काही संहिता अनेक माध्यमांना आकर्षित करतात. कारण त्यातील वेगळेपणा प्रत्येक माध्यमांना जवळचा वाटतो. त्यात आणखीन काहीतरी करता येईल, असं वाटत राहातं. ज्येष्ठ रंगधर्मी दिलीप प्रभावळकर यांच्या लेखणीतून सर्वप्रथम ‘मोहिनी’ दिवाळी अंकात एक एकांकिका प्रकाशित झाली. पुढे ती एकांकिका दूरदर्शनवर नाटिका म्हणून निवडण्यात आली आणि चित्रिकरणानंतर दोन-चार वेळा प्रदर्शितही झाली. नंतर याचे दोन अंकी नाटक करण्याची मागणी झाली आणि प्रभावळकर यांनी ती पूर्णही केली. दोनअंकी पूर्ण नाटकाच्या स्वरूपात त्याचा थेट अमेरिकेतील ह्यूस्टन येथे खास महाराष्ट्र मंडळाने प्रयोगही लावला. मुंबईत तालमी झालेले हे नाट्य असे पहिल्या प्रयोगासाठी अमेरिकेत पोहचले. मराठी आणि अमराठी रसिकांनी त्याला उत्स्फूर्त दाद दिली. नंतर १९९५ साली व्यावसायिक रंगभूमीसाठी हे नाटक तयार करण्यात आले. चंद्रकांत कुलकर्णी यांचे दिग्दर्शन आणि ‘छंद’ नाट्यसंस्थेची निर्मिती होती. रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या नाटकाची संहिता १९९८ साली आभा प्रकाशनने प्रसिद्ध केली. दर्दी वाचकांनी हे पुस्तक संग्रही ठेवले. पुस्तक आणि प्रयोग दोन्हीकडे बाजी मारली! आणि आता २०२४ या वर्षात नव्या दमात हे नाटक रसिकांपुढे आलंय. दिवाळी अंकातील एका दहा पानी एकांकिकेने सुरू केलेला हा प्रवास नाटकाप्रमाणेच नाट्यपूर्ण असा आहे. जवळजवळ तीसेक वर्षे उलटली तरीही हे नाटक विस्मृतीत जात नाही. जाणकारांना ते खुणावते. नाटक आहे ‘चूकभूल द्यावी घ्यावी!’
पडदा उघडताच वाट बघणारी वयोवृद्ध पत्नी. नवर्याला घरी येण्यास उशीर झालाय म्हणून चिंता करतेय. दूध आणायला गेलेला नवरा डेअरीत गेलाय की गोठ्यात, असा प्रश्न तिच्यापुढे आहे; कारण अमेरिकेतल्या मुलाची फोन येण्याची वेळ झालीय. इथून नाटक सुरू होतं. कथानक एका मध्यमवर्गीय घरातलं. वयाची ऐंशी वर्षे उलटलेले राजाभाऊ आणि त्यांची पत्नी उषाक्का. एकमेकांच्या खाण्यापिण्याची औषधं-तब्येतीची काळजी करणारे. आज दोघांचं वय झालं असलं तरी मिश्कील स्वभावामुळे आनंदात आहेत. त्यांचा मुलगा सुरेंद्र रोजच तसा यांच्या संपर्कात आहे. त्याने सातासमुद्रापार परदेशी मुलीशी लग्न केलंय. ‘अमेरिकन पांढरी पाल’ असे विशेषण तिला सासूबाईंनी दिलंय. आता आईबाबांच्या लग्नाला ५५ वर्षे पूर्ण झालीत म्हणून त्यांचा अमेरिकेत सत्कार करण्याचा बेत सुरेंद्र रचतोय. परदेशी इतकी वर्षे लग्न टिकणं म्हणजे ‘प्रेस्टिज’ मानलं जातं.
इकडे सुखी वैवाहिक जीवनावर वाढदिवसाचं शिक्कामोर्तब होण्यापूर्वी राजाभाऊंना मन मोकळं करायचंय. इतक्या वर्षांचा कोंडमारा संपवायचाय. त्यामुळे त्यांना भयंकर अपराध झाल्यासारखं वाटतंय. त्यासाठी जीवनात घडलेल्या चार घटना, ज्या उषाक्कापासून सदैव लपवून ठेवल्या त्या उघड करायच्या आहेत. ज्या ‘फ्लॅशबॅक’ने पुढे येतात. त्यावर बेतलेलं हे नाटक. त्या घटना दे-धम्माल आहेत. पण शेवटी उषाक्का यांनीही नवर्यापासून लपवून ठेवलेली एकमेव घटना सांगते आपण राजाभाऊंची पुरती विकेट उडते! जो धक्कातंत्राचा कळस आणि कहर ठरतो.
पहिली आठवण म्हणजेच फ्लॅशबॅक. राजाभाऊंचे अण्णा हे सासरे मृत्यूशयेवर शेवटची घटका मोजत होते, पण काही केल्या त्यांचा जीव जात नव्हता. त्यावेळची. दुसरी आठवण राजाभाऊंची मैत्रीण माधवी हिच्यासोबतची. तिचा घटस्फोट झालेला. तिसरी घटना. सासूबाई घरात आल्यात. त्या जाता जात नाहीत. अशावेळी शेजारी-कम-मित्र वाडकर मदतीला पुढे येतो. त्याची. चौथी घटना. राजाभाऊ मरणाचं नाटक करतात. त्यामुळे बायकोचं किती प्रेम आहे कळेल, असं त्यांना वाटतं. ती.
अशा प्रकारे चार घटना ज्या वयाच्या ऐंशी वर्षापर्यंत त्यांनी लपवून ठेवल्या. कळत-नकळत केलेल्या पापांची कबुली त्यातून ते देतात. त्यामुळे यापुढे अपराध्याप्रमाणे वाटणार नाही, असे त्यांना वाटते. नाट्याचा शेवट हा वगळणं उत्तम. ज्यात उषाक्का एक गुपित प्रथमच खुलेपणानं सांगते! ते जर उघड केलं तर नाट्याची लज्जत संपेल. त्यासाठी थेट प्रयोग बघणं उत्तम! राजाभाऊंच्या कबुलीजबाबाने पुढे उषाक्काचा जणू हास्याचा बॉम्बस्फोटच म्हणावा लागेल. हास्य दरबार किंवा लाफ्टर क्लबमध्ये ज्याप्रमाणे एकापाठोपाठ एक किस्से आकाराला येतात, त्याचप्रमाणे इथे भूतकाळातल्या आठवणी आणि वर्तमानातील माणसं साकार होतात. फार मोठा प्रश्न, त्यावरली गंभीर चर्चा किंवा भाष्य तसेच अटीतटीचा संघर्ष वगैरे यात नाही. पण ‘हसवाफसवी’प्रमाणे विनोदी प्रसंगाची मालिका आहे. त्यातील मार्मिक शैली हमखास हसे वसूल करते. दिगर्शक महेश डोकंफोडे यांनी यातील नाट्य खेळतं ठेवलंय, ते कुठेही फसणार नाही याची पुरेपूर दक्षता घेतली.
८० वर्षाचे राजाभाऊ आणि ७५ वर्षाच्या उषाक्का या मध्यवर्ती भूमिकांमध्ये अक्षय मुडावदकर आणि अक्षया नाईक यांची जोडी शोभून दिसते. फ्लॅशबॅकमुळे दोघांना तरूणाईत जावं लागतं. यातील वयाचा फरक दोघांनी ताकदीने उभा केलाय. तारूण्य आणि वृद्धत्व ही तारेवरची सर्कस चांगली जमली आहे. ‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेमुळे घराघरात पोहचलेले अक्षय मुडावदकर यांचा अभिनेता म्हणून हा वेगळा मुखवटा नजरेत भरतो. विनोदाचे उत्तम अंग तसेच देहबोली शोभून दिसते. त्यांच्यासोबत ‘सुंदरा मनामध्ये भरली’मधल्या अक्षया नाईक यासुद्धा ‘हटके’ भूमिकेत प्रगटतात. मालिकांतल्या दोघा रंगकर्मींची हजेरी ही जमेची बाजू.
सोबत आणखीन दोन कलाकार आहेत, जे काही भूमिकांमधून लक्ष वेधून घेतात. महेश डोकंफोडे यांचा दारूडा शेजारी आणि अमृता तोडरमल हिची सासू यांची बेअरिंग उत्तम. मैत्रीण माधवी आणि सासरे अण्णा यातही त्यांची उपस्थिती आहे. दारूचा प्रसंग, अण्णांना मरणाची फसवाफसवी, माधवीची लपवाछपवी, सासूची घबराट, हे नोंद घेण्याजोगे आहे. निर्मिती सावंत, नीना कुलकर्णी, उज्वला जोग, हेमू अधिकारी आणि दिलीप प्रभावळकर यांनी यापूर्वी या नाटकात भूमिका केल्या होत्या. एखाद्या व्यंगचित्राप्रमाणे यातील भूमिका गाजल्या आहेत. एक नाटककार आणि अभिनेते म्हणून दिलीप प्रभावळकर या रंगप्रवासात सोबत होते. एकदा का नाटकाचे प्रयोग थांबले की त्या नाटकाशी, त्यातील भूमिकेशी असलेले ऋणानुबंध संपतात पण काही नाटकांची आठवण आणि ठसा कायम राहतो.
मध्यवर्गीय कुटुंबाचे घर हे संदेश बेंद्रे यांनी नेपथ्यातून उभ केलंय. फ्लॅशबॅकमध्ये स्थळबदल करताना अडथळा होणार नाही याची पुरेपूर दक्षता घेतली आहे. कपाट, पलंग याचा वापर करण्यात आलाय. नेपथ्यनिर्मितीत नेमकेपणा आहे. हालचालींना पुरेसा अवकाश मिळाला आहे. ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचे संगीत विनोदाच्या जागा अधिक गडद करणारे ठरते. अक्षय मुडावदकर यांनी भूमिकेसोबतच गीतलेखनही केलंय, ते अर्थपूर्ण झाले आहे. सोबत अभिषेक करंगुटकर यांची रचनाही चांगली आहे. शीतल तळपदे यांची प्रकाशयोजना समर्पक आहे. तांत्रिक बाजू उत्तम जमल्या आहेत.
या नाटकातील राजाभाऊंची भूमिका वारंवार दिलीप प्रभावळकर यांच्या भूमिकांची आठवण करून देणारी आहे. या भूमिकेबद्दल प्रभावळकर एके ठिकाणी म्हणतात, ‘मी केलेल्या ऐंशी वर्षाच्या राजाभाऊंवर थोडा अन्यायच झालाय असं मला सारखं वाटतं. कारण या भूमिकेच्या आगेमागे मी अनेक वृद्धांच्या भूमिका केल्यात. उदाहरण म्हणजे ‘हसवाफसवी’, ‘संध्याछाया’, ‘आपली माणसं’ अशात मी दिसलो. त्यात हा राजाभाऊ म्हातारा जरा लपला गेला! त्याच्यातल्या वेगळ्या विनोदाची बाजाचीही म्हणावी तेवढी दखल घेतली गेली नाही. पात्रता व गुण असूनही हे व्यक्तिचित्रण थोडं बाजूलाच पडलं!’ एका अष्टपैलू अभिनेत्याची एका भूमिकेवरली प्रतिक्रिया व खंत ही खूप काही सांगून जाते. कलाकार म्हणून ती आत्मपरीक्षण करणारी आहे.
गेली साठेक वर्ष बालनाट्ये, एकपात्री, नाटके, मराठी-हिंदी चित्रपट आणि मालिका तसेच पुस्तके ऑडिओ, कॅसेटस, सीडीज यातून प्रभावळकर हे रसिकांना, वाचकांना भेटतच आहेत. त्यांच्या लेखणीतून हे नाटक समर्थपणे आकाराला आलंय. रंगमंचाचं नेमकं भान त्यांना आहे. १९९५-९६च्या सुमारास सर्वप्रथम हे नाटक रंगभूमीवर आलं त्यावेळी या नाटकासमोर अनेक दिग्गज नाटककारांची नाटके हजर होती. त्यात वसंत कानेटकरांचे ‘तू तर चाफेकळी’ (बालकवींच्या काव्यप्रतिभेवरलं नाटक); रत्नाकर मतकरी यांचे ‘साटेलोटे’ आणि ‘असा मी असामी’ (पुलंच्या साहित्यकृतीचं नाट्यरूप), अशोक समेळ यांचे ‘कुसुम मनोहर लेले’ (सांसारिक थरार), प्रवीण शांताराम यांचे ‘येवा कोकण आपलाच असा’, अभिराम भडकमकरकृत ‘जळली तुझी प्रीत’, गजेंद्र अहिरे यांचे ‘उंच माझा झोका गं’, राजा पारगांवकरचे ‘मी तर बुवा अर्धाच शहाणा’, मंगला गोडबोले यांचे ‘श्रीकृपेकरून’ अशा दर्जेदार नाट्यप्रवाहातही नाटककार आणि कलाकार या दुहेरी भूमिकेतून प्रभावळकर यांनी लक्ष वेधून घेतले. फ्लॅशबॅकमधला भन्नाट कबुलीजवाब केवळ विनोदापुरता नव्हता तर सुखी दांपत्यजीवनाचा संदेश देणारा ठरतो, जो आजही कालबाह्य झालेला नाही. उलट दिशादर्शक आहे.
काळाआड न जाणारी काही दर्जेदार नाटके ही सध्या रंगभूमीवर प्रगटत आहेत. तरूणाईतल्या रसिकांसाठी ही एक सुवर्णसंधीच चालून आलीय. प्रशांत दळवी यांचे ‘चारचौघी’, वामन तावडे यांचे ‘छिन्न’, देवेंद्र पेमचे ‘ऑल द बेस्ट’, पु. ल. देशपांडे यांचे ‘एक झुंज वार्याशी’, मीना नेरूरकरांचे ‘अवघा रंग एकचि झाला’, रत्नाकर मतकरी यांचे ‘अलबत्या गलबत्या’ हे बालनाट्य आणि प्रभावळकरांचे ‘चुकभूल द्यावी घ्यावी’ हे नाटक. या निर्मितीतून रंगेतिहास जागा होतोय. मूळ प्रयोग बघितलेल्या प्रेक्षकांकडून तुलना जरूर होईल. पण सशक्त नाटके जपण्याचा हा प्रकार आवश्यक आहे. मालिकांच्या रसिकांना आकृष्ट करणारी अक्षय आणि अक्षया यांची पात्रयोजना यात आहे. त्याचा सकारात्मक परिणाम बुकिंगवर होईल, आणि महत्वाचे म्हणजे मालिकेतून पुन्हा नाटकांकडे वळण्याना जो ‘यू टर्न’ सुरू आहे, तोदेखील नोंद घेण्याजोगा आहे. निर्मात्या केतकी कमळे यांनी निर्मितीमूल्यात कुठेही तडजोड केलेली नाही.
आयुष्याच्या संध्याकाळी आपण काय कमावलं, काय गमावलं याचा ताळेबंद मांडतांना काही लपवून ठेवलेल्या घटनेत आपण गुन्हेगार आहोत, ही भावना कायम सतावते. त्याबद्दल कुणाला तरी कबुलीजवाब द्यावा, असं वाटणं हे स्वाभाविक आहे. त्याखेरीज सुखानं ‘एक्झिट’ घेता येणार नाही आणि त्यातही जर स्वर्ग असलाच तर तिथपर्यंत सुरक्षित प्रवेशही मिळणार नाही. या भाबड्या भावनेतून ही गोड नात्याची प्रभावळकर ‘स्टाईल’ची मिश्कील गोष्ट हळुवार संहिता अन् सादरीकरणातून आकाराला येते. एक घरंदाज विनोदी आविष्कार बघितल्याचे समाधान रसिकांना निश्चितच होईल!
चूकभूल द्यावी घ्यावी
लेखन : दिलीप प्रभावळकर
दिग्दर्शन : महेश डोकंफोडे
नेपथ्य : संदेश बेंद्रे
संगीत : अशोक पत्की
प्रकाश : शितल तळपदे
गीते : अक्षय मुडावदकर व अभिषेक करंगुटकर
निर्माती : केतकी प्रवीण कमळे
सूत्रधार : श्रीकांत तटकरे