महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर मुख्यमंत्री पातळीवर चर्चांचे गुर्हाळ चालू आहे… पलीकडे पंतप्रधान इंदिरा गांधी आणि ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण वाट पाहात आहेत की शेवटी निर्णय काय होतो आहे… दोन्ही मुख्यमंत्र्यांना कल्पनाही नाही की आपण एका जिवंत बाँबवर बसलो आहोत आणि त्या बाँबची वात पेटलेली आहे… केवळ बाळासाहेबांनाच सुचू शकेल अशी जिवंत आणि ज्वलंत कल्पना आहे या व्यंगचित्राची… दुर्दैवाची गोष्ट अशी की हे नऊ मार्च १९६९ रोजीच्या मुखपृष्ठावरचे व्यंगचित्र आजही शिळे झालेले नाही… ५३ वर्षे झाली तरी सीमाप्रश्न सुटलेला नाही, चर्चांचे गुर्हाळ सुरूच राहते… सर्वोच्च न्यायालयातही हा प्रश्न रेंगाळलेला आहे… इथले बेकायदा मिंधे सरकार तो सोडवण्याची धमक दाखवूच शकत नाही. उलट निवडणुका आल्या की कन्नड जनतेला चिथावण्यासाठी महाराष्ट्राला वेडावून दाखवण्याचा खेळ कर्नाटकाचे मुख्यमंत्री एस. आर. बोम्मई खेळतात आणि इथले दीडशहाणे भारतीय जनता पक्षाचे भक्त जिभा लांब करून सांगतात, अरे, महाराष्ट्र काय, कर्नाटक काय, एकाच भारतात आहोत ना आपण! भावड्यांनो, हे जरा बोम्मई काकांना पण सांगा की! त्यांनी तरी मराठीभाषकांची बहुसंख्या असलेल्या सीमाभागावर उगाच कब्जा करून का बसावं? गेलं बेळगाव महाराष्ट्रात तरी ते काही पाकिस्तानात नाही ना! सगळे ज्ञानाचे डोस महाराष्ट्राला का पाजता?