चला, चीनच्या हँगझो शहरात शनिवारपासून (२३ सप्टेंबर) सुरू होणार्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी सज्ज होऊया. मागील काही वर्षांची कामगिरी पाहता पदकलूट अपेक्षित आहे. पदकांची सत्तरी ओलांडणे कठीण नसले तरी शतक गाठणे अवघड आहे. दक्षिण आशियाई, आशियाई आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधील पदकांची लयलूट ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत परावर्तित होत नाही, ही खरी वस्तुस्थिती आहे.
– – –
जागतिक लोकसंख्येचा ६० टक्के भाग हा आशिया खंडाचा आहे. ४.७ अब्ज लोकसंख्या, म्हणजेच सर्वाधिक लोकसंख्येचा खंड अशी त्याची ओळख. इतकी मोठी प्रमाणात लोकसंख्या असूनही, ऑलिम्पिकचा जेव्हा विचार होतो, तेव्हा फक्त चीन, जपान आणि दक्षिण कोरियाची नावे पुढे दिसतात. लोकसंख्येत चीनला मागे टाकून नुकतेच पहिल्या क्रमांकावर गेलेल्या भारतासह बाकीचे देश पहिल्या पदकतालिकेत वीस देशांमध्येही नसतात. अन्य आशियाई देशांना क्रीडात्मक उंची हवी तशी गाठता आली नाही.
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतापुढे प्रामुख्याने आव्हान असेल ते चीन, जपान आणि दक्षिण कोरियाचे. म्हणजेच भारताला या एकंदर स्पर्धेअंती चार ते आठ क्रमांकापर्यंत पोहोचता येऊ शकते. कारण ही पहिली तीन राष्ट्रे ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतही कामगिरीचा दबदबा प्रस्थापित करणारी. २०२०च्या ऑलिम्पिकमध्ये चीन दुसर्या, यजमान जपान तिसर्या आणि दक्षिण कोरिया १६व्या क्रमांकावर होते, तर भारताचा क्रमांक होता ४८वा. हीच आहे आशियातील अव्वल त्रिकूटाच्या आणि भारताच्या कामगिरीतील तफावत. ही तफावत दूर करण्याइतपत भारताची कामगिरी गेल्या काही वर्षांत नक्कीच सुधारलेली नाही. त्यामुळे ही स्पर्धा चालू असताना पदकांची लयलूट करताना भारत दिसला तरी या पदकलुटीचे वास्तव हे ऑलिम्पिकच्या वेळी स्पष्ट होते.
तसे पाहिले तर ही तिन्ही राष्ट्रे नसलेल्या दक्षिण आशियाई म्हणजेच ‘सॅफ’ क्रीडा स्पर्धेत नेपाळ, बांगलादेश, भूतान, मालदीव, पाकिस्तान आणि श्रीलंका या राष्ट्रांपेक्षा भारी कामगिरी करीत भारत मर्दुमकी गाजवतो. तिथे ‘वासरात लंगडी गाय शहाणी’ हेच बोल सार्थकी ठरते. दक्षिण आशियाई, आशियाई आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील यश ऑलिम्पिकमध्ये उंचावत नाही, हीच खरी समस्या आहे.
‘चिनी कम’ यश
१३ फेब्रुवारी १९४९ या दिवशी आशियाई क्रीडा महासंघाची स्थापना दिल्लीत झाली. याच दिल्लीकडे १९५१च्या पहिल्या आशियाई क्रीडा स्पर्धांचे यजमानपद सोपवण्यात आले. भारताने एशियाडच्या ७३ वर्षांच्या इतिहासात दोनदा देदीप्यमान यश मिळवले. १९५१मध्ये १५ सुवर्ण, १६ रौप्य आणि २० कांस्य अशी एकूण ५१ पदके जिंकत दुसरा क्रमांक मिळवला. त्यानंतर १९६२मध्ये १० सुवर्ण, १३ रौप्य आणि १० कांस्य अशी एकूण ३३ पदके मिळवत तिसरा क्रमांक पटकावला होता. या दोन्ही यशांतले समान कारण म्हणजे चीनची अनुपस्थिती. १९५०मध्ये होणार्या आशियाई स्पर्धा अपुर्या तयारीमुळे एक वर्ष लांबणीवर पडल्या. या स्पर्धेत सहभागासाठी जवळपास सर्वच आशियाई राष्ट्रांना निमंत्रणे धाडण्यात आली होती. चीनलाही निमंत्रण गेले होते; परंतु दिलेल्या मुदतीत त्यांनी प्रतिसाद दिला नाही. काश्मीरच्या मुद्द्यावरून पाकिस्तानने भाग घेतला नाही. दक्षिण कोरियाने लंडनला झालेल्या आशियाई राष्ट्रांच्या ऑलिम्पिक प्रतिनिधींच्या बैठकीत सहभागाचे आश्वासन दिले होते. पण कोरियन युद्धामुळे त्यांना माघार घ्यावी लागली. या स्पर्धेप्रसंगी भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलेल्या भाषणातून संयोजकांनी एशियाडचे अधिकृत ब्रीदवाक्य स्वीकारले, ते म्हणजे ‘खेळ खेळा, खेळभावनेने’. त्यानंतर १९६२मध्ये इस्रायल आणि चीनला एशियाडमध्ये स्थान देण्यात आले नाही.
अॅथलेटिक्सवर प्रमुख भिस्त
भारताने आतापर्यंत आशियाई क्रीडा स्पर्धेत १५५ सुवर्ण, २०१ रौप्य आणि ३१६ कांस्य अशी एकूण ६७२ पदके जिंकली आहेत. यापैकी अॅथलेटिक्समधील पदकांची संख्या आहे, ७९ सुवर्ण, ८८ रौप्य आणि ८७ कांस्य अशी एकूण २५४ पदके. म्हणजेच जवळपास ४० टक्के पदके ही अॅथलेटिक्समधील. अगदी एशियाडमधील अॅथलेटिक्सची तुलना जरी केली, तरी भारताचा क्रमांक या यादीत तिसरा आहे. पण ऑलिम्पिक अॅथलेटिक्सच्या पदकयादीत तो ६१व्या क्रमांकापर्यंत घसरतो. जागतिक अजिंक्यपद अॅथलेटिक्स स्पर्धांमध्ये भारताचा क्रमांक ६५वा लागतो, तर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत १५वा. एशियाडमध्ये चीन-जपान, तर ऑलिम्पिक, जागतिक स्पर्धांमध्ये आप्रिâकन देश तसेच ‘तेलश्रीमंती’ जपणारी कतार, बहरिनसारखी राष्ट्रे अग्रेसर असतात.
जागतिक, ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये छाप पाडणार्या नीरज चोप्राला एशियाडचे सुवर्णपदक जिंकणे फारसे जड जाणार नाही. त्याच्यापुढे पाकिस्तानच्या अर्शद नदीमचे कडवे आव्हान असेल. बुडापेस्टच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील भालाफेक प्रकारात नीरजला सुवर्ण आणि अर्शदला रौप्यपदक होते. ज्योती याराजी, तजिंदर तूर, श्रीशंकर मुरली, जेसविन एल्ड्रिन, शैली सिंग, विठ्या रामराज, प्रवीण चित्रावेल, अविनाश साबळे, तेजस्विन शंकर, पारूल चौधरी यांच्यावर भारताच्या अॅथलेटिक्सची प्रमुख धुरा अवलंबून असेल.
अॅथलेटिक्सनंतर कुस्ती, नेमबाजी, बॉक्सिंग या स्पर्धांसह रोविंग (नौकानयन), सेल्िांग (शिडाच्या बोटींची शर्यत) अशा सागरी स्पर्धांमध्ये भारताला पदकाच्या प्रमुख अपेक्षा आहेत. याशिवाय कबड्डीतले सुवर्णपदक जिंकण्यासाठी इराणी अडथळा ओलांडावा लागेल. २०१८मध्ये प्रथमच इराणने भारताची दोन्ही सुवर्णपदके हिसकावली होती. हॉकीच्या संघाकडूनही पदकांची अपेक्षा करता येऊ शकते. याशिवाय टेबल टेनिस, तिरंदाजी, वेटलिफ्टिंग आणि बॅडमिंटन हेसुद्धा खेळ पदकसंख्या उंचावण्यासाठी सक्षम आहेत. ट्वेन्टी-२० क्रिकेट आणि बुद्धिबळ यांच्यासारख्या खेळात भारताचे वर्चस्व दिसून येईल.