□ सर्वोच्च न्यायालयाचा मोदी सरकारला दणका! इलेक्टोरल बॉण्ड रद्द.
■ खरा सर्वोच्च दणका जनतेने द्यायचा आहे, लोकसभेच्या निवडणुकांमध्ये.
□ नार्वेकरांची हास्यजत्रा; राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची.
■ नार्वेकर परफॉर्म करतायत म्हटल्यावर निवांत बसा, मनसोक्त हसा!
□ वादग्रस्त वाढवण बंदराचा मोदींच्या हस्ते भूमिपूजनाचा घाट; पालघर जिल्ह्यात आंदोलन.
■ त्यांना सगळ्या देशभरात सगळीकडे फोटो आणि प्रचारकी भाषणं छापण्यासाठी इव्हेंट हवे असतात… त्यात निवडणुकीचा माहौल आहे. मग आंदोलनांना विचारतो कोण?
□ येरवडा कारागृहात १२ गुंडांची तुरूंगाधिकार्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण.
■ उद्या ते १२ जण भारतीय लाँड्री पक्षात प्रवेश करतील आणि तुरूंगाधिकार्यावर त्यांना सलाम ठोकण्याची वेळ येईल.
□ सत्ताधारी आमदारांवर मिंधेंची १४७ कोटींची खैरात.
■ ही खरी पेन्शन योजना आहे… निवडणूक होऊ द्या, घरीच बसायचं आहे यापुढे.
□ आरटीईमधून खासगी विनाअनुदानित शाळा हद्दपार.
■ मुळात किती खासगी विनाअनुदानित शाळांनी त्या नियमाची अंमलबजावणी करून गरिबांच्या मुलांना प्रवेश दिला होता, हाच एक संशोधनाचा विषय आहे. एक नाटक बंद झालं इतकंच.
□ कुटुंबात मला एकटं पाडलं जातंय – अजित पवार.
■ सगळं कुटुंब सोडून चिखलात उतरायचा निर्णय यांचा आणि आता ही रडारड… नाटकी महानेत्यांच्या महाशक्तीकडे जाताच सगळ्यांचं अभिनयाचं कसब कसं काय बाहेर पडतं देव जाणे!
□ बेकायदा बांधकामांवर ठोस कारवाई न करणार्या महापालिकेला उच्च न्यायालयाने फटकारले.
■ फटकारून काय झाले? बेकायदा बांधकाम पडले? फटकारले हे वाचून आपल्याला जरा बरे वाटले… इतकेच!
□ प्रफुल्ल पटेल यांना टर्म संपण्याआधीच राज्यसभेची उमेदवारी कशासाठी? उलटसुलट चर्चा सुरू.
■ भविष्यातल्या उलथापालथींमध्ये सेटिंग बहाद्दर असणं फार आवश्यक ठरणार आहे…
□ दादा उपचार घ्या… मराठा समाजाची जरांगे यांना हाक.
■ जरांगे पाटलांनी लक्षात घेतलं पाहिजे की जीव पणाला लावण्यासाठी समोर तेवढे संवेदनशील लोक असावे लागतात… हे ब्रिटिशांपेक्षा बदतर लोक आहेत… आता उपोषण सोडा, मैदानात उतरा आणि भामट्यांच्या आश्वासनांवर विसंबून विजयाच्या भ्रमात राहू नका…
□ कुर्ल्यातील वृद्धाचे आरे केंद्र जेसीबीने तोडले.
■ उत्तर प्रदेशातला गावठी आक्रमकपणा मुंबईतही आला… आरेरेरे!
□ माघी गणपतीच्या विसर्जनासाठी ठाणे पालिकेचा नियोजनशून्य कारभार.
■ दोष गणरायांचाच आहे… त्यांनी बुद्धीच दिली नसेल तर उपयोग काय!
□ कुणाकडे किती पैसा, आम्ही आर्थिक सर्वेक्षण करू – राहुल गांधी यांचा केंद्र सरकारला इशारा.
■ गेल्या १० वर्षांत आपण भ्रष्टाचारी देशांच्या यादीत आणखी तळ गाठला आहे आणि सत्ताधारी भाषणं ठोकतात देश भ्रष्टाचारमुक्त केल्याची… यांनी भ्रष्टाचाराला सुव्यवस्था लावून दिली आहे खरंतर… ती उधळायला लागेल.
□ आरक्षणाच्या याचिका हायकोर्टाने फेटाळल्या.
■ कोणत्याही समाजाने यासाठी राजकारणी नेत्यांच्या शब्दांवर, सरकारवर विसंबून गाफील राहून चालणार नाही. न्यायिक अधिष्ठान आहे की नाही, याची खातरजमा केली नाही तर फसगत अटळ आहे.
□ चिपळुणात राणेंच्या गुंडांचा धुडगूस.
■ नुसता गुंडांचा धुमाकूळ असं म्हटलं असतं तरी चाललं असतं… कुणाचे असतील ते सगळ्या कोकणाला आणि महाराष्ट्राला माहिती आहेच.
□ गँगस्टर राकेश शर्मा भाजपात.
■ म्हणजे हिरा कोंदणातच आला म्हणायचा!
□ ऑपरेशन लोटसला केजरीवाल यांचा दणका; विश्वासदर्शक ठरावात आपचा एकही आमदार फुटला नसल्याचे दाखवून दिले.
■ याला म्हणतात जिगर! ब्राव्हो!
□ शेतकर्यांचे आंदोलन चिघळणार; अश्रुधुराच्या हल्ल्यात शेतकर्याचा मृत्यू.
■ शेतकर्यांना चिरडून मारणार्यांनाच जर ते निवडून देणार असतील तर आंदोलनातून साध्य काय होणार?
□ उपर्यांमुळे भाजपमध्ये अस्वस्थता; भाजप नेते माधव भांडारी यांना ५० वर्षांत उमेदवारीच नाही.
■ निष्ठा, शिस्त वगैरे म्हणतात त्यांच्यात या भंपकपणाला!
□ ज्यांना सगळे मिळाले, ते पक्ष सोडून गेले – अशोक चव्हाणांचे नाव न घेता काँग्रेसच्या खरगे यांची टीका.
■ त्यांना सगळे देताना हा विचार करायला हवा होता. आता उपयोग काय?
□ पोलिसांच्या संरक्षणातच पहाटेपर्यंत डान्स बारचा धिंगाणा – विजय वडेट्टीवार यांचा आरोप.
■ पोलिसांचं संरक्षण नसेल तर एकही बार ठरल्या वेळेपलीकडे चालू शकेल काय?
□ ९०० खासगी शाळांतील शिक्षकांना मान्यता नाही.
■ विद्यार्थ्यांना मान्यता आहे ना! त्यांचं नुकसान होईल उगाच.
□ अरबी समुद्रातील इंधन तस्करीला अलिबाग, बेलापूरमधून राजकीय वरदहस्त.
■ राजकीय वरदहस्ताशिवाय इंधन तस्करी होईल का?
□ मोदी सरकारची ‘अग्निवीर’ योजना बड्या उद्योजकांसाठी.
■ मोदी सरकारचं ब्रीदवाक्यच सर्व काही बड्या उद्योजकांसाठी हेच आहे… ते त्यांचेच चौकीदार आहेत.