‘किरकोळ आणि घाऊक’ हे शब्द व्यापार्यांच्या दुनियेत आपल्याला चांगलेच ठाऊक आहेत. किरकोळ म्हणजे घाऊक व्यापार्यांकडून मालाची खरेदी करून विक्री करणारे आणि घाऊक व्यापारी म्हणजे किरकोळ विक्रेत्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे माल पुरविणारे! असे व्यापारात किरकोळ आणि घाऊक यांचं नातं आपण बघतोय. एकमेकांशी हे तसे संबंधित. आता लग्नाच्या किंवा दांपत्यजीवनाच्या चौकटीत ‘किरकोळ नवरे’ हा शब्दप्रकार म्हणजे विनोदच! मग ‘घाऊक बायका’ असं म्हटलं तर आणखीनच गोंधळात गोंधळ उडेल. प्रसंगी आंदोलनही पेटेल. पण या नाटकाचे शीर्षकच ‘किरकोळ नवरे’ असं आहे. त्यातले दोन्ही नवरे जे दिसतात, ते दोघेही स्वभावाने काहीदा किरकोळ वाटले, तरी तब्येतीने मजबूत आहेत. त्यांना बारीक, फुटकळ, काटक, लुकडा ही विशेषणं जराही लागू पडत नाहीत. त्यांचा स्वभाव जरी मृदू असला तरी त्यांची मागणी ही एकाच बायकोसाठी, तिच्यावरल्या हक्कांसाठी आहे. एक बायको, दोन नवरे या त्रिकुटाची धम्माल असा सारा नाट्यपूर्ण मामला! जो गोंधळात गोंधळ उडवणारा आणि नवर्यांनो बायको सांभाळा, असा सांगणारा आहे!
बदलत्या काळात दांपत्यजीवनात परिवर्तन, स्थित्यंतरेही होत आहेत. त्यातही स्त्री ही शिक्षण, नोकरी यात ती स्वत:च्या पायावर ठामपणे उभी राहते, पण तरीही ‘जग काय म्हणेल?’ हा प्रश्न तिची पाठ सोडता सोडत नाही. आजकाल नवरा-बायकोचं न पटल्याने घटस्फोट घेणं हे तसं कॉमन झालंय. पण नवरा ‘गायब’ असेल तर एकाकी जीवन जगण्यापेक्षा नवा संसार, नव्या नवर्याबरोबर थाटला, तर त्यात गैर असे काही नाही. पण ‘गायब’ नवरा अचानक प्रगटला तर बायकोच्या दुसर्या लग्नाचं भवितव्य काय? अशावेळी आजी-माजी पतिव्रतेचे नातं हे बेगडी ठरते काय? की एकाचवेळी दोघांना जवळ करणं शक्य आहे? हे आणि याभोवतीचे अनेक प्रश्न उभे राहतात. म्हटलं तर ‘कॉमेडी’ नाहीतर ‘ट्रॅजेडी’चा हा विषय. नाटककार सागर देशमुख यांनी या गंभीर विषयाला विनोदाची मस्त फोडणी देऊन कथानक रंगविलं आहे.
पडदा उघडतो आणि एका आलिशान घराचे दर्शन होते. अंधारात एक माणूस आत शिरतो. लपवाछपवी करतोय. एखादं हॉरर किंवा सस्पेन्स नाटक असावं अशी सारी वातावरणनिर्मिती. तो तिथून पळही काढतो आणि या घरात अनामिका आणि संजय हे काहीसं ज्येष्ठ दांपत्य नजरेत भरतं. अनामिकाचं हे दुसरं लग्न. एका कंपनीत नोकरीला असलेला तिचा पहिला नवरा आनंद एका भ्रष्टाचारात अडकलेला. कंपनीतल्या राजकारणाचा बळी पडलेला. परिणामी तो गजाआड गेलाय. तीन-चार वर्षे आत तुरुंगात अडकलेला. सुटकेची शक्यता नसलेला. त्यामुळे अनामिकाने संजयशी लग्न केलं आणि नवा संसार सुरू केला. माजी नवरोजी आनंद तुरुंगातून सुटून आता घरी आलाय. तीन वर्षानंतर त्याला निर्दोष ठरवलं गेलंय. अशा प्रकारे आजी-माजी नवरे एका बायकोपुढे उभे आहेत. आणि या नातेसंबंधात एकच गोंधळ उडतो. खरा नवरा कोण? हा प्रश्न येतो.
आनंदच्या राहण्याचा, जगण्याचा प्रश्न आहे. त्याच्याकडे पैसा नाही. दुसरं घर खरेदी करणं त्याला शक्य नाही. तसंच हे घर अनामिका आणि आनंद यांच्या जॉइंट मालकीचं. या संपत्तीवर त्याचीही पन्नास टक्के मालकी आहे. बायकोनं दुसरं लग्न केलं असलं तरीही आता आनंदचं भवितव्य काय? त्याचं राहणं, जगणं कसं होणार? हा प्रश्न उभा राहतो. कायद्याप्रमाणे या घरावर आनंदचा हक्क असल्याने त्याला घराबाहेर काढता येणं शक्य नाही. एक कोंडी, पेचप्रसंगच. दुसर्या नवर्याचंही भवितव्य अंधारात!
माजी नवरा हॉलमध्ये सोफ्यावर झोपतो तर आजी नवरा बेडरूममध्ये! हे चित्रविचित्रच! पण दोघांनाही त्याखेरीज दुसरा पर्याय नसतो. नंतर तर दोघे नवरे सोफ्यावर पोहचतात. वादविवाद वाढतात. दोघांचा बायकोवर, या घरावर हक्क सांगण्याचा प्रयत्न होतो. आता या दोघांंची घरातली उपस्थिती अनामिकाला तापदायक ठरू लागते. दोघे नवरे जवळ येतात, त्याचा बायकोला त्रास होतोय. ती संतापते. या काहीशा गंभीर वाटणार्या दांपत्यजीवनात विनोदाच्या अनेक जागा आहेत. त्या नेमक्या पकडून प्रसंग व्यंगचित्राप्रमाणे आकाराला येतात. या दोघा नवर्यांचे पुढे काय? बायको म्हणून अनामिका कुणाला जवळ करते? दोघांना त्यांचे हक्क मिळतात का? ही गुंतागुंत अखेर कशी काय सुटते? या प्रश्नांची उत्तरे प्रत्यक्ष नाट्यप्रयोगातूनच बघणं उत्तम.
नाटककार, दिग्दर्शक आणि आनंदची भूमिका अशा तिहेरी जबाबदार्या सागर देशमुख यांनी कुशलतेने पार पाडल्या आहेत. नाटक कुठेही रेंगाळणार नाही, याचीही पुरेपूर दक्षताही घेण्यात आलीय. सागर स्वत: व्यवसायाने वकील असल्याने नाटकात असणारे हक्क, दावे, अधिकार यावरला युक्तिवाद खोटारडा किंवा फसवा वाटत नाही. हक्कांचा हा खेळ संवादातून चांगलाच रंगला आहे. तसा हा विषय एखाद्या एकांकिकेचा असला तरीही दोन अंकात खिळवून-हसवून ठेवण्यात संहिता व सादरीकरण बाजी मारते. हे नाटक पाच-सहा वर्षांपूर्वीचे आहे. त्यावेळी प्रकाशात आले नव्हते. पाच वर्षाच्या मध्यंतरानंतर, ‘वयात आल्यावर’ नाट्य रंगमंचावर प्रगटले आहे. त्याच्याही पडद्यामागील रंजक गोष्टी ऐकिवात येत आहेत. संहिता आणि दिग्दर्शक एकमेकांना पूरक तसेच वेगवान आहे.
सागर देशमुख याचा आनंद, पुष्कराज चिरपुटकर यांचा संजय आणि अनिता दाते हिची अनामिका. तिघांनी भूमिकेला न्याय दिला आहे. तिघांचं ट्युनिंग मस्त जुळून आलंय. पाच वर्षांपूर्वीच नाटक असलं तरीही दोन महिने तालमी झाल्याने प्रयोग ‘प्रâेश’ झालाय. तिघेही कलाकार चित्रपट, मालिका, नाटक यात अनुभवी आहे. त्यामुळे सादरीकरणात सहजता आलीय. पुष्कराज हा अनेक वर्षानंतर रंगभूमीवर प्रगटतोय. दोन्ही नवर्यांचे विनोदी प्रसंग रसिकांची हसून पुरेवाट करतात. सागरचा आनंद लक्षवेधी झालाय. पु. ल. देशपांडे, बाबासाहेब आंबेडकर अशा व्यक्तिरेखा त्याने यापूर्वी रंगविल्या होत्या. गंभीर देहबोलीतून विनोदाची फवारणी यात केलीय. अनिता दाते हिने ताकदीने ‘बायको’ उभी केलीय. यातून तिची एक वेगळीच छबी रसिकांपुढे येईल. मालिकांमधून, खास करून महिला रसिकांचे लक्ष वेधणार्या भूमिकांमध्ये यापूर्वी तिला बघितलेल्यांना ही वेगळी भूमिका भुरळ पाडेल. तिघांची केमिस्ट्री चांगली जुळली आहे. हक्काचे हसे-टाळ्या तिघेही वसूल करतात.
तांत्रिक बाजूही नाट्याला पूरक. संदेश बेंद्रे यांचा दिमाखदार दिवाणखाना भुरळ पाडतो. विक्रांत ठकार यांची प्रकाशयोजनाही यथायोग्य. जितेंद्र जोशी यांचे काव्य, त्यात जसराज जोशी याचा सूर चांगलाच जुळलाय. त्यातून नाटकाला अर्थ देण्याचा प्रयत्न आहे. सौरभ भालेराव याचे संगीत जेवढ्यास तेवढे आहे. नाट्यनिर्माते अनुभवी असल्याने बुकिंगचे अर्थगणित आणि रसिकांची आवड-निवड याची पुरती जाण त्यांना आहे. हे नाट्य ‘लंबी रेस का घोडा’ निश्चितच ठरेल. निर्मितीमूल्यात कुठेही तडजोड केलेली नाही.
रंगभूमीवर सध्या सुरू असलेल्या नाटकांवर नजर फिरविली तर मराठी, हिंदी मालिकांचा प्रभाव विषय-आशयावर ठळकपणे दिसून येतो. नवरा-बायको नातेसंबंध किंवा दोघात तिसरा किंवा एकामागे दोन अशी (प्रेम) प्रकरणं दिसताहेत. मालिकांवर जेवढी चर्चा रंगते तेवढी नाटकांवर होताना दिसत नाही, पण याच विषयाचा कल बहुतेक नव्या नाटकात आहे. पुन्हा एकदा रंगभूमीवर आलेलं प्रशांत दळवी यांचे ‘चारचौघी’, संकर्षण कर्हाडे यांचे ‘सारखं काहीतरी होतंय’ आणि ‘नियम व अटी लागू’, इरावती कर्णिक यांचे ‘जर तरची गोष्ट’, मनस्विनी लता रवींद्र यांचे ‘डाएट लग्न’ आणि ‘खरं खरं सांग’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ अशी डझनभर नाटके ही बुकिंग काउंटरवर रसिकांपुढे उभी आहेत. त्यात ‘किरकोळ नवरे’ हे नाट्य हटके हास्यदरबार ठरलंय.
आपल्या समाजात स्त्री-पुरुषांना वेगळे नीतीनियम लागू आहेत. आजही त्यात शंभर टक्के बदल हा झालेला दिसत नाही. बायकोचं पाऊल जराही वाकडं पडलं तर तिला कुटुंबात, समाजात पुन्हा परतीची वाट मिळत नाही. पण याउलट नवर्याने वाकडे पाऊल टाकले तर त्याला परतीच्या वाटा सताड उघड्या आहेत. ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. बरेचदा नवर्याच्या चुकांवर बायकोच पांघरूण घालते असेही दिसते. बायकोला नव्या रूपात सामावून घेण्याची कुटुंबव्यवस्था उभी करून नव्या नजरेतून बघितले पाहिजे. कानेटकर, दळवी, तेंडुलकर, एलकुंचवार, प्रशांत दळवी या नाटककारांनी अनेक स्त्रीरूपे आपल्या नाटकातून आजवर आकाराला आणली. गंभीरपणे त्यावर विचार करायलाही भाग पाडले. याही नाटकात एक गंभीर विषय हसत खेळत ‘किरकोळ घाऊक’ करीत मांडलाय. मध्यंतरी राजू पार्सेकर याचा ‘तीन बायका फजिती ऐका’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याच चालीवर या नाटकाचे बारसे करायचे झाले तर ‘दोन नवरे, फजिती ऐका!’ असं म्हणावं लागेल!
किरकोळ नवरे
लेखन / दिग्दर्शन : सागर देशमुख
नेपथ्य : संदेश बेंद्रे
संगीत : सौरभ भालेराव
प्रकाश : विक्रांत ठकार
गीते : जितेंद्र जोशी
निर्माते : अभिजीत देशपांडे, राहुल कर्णिक, दिनू पेडणेकर