(उमेदवार सूचक मंडळाचं कार्यालय. ‘येथे संबंध जुळवून मिळतात,’ ‘निवड नेत्याची, उमेद विजयाची,’ ‘ताजे नवेकोरे, भक्त, विभक्त, मुक्त, मुरलेले, उरलेले उमेदवार मिळण्याचे हक्काचे ठिकाण’ वगैरे फलक बाहेर लागलेले. आत काउंटरवर एक सुंदर ललना बसलेली. तिच्या मागे आकर्षक कपाटावर फाईलबंद बायोडेटा वर्गवारीनुसार लावलेले. तिथे अधीर, बंदढेकर, बालिश, अर्धेन्द्र, नि त्यांची करंगळी पकडून मिळ्मिळिष येतात.)
अधीर : (अर्धा अधिक वाकत) नमस्कार मॅडम!
ललना : नमस्कार सर! मी सुविधा! आपलं उमेदवार सूचक मंडळात स्वागत आहे. (सर्वजण समोरील खुर्च्यांवर बसतात.)
बंदढेकर : नमस्कार! नमस्कार!! आम्हाला उमेदवार पाहिजे होते! पुढलं इलेक्शन जिंकायला!
सुविधा : तुम्ही योग्य ठिकाणी आलात सर! आमच्याकडे सगळ्या प्रकारचे उमेदवारांचे बायोडेटा आहेत…
बालिश : (मध्येच बोलत) तुमच्याकडे फक्त बायोडेटाच असतील, पण आमच्या रस्संघाच्या भट्टीत तयार उमेदवार मिळतात. ते देखील ओतीव साच्यातले!
सुविधा : (स्मितहास्य करत) असतीलही सर! पण तरीही तुम्ही आमच्या मंडळात आलात ना?
अर्धेन्द्र : (डोक्याला हात लावत) हो, आता साच्यातले म्हटल्यावर एकसाची असतातच ना? तोच दोष आहे ह्या सगळ्यांचा!
सुविधा : (चिंताग्रस्त अर्धेन्द्रकडे बघत) ह्या सगळ्यांचा? म्हणजे कुणाचा?
मिळ्मिळिष : (बालसुलभ बोबड्या बोलात) आमच्याकडं आधीच शेकड्यानं उमेदवार आहेत, पण ना…?
सुविधा : (प्रश्नार्थक मुद्रेने) पण काय? हे शेकड्याने असलेले उमेदवार पुरेसे नाहीत का?
अधीर : कसे असणार? कारभार करायचा म्हणजे किमान दीडएकशे असायला नको?
सुविधा : जरूर सर! त्याचसाठी आमची संस्था काम करते. यू नो? हे काम किती अवघड आहे ते?
बंदढेकर : हा ते आमच्या लक्षात आलंय! म्हणून तर इथे आलोय आम्ही! एकेक उमेदवार शोधणं अति कठीण काम! तेच अलीकडं जमेना आम्हाला!
बालिश : (चटकन सावरून घेत) जमेना नाही! जमतंय! (उसनं हसत) पण कसंय ना? छत्तीस गुणी, अष्टावधानी, निष्कलंक उमेदवार मिळणं आजकाल किती मुश्किल झालंय…
सुविधा : हो सर! आम्ही ते जाणतोच! त्याचसाठी आम्ही सर्व प्रकारच्या उमेदवारांचं सूचक केंद्र स्थापलंय! जेणेकरून तुमच्यासारख्या गरजू लोकांना एकाच छताखाली हवे ते उमेदवार मिळू शकतील (एक फाईल पुढे सरकवते) हे बघा यातले तुम्हाला काही पसंत पडतील का?
अर्धेन्द्र : (फाईल स्वतःपुढे ओढतो. बाकीचे मान वर करून फाईलमध्ये डोकावू बघतात. अर्धेन्द्र पान चाळू लागतो.) ह्या? यात लूटमार करणारे काही चेहरे दिसतायत. हे चालणार नाही!
बंदढेकर : (मान वर करून डोकावत) हे असे गुन्हेगार नकोच, शक्यतो. काय? (फाईलकडे बघत) मॅडम, एवढी एकच फाईल आहे का? नाही आणखी असतील तर शोधायला बरं पडेल. सगळ्यांनी एकेक फाईल वाटून घेतली म्हणजे, शोधून लवकर होईल ना?
अर्धेन्द्र : (नाईलाजाने) द्या, त्यांच्याकडे पण द्या एखादी फाईल. तेवढंच आमचं काम लवकर पूर्ण होईल उमेदवार संशोधनाचं!
सुविधा : (काही फाईल उरलेल्या सर्वांना वाटत) ह्या घ्या सर! पण प्रीमियमपेक्षा जास्त उमेदवारांचे बायोडेटा दाखवते आहे तुम्हाला! याचा जास्त चार्ज पडेल हो!
अर्धेन्द्र : (फाईलमध्ये खुपसलेलं नाक वर न करता) पैशाची चिंता सोडा तुम्ही! पैशाच्या बाबतीत आम्ही उमेदवाराला देखील तोशीस पडू देत नाही! अगदी प्रवेश सोहळ्याचे खर्चसुद्धा आम्हीच करतो!
मिळ्मिळिष : (कॉलर उगाच ताठ करत गाल फुगवून) आमच्याकडे बॉण्ड आहेत, बक्कळ पैशाचे! आम्ही कुणाला पण विकत घेऊ!
बंदढेकर : (मिळ्मिळिषचा हात दाबत) हळू बोल! तू बोलायच्या आत पंचाने बॉण्ड फाडलेसुद्धा आहेत. (मिळ्मिळिष चूक ध्यानात येताच मागे सरकून गप्प उभा राहतो.)
अधीर : (फाईल न्याहाळत) हा बायोडाटा बघा! याने आईबापाचं नाव सुद्धा लपवलंय. असे कुसंस्कारी उमेदवार नकोत.
सुविधा : पण सर! आजकाल तुमच्याकडे सुद्धा वृद्ध अडगळीत टाकले जातायत ना? (अधीर चपापतो.)
बालिश : (एक बायोडाटावर बोट ठेवत) हा जो उमेदवार आहे, याला मागे मुलीची छेड काढताना बघितलंय मी! असे लोकं आम्हाला चालणार नाहीत हो!
सुविधा : काय सांगता सर? शेजारल्या प्रातांत तुम्ही अशांना विशेष बाब म्हणून मोकळं सोडलंत आणि इथे बसून तुम्ही बलात्कार्यांच्या समर्थनाचा राग आळवत होता ते? सोसवेल तितका? विसरला? (बालिशचा खर्रकन चेहरा उतरतो.)
बंदढेकर : (एक फोटो दाखवत) हे बघ! शुद्ध नेपोटिझम आहे हे! निव्वळ बापजाद्याच्या जिवावर यांना का माळा घालून मिरवायचं?
सुविधा : (शांतपणे) का हो, तुमच्याकडे पण अर्धी गर्दी अशीच आहे ना?
मिळ्मिळिष : (कुठलासा फोटो बघून) तो गुंड आहे ना? त्याला नका घेऊ! आपलं नाव खराब होईल ना?
सुविधा : (मिळ्मिळिषचा गाल पकडत) बाळा, तुमच्याकडे गोळ्या मारणारे पन्नासेक डॉन आधीच आहेत. उलट जर हा चुकून तुमच्याकडे आला तर फार तर तुम्ही याला पंचायतीला उभं कराल. किंवा आधीच्या डॉनकडे बंदूक साफ करायला ठेवाल!
अर्धेन्द्र : (सुविधाकडे रोखून बघत) तुम्ही आमच्याच चुका काढा. आता यात काही भ्रष्टाचारी लोकांचे बायोडेटा दिसताय…
सुविधा : मग तुम्हाला आदर्श धरणराव चालतात, त्यांना सोबत घेऊन फिरता. त्यामानाने हे काहीच नाही.
अर्धेन्द्र : बरीच माहिती आहे तर तुम्हाला आमची!
सुविधा : (हसत) हो आता हुकूमचंदांचा आदेशच आहे, दिवसरात्र त्यांचा आणि पाठोपाठ तुमचा चेहरा पेप्रात आणि टीव्हीवर सताड दाखवायचा म्हणून! तेव्हा तुमचे चेहरे आपसूक आठवत जातातच ना?
अर्धेन्द्र : बरं बरं! ते राहू द्या! पण आम्हाला मनासारखे उमेदवार मिळणार आहेत की नाही?
सुविधा : मिळतील की! फक्त तुमच्या अपेक्षा काय आहेत सांगा. म्हणजे मी स्वतः बघून कळवते.
बंदढेकर : उमेदवार सुशिक्षित हवा…
बालिश : गुन्हेगार नसावा…
अधीर : भ्रष्टाचारी नसावा…
अर्धेन्द्र : महिलांचा सन्मान करणारा असावा…
सुविधा : एकूण निरपराध, निष्कलंक, सुसंस्कारी असावा!
अर्धेन्द्र : पण हे ध्यानी घ्या! संघटना त्याला उभी करता यायला हवी! तो केवळ हुकूमचंदांच्या नावावर निवडून येणारा नसावा, त्याला त्याची किंमत कळायला हवी!
सुविधा : पण सर! एवढे पूर्ण छत्तीस गुणी उमेदवार मिळणं कठीण आहे. थोडी तडजोड करता का?
अर्धेन्द्र : काय तडजोड करावी? आम्ही?
सुविधा : हे बघा. समजा, एक अडाणी उमेदवार घेतला तर तो किंचितसा गुंड असू शकतो! थोडाफार शिकलेला मनुष्य घेतला तर कदाचित तो भ्रष्ट असू शकतो…
अर्धेन्द्र : तुम्ही असं सांगताय जसं ह्या दुनियेत आम्हाला आमच्या इच्छेनुसार एकही उमेदवार मिळणार नाही असं!
सुविधा : मिळू शकतो सर एखादा! पण असे लोक फार विरळ मिळतात!
बालिश : विरळ का असेना? पण असतात ना? शोधून आणा अशी लोकं!
सुविधा : पण त्यांनी मुख्य पदं मागितली तर?
बंदढेकर : हे बघा, प्रांतात आम्हीच मुख्य पुढारी. त्यांनी आम्ही म्हणू त्याप्रमाणे वागलं पाहिजे.
सुविधा : (काही फाईल पुढे घेत) मला कळालंय, तुम्हाला कसे लोक हवेत ते ती! ह्या फाईल बघा! यात खास आणि विशेष लोक आहेत हे!
अर्धेन्द्र : (घाईने फाईलची पानं उलटत) पण हे उमेदवार आम्ही सांगू तेव्हा माना डोलावतील ना?
सुविधा : (हसून) नाही सर! त्यांना इनबिल्ट मेंदू असतो! त्यामुळे ते कदाचित विरोध पण करूच शकतात की!
बंदढेकर : (निराशेने) मला वाटतं, आपल्याला हवी तशी उमेदवार मंडळी इथे मिळणार नाहीच! तेव्हा निघूयात आपण!
अधीर : (भ्रमनिरास झाल्यागत) फार साधी अपेक्षा होती आपली, काळे-पिवळे-ढवळे-गुलाबी असल्या निरनिराळ्या रंगाढंगाचे चारित्र्यवान उमेदवार हवेत ही! पण यांना तेही दाखवता आले नाहीत! चला!
सुविधा : सर मी शक्य तेवढे सॉर्ट करून बायोडाटा दाखवलेत पण तुमच्या अपेक्षा उमेदवारांत राम शोधण्याच्या आहेत.
मिळ्मिळिष : (सगळे उठून बाहेर येऊ लागतात) आपल्याला पावणेतीनशे उमेदवार पाहिजे आहेत ना?
बालिश : (मिळ्मिळिषच्या केसातून बोटं फिरवत) हो रे! पण आता दुसरीकडे शोधावी लागतील बघ! (तोच सर्वांचे मोबाईल इनकमिंग मेसेजने दणाणून जातात.)
बंदढेकर : (मेसेज बघत) काय आहे हे? आदर्शरावांचा जंगी प्रवेश सोहळा सोबत आणखी काही लटांबर?
बालिश : (मेसेज बघत) मजा पुढे आहे बघ! भ्रष्ट, चारित्र्यहीन ठरवलेली आणखी काही सेकंडहँड मंडळी येणार वा घेतली जाणार असं सांगितलं जातंय! त्याची तयारी करायला लावलीय!
अधीर : याचा काय अर्थ घ्यायचा?
अर्धेन्द्र : हाच! पैशाने चांगल्यासोबत संबंध जोडता येत नाही. पैशाच्या गळाला कायम निरूपयोगी, उपद्रवी, चारित्र्यहीन, भ्रष्ट मासेच अडकतात. हेच होणार असेल तर इथूनच उमेदवार घेतलेले बरे.
(सगळे पुन्हा उमेदवार सूचक केंद्राकडे परत फिरतात.)