताय. असला मित्र असण्यापेक्षा नसलेला बरा.
– माझं ऐकून तर घे पोक्या.
– काही नको. हा चाललो मी.