बाळासाहेबांनी हे व्यंगचित्र चितारलं तेव्हा वाघासारख्या मराठी माणसाच्या शेपटाला गाठी मारण्याचं काम दिल्लीत सत्ता उपभोगत असलेला काँग्रेस पक्ष करत होता. शंभर टक्के मराठी माणसांच्याच हक्काची मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचं कारस्थान करणारे तेव्हा त्या सत्ताधीशांच्या आडून वार करत होते, आता सत्तेतला पक्ष बदलला, त्याने मराठी वाघाच्या शेपट्यांना गाठी मारण्यासाठी हातही आपलेच तोडून घेतले आहेत आणि आपण सुखाने झोपून राहिलो आहोत. शिवजयंतीला छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला, पुतळ्याला हार घालून, जय भवानी, जय शिवाजी अशा गर्जना करून आणि मराठी गाणी वाजवून हे संकट टळणार आहे का? बाळासाहेबांनी हे व्यंगचित्र रेखाटलं तेव्हा मुंबईत मराठी टक्का किती होता, आता किती राहिला? मराठी माणसांची कैवारी शिवसेना एकच होती, तिची शकलं किती झाली आणि किती मिंधे दिल्लीचे दलाल बनून बसले आहेत? शिवाय हा मराठा, हा कुणबी, हा ओबीसी, हा दलित, हा बौद्ध, हा मुसलमान अशा भेदांच्या पिसवांनी या वाघाला बेजार करून टाकलं आहे… शिवरायांच्या आज्ञेनुसार तरी हा वाघ अंग झटकून उभा राहणार की दिल्लीच्या ताटाखाली मांजर बनून शिळ्या मटणाचे तुकडे तोडत बसणार?