विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने गोदी मीडिया म्हणून ओळखल्या जाणार्या १४ चरणचुंबक अँकरांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर अनेकांना पत्रकारितेच्या सन्मानाचे उमाळे येऊ लागले आहेत. मराठीतले काही पत्रधुरंधर या निर्णयाची बेजबाबदार आणि बिनडोक अशा शेलक्या शब्दांत संभावना करण्याइतपत संतापले आहेत. बिनडोक हा शब्द वापरण्याजोग्या अनेक घटना आसपास घडत आहेत बराच काळ. त्यासाठी थेट हा शब्द वापरण्याची हिंमत त्यांनी आजवर केलेली दिसत नाही. इथल्या परिस्थितीवर थेट बोलून सत्ताधीशांची खप्पामर्जी ओढवून घेण्यापेक्षा बोल्सनारो, एर्दोगान, डोनाल्ड ट्रम्प, बोरिस जॉन्सन यांच्यावर लिहायचे आणि असेच नेते सर्व देशांत सापडतात, म्हणून घाबरत घाबरत अंगुलीनिर्देश करायचा, ही यांची निर्भीड पत्रकारिता. विषय विरोधकांचा असला की मात्र भीड चेपते आणि असे वावदूक शब्दप्रयोग करण्याची हिंमत येते. आपले व्यवसायबंधू डिबेटच्या नावाखाली भारतीय जनता पक्षाचा प्रच्छन्न प्रचार करत होते, ऐन कोरोनाकाळात थूक जिहाद, तबलिगी जमात यांच्यावर खोटारडे, प्रक्षोभक कार्यक्रम करत होते, तेव्हा या खर्डेघाशांच्या लेखण्या मास्क घालून काढा पीत बसल्या होत्या की क्वारंटाइन झाल्या होत्या? पत्रकारितेला लाज आणणार्या या जमातीला मुळात सुज्ञ, गंभीर आणि जबाबदार पत्रकारांनी, त्यांच्या संघटनांनीच चाप लावायला हवा होता. किमान त्यांच्या आगलाव्या चाटुकारितेवर चार असूड ओढायला हवे होते. ते केले का या ढुढ्ढाचार्यांनी?
या अँकरांवर बहिष्कार घालण्याऐवजी आघाडीच्या प्रवक्त्यांनी त्यांच्या कार्यक्रमात जाऊन तिथे आपल्या पक्षाची, आघाडीची बाजू जोरकसपणे मांडायला हवी, असा सल्ला काही दीडशहाणे देत आहेत. गेल्या नऊ वर्षांत टीव्हीवर एकही डिबेट पाहिलेली नसावी या सल्लेबहाद्दरांनी. अशा चर्चांमध्ये भाजपचे एक नव्हे, दोन प्रवक्ते असतात, एक अधिकृत प्रवक्ता आणि दुसरा अँकर. पत्रकाराचे काम सत्तेला प्रश्न विचारायचे आहे, हे विसरून मोदीभक्त अँकर भाजपच्या प्रवक्त्याच्या सुरात सूर मिसळून विरोधकांवर टीकेच्या तोफा डागत असतात. जिथे अधिकृत प्रवक्ता कमी पडेल तिथे हेच थयथयाट करतात. पेन्सिल नाचवत नेशन वाँट्स टु नो म्हणून आपणच बोलावलेल्या पाहुण्यांच्या अंगावर धावून जाणारा अर्णब गोस्वामी हा लोकमान्य टिळकांचा वारस आहे की गोपाळ गणेश आगरकरांचा? मुळात हे पत्रकार तरी आहेत का? पत्रकार तटस्थपणे बातम्या आणतात आणि त्या तटस्थपणे सादर करतात. त्यांची जी काही विचारधारा असेल ती नावाने लिहिलेल्या लेखातून व्यक्त होते, हा एक सर्वसाधारण संकेत आहे. हे चर्चासंवादाचे कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करणारे लोक निव्वळ अँकर आहेत. चर्चेला आलेल्यांना बोलते करावे, काही अवघड प्रश्न विचारावेत, वादसंवाद करावा आणि उपस्थित सगळ्या पक्षांमध्ये सौहार्दयुक्त संतुलन ठेवावे, हे त्यांचे काम. ते कष्टाचे, कौशल्याचे आहेच. त्याला अभ्यासाची, प्रसंगावधानाची जोड असावी लागतेच. पण, संवाद न करता वाद घालणारे, देशात सामाजिक तेढ पसरवणारे कार्यक्रम आयोजित करून दुहीच्या आगी पेटवणारे हे अँकर गोदी मीडिया म्हणून उगाच बदनाम नाहीत. यांचे कारनामेच तसे आहेत. गेली नऊ वर्षे ते सत्तेच्या पालख्या वाहताहेत आणि त्यांचे लाभ मिळवत आहेत. हे विरोधकांना बोलू देणार नाहीत, त्यांचे बोलणे मध्येच तोडणार, त्यांना एकतर्फी भ्रष्ट, देशद्रोही वगैरे ठरवणार, त्यांना अपमानित करणार आणि मग हा कच्चा माल भाजपच्या आयटी सेलच्या फेक न्यूज फॅक्टरीकडे पाठवणार. तिथे मग या देशप्रेमी अँकर्सनी देशद्रोही विरोधकांचा कसा पर्दाफाश केला, कसे त्यांना गप्प केले, कशी त्यांना पळता भुई थोडी केली, अशा दिशाभूल करणार्या क्लिप्स आणि रील्सचा कचरा तयार करून तो भक्तांच्या ग्रूपवरून सगळीकडे व्हायरल केला जाणार, ही यांची, गुन्हेगारांची असते तशी, मोडस ऑपरंडी आहे. आज इंडियाने बहिष्काराचे अस्त्र उगारल्यावर त्यांना सबुरीचा सल्ला देणार्यांनी या व्यवसायबांधवांना व्यावसायिक शुचितेच्या पालनाचे किती धडे दिले?
पत्रकार हा पगारी नोकर असतो, मुळात मालक सत्तेपुढे झुकले आहेत, त्यांच्या आर्थिक नाड्या आवळण्याची ताकद केंद्र सरकारकडे आणि भाजपच्या राज्य सरकारांकडे असते. त्यामुळे त्यांच्या तालावर हे अँकर नाचतात, त्यांचा काय दोष, असा मानभावी हातझटकूपणा गोदी मीडियात समाविष्ट नसलेल्या काही सुजाण पत्रकारांनीही करावा, हेही आश्चर्यकारक आहे. राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेत गोंधळ घाला, असा आदेश आल्यावर तो धुडकावून राजीनामा देणारा खरा पत्रकार की मालकाने छू म्हटले की कोणाच्याही अंगावर धावून जाणारा खरा पत्रकार? ज्याला पाठीचा कणाच नसेल, स्वत:चे काही तारतम्य नसेल, विवेकबुद्धी नसेल, त्याने या व्यवसायात यावे कशाला? खरी गोष्ट वेगळी आहे. हे अँकर स्वत:च बुद्धी गहाण ठेवून मोदीभक्तीत लीन झालेले आहेत. काही मुळातच या विचारांचे स्लीपर सेल होते, जे २०१४नंतर जागृत झाले आणि काही शुद्ध बाजारू, धंदेवाईक सुपारीबहाद्दर आहेत. ज्याची पोळी खातात, त्याची टाळी वाजवतात. त्यांच्या पात्रतेचे मालक त्यांना लाभले आहेत, एवढेच.
इंडिया आघाडीला या बहिष्काराचा फटका बसेल, त्यांना प्रसिद्धी मिळणार नाही, हे अँकर आता हुतात्मे ठरतील, अशी भीती घातली जाते आहे. या आघाडीला सोडा, भाजपलाही आपले विचार पोहोचवण्यासाठी, प्रचार करण्यासाठी प्रस्थापित इलेक्ट्रॉनिक माध्यमांची गरज राहिलेली आहे का? तशी त्यांची विश्वासार्हता राहिलेली आहे का? या बहिष्कारावर घेतलेल्या पोलमध्ये जनतेने काय कौल दिला आहे, ते पाहा एकदा. इंडिया आघाडीने बहिष्कार घालण्यासाठी पुढचीही यादी तयार केली आहे. तीही लवकरच प्रसृत होईल. त्याबद्दल कोणाला चाड असेल, तर त्यांनी आपल्या कार्यपद्धतीत बदल करायला हवा. संतुलन साधायला हवे. सत्तेला प्रश्न विचारायला हवे. ते जमत नसेल तर बसा मोदीभजनाच्या चिपळ्या वाजवत. इंडियाला तुमची गरज नाही.