इंडियन प्रीमियर लीग क्रिकेटच्या १७व्या पर्वाला शुक्रवारपासून (२२ मार्च) प्रारंभ होतोय. स्वाभाविकपणे चेन्नई सुपर किंग्जच्या यशोप्रवासाचा शिल्पकार, त्यांचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी आता पुन्हा मैदानावर दिसणार आहे. मानेपर्यंत केस वाढवून हंगामाला प्रारंभ करणारा धोनी पुन्हा पराक्रम दाखवणार का, ही क्रिकेटरसिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या चर्चांबाबत माहीला लिहिलेलं हे अनावृत पत्र.
– – –
।। श्री क्रिकेटदेवता प्रसन्न ।।
परमोच्चप्रिय माही,
माझ्यासारख्या असंख्य क्रिकेट वारकर्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे. २२ मार्चपासून सुरू होणार्या ‘आयपीएल’च्या १७व्या पर्वात तुझा मैदानी आविष्कार पाहायची आणखी एक संधी प्राप्त होणार आहे. तुझ्या कारकीर्दीपुढे पूर्णविराम तर दिला जाणार नाही, ही भीती गेली अनेक वर्ष देशातील क्रिकेटरसिकांच्या मनात होती. गतवर्षी तू पाचव्यांदा ‘आयपीएल’ चषक उंचावलास. जुन्या-नव्या खेळाडूंची मोट बांधलीस. जेतेपदावर शिक्कामोर्तब केल्यानंतर सुनील गावस्कर यांनी ‘आयपीएल’ची सांगता झाल्यानंतर तुझ्याकडून जर्सीवर स्वाक्षरी घेतली, तेव्हा आमच्या मनात काहूर माजलं. हे तुझं अखेरचं मैदानी दर्शन तर नव्हे?… या प्रश्नाला तू ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन…’ हे छातीठोकपणे सांगत निरुत्तर केलंस. आता पुन्हा दोन महिने धोनीमय असणार आहेत, याच निमित्तानं केलेला हा पत्रप्रपंच.
पाहा, देशात सध्या सार्वत्रिक निवडणुकांचं वातावरण पसरलंय. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआय) सावधतेनं पहिल्या १५ दिवसाचं वेळापत्रक जाहीर करून ‘थांबा आणि वाट पाहा’ हे धोरण स्वीकारलं होतं. पण आता निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर झाल्यानं ‘बीसीसीआय’ला उर्वरित वेळापत्रक तयार करता येईल. वर्तमानपत्रं, वृत्तवाहिन्या, डिजिटल मीडिया आणि सोशल मीडिया इथे सर्वत्र ही राजकीय रणधुमाळी पुढील दोन महिने गाजेल. ४ जूनला देशात सत्ता कुणाची, हे पक्कं होईल. या सार्या राजकीय गदारोळात ज्या ठिकाणी चेन्नई सुपर किंग्जचा सामना असेल, तिथे मात्र आवाज कुणाचा?… ‘धोनी… धोनी… सीएसके… सीएसके’ हा एकच नाद स्टेडियमवर गुंजेल. अर्थात, ‘आयपीएल’वर सत्ता मात्र तुझ्या धोनी सेनेचीच असेल, ही तमाम देशवासियांची इच्छा आहे.
आमच्या धकाधकीच्या वाळवंटी आयुष्यात तुझा खेळ ओअॅसिसची भूमिका बजावतो. दु:ख विसरायला लावण्याची क्षमता तुझ्या खेळात आहे. एमएसडी, माही, थाला, मिडासटच, इत्यादी अशा अनेक आख्यायिका काय उगाच अजरामर झाल्यायत काय? तुझा तल्लख मेंदू हा उत्तम रणनीती आखतो. ‘मॅनेजमेंट’चा अभ्यास करणारी मुलंही तुझ्या स्ट्रॅटजिक प्लानिंग (व्यूहरचना) किंवा डिझास्टर मॅनेजमेंटचे (आपत्कालीन व्यवस्थापन) धडे गिरवतात. अशी तुझी थोरवी…
गतवर्षीच्या आठवणी आजही डोळ्यांसमोर घर करून आहेत. जडेजा किंवा तुझ्याआधी येणारा फलंदाज बाद व्हावा, जेणेकरून तू फलंदाजीला मैदानावर उतरावंस, यासाठी चाहते देव पाण्यात ठेवतात… तुझ्या भात्यातील फटक्यांची खास अस्त्रं चौकार-षटकारांच्या रुपात तू सीमापार धाडतोस… मैदानावरील पिवळ्या जल्लोषाचा उत्साह आणखी द्विगुणित करतोस… याची पुन:प्रचिती आम्ही ‘आयपीएल’च्या सलग १७व्या अध्यायात घेणार आहोत… वयाच्या ४२व्या वर्षीही तू पुन्हा आपली जादू दाखवशील असा आम्हाला विश्वास आहे. गेल्या वर्षी पायाच्या दुखापतीची तमा न बाळगता तू बँडेड बांधून खेळलास. मोठ्या खेळी तुझ्याकडून साकारल्या नाहीत. बॅट मंदावल्याचे आसूड टीकाकारांनी ओढले. पण तुझं यष्टीरक्षणातील चापल्यात वयपत्वे कोणताही फरक पडला नाही. केएल राहुल, श्रेयस अय्यर, जडेजासारखे खेळाडू दुखापती आणि तंदुरुस्तीशी नेहमीच झुंजताना आढळतात. त्यांनी तुझ्याकडून तंदुरुस्तीचे धडे गिरवण्याची नितांत आवश्यकता आहे.
दोन ‘आयपीएल’मधीलच्या कालखंडात तू धोनी इन्स्टिट्यूट ऑफ फिटनेसद्वारे तंदुरुस्तीचे धडे दिलेस, तर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीला खेळाडूंच्या पुनर्वसनाचं कार्य बंद करावं लागेल. या प्रशिक्षण संस्थेत तू नेतृत्वक्षमता आणि यष्टीरक्षकही घडवू शकशील.
गतवर्षीच्या ‘आयपीएल’मध्ये ‘अजिंक्य रहाणे २.०’ पाहायला मिळाला. रहाणे संपलाय, तो कसोटी संघातही नकोसा झालाय, तो मर्यादित षटकांचे क्रिकेट काय खेळणार, हे त्याच्याविषयीचे अंदाज तू खोटे ठरवलेस. मथिशा पथिराणाद्वारे ‘दुसरा मलिंगा’ घडवण्याचं श्रेयही तुलाच जातं, याची कबुली लसिथ मलिंगानंच काही दिवसांपूर्वी दिली. एकीकडे सलामीवीर ऋतुराज गायकवाड, अष्टपैलू शिवम दुबे, वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे, दीपक चहर आणि राजवर्धन हंगर्गेकर या युवा पिढीच्या पाठीशी तू समर्थपणे उभा राहिलास. चुकांतून काय शिकायचं, हे तू त्यांना दाखवून दिलंस. तर अंबाती रायुडू, मोईन अली या चाळीशीकडे झुकलेल्या अनुभवी शिलेदारांना तू फारशी चमक दाखवत नसतानाही दुरावलं नाहीस. तू अशा प्रकारे जुन्या-नव्याची उत्तम मोट बांधून चेन्नईला पुन्हा जेतेपद मिळवून दिलंस. जणू काही ‘आयपीएल’ यशाचं सूत्रच तुला ज्ञात होतं…
चला, आता नव्या हंगामाला सामोरे जाताना काही धक्के तुझ्या संघाला बसतायत. न्यूझीलंडचा सलामीवीर फलंदाज आणि यष्टीरक्षक डेव्हॉन कॉन्वेनं दुखापतीमुळे माघार घेतलीय. रणजी बाद फेरीत दुखापत झालेला शिवम दुबे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत सावरतोय. मुस्ताफिझूर रेहमानला ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या तयारीसाठी बांगलादेशनं ११ मेपर्यंतच खेळण्याची परवानगी दिलीय. पण अशा प्रकारचे असंख्य धक्के पचवून नव्यानं संघबांधणी करण्यात तू वाकबदार आहेस. या निर्णयप्रक्रियेत तुला प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंगचही तोलामोलाची साथ वर्षानुवर्षे मिळतेय.
तसं काही सकारात्मकही सीएसकेसाठी घडलंय. एकदिवसीय विश्वचषकातील न्यूझीलंडचे दोन तारे रचिन रवींद्र आणि डॅरेल मिचेल तुझ्या ताफ्यात सामील झालेत. त्यांच्यासाठी बेन स्टोक्स आणि ड्वेन प्रीटोरियसला बाहेर पाठवण्याचा उत्तम निर्णय संघाकडून घेतला गेला. याशिवाय रणजी करंडक गाजवणारा अष्टपैलू शार्दूल ठाकूर दोन हंगामांनंतर पुन्हा सीएसकेकडे येतोय. गतवर्षी चंद्रकांत पंडित सरांनी कोलकाता नाइट रायडर्स संघासाठी खेळताना शार्दूलवर काही प्रयोग केले. ते काही प्रमाणात यशस्वी झाले. पण तू त्याला आणखी पैलू पाडशील, अशी अपेक्षा आहे. यूपी ट्वेन्टी-२० लीग आणि सय्यद मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धेमध्ये छाप पाडणार्या समीर रिझवीचा तू उत्तम उपयोग करून त्याला निवड समितीचं लक्ष वेधण्याइतपत परिपक्व करशील, हे निश्चित. याशिवाय ‘मिस्ट्री स्पिनर’ माहीश तीक्ष्णा, मिचेल सँटनर, निशांत सिंधू, अजय मंडल, प्रशांत सोलंकी, मुकेश चौधरी आणि सिमरनजीत सिंग असे आणखीही उत्तम पर्याय तुझ्याकडे आहेत. त्यामुळे यंदाच्या हंगामातही तुझ्या पिवळ्या महासत्तेला आव्हान देणं सोपं नसेल.
सीएसकेनं तुझ्या मावळत्या कारकीर्दीचा अंदाज घेत गेल्या काही वर्षांत जडेजाकडे नेतृत्व देण्याचा केलेला प्रयोग सपशेल अपयशी ठरल्याचे आम्ही पाहिले. अगदी स्टोक्सकडेही कर्णधारपदाचा उमेदवार म्हणून पाहिलं जात होतं. पण तो दुखापती आणि लय हरवल्यानं संघाचा विश्वासार्ह खेळाडूही होऊ शकला नाही. परंतु तुझ्या तालमीत ऋतुराजचे नेतृत्वगुणही विकसित झालेत. गेल्या वर्षी त्याच्या नेतृत्वाखाली भारताला एशियाडमधील सुवर्णपदक जिंकता आलं होतं. याव्यतिरिक्त मुंबई इंडियन्सनं हार्दिक पंड्याकडे नेतृत्वधुरा दिल्यामुळे रोहित शर्मा हा फक्त एक सलामीवीर फलंदाज म्हणून संघात आहे. तू रोहितची सीएसकेचा भावी कर्णधार म्हणून शिफारस करशील अशी शक्यता सध्या चर्चेत आहे. हा यक्षप्रश्न सोडवण्यासाठीही काही रणनीती तुझ्या मनात नक्कीच घोळत असतील.
क्रिकेट हा धर्म आणि सचिनला देव मानणार्या देशात वानखेडे स्टेडियमवर सचिनचा पूर्णाकृती पुतळा गतवर्षी त्याच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त तयार करण्यात आला. चेन्नईवासियांचं तुझ्यावरचं निस्सीम प्रेम आणि भक्ती पाहता चेपॉकवर तुझाही पुतळा लवकरच बांधल्यास आश्चर्य वाटू नये.
काही दिवसांपूर्वी तू जामनगरला अनंत अंबानीच्या शाही विवाहपूर्व सोहळ्याला पत्नी साक्षीसह हजेरी लावली होतीस. याचप्रमाणे सीएसकेही तुझ्या सरावाची ताजी छायाचित्रं ‘एक्स’वर पोस्ट करीत असते. यातील तुझी सध्याची केशरचना सर्वांचंच लक्ष वेधतेय. तसा केशरचनेचा धक्का याआधीही तू अनेक मोठ्या आव्हानांआधी दिलायस. त्यामुळे चाहत्यांनी सुपरहिट ‘अॅनिमल’ चित्रपटाचा नायक रणबीर कपूरप्रमाणे केलेल्या केशरचनेला भरभरून दाद दिलीय. रणबीर आणि अनिल कपूर या ‘अॅनिमल’ सिनेमातील बाप-लेकांनीही ‘एक्स’वर तुझी प्रशंसा करण्याची संधी सोडलेली नाही. पण खरं तर ही केशरचना शैली तुझ्या प्रारंभीच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतही तू केली होतीस. त्यावेळी तुझी फटकेबाजी आणि लांब केस ही तुझी ‘स्टाइल स्टेटमेंट’ झाली होती. अगदी पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनीही तुझ्या केशरचनेचं कौतुक केलं होतं. ‘अॅनिमल’ चित्रपटाचं कथानक आपल्याला समजून न घेणार्या बापाच्या रक्षणासाठी लढणार्या शूर मुलावर बेतलंय. मग त्या अनुषंगानं दिग्दर्शकानं दाखवलेला नरसंहार, वगैरे, वगैरे…. इथे तू तुला समजून घेणार्या पिवळ्या वेशातील चाहत्यांसाठी हिंमतीनं लढतोयस. इथे नरसंहार नाही. कारण ‘कॅप्टन कूल’ म्हणून ओळखला जाणारा तू शांतीदूत. प्रतिस्पर्धी संघांमधील जगातील कोणत्याही सामर्थ्यशाली खेळाडूविरोधात तुझ्याकडे रणनीती उपलब्ध आहे. तू बुद्धिबळाप्रमाणे डाव रचतोस आणि त्याला निष्प्रभ करतोस. त्यामुळे ही विरुद्ध टोकं…
तूर्तास, तुझ्या खेळामुळे जरी ‘बीसीसीआय’चं अर्थकारण, ब्रँडिंग हे सारं तू प्रभावित करीत असलास तरी देशवासियांचा तू भावनिक आधार आहेस. ‘७’ क्रमांकाच्या जर्सीचा महिमा यंदा पुन्हा तू दाखवशील, अशी आम्हाला आशा आहे. तुला ‘आयपीएल’मधील चेन्नईच्या सहाव्या विजेतेपदासाठी खूप सार्या मन:पूर्वक शुभेच्छा… ‘विजयी भव:’… सीएसकेचं विजेतेपद चिरायू राहो!
– तुझा निस्सीम चाहता