शिवतीर्थावर खर्या शिवसेनेच्या साथीने काँग्रेसची सभा झाली, इंडिया आघाडीचा प्रचाराचा जोशात नारळ फुटला, लोकांच्या उत्स्फूर्त सहभागाने शिवतीर्थ शिगोशीग भरलेले पाहिले आणि मिंध्यांना पोटशूळ उठला… देशाला स्वातंत्र्य मिळवून देणार्या पक्षाचा सहभाग असलेली सभा झाल्याने शिवतीर्थ अपवित्र झालं असा साक्षात्कार त्यांना, देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात कणभराचा सहभाग नसलेल्या, आयत्या बिळावरच्या नागोबांच्या मांडीवर जाऊन बसल्यावर झाला आहे. काँग्रेस पक्षावर, त्यांच्या नेत्यांवर, खासकरून मुंबईतल्या प्रदेश काँग्रेसवर शिवसेनाप्रमुखांच्या कुंचल्याने कायम धारदार प्रहार केले होते. पण, काँग्रेसच्या योगदानाबद्दल त्यांच्या मनात ना कधी शंका होती, ना इंदिरा गांधी यांच्यासारख्या रणरागिणीबद्दलचा आदर त्यांनी कधी लपवला. शिवसेनाप्रमुखांच्या हयातीत शिवसेनेने किती वेळा काँग्रेसबरोबर हातमिळवणी केली आहे, याची माहिती ‘मार्मिक’ने एका लेखातून याआधीही दिली होतीच. तरीही ज्यांचे डोळे (कशाने जडावले आहेत ते महाशक्तीच जाणे) उघडले नसतील, त्यांनी ते नीट उघडून फाडफाडून पाहावे… हे खुद्द बाळासाहेबांच्या कुंचल्यातून साकार झालेलं चित्र आहे १९८०च्या जून महिन्यातलं. आईचं दूध विकणं ज्यांना अपवित्र वाटलं नाही त्यांना तेव्हा दाढी तरी फुटली होती की नाही, याबद्दल शंकाच आहे!