भारतीय जनता पक्षाने नरेंद्र मोदी का परिवार या टॅगलाइनने केलेली एक जाहिरात अलीकडे अफाट लोकप्रिय झाली आहे… मात्र ती भाजपला हवी त्या अर्थाने नव्हे, तर संपूर्णपणे उलट्या अर्थाने लोकप्रिय झाली. पंतप्रधान मोदी यांना आंतरराष्ट्रीय वर्तुळात केवढा मान आहे, हे सांगण्यासाठी युक्रेनचं युद्ध त्यांनी एका फोनवर थांबवलं, अशी एक लोणकढी व्हॉट्सअप विद्यापीठातून फिरवण्यात आली होती. मेंदूगहाण भक्त वगळता कोणाचाही त्यावर विश्वास बसला नव्हताच म्हणा! युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय मुलांना परत सुखरूप भारतात आणण्यासाठी कोणत्याही सरकारने केले असते तसेच प्रयत्न मोदी सरकारनेही केले. मात्र, इतर कोणाला या कर्तव्यपालनाचाही प्रचार करण्याची जाहिरातबाजी सुचली नसती; शहिदांच्या मढ्यावरचं लोणी खाणार्या भाजपने ती केली. परत आलेल्या विद्यार्थ्यांना बळजबरीने मोदींचा जयजयकार करायला लावणे, भारत माता की जय वगैरे घोषणा द्यायला लावणे असे उद्योग त्यांच्याकडून करून घेतले. मुळात स्वातंत्र्याच्या अमृतकाळात, मोदीकाळात, दुसर्या रामराज्यात, विकसित भारतात ही मुलं आपला देश सोडून युक्रेनला शिकायला का गेली होती, हा प्रश्न काही भाटांना पडला नाही.
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या इव्हेंटबाजीतून पुन्हा नवा इव्हेंट जन्माला घालण्यात आला आहे, एका जाहिरातीच्या रूपाने. या जाहिरातीत युक्रेनमध्ये अडकलेल्या आपल्या मुलीच्या भवितव्याच्या चिंतेने व्यथित असलेल्या आईला त्या मुलीचे बाबा दिलासा देतात, की ‘वो’ करेगा कुछ ना कुछ! ती मुलगी मग विमानातून तिरंगा फडकवत बाहेर येताना दिसते आणि बाहेर आल्यावर आई तू कशी आहेस, बाबा कसे आहात वगैरे न विचारता एकदम मोदीजींनी कसं युद्ध थांबवलं आणि आम्हाला इथे आणून पोहोचवलं, असं अगदी सद्गतित होऊन आईवडिलांना सांगते.
ही बटबटीत जाहिरात आणि त्यातली ‘उन्होंने वॉर रुकवाया पापा’ ही बालिश थाप हास्यास्पद होतीच. त्यामुळे साहजिकच जाहिरात प्रदर्शित झाल्यापासून अनेक लोकांनी कमेंट्सच्या सेक्शनमध्येच अतिशय तीव्र शब्दांत जाहिरातीतल्या दाव्याची खिल्ली उडवली होती. मात्र, ही जाहिरात खर्या अर्थाने उलटली ती इलेक्टोरल बाँड प्रकरण बाहेर पडल्यामुळे; सर्वोच्च न्यायालयाच्या कानपिचक्यांमुळे स्टेट बँक ऑफ इंडियाला निवडणूक रोख्यांचे व्यवहार खुले करायला लागल्यानंतर.
देशातल्या सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या या प्रतिष्ठित बँकेच्या उच्चाधिकार्यांनी सत्ताधीशांच्या ताटाखालचं मांजर बनून सर्वोच्च न्यायालयाचा आदेश धुडकावण्याचा, त्यातून पळवाटा काढण्याचा प्रयत्न केला होता. तो सर्वोच्च न्यायालयाने खरमरीत शब्दांत हाणून पाडल्यानंतर आणि इलेक्टोरल बाँड असंवैधानिक आहेत, असा स्पष्ट निकाल दिल्यानंतर स्टेट बँकेने ते तपशील निवडणूक आयोगाकडे दिले आणि सत्ताधारी पक्षाचे वेठबिगार असल्याप्रमाणे वागणार्या आयोगालाही ते झक्कत प्रसिद्ध करावे लागले.
इथे या जाहिरातीतल्या मुलीचे मम्मी, पप्पा आणि खुद्द ती यांचं नष्टचर्यच सुरू झालं. आधुनिक काळातली व्यंगचित्रकलाच असलेल्या मीम्समध्ये या अभिनेत्रीच्या नाटकी रडारडीचे फोटो वापरून मीमर मंडळींनी धुमाकूळ घातला (त्याचा वानोळा ‘मार्मिक’च्या वाचकांना समोरच्याच पानावर पाहता येईल). या मुलीच्या तोंडचे उद्गारच बदलून टाकले त्यांनी. या मुलीच्या रडव्या भावमुद्रांवर चिकटवलेले संवाद पाहा… ‘चौकीदारही चोर निकला पापा’, ‘या सुप्रीम कोर्टाचं काहीतरी करा पापा’, ‘चंद्रचूड यांनी पर्दाफाश केला पापा’, ‘आता लोक पीएम केअर फंडाचाही हिशोब मागतायत पापा’. अशा अफलातून मीम्सचा पाऊस पडला आहे सोशल मीडियावर. मोदींच्या भक्तगणांनी सोशल मीडियावर खोटेनाटे मजकूर टाकून जी काही अपप्रचाराची बांधणी केली होती ती या जाहिरातीने आणि इलेक्टोरल बाँड्सवरच्या मीम्सनी पार उधळून टाकली. शेवटी एका मीममध्ये मुलीचे वडील म्हणतायत की कशाला ही जाहिरात केलीस बेटा? अन्य एका मीममध्ये ती वडिलांना म्हणते आहे की सगळे माझी चेष्टा करताय पापा, मला युक्रेनला परत जायचंय पापा!
जाहिरातीत एक अभिनेत्री आहे; तिच्याजागी खरोखरच कोणी युक्रेनहून आलेली मुलगी असती, तर युद्ध थांबलेलं नसतानाही ती युक्रेनला परत गेली असती, इतकी खिल्ली इथे उडाली आहे तिची. बस हो गयी महँगाई की मार म्हणून २०१४ साली जनतेला मूर्ख बनवणार्या काकू कुठे हरवल्या असा प्रश्न २०१९ साली मतदारांना पडला होता प्रचारकाळात. त्याचीच ही त्याहून मोठी आवृत्ती ठरली आहे.
स्विस बँकेतला काळा पैसा घेऊन येण्याचा गमजा करणार्या मोदी सरकारला आपल्याच देशातल्या स्टेट बँकेकडून माहिती बाहेर जाऊ नये यासाठी एवढा आटापिटा करण्याची वेळ यावी हा दैवदुर्विलास आहे. हा देशातला एक प्रचंड मोठा आर्थिक घोटाळाच आहे. भ्रष्टाचाराचे सोयीस्कर कर्दनकाळ अण्णा हजारे आणि त्यांच्याभोवती रामलीला मैदानात गरबा नृत्य करणारी प्रसारमाध्यमे आज मूग गिळून गप्प बसले आहेत. पण, भाजपच्याच जाहिरातीने लोकांना अखेर सत्य सांगून टाकलं, चौकीदारही चोर निकला पापा! अब तो जागो!!