सदावर्ते
पिसाळल्या श्वानागत बोललो
भडकवली कामगारांची माथी
लाखो गरीब कामगारांच्या
संसाराची केली माती
भाजपनेच दिली फूस
विलीनीकरण लावून धरा
घेत सुपार्या देत सुपार्या
डबलगेम होता खरा
दगडफेक करण्याचे तर
केव्हाच प्लानिंग केले होते
बारामतीची जागा चुकली
तेव्हाच जेल पक्के होते
—– —– —–
किरीट सोमय्या
मी कुठे गायब होतो
बसलो होतो हिशोब मोजत
अजून मोजून संपत नाही
जामीन मिळाला वाजत गाजत
माझी अफाट बुद्धी बघून
न्यायदेवताही खूष झाली
हा तर पीएम व्हायला हवा
असे चुकून नाही म्हणाली
बोबड्या बोलाची चेष्टा करतात
मला म्हणतात डिलीट थोमय्या
त्यांना नाही माहीत अजून
कसा करतो ता ता थैय्या
—– —– —–
नरेंद्र मोदी
कसली गरिबी, कसली भाववाढ
कशाला उगाच मारता बोंबा
देश चाललाय विकासाकडे
करायला हवा र्होंबासोंबा
लंका बघा भिकेला लागली
आपली मान सदैव ताठ
आम्ही पुरवतो मदत त्यांना
सुखसमृद्धीचा आमचा थाट
भरपूर आहे विकण्यासारखे
देशच आहे इतका मोठा
तुम्हाला सांगतो आपणास कधी
पडणार ना कशाचा तोटा
—– —– —–
देवेंद्र फडणवीस
सत्ता हेच साधन असते
गब्बर दादा होण्याचे
म्हणून आज दु:ख होते
पाण्याबाहेर सुकण्याचे
समोर दिसतो तुडुंब सागर
लाटेबरोबर आम्ही बाहेर
अडकून बसलो तिथेच रुतून
आम्हीच बसलो ना खडकावर
पुन्हा सीएम बनण्यासाठी
किती काळ पाहावी वाट
आता संयम सुटत चालला
महाआघाडीने टाकली खाट
—– —– —–
अमित शहा
आमच्यात आला तर पायघड्या
नाहीतर ईडीच्या हाथकड्या
आमचा पक्ष आणखी फुगवा
पक्षात देतो ऑफर बड्या
गुंड असा किंवा पुंड असा तुम्ही
सर्वांना मिळे संरक्षण
आमच्या पंखाखाली बागडून
ढेकर द्या पैशाचा झटकन
येत्या निवडणुकीपर्यंत
पक्ष सुजत जायलाच हवा
म्हणूनच हिंदुत्वाचे भरते
बाकी तुम्ही जाणताच कावा
– श्रीकांत आंब्रे