मानवाची भौतिक प्रगती आणि बौद्धिक प्रगती या दोन्ही बहुतांशी रेल्वेरुळांसारख्या समांतर चालत आल्या आहेत. त्यांची एकमेकांशी गळाभेट होत नाही. रूळ एकमेकांच्या थोडे जरी जवळ आले तर अपघात होणारच. दोन रुळांचा मिळून एक ट्रॅक होतो. म्हणून हा ट्रॅक समांतर राहणेच इष्ट आहे. (आधुनिक तंत्रज्ञानाने निर्मित केलेल्या काही बाबी अपवाद समजाव्या.) वैज्ञानिक तंत्रावर आधारित असणारी चित्रपट ही एकमेव आभासी कला असावी. अंधारात बसून प्रखर प्रकाशझोतात समोरच्या पांढर्या पडद्यावर आपण खूप काही बघत असतो. जणू काही आपल्या मनातल्या स्वप्नांच्या सावल्या जिवंत होऊन आपल्यासमोर येत आहेत. अनेकदा हे सर्व आभासी आहे हे माहित असूनही त्यात बर्यापैकी गुंतून पडतो. मग कधीकधी वीज जाताच भानावर येतो. चित्रपटाचे गारूड आपल्याला एखाद्या कळसुत्री बाहुलीसारखे जखडून टाकते. आपणही आनंदाने हे जखडणे अनेकदा कुबूल करतो.
चित्रपटकलेचे सर्वात मोठे गुणवैशिष्ट्य म्हणजे ही एक व्यावसायिक कला आहे. त्यामुळे यात कलावंत-तत्रंज्ञांसोबत आर्थिक व्यवहार करणारे व्यावसायिकही गुंतलेले असतात आणि ते अधिक सामर्थ्यवान असतात. शापूरजी पालनजी या ग्रूपने ‘मुगल-ए-आझम’ या अतिभव्य चित्रपटाच्या निर्मितीसाठी ५०च्या दशकात दीड कोटी रुपये दिले होते. ही त्या काळातील सर्वात मोठी आर्थिक गुंतवणूक होती. हल्लीची या क्षेत्रातली गुंतवणूक बघता डोळे विस्मयाने विस्तारतात. पैसा कमावण्यासाठी अफाट कष्ट, परिश्रम, जिद्द लागते, हे सर्वच मान्य करतात. मात्र तरीही भाग्य, भविष्य, नियती, नशीब, अंकशास्त्र, ग्रहवार हेही अनुकूल असावे लागतात, असे बहुतांश लोकांना वाटत असते. चित्रपटक्षेत्र याला कसे अपवाद असेल? बहुतांशी चित्रपट हे शुक्रवारीच का प्रदर्शित असावेत, हा प्रश्न मला शाळकरी वयापासून पडत आला आहे. लग्नगाठी जुळवताना जसा शनी आणि मंगळ सर्वाधिक लुडबूड करतो, तसाच चित्रपट क्षेत्रात शुक्र अर्थात शुक्रवार करीत असावा अशीच माझी समजूत होती. हे समजून घेण्यासाठी मग ८१ वर्षे मागे जावे लागले.
मार्गारेट मिचेल या लेखिकेचे १९३६मध्ये तुफान गाजलेली महाकादंबरी म्हणजे ‘गॉन विथ द विंड’. ‘अमेरिकन सिव्हिल वॉर’ अर्थात नागरी युद्ध हा १०३७ पानाच्या या जाडजूड कांदबरीचा मुख्य विषय. नागरी युद्धाच्या भडक्यात नागरिकांचा बट्ट्याबोळ होतो, कारण यात तीव्र संघर्षाचे बीज दडलेले असते. अनेकदा हे दीर्घकाळ चालू शकते व यात जे सत्तेत असतात ते सैन्याचा वापर करू शकतात. या युद्धासाठी बरीच साधने व आर्थिक बळ लागते. अशा विषयावर कादंबरी असेल तर चित्रपट निर्माते कसे स्वस्थ बसतील? ही कांदबरी प्रकाशित झाल्यानंतर एका महिन्यामध्ये डेव्हिड ओ सेल्झनिक या निर्मात्याने ५० हजार डॉलर्स मोजून या तिचे हक्क विकत घेतले. पुढे १९३९मध्ये याच नावाचा चित्रपट तयार केला. हा चित्रपट सलग बघायचा म्हणजे २२१ मिनिटे लागतात. क्लार्क गेबल, विवियन ली, लेस्ली हॉवर्ड, ऑलिव्हर दे हॅविललॅन्ड वगैरे तगडे कलाकार यात होते. या चित्रपटाने १२व्या ऑस्कर पुरस्कारांत वेगवेगळ्या विभागांत आठ पुरस्कार मिळवले होते. साडे अडतीस लाख डॉलर बजेट असलेल्या या चित्रपटाने त्या काळी ४० कोटी डॉलर एवढा गल्ला जमविला. चित्रपट क्षेत्राच्या इतिहासात आजही बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून ‘गॉन विथ द विंड’ची नोंद आहे. हा चित्रपट १५ डिसेंबर १९३९ रोजी प्रदर्शित झाला होता आणि तो दिवस होता शुक्रवार. त्यानंतर हॉलिवुडमध्ये मग शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित होण्याची परंपराच सुरू झाली. या क्षेत्रातील अनेक निर्माते, अर्थसहाय्य करणारे व वितरकांना कदाचित असे वाटले असेल की सिनेमा शुक्रवारी प्रदर्शित केला तर चांगला गल्ला भरतो. योगायोगाने असे घडले असेल आणि मग खात्रीचा शिक्काच शुक्रवारवर बसला असेल.
त्या काळात मात्र भारतात शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित होत नसत. भारतात ही प्रथा १९५०च्या आसपास सुरू झाली. १९४७मध्ये राज कपूर-मधुबाला अभिनीत चित्रपट ‘नील कमल’ हा २४ मार्च १९४७ रोजी प्रदर्शित झाला. हा तेव्हाचा मोठे बॅनर आणि स्टारकास्ट असलेला चित्रपट होता. मात्र त्या दिवशी सोमवार होता. पुढे योगायोगाने के. आसिफ या दिग्दर्शकाचा ‘मुगल-ए-आझम’ हा ‘गॉन विथ द विंड’सारखाच भव्यदिव्य चित्रपट १९६०मध्ये प्रदर्शित झाला. या दिवशी तारीख होती ५ ऑगस्ट १९४७ आणि वार होता शुक्रवार. या चित्रपटाच्या प्रिमियरला मुंबईतील ‘मराठा मंदिर’ या चित्रपटगृहाला एखाद्या नववधूसारखे सजविण्यात आले होते. चित्रपटांची प्रिंट हत्तीवरून वाजत गाजत आणण्यात आली होती. अकबराच्या वेषभूषेतला पृथ्वीराज कपूरचा ४० फूट उंचीचा भव्य कटआऊट लावण्यात आला होता. अभिनेत्याचे मोठमोठे कटआऊटस् व होर्डिंग बघायला प्रचंड गर्दी होत असे. परेदशी पाहुण्यांसाठी एक वेगळी तिकीट विंडोही उघडली गेली. एकाच वेळी भारतातील वेगवेगळ्या १५० चित्रपटगृहांत हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. कोलकात्त्याच्या एकाच सिनेमागृहात हा चित्रपट वर्षभर चालला होता. या चित्रपटाने कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय केला.
या सिनेमाच्या यशामुळे धनलक्ष्मीचा वर्षाव शुक्रवारी होतो ही भावना चित्रपटव्यावसायिकांच्या मनात चांगलीच रूजली. यानंतर भारतीय चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होण्याची परंपरा सुरू झाली. यात आणखी एक बाब म्हणजे शुक्रवार हा वीकएन्डचा दिवस. शनिवा-रविवार हे बहुतांशी शाळा कॉलेज आणि कर्मचारी यांचे सुट्टीचे दिवस. या काळात लोक बाहेर पडून बर्यापैकी खर्च करत. या दिवशी नवीन चित्रपट लागला की हमखास गर्दी होण्याची शक्यता असे. त्यात काहीजणांची अशीही मान्यता आहे की शुक्रवार हा लक्ष्मीचा वार असतो. कोण जाणे आपल्यावरही तिची कृपा होऊ शकते.
काही चित्रपट वितरकांच्या म्हणण्यानुसार इतर दिवशी चित्रपट रिलीज केल्यास चित्रपटगृहाच्या मालकाला अधिक पैसे मोजावे लागतात. मात्र शुक्रवारी कमी पैसे आकारले जातात. परंपरा या अशाच घट्ट होत जातात. ‘बावरे नैन’, ‘आवारा’, ‘हलचल’, ‘तराना’ हे ५०च्या दशकातील भरपूर कमाई केलेले चित्रपट शुक्रवारीच प्रदर्शित झाले होते. माझ्या शाळकरी वयात आम्ही जे चित्रपट पाहात असू, तेही शुक्रवारीच थिएटरला लागत असत. मला आठवते ते असे की चित्रपट मोठ्या शहरात रिलीज झाल्यानंतर लगेच ते लहान शहरात येत नसत. कधीकधी ते ६ महिन्यांनी येत. कारण चित्रपट रिळाच्या मोजक्याच आवृत्त्या एका शहरातून दुसर्या शहरात जात. पण सिनेमाच्या प्रदर्शनाचा वार शुक्रवारच असे. म्हणजे चित्रपटाचा पहिला रिलीज जसा शुक्रवारी असे, तसाच तो प्रत्येक शहरांतही शुक्रवारीच रिलीज होत असे. अर्थात मोजकेच चित्रपट अपवाद होते. त्याची इतरही कारणे असू शकतात.
मात्र २००६मध्ये राकेश ओमप्रकाश मेहरा यांचा ‘रंग दे बसंती’ हा चित्रपट गुरुवारी प्रदर्शित झाला होता, तर २०१६मध्ये सलमान खानचा ‘सुलतान’ बुधवारी प्रदर्शित झाला होता. तरीही या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर भरपूर कमाई केली. अर्थात ही परंपरा मोडण्याचे प्रयत्न हे अपवाद म्हणायला हवे. कारण आजही बहुतांशी चित्रपट शुक्रवारीच प्रदर्शित होतात.